प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता

(अ) ख्रिस्ती वाङ्मयाची वाढ-पालचीं पत्रें.- येशू आणि त्याचे शिष्य यांचें बायबल जुना करार हेंच होतें. दोघांचेंहि तेवढ्या ग्रंथानें समाधान असे. ख्रिस्ताच्या मरणानंतर दोन दशकें पुरीं होईपर्यंत ख्रिस्ती लोकांनीं स्वतःचे स्वतंत्र ग्रंथ लिहिण्यास आरंभ केला नव्हता. ख्रिस्ती लोकांच्या पहिल्या पिढीनें लेखनाचें कार्य मुळींच केलें नाहीं. त्यांनीं लेखनकार्य मुळींच न करण्याचें कारणहि सबळ आहे. या पहिल्या पिढीला ख्रिस्त स्वर्गांतूंन पृथ्वीवर पुन्हां जन्माला येणार आहे अशी रोज आशा वाटत होती. वस्तुस्थिति अशी कीं, ख्रिस्ती लोक मेसायाचा दुसरा अवतार होणार असें मानीत होते इतकेंच नव्हे तर हाच खरा अवतार होय असें त्यांनां वाटत होतें. यहुदी लोकांची कल्पना अशी होती कीं, मेसाया म्हणजे अतिमानवकोटींतील व्यक्ति होय. त्याचें पहिलें मनुष्य स्वरूपांत झालेलें येणें मेसाया म्हणजे अवतारच नव्हे अशी त्यांची समजूत होती. त्यामुळें मेसायाचा सर्व शक्तिमान व कीर्तिमान स्वरूपांत खरा अवतार होण्यासंबंधाची वाट ख्रिस्ती लोकांची पहिली पिढी फार उत्सुकतेनें पहात होती; आणि हा अवतार लवकरच होणार असा त्यांनां दृढ विश्वास वाटत होता. असल्या मनःस्थितीमुळें होऊन गेलेल्या ख्रिस्तासंबंधाची माहिती लेखनिविष्ट करून कायम ठेवावी असा हेतु त्यांच्या मनांत उद्भवला नाहीं. या कारणामुळें ख्रिस्ती लोकांचें आरंभींचे जे लेख आहेत ते नीट विचार पूर्वक लिहिलेले नाहींत. तत्कालीन व्यावहारिक आवश्यकता एवढ्याच साध्या कारणास्तव ख्रिस्ती लोकांच्या मूळ लेखनाला आरंभ झाला.

अशा रीतीनें, सेंटपॉलनें थेस्सालोनियन लोकांनां लिहिलेलीं दोन पत्रें हे ख्रिस्ती लोकांचे अगदी सर्वांत जुने लेख होय. या सुमारास सेंट पॉल हा आपल्या धर्मसंप्रदायप्रचाराच्या कामास नुकताच लागला होता. त्यानें कांही चर्चेस (ख्रिस्ती उपासना मंदिरें) स्थापिलीं होतीं आणि अधिक स्थापण्याच्या विचारांत तो होता. त्याचीं हीं अगदीं पहिलीं पत्रें नुकत्याच संप्रदायप्रदेश करून ख्रिस्ती बनलेल्या लोकांनां उपदेश म्हणून लिहिलेलीं होतीं. या दोन पत्रांपूर्वीं असल्याच त-हेंचीं दुसरीं कांहीं पत्रें त्यानें लिहिलीं असावीं असें वाटतें, पण तीं पत्रें कोणीं रक्षण करून ठेविलीं नाहींत. वास्तविक आश्चर्य हें आहे कीं, सेंटपॉलची ब-याच आरंभापासूनचीं पत्रे रक्षण करून ठेविलीं आहेत व त्यावरून ख्रिस्तानुयायी बनलेल्या लोकांवर त्याचें कितीं वजन होतें हें स्पष्ट दिसतें. पहिल्या दोन्ही पत्रांत सेंट पॉलनें थेस्सालोनी लेकरांच्या वर सांगितल्याप्रमाणे उत्कंठित झालेल्या मनोवृत्ती शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्रांचा लोकांच्या मनांवर जो मोठा परिणाम झाला त्यामुळें ख्रिस्ती लोक या पत्रांनां ईश्वरी प्रेरणनें लिहिली गेलेलीं पत्रें अतएव पवित्र लेख मानूं लागले. या पत्रांनां पवित्र मानण्याबद्दल कोणी तरी मोठ्या अधिकारी व्यक्तीनें हुकूम सोडला होता ही समजून चुकीची आहे. वास्तविक पाहतां त्या पत्रांचा जो मोठा परिणाम झाला त्यामुळेंच लोक त्यांनां पवित्र पत्रें मानूं लागले.

