प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.             

कातन्त्र सूत्रपाठांत प्रक्षिप्त भाग असल्याचा पुरावा- कातन्त्र व्याकरणाचे चार पोटविभाग आहेत. (१) संधिप्रकरण, (२) नामप्रकरण, (३) आख्यात प्रकरण, व (४) कृत्प्रकरण. या संबंधांत पहिला प्रश्न असा उपस्थित होतो की, हें चवथें कृत् प्रकरण जें आहे तें शर्ववर्मा याचेंच खुद्द आहे कीं तें मागाहून दुसऱ्या कोणी घुसडलेलें आहे ? अशी शंका येण्याचें कारण, या चौथ्या प्रकरणाच्या आरंभी मंगलाचरण आहे. प्रत्येक पोटविभागाच्या आरंभी मंगलाचरण् असणें अस्वाभाविक नाहीं ही गोष्ट खरी. परंतु, दुर्गसिंह नांवाच्या एका टीकाकारानें'सिध्दिग्रहणं भिन्नकर्तृकत्वान्मंगलार्थम्' असा या ठिकाणी विशेष शेरा मारिला आहे. दुसऱ्या  एका ठिकाणी कृत्प्रकरण हे कात्यायनाचें होय असें याच टीकाकारानें म्हटलें आहे. तो आपल्या कृत्प्रकरणावरच्या टीकेस पुढें दिल्याप्रमाणें सुरूवात करतो:- 'वृक्षादिवदमी रूढा:कृतिना नकृता:कृत:। कात्यायनेन ते सृष्टा विवुद्विप्रतिबुध्द्ये'॥. 'पदप्रकरणसंगति' ग्रंथाचा कर्ता जोगराज सुद्धां असेंच म्हणतो. परंतु त्याच्या मतें हें कृत्यप्रकरण कात्यायनाचें नसून शाकटायनाचें असावे. दुर्गसिंहवृत्तीचा एक टीकाकार रघुनंदशिरोमणि म्हणतो की,हें प्रकरण वररूचीचें असावें वररूचि, कात्यायन किंवा शाकटायन यांपैकी कोणीहि याचा कर्ता असो. हें प्रकरण प्रक्षिप्त आहे याबद्दल वाद नाही.

वर जे पोटविभाग सांगितले त्यापैकीं पहिल्यांतील निपातपाद, दुसऱ्यांतील स्त्रीप्रत्ययपाद व चौथ्यांतील उणादिपाद यांवरूनहि कातंत्रसूत्रांत प्रक्षिप्त भाग असल्याचें दिसून येतें; कारण हे भाग दुर्गसिंहवृत्तींत सांपडत नाहींत, पण् काश्मिराकडील सूत्रपाठांत हे भाग रीतसरपणें मूल ग्रंथांत अंतर्भूत केलेले आढळून येतात. तसेंच दुसऱ्या प्रकरणांतील तद्वितपाद सुद्धां शर्ववर्म्याचां नसावा असें बेलवलकर म्हणतात. कारण तेवढाच एक भाग अनुष्टुभ् वृतांत आहे. शर्ववर्म्याला तेवढाच पाद अनुष्टुभ् वृतांत लिहिण्याची आवश्यकता होती असें दिसत नाहीं. मूळ व्याकरण राजाला आवडल्यानंतर प्रजेचें व दरबारच्या लोकांचें लक्ष त्याजकडे वेधले गेलें, व तद्वितप्रकरण व इतर प्रकरणें यांची उणीव नजरेस आल्यावर मूळ ग्रंथकारानें किंवा दुसऱ्या कोणींतरी हीं मागाहून घातलीं असावी असा बेलवकरांचा तर्क आहे.