प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता

येशूचीं मतें.- प्रवक्त्यांचा उपदेश व जुना वैध धर्म यांचा संबंध ब-याच अंशीं आपल्या कडील ज्ञानकांड व कर्मकांड यांतील संबंधासारखाच आहे. आरण्यकांत व उपनिषदांत ज्याप्रमाणें उच्च प्रकारचे विचार दृष्टीस पडतात. त्याप्रमाणें प्रवक्त्यांच्या वाङ्‌मयांत देखील ते दृष्टीस पडतात. ख्रिस्ती लोकांच्या दृष्टीनें जें कार्य प्रवक्त्यांनीं सुरू केलें तेंच येशूनें पुरें केलें. येशूला भुतें, परलोक, पवित्र ग्रंथ इत्यादि बाबतींत जुन्या कल्पना अमान्य होत्या असें म्हणवत नाहीं. त्याची ईश्वरविषयक कल्पना एखाद्या पंडितास साजेल अशी नसून ती साध्या मनुष्याची होती, व तींतच त्याचें बल होतें. ईश्वराचें सर्वव्यापित्व, नितान्त जगावरील पितृप्रेम, त्याची दया, त्याचें न्यायित्व इत्यादि गोष्टींवर त्याचा भर असे, आणि तो फार गहन व सूक्ष्म वादांत पडतच नसे. त्यानें जुन्या वैध धर्माविषयीं अनादर प्रकट केला नाहीं; तथापि त्याची बुद्धि भावनाप्रधान होती. आणि ती त्यानें जागोजाग व्यक्त केली आहे. येशूच्या उपदेशांत पश्चात्तापाचें महत्त्व मोठें आहे- विधिनियमांचें व ईश्वरविषयक सूक्ष्म विवेचनाचें महत्त्व कमी आहे. जे प्राचीन विधिनियम त्याच्या धार्मिक भावनेच्या विरूद्ध जात असत त्यांचा येशूनें निषेध केला आहे. त्याच्या उपदेशाचें रहस्य 'आत्मवत् सर्वभूतेषु' अशा प्रकारचें आहे. (मार्क १२.२९,३१). ईश्वराविषयीं प्रेम असें असावें कीं, जेणेंकरून जीव व शिव यांचें ऐक्य होईल असें एके ठिकाणीं म्हटलेलें आहे.

येशूचा गुन्हेगार म्हणून झालेला वध व त्याचें पुनरुत्थान झालें म्हणून झालेली समजूत यांहींकरून त्याचे जे थोडे यहुदी अनुयायी होते त्यांच्यामध्यें एक त-हेचा विश्वास उत्पन्न झाला; आणि येशूचें जीवितकार्य आणि येशूचें चरित्र त्यांच्या प्रेमाचा आणि विचाराचा विषय झाला. इतके दिवस जो त्यांनां केवळ प्रवक्ता वाटप होता तो त्यांस आतां अवतार (मेसाया) वाटूं लागला. येशूचा शब्द मानावयाचा किंवा नाही हा विचार त्यांच्यापुढे नसून येशूला अवतार मानावयाचें किंवा नाही हा विचार त्यांच्यापुढें होता; ते येशूस ख्रिस्त म्हणजे अवतार समजूं लागले व आपणांस ख्रिस्ती म्हणवून घेऊं लागले. प्रथमतः येशूचे अनुयायी यहुदीच होते, परंतु पॉलनें ग्रीक देखील आपले अनुयायी बनविले. पॉलच्या पत्रांमध्यें येशूच्या ठायीं ईश्वरत्व स्थापिलें आहे. ईश्वर जगांत मुद्दाम आला-जगांत येऊन त्यानें मुद्दाम लघुत्त्व अंगीकारिलें- अशी कल्पना पॉल व जॉन यांनीं मांडली. पॉलच्या लेखांमध्यें मेसाया या शब्दाचा मूळ अर्थ नाहींसा होऊन मेसाया हा शब्द केवळ आडनांवासारखा झाला आणि येशू हा ईश्वराचा पुत्र झाला.