थेस्सालोनी लोकांनां लिहिलेल्या पत्रांनंतर थोडक्याच काळांतील म्हणजे सुमारें वर्षादीडवर्षांतीलच कॉरिंथकर लोकांनां लिहिलेलीं दोन पत्रें आहेत. हीं पत्रें लिहिलीं त्या वेळींहि लोक बरेच अस्वस्थ मनःस्थितींत होते ख्रिस्ताचा पुन्हां लवकरच नवा अवतार होणार आणि जगाची पूर्वींची सर्व स्थिति बदलून नव्या युगाला आरंभ होणार असें लोकांना वाटत होतें. हा समज इतका दृढ पसरला होता कीं, लोक चालू दिवसापुढील दुस-या दिवसाचा विचारच करीत नसत. कायमच्या संस्था स्थापण्याचा प्रयत्न करणें तशा स्थितींत अगदीं निरूपयोगी होतें. कारण प्रत्येक मनुष्य चालू घटकेबद्दलच कायतो पहात असे. अशा स्थितींत सदरहू पत्रांत नूतन संप्रदायप्रवेश केलेल्या लोकांनीं विचारलेल्या प्रश्नांचीं उत्तरें किंवा चर्चच्या व्यवस्थेंत प्रत्यक्ष दिसणारे कांहीं दोष नाहींसे करण्यासंबंधाची योजना असलेच विषय येणें संभवनीय होतें. अर्थात् या लेखांनां केवळ पत्राचें स्वरूप आहे; किंवा पुस्तकाचें निबंधाचें स्वरूप नाहीं. ख्रिस्तसंप्रदाय प्रचारक सेंटपॉल याच्या या पत्रांत कांहीं कांहीं ठिकाणीं उच्च भावना व जोरदार भाषा दृष्टीस पडते. त्यानें तत्कालीन सामान्य प्रश्नहि उच्च धार्मिक तत्त्वाच्या अनुरोधानें सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. कोरिथकर लोकांनां लिहिलेल्या पत्रांवरून सेंटपांलचा स्वभाव अधिकच चांगल्या प्रकारें व्यक्त होते. सेटपॉल मोठा धोरणी, प्रेमळ व कोमल अंतःकरणाचा होता; व इतकें असूनहि तो मोठा मुत्सद्दी आणि अधिकार चालविण्यास समर्थ होता.

सेंटपॉलच्या पत्रांनां हळू हळू तात्त्विक विवेचनाचें स्वरूप प्राप्त झालें. कारण लोकांची अवतारविषयक उत्सुकता नाहींशी होऊन निराळेच वादाचे मुद्दे पुढें आले. प्रतिग्रामी धोरणाच्या यहुदी लोकांनीं सेंटपॉलनें स्थापन केलेल्या चर्चवर हल्ला सुरू केल्यामुळें गॅलेशियांत मोठा आणीबाणीचा प्रसंग उद्धवला. त्यामुळें सेंटपॉलनें आणखी एक पत्र लिहिले. या पत्रांत सेंटपॉलला स्वतःबद्दल व नवीन स्थापन झालेल्या ख्रिस्ती संप्रदायांतील तत्त्वांबद्दल खुलासा करावा लागला. त्यामुळें या पत्राचा बराचसा भाग संप्रदायासंबंधाच्या मुख्य प्रश्नानेंच व्यापलेला आहे.

यानंतर दोन तीन वर्षांनीं (इ .स. ५५-५६ च्या सुमारास) सेंटपॉलनें रोमला भेट देण्याचा विचार केला; पण सरळ रोमला न जातां त्यानें प्रथम यरूशलेमला जाण्याचें ठरविलें, तिकडे जाण्यांत स्वतःच्या जिवाला धोका आहे हें जाणून होता. अशा स्थितींत त्यानें ख्रिस्तीसंप्रदायाच्या विवादविषयीभूत झालेल्या अंगाचें समर्थन करणारा लेख लिहून तो रोमन लोकांकडे पाठविला.

