प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
चंद्रगोमिन् याच्या ग्रंथाचें स्वरूप.- चांद्र व्याकरणांत संक्षेपावर फार भर दिला आहे असें दिसतें. जेथें जेथें थोडया शब्दांत किंवा अक्षरांत काम भागण्यासारखें होतें तेथें तेथें चांद्र व्याकरणांत संक्षेप करण्याकडे सक्त नजर पुरविलेली आहे. पाणिनी कात्यायन व पंतजलि यांच्या व्याकरणांत संक्षेप कसा करतां येईल याचा व मोजक्या आणि योग्य शब्दांत तीच माहिती कशी देतां येईल याचा चंद्रगोमिन् यानें फार बारकाईनें विचार केला आहे. प्रत्याहार सूत्रांपैकीं एका सूत्रास रजा देऊन त्यांच्या जागीं १३ च सूत्रें कायम ठेविलीं आहेत. त्यानें पाणिनीचे नियम कांही ठिकाणी उच्चाराच्या सोयीसाठीं बदलून निराळया शब्दांत सांगितले आहेत. स्वत:चंद्राचीं अशीं अवघी ३५ च सूत्रें आहेत व ती सर्व काशिकेंत घेतलीं आहेत. चंद्राच्या ग्रंथांत पाणिनीच्या ४००० सूत्रांऐवजी ३१०० च सूत्रें आढळतात. अध्याय देखील सहाच असून पाणिनीच्या पहिल्या दोन अध्यायांतील माहिती यानें सहा अध्यायांतच निरनिराळया ठिकाणीं घातली आहे. उच्चारशास्त्रासंबंधाचे किंवा व्याकरणसंबंधाचे जे नियम पूर्वीच्या व्याकरणांतून होते त्यांचे विषयावर वर्गीकरण करणें व ते सुव्यवस्थितपणानें मांडणें, हा चंद्रगोभिन् याचा हेतु होता.