प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता
कालवृत्तान्त, एज्रा व नहेम्या.- ही पुस्तकें ही ऐतिहासिक पुस्तकांपैकीं दुसरी मालिका होय. एज्रा व नहेम्या यांत कालवृत्तांत या पुस्तकांतील हकीकतीच्या पुढील हकीकत दिलेली आहे. १ कालवृत्तांत १-९ यांत यहुदी जातींतील प्रसिद्ध घराण्यांतल्या पुरूषांची हकीकत दिलेली आहे. १ कालवृत्तांत १०-२ कालवृत्तान्त ३६ यामध्यें शमुवेल व राजे या पुस्तकांतीलच उतारे दिलेले आहेत, व त्याबरोबर लेखकानें स्वतःचा मजकूरहि घातला आहे. एज्रा व नहेम्या हीं पुस्तकें याच प्रकारानें तयार केलेलीं आहेत. ग्रंथकर्त्यानें स्वतःलिहिलेल्या मजकुरामुळें ग्रंथकर्त्याच्या काळांतील परिस्थितीची कल्पना नीट करतां येते. ग्रंथकर्त्याच्या लेखनाचा नमुना १ कालवृंत्तान्त १५. १-२४, १६. ४-४२, २२. २-९, २ कालवृत्तान्त १३. ३-२२, १४. ६-१५.१५, १६. ७-११ इत्यादि ठिकाणीं पहावयास सांपडतो. नहेम्याचें पुस्तक त्यांतील ऐतिहासिक उल्लेखांवरून ख्रि. पू. ३०० च्या सुमारास झालें असावें असें दिसतें.
आतां प्राचीन यहुदी लोकांच्या वाङ्मयांतील कांहीं उतारे देऊन त्या वाङ्मयाचें स्वरूप स्पष्ट करतों. यहुदी लोकांचें प्राचीन वाङ्मय राष्ट्रीय वाङ्मय या नांवास जगांतील दुस-या कोणत्याहि प्राचीन वाङ्मयापेक्षां अधिक पात्र आहे. या जातीस दैवाच्या अनेक फे-यांतून परिवर्तन करावें लागलें, आणि त्या परिवर्तनांतील अनेक प्रसंगांचें सूचक किंवा साक्षीदार म्हणून त्यांचें वाङ्मय शिल्लक आहे. त्यांची अशी समजूत होती कीं त्यांच्यावर जे बरे वाईट प्रसंग आले त्यांचें कारण त्यांचें चांगल्या वर्तणुकीस सोडून असलेलें वर्तन होय. त्यांचा आचार कसा असावा, तर मोश्याला परमेश्वरानें जसा सांगितला असेल तसा. परमेश्वरानें मोश्याला काय सांगितलें तें लेवीय म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकरणांत घातलें आहे.
''परमेश्वरानें मोश्याला सांगितलें कीं, ज्या कशाला खोड आहे तें अर्पूं नका. कांतर तें तुमच्यासाठीं मान्य होणार नाही. आणि कोणी नवस फेडण्यासाठीं किंवा खुशीनें दान करण्यासाठीं गुरांतला किंवा मेढरांतला शात्यर्पणाचा यज्ञपशु परमेश्वराला अर्पितो तर तो मान्य होण्यास निर्दोष असावा; त्याला कांहीं खोड नसावी''. (२२.२० व पुढें). हा नियम भारतीय श्रौतविधींतील यज्ञिय पशूच्या वर्णनाची आठवण भारतीयांस करून देईल.
लेवीय प्रकरणांत इस्त्राएल लोकांनीं कोणते सण, उत्सव वगैरे पाळावेत, याविषयी नियम दिले आहेत. त्यांतच पुढें कांहीं नैतिक नियम आहेत. त्या नियमांचा ख्रिस्ताच्या उपदेशाशीं विरोध दाखवून ख्रिस्ताचा उपदेश उच्च त-हेचा अशी मांडणी आजचे ख्रिस्ती करतात. यासाठीं तो प्रसिद्ध उल्लेख अवतरणार्ह आहे.
