प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता

शुभवर्तमानें व प्रेषितांचीं कृत्यें.- सरदहू पुस्तकांचा उद्भवहि पॉलच्या पत्रांप्रमाणेंच झाला. ही पुस्तकें देखील लोकांनीं त्यांनां पवित्र ग्रंथ म्हणून मान द्यावा या उद्देशानें लिहिलेलीं नव्हतीं. ख्रिस्त पुन्हां अवतार घेणार आहे या आशेमुळें हे ग्रंथहि बराच काळपर्यंत लिहून ठेवण्याची आवश्यकता भासली नाहीं. तेहि, जसजशी जरूर भासूं लागली तसतसें त्यांचे, निरनिराळे भाग लिहिले जाऊन तयार झाले. तेव्हां त्यांच्यासंबधीं ज्या गोष्टी आपणांस माहिती नाहींत, त्या अनुमानानें घालूनच सर्व कथासूत्र जुळविलें पाहिजे. या ग्रंथांच्या रचनेसंबंधी पुढें दिलेली उपपत्ति कांहीशीं संयुक्तिक दिसते.

संप्रदायप्रसाराचें काम कांहीं काळ केल्यानंतरच, विशेषतः जेथें ख्रिस्ताची किंवा ख्रिस्ती ध्येयांची लोकासं कांहीएक माहिती नव्हती अशा पॅलेस्टाइनबाहेरील प्रदेशांतल्या अनुभवाअंतीं, या आद्य संप्रदायप्रसारकांस आपला उपदेश परिणामकारक व्हावा म्हणून कांहीं तरी आधारभूत ग्रंथाची आवश्यकता भासूं लागली असावी. पूर्वकालीन ख्रिस्ती उपदेशकांचें एक वैशिष्ट्य हें होतें कीं, ते एकाच ठिकाणीं फार दिवस कधींहि रहात नसत. ते एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणीं सारखे भटकत होते. एका ठिकाणीं एक उपदेशक येऊन गेल्यावर दुसरा उपदेशक येईपावेतों तेथील लोकांवर पहिल्या उपदेशकांनें बिंबविलेला उपदेश कायम ठेवण्यास कांहीच साधन नव्हतें. ख्रिस्तसंप्रदायाचा उपदेश ग्रहण करण्यास सर्व लोकांची मनोभूमि सारखीच तयार झालेली नव्हती. शुभवर्तमानामध्यें ज्याचें 'ईश्वराच्या राज्याची वाढ पाहणारे' म्हणून वर्णन केलें आहे, ते चांगले धार्मिक व जुन्या कराराचा काळजीपूर्वक अभ्यास केलेले असे लोक होते. या लोकांच्या कानावर ख्रिस्ताचे नांव जाण्यापूर्वींच ते उपर्युक्त ईश्वरी राज्याच्या आगमनास लायक बनले होते. उलट पक्षी यहुदी समाजाबाहेरील जे लोक ख्रिस्ती झाले होते, त्यांचें नीतिशास्त्रांतील व एकेश्वरीउपासना मार्गांतील अगदीं मूलभूत तत्त्वांसंबंधीं देखील गाढ अज्ञान होतें. अशा रीतीनें अगदीं अडाणी लोकांपासून तो चांगल्या सुसंस्कृत माणसा पावेतों सर्व प्रकारच्या लोकांच्या ख्रिस्ती संप्रदायांत भरणा होता. या सर्वाना उपयोगी पडेल असें एखादें संप्रदाय टिकविणारें साधन शोधून काढणें आवश्यक झालें. आद्यकालीन ख्रिस्तसंप्रदायप्रसारक आपला संप्रदाय वाढविण्याकरितां संप्रदायाबाहेरील लोकांपुढें असा उपदेश करीत होते कीं, 'लवकरच जगामध्यें कोणीएक व्यक्ति निर्माण होऊन ती या पृथ्वीवर आधिदैविक राज्य स्थापन करण्यार आहे' व राज्यासाठीं प्रत्येकानें स्वतः लायक बनलें पाहिजे. अर्थात लोकानां स्वतःस लायक बनवून घेण्याच्या कामीं मदत करण्याचा उत्तम मार्ग म्हटला म्हणजे, ख्रिस्ताच्या मतें लोकांनीं जी नीतितत्त्वें आचरणांत आणावयास पाहिजेत तीं जींत स्पष्टपणें सांगितलीं आहेत अशी ख्रिस्ताच्या शिकवणुकीची रूपरेखा लोकांपुढें ठेवणें हा होय. ही नीतितत्त्वें लोकांच्या पुढें मांडण्याच्या प्रयत्नांनींच पहिल्या ख्रिस्ती शुभवर्तमानास जन्म दिला असावा. ब्रिटानिकाकारांच्या मतें हे पहिलें शुभवर्तमान म्हणजे 'क्यू' या संक्षिप्त नांवानें संबोधिला जातो तो भाग होय. हा भाग म्हणजे जगांत कसें आचरण ठेवावें या विषयीं नियम घालून देणा-या वचनांचा एक संग्रह आहे.