असें वारंवार म्हणण्यांत आलें आहे कीं, येशूच्या उपदेशांत नवीन असें कांहींच नव्हतें. येशूच्या उपदेशाशीं सदृश स्थलें आपण पाहूं गेलों तर जुन्या अनेक देशांच्या ग्रंथांतून ती सांपडतील. तथापि त्या वेळच्या फॅरिसी लोकांनां येशूचा उपदेश नवीन व क्रांतिकारक वाटला यांत शंका नाहीं. ती क्रांतिकारकता उपदेशांत विशेषशी नव्हती. जेव्हां कोणतीहि पद्धति तयार होते तेव्हां ती अनेक कालच्या अनेक लोकांच्या परिश्रमामुळें व अनेक लोकांनीं आपल्या स्वार्थाकरितां केलेल्या अनेक गोष्टींच्या संचयानें तयार होते, व तींत साधेपणा रहात नाहीं. आजच्या ख्रिस्ती संप्रदायाच्या घटनेंत साधेपणा कोठें आहे ? जे नियम प्रथम देतांना फार साधे वाटतात त्यांचा जगांत प्रसार करूं लागलें, प्रसार करण्याकरितां एक वर्ग निर्माण केला, त्यांवर आलेले आघात खंडून काढण्यासाठीं वाङ्‌मय तयार झालें, शिवाय तत्त्वांचा प्रसार करणारे जे लोक असतील त्यांच्या योगक्षेमासाठीं अनेक खटपटी सुरू झाल्या, म्हणजे बरेंच अवडंबर वाढतें; तें देखील इतकें कीं, त्यांत मुख्य उपदेशाची विस्मृतिहि होते. अशा प्रसंगीं मुख्य तत्त्वांची आठवण करून देणारा कोणी तरी भेटावा लागतो. तो तसा भेटला म्हणजे पूर्व संस्थांच्या अभिमान्यांस त्या मनुष्याचा उपदेश क्रांतिकारक वाटतो. यज्ञसंस्थेच्या अभिमान्यांस औपनिषद विचारांचे प्रवर्तक क्रांतिकारक वाटले असावे, व कदाचित हिब्रू लोकांसहि त्यांच्या प्रवक्त्यांचे उपदेश क्रांतिकारक वाटले असावे. येशूस जें महत्त्व प्राप्त झालें त्याची कारणपरंपरा अशी देतां येईल कीं, येशूस पॉलनें महत्त्व आणिलें. आणि पॉलच्या मनावर येशूचें महत्त्व अधिक ठसण्यास येशूच्या दुःखकारक शेवट कारण झाला असावा. येशूचा असा दुःखकारक शेवट होण्याचें कारण कांहीं अंशीं येशूची निर्भयतेची वृत्ति असावी, व कांहीं अंशीं तो भिक्षुक वर्गांतील नसून सुताराचा मुलगा होता हें कारण असावे.

येशूविषयी सविस्तर माहिती पुढें शररिखंडांत येईलच. येथें त्याच्या संप्रदायाच्या इतिहासाची माहिती दिली पाहिजे. ती देण्यासाठी अगोदर त्या संप्रदायास आधारभूत असलेल्या ''बायबल'' नांवानें प्रसिद्ध असलेल्या वाङ्‌मयाकडे वळूं.

बायबल - बायबल हा शब्द इंग्रजी भाषेंत एकवचनी असला तरी मूळ ग्रीक भाषेंत तो अनेकवचनी आहे, व त्याचा अर्थ 'ख्रिस्ती धर्मसत्तेसंबंधाचे पवित्र ग्रंथ' असा आहे. या मूळ अनेकवचनी शब्दयोजनेवरून बायबल हा एक ग्रंथ नसून तो निरनिराळ्या काळांत लिहिल्या गेलेल्या अनेक ग्रंथांचा समुदाय आहे असें स्पष्ट होतें. या ग्रंथाचे मुख्य दोन विभाग पडतात. एक जुना करार (ओल्ड टेस्टामेंट) व दुसरा नवा करार (न्यू टेस्टामेंट). या दोन्ही विभागांतील विषयवारी थोडक्यांत येथें देतो.