प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
चंद्रगोमिन् याचें व्याकरण- चंद्रगोमिन् हा पाणिनि, कात्यायन व पंतजलि यांच्याच परंपरेंतील मनुष्य असल्यानें, त्यानें त्यावेळेपर्यंत व्याकरणशास्त्रांत मुनित्रयानें जी प्रगति केली होती तिचा पुरा फायदा घेतला. महाभाष्यानंतरच्या काळांत संस्कृत भाषेंत जे जे फरक झालें ते सर्व जमेस धरून सूत्रें, र्वात्तिकें व इष्टी यांत चंद्रगोमिन् यानें शोध घालून ती सुधारण्याचा यत्न केला. चंद्रगोमिन् हा बौद्ध पंथी असल्यामुळें ब्राह्मण धर्मांशीं संबंध नसलेंलें असें एक अलग व्याकरण लिहीलें असावें. त्यानें जें व्याकरणांत शोध घातले ते जुन्या लोकांस आवडले नाहींत.त्यांनीं टीका करण्याचे नवे नवे प्रकार उपयोगांत आणून चंद्रगोमिन् यानें दाखविलेले दोष नवे नाहींत. त्यांचा परिहार यापूर्वीच झालेला आहे,असें दाखविण्याचा प्रयत्न केला. ऐतिहासिक द्दष्टाहें कृत्य अनुचित आहे खरें: पण याच गोष्टीचा अवलंब कात्यायन व पंतजलि यांनींहि केलेला आहे. चंद्रगोमिन् याचा काळ इ.स. ४७० असावा.