यहुदी संस्कृति आणि ख्रिस्ती संप्रदाय त्यांच्यामध्यें चालू असलेल्या झगड्यामुळें ख्रिस्तीसंप्रदायाच्या तत्त्वांनां निश्चित स्वरूप साहजिकच येत गेलें. याच झगड्यामुळें भविष्यकालापेक्षां चालू काळाकडे आणि तत्संलग्न अशा भूतकाळाकडे लोकांचें लक्ष अधिक लागलें. सेंटपॉलसारख्या माणसाला संप्रदायविषयक सिद्धान्त बनविणें भाग पडलें ते याच परिस्थितीमुळें होय. निरनिराळे भाग एकत्र करून ख्रिस्ती संप्रयाला सुव्यवस्थित स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू झाला. हें प्रयत्नाचें स्वरूप इफीसकरांस व कलस्सैकरांस या पत्रांत चांगलें व्यक्त झाले आहे.

ही पत्रें तत्कालीन विचारांतील प्रगति पुढें मांडण्याकरितां व ख्रिस्ताच्या शेजारीं इतर देवता बसवून ख्रिस्ती आचार भ्रष्ट करण्याची जी प्रवृत्ति वाढत होती तिला आळा घालण्याकरितां लिहिलेलीं होतीं. तें कार्य साधण्यासाठीं, पॉल यानें ख्रिस्ताचें महत्त्व पुनः पुन्हां वर्णन केलें व यहुदी व यहुदी नसलेल्या लोकांचा चर्चमध्यें अंतर्भाव करून त्याचें स्वरूप व्यापक करण्याची आपली कल्पना एक पाऊल आणखी पुढें ढकलली. अशा रीतीनें या पत्रांमध्यें मुख्यत्वेकरून गूढ विषयाचें प्रतिपादन केलें जाऊं लागल्यामुळें त्यांचें पत्राचें स्वरूप जाऊन त्यांनां ग्रंथाचें स्वरूप येऊं लागलें. इफिसकरास (इफीझनांनां) पत्र हे अनेक चर्चाच्या समूहास उद्देशून लिहिलेले एक हुकूमवजा पत्र असल्यामुळें त्यांत तर हें ग्रंथाचे स्वरूप अधिक स्पष्ट होतें. फिलेमोनाला पत्र शुद्ध पत्राच्या स्वरूपांत आहे, आणि फिलिप्पैकरांस पत्र हेंहि मुख्यत्वेंकरून तसेंच आहे. पास्टोरल्स या पत्रांत पालनें टिमोथि व टायटस या आपल्या हाताखालच्या लोकांस उपदेश केलेला आहे. टिमोथि व टायटस यांच्या स्वाधीन जेथें पॉल यास स्वतः जातां येत नव्हतें अशीं चर्चें केलेलीं होतीं.

हिब्रूंनां पत्र हा पॉलच्या धर्ती वर लिहिलेला पॉलच्या एका शिष्याचा- किंवा ज्यावर पॉलच्या मतांचा बराच परिणाम झाला होता अशा एखाद्या इसमाचा- ग्रंथ आहे. या लेखकावर अलेक्झांड्रियाच्या फायलो नामक यहुदी उपदेशकाच्याहि मताचा बराचसा परिणाम झालेला दिसतो. हें पत्र बहुधा रोममधील हिब्रू ख्रिस्त्यांस किंवा पॅलेस्टाइन मधील एखाद्या चर्चला किंवा ज्याचें केंद्र सेसारीआसारख्या ठिकाणीं आहे अशा एखाद्या चर्चच्या समूहास लिहिलें असावें यरूशलेमच्या चर्चला उद्देशून लिहिलेलें असणें संभवनीय नाहीं.

पॉलच्या पत्रांचें वर जें वर्णन केलें आहे तें ही सर्व तेराचीं तेरा पत्रें खरोखर पॉलचींच आहेत असें गृहीत धरून केलेलें आहे. तथापि येथें एवढें सांगून ठेविलें पाहिजे कीं, यांपैकीं थेस्सलनीकेकरांच्या, कलस्सैकरांच्या, फिलेमोनच्या, इफिसकरांच्या व पास्टोरल्सच्या अस्सलपणाबद्दल आधुनिक चिकित्सक पंडितांस बरीच शंका आहे.