प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.             

कातंत्रशाखेचा प्रस्थापक शर्ववर्मा याची परंपरागत हकीगत- दक्षिणेचा राजा शातवाहन हा एकदां जलक्रिडा करीत असतां त्याच्या राणीनें त्याला 'मोदकं ( =मा उदकं ) देहि राजन्' असें बनविलें. परंतु त्याचा अर्थ भलताच समजून राजा तिला मोदक देऊं लागला. स्वत:ची चूक लक्षांत येण्याबरोबर त्याला आपल्या अज्ञानाची लाज वाटून शर्ववर्मा नांवाच्या आपल्या पदरच्या पंडिताला त्यानें मला व्याकरण शिकवा अशी विनंति केली. तेव्हां शर्ववर्मा यानें शंकराची प्रार्थना केली. शंकरानें कुमाराच्या द्वारे व्याकरणाची एक अगदी सोपी पद्धत त्याला शिकविली. कुमाराच्या द्वाराने ही पद्धत आली म्हणून 'कौमार' व कुमारानें कलापी ( = मोर) याच्या द्वारें दिली म्हणून 'कालाप' अशा संज्ञा तिला प्राप्त झाल्या. या जातीच्या सर्व आख्यायिकांप्रमाणें याहि आख्यायिकेंत थोडाफार सत्याचा अंश आहे. या आख्यायिकांप्रमाणें या शाखेच्या उदयाचा जो काळ निघतो त्याशीं विसंगत अशी एकहि गोष्ट उपलब्ध नाहीं. तेव्हां, ख्रिस्ती शकानंतरचें पहिलें शतक हा याच्या उदयाला काल मानण्यास हरकत नाहीं.