प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
काशिकेच्या कर्तृत्वांत वामन व जयादित्य यांचे अंश- काशिका ग्रंथ वामन, जयादित्य किंवा वामन जयादित्य अशा तीनहि प्रकारांनीं संबोधिल्या जाणाऱ्या माणसाचा होय असा एके काळीं समज होता.पण भट्टोजी दीक्षित यांनी प्रौढमनोरमा ग्रंथांत पाणिनी ५-४-४२ यावर टीका लिहितांना वामन व जयादित्य हे दोघे वेगवेगळे होते असें निष्पन्न होतें.सर्व ठिकाणच्या हस्तलिखितांतील पुराव्यावरून काशिकेच्या पहिल्या पांच अध्यायांचें कर्तृत्व वामनाकडे जातें असें त्याच पुराव्यावरून दिसतें.
चंद्रगोमिन् यानें व्याकरणशास्त्रांत जे शोध घातले त्यांचा पाणिनीय परंपरेंत समावेश करणें हें काशिकेचें कार्य होय. काशिका ग्रंथ म्हणजे अष्टाध्यायीवरची एक सुगम टीका होय. काशिकेंत आपिशलीचा एक नियम दिला असून सौनागस याच्या वार्त्तिकाचाहि उल्लेख आला आहे. यावरून पाणिनीपूर्वी होऊन गेलेल्या आपिशलीचा ग्रंथ काशिकारास उपलब्ध होता असें दिसतें;व काशिकारानें उल्लेखिलेल्या सौनागस् याच्या वार्त्तिकाचा इतरत्र कोठें उल्लेख आढळत नसल्यामुळें,कात्यायनाच्या आधी व मागाहून पुष्कळ वैयाकरण होऊन गेले असावे या समजाला पुष्टि मिळते. काशिकाकारानें दिलेला अष्टाध्यायीचा पाठ व कात्यायन आणि पतंजलि यांस ठाऊक असलेला अष्टाध्यायीचा पाठ या दोहोंत ५८ सूत्रांत फरक आहे, असें कीलहॉर्न यानें लिहिलें आहे [इंडियन ॲटिक्करि पु.१६ प.१७९ व ५ पुढील] काशिकेमध्यें ज्या ज्या नवीन गोष्टी आल्या आहेत त्यांपैकीं बहुतेक चंद्रगोमिन् याच्या व्याकरणांत सांपडतात. काशिकावृत्तिकारानें या गोष्टी कांहीं थांगपत्ता न लागूं देतां मोठया शिताफीनें तेथून घेतल्या आहेत. लीबिश नांवाच्या एका गृहस्थानें चंद्र व काशिका यांच्यातील समान स्थळें पुष्कळ दाखिवलीं आहेत [लिबिश यांचे चंद्र व्याकरण] 'काशिका' वृत्तीवर जिनेंद्रबुध्दीची न्यास नांवाची व हरदत्ताची पदमंजरी नांवाची अशा दोन टीका आहेत.