प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
चांद्र संप्रदायाचे तिबेटकडे प्रचारांत असलेले ग्रंथ- हे ग्रंथ पुढें दिल्याप्रमाणे आहेत.ते संस्कृतमध्यें आहेत किंवा यांचे तिबेटी भाषेत अक्षरश:भाषांतर आहे.
(१)पाणिनीच्या अ ष्टा ध्या यी शीं जु ळ णा रे सू त्र पा ठ.- याचे सहा भाग आहेत. इ.स. १३५६ मध्यें लिहिलेली संपूर्ण हस्तलिखित प्रत अलीकडे हिंदुस्थान सरकारला नेपाळांतून मिळाली असून ती आतां कलकत्ता शहरीं आहे.शिवाय याचे कित्येक भाग केंब्रिज येथें असून संपूर्ण भाषांतर तंजावर येथें आहे.
(२)सू त्र वृ त्ति- हा फार महत्वाचा ग्रंथ असून त्याची भाषापद्धति आणि विषयविवेचन काशिकावृत्तींशी इतकें जुळतें कीं, यांत बहुतेक स्वत:चंद्रगोमिन याचेंच मूळ स्पष्टीकरण असावें असें वाटतें. ग्रंथसमाप्तीमध्यें, हा ग्रंथ धर्मदास यानें लिहिला असा उल्लेख आहे; परंतु धर्मदास हा चंद्रगोमिन् याचा शिष्य असावा व त्यानें आपल्या गुरूचे शब्द जसेचे तसेच उतरून घेतले असावेत. सटीक सूत्रांची हस्तलिखित पूर्ण प्रत खाटमांडू येथील ग्रंथालयात आहे.
(३)सू त्र प द्ध ति- सूत्रपाठाच्या पहिल्या व दुसऱ्या भागाचे कित्येक तुकडे केंब्रिज येथें राखून ठेविले आहेत.
(४)चं द्र अ लं का र- ही एक अज्ञात ग्रंथकारानें लिहिलेली सूत्रपाठाची टीका होय. पांचव्या व सहाव्या भागासंबंधीं एक तुटक पुस्तक प्रो.बेन्डॉल यांनां नेपाळांत मिळालें असून तें सध्यां त्यांच्या ताब्यांत आहे.
(५)अ धि का र सं ग्र ह- हें एक चत्मकारिक लहानसें पुस्तक आहे. यांत चंद्रसूत्राचे ठळक नियम अथवा अधिकार असून तें किती सूत्रांनां लागू पडतात हें दाखविलें आहे. हें फक्त तंजावर येथें आहे.
(६)धा तु पा ठ- या ग्रंथांत चांद्र पद्धतीप्रमाणें धातू एके ठिकाणीं दिले आहेत.ही पद्धत पाणिनीच्या रचनेहून निराळी आहे याचीं दोन निरनिराळीं भाषांतरे डॉ.लिबिशला तंजावर येथें मिळाळीं व त्यांच्या साहाय्यानें पुढें केंब्रिज संग्रहांत मूळ संस्कृत प्रतहि सांपडली.
(७)धा तु पा रा य ण- हा ग्रंथ पूर्णचंद्रानें लिहिलेला असून बहुश:चांद्र शाखेपैकी असावा.हा माधवीय धातुवृतीशीं जमत असून प्रो.बेंडॉल यांनी नेपाळांत विकत घेतला होता. सध्यां हा केंब्रिज संग्रहांत आहे.
(८)ग ण पा ठ- ज्या प्रमाणें काशिकावृत्तीमध्यें पाणिनीचा गणपाठ आहे त्याप्रमाणें सूत्रवृत्ति [नं.२] मध्यें चांद्र पद्धतीच्या गणांचा समावेश केलेला आहे.
(९)उ णा दि सू त्र- हें तंजावर येथें आहे. चंद्रगोमिन् यानें आपले उणादि प्रत्यय तीन पुस्तकांत अंत्य अक्षरांच्या अनुक्रमाप्रमाणें रचलेले आहेत. पहिल्या पुस्तकांत 'अ' शिवाय सर्व स्वरान्त प्रत्यय, क्किप प्रत्यय व व्यंजनान्त प्रत्यय आहेत; दुस-या ‘क’ पासून ‘य’ पर्यंत ‘अ’ स्वरान्त प्रत्यय आहेत; तिस-यांत बाकीचे र पासून ह पर्यंत ‘अ’ स्वरान्त प्रत्यय, क्किप् प्रत्यय व व्यंजनान्त प्रत्यय आहेत.
