प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता

बायबल नवाकरार - नवा करार हा ख्रिस्ती लोकांच्या पवित्र पुस्तकांचा संग्रह आहे. बायबलांतील हा भाग सर्वस्वी एकट्या ख्रिस्ती लोकांचा आहे. उलट पक्षी जुना करार हा भाग ख्रिस्ती व यहुदी या दोघांचा मिळून आहे.

या नव्या कराराची गुणदृष्ट्या आणि परिमाणदृष्ट्या दोन्ही प्रकारें वाढ होत गेली. गुणदृष्ट्या वाढ म्हणजे ह्या पुस्तकांनां धार्मिक पवित्र ग्रंथ अशी योजना हळू हळू प्राप्त झाली, आणि परिमाणदृष्ट्या वाढ म्हणजे ही पुस्तकें आकार वाढतां वाढतां प्रस्तुतच्या स्वरूपाप्रत हळू हळू पोहोंचलीं. हीं दोन्हीं कार्यें कशीं झालीं याचा इतिहास आपणांस पाहिला पाहिजे. त्याकरितां या लेखांत पुढील चार मुद्दयांचा विचार करूं. (अ) खास ख्रिस्ती वाङ्‌मयाची वाढ; (आ) अनेक पुस्तकें सुसंगतवार एकत्र करून त्यांचा एक ग्रंथ बनविण्याचें काम; (इ) या ग्रंथाला पवित्र ग्रंथाची योग्यता प्राप्त होण्याचीं कारणें; आणि (ई) या ग्रंथाला हळू हळू प्राप्त झालेलें सांप्रतचें विशिष्ट स्वरूप.

नवा करार हा ग्रंथ पूर्णपणें जुन्या कराराच्या नमुन्यावर तयार केला गेला आहे. नव्या कराराला जुन्या कराराचा पुरवणीभाग व तितकाच पवित्र ग्रंथ अशी योग्यता अखेर प्राप्त झाली. हीं योग्यता प्राप्त होण्याचें काम बरेंच हळूहळू झालें, आणि अखेर जुना करार आणि नवा करार मिळून पवित्र बायबल ग्रंथ होय असें मत रूढ झालें. ही स्थिति कशी उत्पन्न झाली याचा इतिहास आपणांस बारकाईनें पाहिला पाहिजे.