प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता

ख्रिस्ती संप्रदाय.- आतांपर्यंत जें जगाचें निरीक्षण झालें त्यांत ख्रिस्ती संप्रदायाविषयीं तुरळक उल्लेख आले आहेत. हे उल्लेख म्हटले म्हणजे यहुद्यांमध्यें 'मेसाया' (गांजलेल्यांचा रक्षणकर्ता) या राजकीय कल्पनेचें अस्तित्व, येशूचा मेसाया होण्याचा प्रयत्न व राजकीय दृष्ट्या त्याच्या कल्पनेतील वैगुण्य यांविषयीं(पृ.२५) होत. तसेंच बौद्ध वाङ्‌मय आणि ख्रिस्ती सांप्रदायिक वाङ्‌मय यांतील साम्यस्थलांचें आणि दोन्ही संप्रदायांतील शक्य अन्योन्याश्रमाचें विवेचनहि मागें झालेलेंच आहे (पृ. २९-२३). या संप्रदायाचा मणिसंप्रदायाशी संबंध (पृ.३६), इराणी साम्राज्यांत त्याचा प्रवेश व छळ (पृ.५८) आणि रोमन साम्राज्यांतील त्याचें स्वागत (पृ. १०७) व हिंदुस्थानांत प्रसार (पृ.२६०-१) यांवरहि प्रसंगानुसार टीपा लिहिल्या आहेत. आतां या संप्रदायाकडे थोडे अधिक लक्ष देऊन यांशीं असलेला जगांतील इतर कार्यपरंपराचा संबंध स्पष्ट केला पाहिजे; ख्रिस्ती संप्रदायाचा जगाशीं संबंध आला तो रोमन साम्राज्यामुळें आला; आणि तो देखील पश्चिमेकडील साम्राज्याच्या उत्तर काळांत आणि पूर्वेकडील साम्राज्याच्या प्रारंभापासून आला.

ख्रिस्ती संप्रदायाचा सविस्तर इतिहास द्यावयाचा म्हणजे तो अनेक अंगांनीं दिला पाहिजे. ख्रिस्ताचें चरित्र हा त्याचा अवश्य भाग आहेच, पण तेवढ्यानेंच काम भागत नाहीं. ख्रिस्ताच्या अनुयायांमध्यें कदाचित् राजकीय हेतूसाठीं आणि तदाश्रयानें नैतिक हेतूसाठीं संप्रदाय स्थापन झाला असावा असें दिसतें. तेव्हां तसें असल्यास त्याचें राजकीय स्वरूप जाऊन त्यास केवळ नैतिक आणि पारमार्थिक संप्रदाय म्हणजे स्वरूप कसें प्राप्त झालें, त्यांत भिक्षुकी कशी शिरली, त्याचा कायद्यावर कसा परिणाम झाला, त्या संप्रदायाचें वाङ्‌मय काय, त्या संप्रदायांत मोठाले पुरूष व भगवद्भक्त कोण होऊन गेले, एवढेंच नव्हे तर या संप्रदायाचा तत्कालीक कलेवर काय परिणाम झाला अशा अनेक दृष्टींनीं विचार करून इतिहास मंडवितां येईल.

या अभ्यासाच्या शाखा एवढ्यानेंच सरल्या नाहींत. तर आज बायबल म्हणून जें वाङ्‌मय आहे त्याची जुळणी कशी झाली, तिचा इतिहास विस्मृत कसा झाला. तो इतिहास विस्मृत झाला असतां जेव्हां संशोधकांच्या प्रयत्नानीं तो पुन्हां बाहेर पडूं लागला तेव्हां त्याचा परिणाम काय होऊं लागला, याची हकीकत जगाच्या विचारेतिहासांतील एक मोठें महत्त्वाचें पान आहे. हा संप्रदायेतिहास केवळ अंतर्गत विकसाचा होय असें म्हटल्यास चालेल. पण जेव्हां या संप्रदायानें जगद्यापी धोरण ठेविलें तेव्हां इतर लोकांनां या संप्रदायांत आणण्याकरितां पारमार्थिक धंदेवाईकांनीं काय काय बरेवाईट उपाय योजले याचा वृत्तान्त इतिहासांत बरीच मनोरमता उत्पन्न करतो. प्रथम आपण संप्रदायसंस्थेचा इतिहास घेऊं. त्या इतिहासाचा राजकारणाशीं बराच संबंध असून राजकीय इतिहासाचें हें उत्तरांगच म्हटलें तरी चालेल.