लोकांच्या मनांत ऐतिहासिक गोष्टींबद्दल जिज्ञासा उत्पन्न झाली ती यानंतर कांहीं कालानें जेव्हां मरणोत्तर स्थितीसंबंधीं त्यांची जिज्ञासा कांहीं अंशीं कमी झाली व त्यांची दृष्टि भविष्यकाळावरून निघून भूतकाळाकडे वळली तेव्हांच, झाली असावी. ख्रिस्ती लोकांमध्यें भूतकालीन गोष्टींबद्दलची ही इतिहासविषयक जिज्ञासा इ. स. ६०-७० या काळापर्यंत उत्पन्न झाली नव्हती असें मानावयास आधार आहे. या जिज्ञासेमुळेंच सध्यांचें सेंट मार्कचें शुभवर्तमान अस्तित्वांत आलें. हें शुभवर्तमान बहुधा इ .स. ६४-७० या काळाच्या दरम्यान रोम येथें रचलें गेलें असावें. हें हल्लीचें शुभवर्तमान मूळच्या दुस-या एखाद्या शुभवर्तमानावरून तयार करण्यांत आलें असेल अशी शंका घेण्यास पुरेसा आधार नाहीं.

'क्यू' या नांवानें ओळखला जाणारा माथ्यू (मत्तय) व लूक या दोहोंच्या ग्रंथांत आढळून येणारा लोजिया नांवाचा भाग व मार्कचें शुभवर्तमान या दोन ग्रंथांवरच शुभवर्तमानाचें पुढील वाङ्मय आधारिलेलें आहे. हल्लींचा माथ्यूचा व लूकचा ग्रंथ हे उपर्युक्त दोन लिखाणांतील मजकूर भिन्न भिन्न रीतींनीं मांडून व त्यांत स्वतः संपादकांनीं मिळविलेल्या मजकुराची भर पडून तयार झाले आहेत. हिब्रूंचें शुभवर्तमान, पीटरचें शुभवर्तमान वगैरे ज्या कांहीं दुस-या शुभवर्तमानांचे थोडथोडके भाग आज उपलब्ध आहेत, तीं देखील या दोन लिखाणांपासूनच तयार झालीं असणें संभवनीय आहे.

लूक यानें इतिहासकारास शोभेल असा जो आपल्या ग्रंथास उपोद्धात जोडला आहे त्यावरून शुभवर्तमान तयार करण्याचें काम प्रथम लूक यानेंच केलें असे दिसतें. हा ग्रंथ थिओफिलस (थियफिला) नामक इसमास उद्देशून लिहिलेला असून थिओफिलस हा ज्यास ख्रिस्ती संप्रदायाचीं मुख्य मुख्य तत्त्वे आगोदरच परिचित करून दिलेलीं होतीं असा कोणी तरी सरकारी कामगार असावा. या ग्रंथाची मांडणी बहुतांशीं लूक याच्याच डोक्यांतून निघालेली असून प्रेषितांचीं कृत्यें हा त्याचा दुसरा भाग आहे. प्रो. हार्नाकसारखे विद्वान पंडित सुद्धां लूक हाच तिसरें, शुभवर्तमान व प्रषितांचीं कृत्यें यांचा कर्ता आणि अंतिम संपादक आहे, या इंग्लंडमध्यें सर्वत्र प्रचलित असलेल्या मतांस येऊन मिळाला आहे.

