प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता
संस्कृतिविकासांत यहुदी लोकांची कामगिरी.- तिस-या विभागांत यहुदी राष्ट्राचा इतिहास सामान्यपणें दिलाच आहे. बुद्धोत्तर कालामध्यें यहुदी लोकांची जी कामगिरी झाली तीत त्यांची राष्ट्र या नात्यानें कामगिरी महत्त्वाची नाहीं. यहुद्यांच्या राष्ट्राचा नाश होऊन ते प्रथम खाल्डियन सारख्या प्राचीन साम्राज्याचें अंकित बनले, आणि नंतरहि त्यांनां आपलें राज्य पुन्हां स्थापण्यांत यश आलें नाहीं. राष्ट्रस्थापना करून उच्च प्रकारचा सांघिक आयुष्यक्रम तयार करण्यांत जरी त्यांस यश आलें नाहीं तरी सर्व जगभर वजनदार जात या दृष्टीनें त्यांचा प्रसार झाला; एवढेंच नव्हे तर त्यांच्या वाङ्मयाचें आणि संस्कृतीचें महत्त्व सर्व जगास मान्य होऊन त्यांचें वाङ्मय आणि त्यांच्या समाजसंस्था, यांचा सर्व जगभर संचार झाला. उच्च प्रकारचे विचार आणि श्रेष्ठ प्रकारचे आवेशयुक्त काव्य ज्यांत आहे असें त्यांचें वाङ्मय जातिविशिष्ट न राहतां जागतिक झालें; आणि त्यांच्या जातींत जो एक संप्रदाय उत्पन्न झाला त्याचा प्रसार सर्व जगभर होऊन बुद्धाच्या संप्रदायाच्या तोडीचें कार्य त्या संप्रदायानें केलें. बुद्धानंतर पांचशें वर्षांनीं हा संप्रदाय उत्पन्न झाला आणि एक हजार वर्षांच्या आंत या संप्रदायानें यूरोपांतील सर्व देशांत देश्य संस्कृति बहुतेक पुसून टाकून यूरोपचें रूपांतर केलें. पुढें यूरोपच्या शासनसंस्थांतहि तो संप्रदाय महत्वाचा झाला. आज जगांतील लाखों लोकांस तोच संप्रदाय सत्कर्मास प्रेरित करीत आहे. या संप्रदायाचा इतिहास बुद्धोत्तर जगाच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग होय.