प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता

संस्कृतीच्या इतिहासांत सेमेटिक राष्ट्रांचें स्थान.- ग्रीक रोमन, अगर भारतीय व इराणी या संस्कृतींच्या इतिहासाकडेच आतांपर्यंत विशेष लक्ष दिलें गेलें. संस्कृतीच्या इतिहासांत आर्यन् राष्ट्रांचें स्थान सर्वांत मोठें खरें, तथापि सेमेटिक राष्ट्रांचें स्थानहि फारच मोठें आहे. राष्ट्रीय संस्कृति राष्ट्रांत उत्पन्न झालेल्या राजकीय शक्तीच्या जोमानें जशी अतिराष्ट्रीय होते तशी ती अन्य कारणानेंहि होते ही गोष्ट लोकांत निघालेल्या एका संप्रदायानें लोकांच्या नजरेस आणली. राजकीय शक्ति आणि पारमार्थिक संप्रदाय हीं एकवटली असतां श्री, विजय आणि भूति यांचा फार जोमानें विकास होतो ही गोष्ट देखील सेमेटिक लोकांत निघालेल्या दुस-या एका संप्रदायानें सिद्ध केली आहे. सेमेटिक संस्कृतीस जगांत महत्त्वाचें स्थान ख्रिस्त व पैगंबर यांनीं मिळवून दिलें. जगांतील इतिहासांत सेमेटिक संस्कृतीची उचल हा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि सर्व जगाच्या नीतिकल्पनांवर या सेमेटिक उचलीचा परिणाम मोठा झाला आहे. ख्रिस्तीधर्म आणि महंमदीय धर्म म्हणून ज्या दैवतकल्पना आणि नीतिकल्पना लोकांत प्रसृत झाल्या त्याच्या मुळाशीं यहुदी लोकांचा एकसारखा वाढत चाललेला विचार विकास व भावनाविकास आहे.