''ज्याचा बाप मिसरी होता असा. इस्त्राएली स्त्रीचा पुत्र इस्त्राएलाच्या संतानांमध्यें बाहर गेला, आणि त्या इस्त्राएलीचा पुत्र व एक इस्त्राएली माणूस छावणींत भांडूं लागले. तेव्हां इस्त्राएली स्त्रीच्या पुत्रानें परमेश्वराच्या नामाची निंदा करून शिवी दिली, मग त्यांनीं त्याला मोश्याकडे आणिलें; त्याच्या आईचें नांव तर शलोतीथ, ती दानाच्या वंशांतला दिब्री याची कन्या होती. आणि परमेश्वराचा ठराव त्यांस कळावा म्हणून त्यांनीं त्याला बंदांत ठेविलें.
''मग परमेश्वरानें मोश्याला सांगितलें कीं, ज्यानें शिवी दिली त्याला छावणीच्या बाहेर घेऊन जा, आणि सर्व ऐकणा-यांनीं आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावे, मग सर्व समुदायानें त्याला धोंडमार करावा. आणि इस्त्राएलाच्या संतानांस असें सांग कीं, जर कोणी मांणूस आपल्या देवाला शिवी देईल तर त्यानें आपला पापाचा भार सोसावा. म्हणजे जो परमेश्वराच्या नामाची निंदा करतो त्याला जिवें मारावें; सर्व समुदायानें त्याला धोंडमार करावा, जसा देशस्थ तसा विदेशी जो कोणी त्या नामाची निंदा करितो त्याला जिवें मारावें. आणि मनुष्य कोणत्याहि मनुष्याला जिवें मारील तर त्याला जिवे मारावेंच. आणि पशूला जो जिवें मारील त्यानें पशूबद्दल पशु देऊन फेड करावी. आणि कोणी आपल्या शेजा-याला अपकार करील तर जसें त्यानें केलें तसें त्याला करावें. मोडण्याबद्दल मोडणें, डोळ्याबद्दल डोळा, दांताबद्दल दांत. कोणी माणसाला अपकार करील तसा त्याला करावा. आणि पशूला जो मारील त्यानें त्याची फेड करावी, आणि जो मनुष्याला मारील त्याला जिवें मारावेंच. तुम्हांस एक न्याय असावा. जसा देशस्थ तसा विदेशी असावा, कां कीं, मी परमेश्वर तुमचा देव आहें. मग मोश्यानें इस्त्राएलाच्या संतानांस सांगितलें, तेव्हां त्यांनीं शिवी देणा-याला छावणीच्या बाहेर काढून घोंड्यांनीं त्याला मारिलें; मोश्याला आज्ञा दिली त्याप्रमाणें इस्त्राएलाच्या संतानांनीं केले.'' (लेवीय, अ. २४ १० -२३).
वरील उता-यावरून यहुद्यांची आपल्या देवावरील श्रद्धा व्यक्त होते. त्या वेळेच्या यहुदी लोकांस एकेश्वरवादी असें म्हणतां येत नाहीं. कांकीं देव व दुस-याचें देव हा भाव त्यांच्यांत होता. आपला देव खरा, आपली उपासना पद्धति खरी अशी भावना त्यांच्यांत असून त्याविषयीं लोकांच्या मनांत श्रद्धा कायम असावी याबद्दल त्यांची खटपट असे.
सामान्य मनुष्य देवाच्या निवडणुकींच्या बाबतींत बराच निःपक्षपाती असतो. जो नवसाला पावेल तो देव खरा, आणि तोच पूज्य, अशी भावना सर्व ठिकाणीं दृष्टीस पडते. ग्रीक लोकांस आपले देव मान्य होते व अन्य स्थलांतील देवताहि मान्य होत्या. ग्रीक जेथें जात तेथें ते स्थानिक देवतेची पूजा करीत.