प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता

ऊर्जितकालाची आशा व मेसायाच्या कल्पनेचा उदय.- यहुदी लोकांमध्यें आपल्या जातीच्या भवितव्याविषयी जी आशायुक्त कल्पना होती ती पुढें अवतार कल्पनेंत परिणत झाली. अवतार उर्फ मेसाया जगांत येऊन त्यांचें पुन्हां राज्य स्थापन करील आणि दाविदाच्या वंशास राज्यारूढ करील अशी ही कल्पना होती. यशया, मीखा यहेज्केल वगैरे प्रवक्त्यांनीं या कल्पनेचा पुरस्कार केला. इतर प्रवक्त्यांनीं या कल्पनेचा पुरस्कार केला. इतर प्रवक्त्यांनीं जरी ही कल्पना पुढें मांडली नाहीं तरी भावी आशामय कालाची त्यांस जाणीव होतीच; आणि त्यांनीं तो काल परिश्रमानें, कष्ट सोसल्यानें आणि जे धर्माचरणयुक्त अवशेष हिब्रूंत राहिले आहेत, त्यांच्या विजयानें प्राप्त होईल, अशी आशा व्यक्त केली. धर्माचरणयुक्त वर्तनावर त्यांनीं जो जोर दिला त्याबरोबर त्यांची पारमार्थिक कल्पना जातिविशिष्टत्वाचे पाश तोडून टाकून सर्व लोकांनां सामान्य असा जो ईश्वर व त्यापर्यंत पोंचण्यास लागणारें सदाचरण यामध्यें स्थित झाली. त्यांच्या एकेश्वरवादामध्यें विश्वोत्पत्तिविषयक सिद्धान्त किंवा द्वैताद्वेतवाद वगैरे कांहीं नव्हतें. केवळ नैतिक आचरणाचा अंतिम परिणाम परमेश्वरसायुज्यता आहे एवढाच विचार त्यांनीं विकासविला. ईश्वरराज्याची कल्पना ही त्यांच्या पारमार्थिक भावनांचे प्रधान अंग होती. ईश्वर हा राजा आहे, तो स्वर्गांत आहे आणि तो सर्वांत वरिष्ठ आहे अशी त्यांची कल्पना मागाहून झाली. प्रथमतः त्यांची ईश्वरविषयक कल्पना ईश्वराचें बल नियमित आहे आणि हिब्रू जातीस जें यशापयश आलें तें जातीच्या देवाच्या बलाबलामुळें आलें अशी होती. पुढें त्यांची ईश्वरविषयक कल्पना व्यापक झाली तेव्हां ईश्वर हा केवळ हिब्रूंनां जय मिळवून देणारा नव्हे, तर तो सर्व जगाचा स्वामी व निर्माणकर्ता होय, त्याला सर्व लोकांनी पुजिलें पाहिजे, व त्याची आज्ञा पाळली पाहिजे असें ईश्वरस्वरूप त्यांनीं जाणिलें.

हिब्रूंतील प्रवक्त्यांनीं जरी ईश्वरस्वरूप अधिक व्यापकपणें उपदेशिलें तरी त्यांच्या उपदेशांतील जातिविशिष्टता नष्ट झाली नव्हती. ईश्वर सर्वांचा स्वामी खरा; परंतु ईश्वरानें हिब्रू लोकांस कांहीं विशिष्ट कार्याकरितां निवडलें आहे आणि ते त्याच्या विशेष प्रेमाचा विषय आहेत अशी कल्पना त्यांनीं आपल्या लोकांत संचरविली. ही कल्पना त्यांनीं आपल्या जातीच्या उत्कर्षार्थ संचरविली असली पाहिजे हें उघड आहे. प्रवक्त्यांच्या उपदेशांत जातिविशिष्टता होतीच व त्यांचा वैध धर्म नष्ट झाला नसून कांहीं अंशीं उत्कर्ष पावला. जेव्हां पारतंत्र्यामुळें लोकांत देशाभिमान प्रज्वलित झाला तेव्हां देश्यसंस्कृतीविषयीं आदरहि वाढला. जित झालेल्या यहुदी लोकांचें एकत्व रक्षिण्यास परंपरागत विधींवर श्रद्धा अवश्य होऊन गेली, आणि यामुळें स्वाभाविकपणेंच भिक्षुकांचे महत्त्व वाढलें. जो या विधिधर्माशीं बेइमान होईल तो जातिबहिष्कृत होईल. मेसाया प्रकट होऊन यहुदी लोकांस मुक्त करणार आहे. तेव्हां सर्वांनीं धर्माचे विधिनियम पाळले पाहिजेत; जो पाळणार नाहीं तो मेसायाचें आगमन लांबणीवर टाकीत आहे अशा प्रकारची भावना यहुदी लोकांत अधिकाधिक बलवान होत गेली. असो.