प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता

येशू ख्रिस्त आणि त्याचें यहुदी धार्मिक इतिहासांत स्थान. - ख्रिस्ती संप्रदायाचें जागतिक इतिहासांत स्थान महत्त्वाचें आहे; आणि ज्या अर्थी येशू हा त्या संप्रदायाचा संस्थापक होता त्या अर्थी त्याचेंहि स्थान मोठें होतें असें म्हणतां येईल. तथापि येशू हा अलौकिक पुरूष होता अशी खात्री वाटत नाहीं. येशूचें यहूदी इतिहासांत कार्य फारसें महत्त्वाचें नव्हतेंच. अनेक उपदेशक आले व गेले त्यांपैकींच येशू हाहि एक होता. त्यांच्याकडून त्यास प्रवक्ता म्हणून मान्यता मिळून त्याच्या उपदेशाच्या जुन्या करारांत समावेश होण्याइतकी योग्यता यहुद्यांच्या दृष्टीने ख्रिस्ताची नव्हती. पॉलला येशूच्या उपदेशांत कांहीं तरी निराळें वाटलें म्हणून म्हणा, किंवा संप्रदायस्थापना करून आपलें महत्त्व वाढवावें अशी प्रेरणा होऊन संप्रदायस्थापनेला कोणी तीर स्पर्धाक्षेत्रांत नसलेला म्हणजे मृत गुरू पाहिजे या भावनेनें त्यानें येशूस शोधून काढलें म्हणून म्हणा, त्यानें स्वतः संप्रदायप्रवेश करून येशूस मोठें केलें.