प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.               

क्रमादीश्वराच्या ग्रंथाचें स्वरुप.- क्रमादीश्वरानें आपला ग्रंथ भर्तृहरीच्या महाभाष्यदीपिकेच्या नमुन्यावर लिहिला असून त्यांत उदाहरणेंहि भट्टिकाव्यांतील घेतलेलीं आहेत.  हा ग्रंथ पाणिनीच्या ग्रंथाच्या तीन चतुर्थांशाएवढा असून अवश्यक वाटतील ते नियम काढून टाकणें व नवीन पद्धतीनें विषयाची मांडणी करणें असल्या प्रकारच्या क्रमादीश्वरानें सुधारणा केल्या आहेत.  याच्या ग्रंथाचे सात पाद असून आठवा प्राकृताबद्दलचा पाद मागाहून जोडलेला आहे.  व्यवस्थित युक्तिवाद, न्यायशुद्ध विधानें इत्यादि बाबतींत बोपदेव वगैरेंच्या व्याकरणांचा नंबर याच्या बराच वर लागेल.  परंतु अशा तऱ्हेचे हें पहिलेंच व्याकरण असल्यानेंहि कदाचित असें होणें शक्य आहे.