प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.             

कातन्त्रशाखेचा काश्मीरमधील इतिहास- काश्मीरकडे कातंत्रशाखेची वाढ निराळया प्रकारानें झाली. दुर्गसिंहाच्या सूत्रपाठापेक्षां हा सूत्रपाठ बराच निराळा आहे. यावरून काश्मिरी पंडितांचा दुर्गसिंहाशीं परिचय फार उशिरां झालासें दिसतें. तेथपर्यंत कातंत्रशाखेवर स्वतंत्र टीका व सारग्रंथ लिहिण्यांतच या पंडितांनीं काल घालविला असें दिसतें. बाराव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत कातंत्र व्याकरणच काश्मीरकडे प्रचलित होते असें डॉ.बुहलर म्हणतो. काश्मिरी पंडितांच्या ग्रंथांपैकीं फारच थोडयांचीं हस्तलिखितें आज उपलब्ध आहेत. उपलब्ध ग्रंथांत भट्ट जगंध्दाराचा बालबोधिनी हा एक ग्रंथ असून त्यावर उग्रभूति नांवाच्या एका टीकाकाराची न्यास नांवाची टीका आहे. उग्रभूति हा इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या उत्तरार्धांत होऊन गेला असावा. छिछुभट्ट नांवाच्या एका टीकाकारानें याच सुमारास लिहिलेला लघुवृत्ति नांवाचा आणखी एक ग्रंथ प्रसिद्ध आहे. या पुढच्या ग्रंथकारांत विशेष नामनिर्देश करण्यासारखा कोणी नाहीं.