(१०)उ णा दि वृ त्ति- ही उणादिसूत्रांवरील उत्कृष्ट टीका आहे. हा ग्रंथ फक्त तंजावर येथें आहे. उणादि प्रत्ययांपासून साधित शब्द व त्याचे समानार्थी संस्कृत शब्द व तिबेटी भाषेंतील भाषांतर हीं या ग्रंथांत दिलीं आहेत.
(११)उ प स र्ग वृ त्ति- या ग्रंथांत चंद्रगोमिन् याने संस्कृत भाषेंतील वीस धातुप्रत्ययांचें अथवा प्रत्ययांचें स्पष्टीकरण केलें आहे.हा फक्त तंजावर येंथे आहे.
(१२)व र्ण सू त्र- पाणिनीय शिक्षेसारखार्, वर्णशास्त्राचे नियम असलेला चंद्रगोमिन् याचा ग्रंथ प्रो.बुह्लर यांनां हा ग्रंथ काश्मीरमध्यें सांपडला. शिवाय तंजावर येथें त्यांचे एक भाषांतर आहे.
(१३)व र्ण सू त्र वृ त्ति- चॉस-स्कियॉन म्हणजे धर्मपाल यानें ११९ श्लोकांत वर्णसूत्रावर लिहिलेली टीका.हा ग्रंथ तंजावर येथें राखून ठेविलेला आहे.
(१४)प रि भा षा सू त्र- या ग्रंथांत चांद्र पद्धतीच्या स्पष्टीकरणार्थ नियम दिले आहेत. प्रो.बुह्लर यांना हा ग्रंथ काश्मीर मध्यें मिळाला.
(१५)बा ला व बो ध न- हें एक चांद्र पद्धतीचे संस्कृत व्याकरणावर प्रमाणभूत पुस्तक आहें. वरदराजाच्या लघुकौमुदीशीं या पुसतकाचें साम्य आहे.हें इ.स. १२०० च्या सुमारास कस्सप अथवा कश्यप नांवाचा बुद्ध भिक्षूनें संस्कृताचें अध्ययन सुलभ व्हावें म्हणून लंकाद्वीपांत लिहीलें. या पुस्तकाच्या उदयानें या बेटांतील मूळ चांद्र व्याकरणाचालय झाला. त्याचा नंतर विल्यम (गुणतिलक) यानें शोध लावला व याचा एक तृतीयांश भाग प्रकाशित केला. कोलंबोच्या मोंडिस गुण शेखर यांनीं डॉ.लिबिशला या ग्रंथाची एक संपूर्ण प्रत नजर केली होती.
(१६)ति ङ न्त- चांद्रपद्धतीप्रमाणे धातु चालविण्यासंबंधी एक ग्रंथ.हा फक्त तंजावर येथें आहे.
(१७)सु व न्त र त्ना क र- म्हणजे नामांची रत्नखाण. चांद्र पद्धतीचें लिंग आणि अंत्य अक्षर यांच्या लावलेल्या अनुक्रमानें नामांच्या संग्रहाचें पुस्तक. हें फक्त तंजावर येथें आहे.
(१८)व्या क र ण सु व न्त- चांद्र पद्धतीप्रमाणे नामें चालविण्याविषयीं पुस्तक. हें फक्त तंजावर येथें आहे.
(१९)वि भ क्ती-का रि का- नामें चालविण्याविषयीं ईश्वर भद्र अथवा सिंहभद्र यांचे पुस्तक. हें फक्त तंजावर येथें आहे.
(२०)सं बं ध उ द्दे श अथवा चण्ड वृत्ति- हें चण्डदास कायस्थ यानें श्लोकांत लिहिलेलें वाक्यरचनेविषयी एक लहानसें पुस्तक आहे याची मूळ हस्तलिखित प्रत डॉ.एस.व्हॉन ओल्डेनवर्ग यांच्या ताब्यांत सेंट पिटर्सबर्ग (पेट्रोग्रेड) येथें होती तिचें तिबेटी भाषेंतील भाषांतर तंजावर येथें आहे.
(२१)च ण्ड वृ त्ति- विवरण - संबंधउद्देशावरील टीका. ही डॉ.एस्. व्हॉन, ओल्डेनबर्ग यांच्या ग्रंथालयांत आहे.
[इं. अँ. पु. २५ पृ. १०३-१०५]