हल्लीच्या शुभवर्तमानांमध्यें ज्या मूलभूत लिखाणांचा उपयोग करण्यांत आला होता त्यांच्या उत्पत्तीसंबंधानें व स्वरूपासंबंधानें वर दिलेला निष्कर्ष काढण्यास कारणें कारक झालीं आहेत तीं अशीं:-

(१) या शुभवर्तमानांच्या ग्रंथांचें वाङ्मयीन पृथक्करण केलें असतां माथ्यू (मत्तय) व लूक या दोहोंतहि असणारे असे कित्येक भाग आढळतात. हे भाग एके काळीं स्वतंत्र लिखाणांच्या रूपानें अस्तित्वांत असले पाहिजेत. (२) या लिखाणांत मुख्यत्वेंकरून ख्रिस्ताचा स्वभाव, व त्यानें उपदेशिलेल्या धार्मिक व नैतिक कल्पना ज्यांत स्पष्टपणें व्यक्त झाल्या आहेत अशा त्याच्या वचनांचा संग्रह होता. (३) माथ्यू यानें लोजिया नामक हिब्रू ग्रंथ रचला असें मूळ इ. स. च्या पहिल्या शतकाच्या अखेरीस केलें गेलेलें स्पष्ट विधान आपणांसमोर आहे. लोजिया या शब्दाचा अर्थ ईश्वराच्या अधिकारयुक्त वचनांचा संग्रह' असा होऊं शकतो. (४) पूर्व कालीन ख्रिस्तसंप्रदायप्रसारकास मागें वर्णन केलेल्या परिस्थितींत उपदेश करावा लागत होता असें आपणांस डायडॅची नामक ग्रंथावरून कळतें; ज्याला ''दोन मार्ग'' असें नामाभिधान आहे तो ग्रंथाचा पहिला भाग यहुद्यांपैकीं जे लोक ख्रिसतसंप्रदायांत नवीन प्रवेश करीत असत त्यांच्या हातीं आधारभूत धर्मग्रंथ म्हणून देण्यांत येत असे. ब्रिटानिकाकारांच्या उपपत्तीप्रमाणें लोजिया या ग्रंथाचा उपयोग उपर्युक्त ''दोन मार्ग'' या प्रकरणाप्रमाणेंच होत असावा. (५) या मतास पुष्टि देणारी गोष्ट म्हटली म्हणजे मूळ १२ प्रवक्त्यांच्या सान्निध्यांत नसलेले ख्रिस्ती लोक देखील त्यांनां ख्रिस्ताच्या आयुष्याची सविस्तर माहिती नसली तरी ख्रिस्ताच्या स्वभावांतील महत्त्वाच्या मुद्यांशीं व ख्रिस्ती ध्येयांशीं चांगले परिचित होते.

वरच्याप्रमाणेंच पहिलें शतक संपण्यापूर्वीं केलेले दुसरें एक विधान असें आहे कीं, मार्क यानें सेंटपीटर याच्या (पत्राच्या) उपदेशावरून आपलें शुभवर्तमान रचलें. याचा अर्थ असा नाहीं कीं, मार्क यानें आपल्या ग्रंथांत स्वतःचें अनुभव किंवा अन्यसाधनापासून गोळा केलेली माहिती मुळीच अंतर्भूत केली नसेल. सेंट पीटरपासून मार्क यास फक्त कच्चा मालच मिळाला होता. तो तपासून त्याची पद्धतशीर मांडणी करण्याचें काम मार्क यानेंच केलें असून तें इतकें उत्तम साधलें आहे कीं, त्यास या कामीं दुस-या एखाद्या चांगल्या माणसाची मदत झाली असावी अशी शंका येऊं लागत इरीनीयस (अजमासें इ. स. १८५) म्हणतो कीं, शुभवर्तमान हें पीटरच्या मरणापावेतों प्रसिद्ध झालें नव्हतें. यावरून तें इ. स. ६५-७० यांच्या दरम्यान रचलें गेलें असावें असें अनुमान निघतें.

लूक याचा ग्रंथ केव्हां संपूर्ण झाला ही गोष्ट या ग्रंथाचा कर्ता लूक किंवा दुसरा कोणी उत्तरकालीन शिष्य होता हें ठरविण्यावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणें प्रषितांचीं कृत्यें या ग्रंथाच्या कर्त्यानें इ .स. ९३ किंवा ९४ मध्यें प्रसिद्ध झालेला जोसेफसचा अँटिक्विटीज नामक ग्रंथ पाहिला होता किंवा नव्हता या प्रश्नाच्या उत्तरावरहि लूकच्या ग्रंथाचा कालनिर्णय बराचसा अवलंबून आहे. माथ्यूचा ग्रंथ इ. स. ७०-१०० यांच्या दरम्यान केव्हां तरी तयार झालेला दिसतो.