प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता

जुना करार - जुना करार हा ''पवित्र शास्त्रा'' चा पहिला विभाग असून त्यांत एकोणचाळीस पुस्तकें (बुक्स) आहेत. यां पैकीं कांहीं पुस्तकें फारच लहान म्हणजे एक दोन, तीन किंवा चार इतक्याच प्रकरणांचीं आहेत; तर कांहीं पुस्तकांची चाळीस, पन्नास किंवा साठ पर्यंत प्रकरणें आहेत. एका स्तोत्रसंहिता (साम्स) नामक पुस्तकाची तर दीडशें प्रकरणें असून हा पहिला विभाग बारीक टाइपाच्या व मध्यम आकाराच्या सातसाडेसातशेंवर पानांचा आहे. या इतक्या पुस्तकांचें ग्रंथकर्तृत्व एका इसमाकडे असणें शक्य नाही. ती निरनिराळ्या काळांत निरनिराळ्या व्यक्तीकडून लिहिलीं गेलीं आहेत. तथापि ख्रिस्ती शकाच्या पहिल्या शतकांतील एका ग्रंथांत असें लिहिलें आहे की, जुन्या कराराची पुस्तके सर्व जळून गेली, तेव्हां एज्रानें पांच लेखकांनां सर्व मजकूर स्वतः तोंडानें सांगून चाळीस दिवसांत जुन्या कराराची २४ पुस्तकें (जुन्या यहुदी लोकांच्या गणनेप्रमाणें) आणि इतर ७० पुस्तकें मिळून ९४ पुस्तकें तयार केलीं. अर्थात् ही दंतकथा मुळींच विश्वसनीय नाहीं. तथापि एज्रानेंच जुन्या कराराचीं नष्ट झालेलीं पुस्तकें पुन्हां उपलब्ध करून दिलीं हें मत बरेंच प्रचलित आहे.
 
र च ना का ल.- यहुदी गणनेप्रमाणें जुन्या करारांतील पुस्तकांचे विषयानुरोधानें तीन वर्ग केलेले आहेत; ते येणे प्रमाणें :
  १  धर्मशास्त्रविषयक (पांच पुस्तकें);
  २  प्रवत्क्यांविषयीं (आठ पुस्तकें);
  ३  स्तोत्रें, नीतिसूत्रें, उपदेशक, गीतें, विलाप इत्यादि (अकरा पुस्तकें).

हे तीन प्रकार मिळून जीं २४ पुस्तकें होतीं तींच पुढें वाढवून ३९ पुस्तकें करण्यांत आलीं. हिंब्रू बायबलचें ग्रीकमध्यें भाषांतर करण्यांत आलें तेव्हां या पुस्तकांचा अनुक्रमहि बदलण्यांत आला. जुन्या करारामधील पुस्तकांचे वर सांगितलेले तीन वर्ग ऐतिहासिक दृष्ट्याहि साधारच आहेत. कारण, त्यांपैकीं धर्मशास्त्रविषयक पुस्तकें प्रथम मान्य झालीं, नंतर प्रवक्तृविषयक पुस्तकें मान्य झालीं या शेवटीं स्तोत्रें, नीतिसूत्रें इत्यादि विषयांचीं पुस्तकें मान्य झालीं. अंतर्गत पुराव्यावरून धर्मशास्त्रविषयक पुस्तकें ख्रि. पू. ४४४ च्या सुमारास पूर्ण तयार होऊन मान्य झालीं असावींत, प्रवक्तृविषयक पुस्तकें ख्रि .पू. २५० च्या सुमारास पुरीं तयार झालीं असावींत आणि बाकीचीं (हेजिओग्राफा) ख्रि. पू. १५० व १०० यांच्या दरम्यान तयार झाली असावींत, असें दिसतें.

कालनिर्णयानंतर लेखकनिर्णयासंबंधानें पाहतां, हीं सर्व पुस्तकें एका व्यक्तीनें तर अर्थात् लिहिलेलीं नाहींतच; पण त्यांपैकीं बहुतेक मोठालीं पुस्तकें व कित्येक लहान पुस्तकें सुद्धां प्रत्येकीं एकएका इसमानें लिहिलेलीं नसून अनेकांनीं निरनिराळ्या काळांत भर घालून एकएक पुस्तक पुरें केलें आहे असें स्पष्ट दिसतें.

इतर राष्ट्रांप्रमाणें हिब्रू राष्ट्रांतहि वाङ्‌मयाला मूळ आरंभ पद्यमय ग्रंथांपासून झाला असला पाहिजे. निर्गम (एक्झोडस १५) या पुस्तकांतील मोझेसच्या गीताचा मजकूर, न्यायाधीश (जजेस ५) या पुस्तकांतील डेबोराचें गीत, गणना (नंबर्र २१. २५-३०) या पुस्तकांतील इस्त्राएलाइटांचा विजय वर्णन करणारा युद्धविषयक पोवाडा वगैरे भागांवरून इस्त्राएलाइट लोकांतील वीरांच्या पराक्रमांनीं व राष्ट्रीय गोष्टींनीं कवींना काव्यें करण्यास कशी स्फूर्ति होत असे तें स्पष्ट दिसतें.

जुन्या करारामध्यें ऐतिहासिक गोष्टींविषयीं माहिती देणारीं जीं पुस्तकें आहेत त्यांचे दोन पोटवर्ग पडतात; पोटवर्गांत 'उत्पत्ती' (जेनिसिस) 'राजे' (किंग्ज) पर्यंतच्या पुस्तकांचा समावेश होतो ('रुथ' हें पुस्तक वगळावयाचें, कारण ते तिस-या हेजिओग्राफा या वर्गांतील आहे). या पुस्तकांत सृष्ट्युत्पत्तीपासून खाल्डी लोकांनी ख्रि .पू. ५८६ मध्यें यरुशेलमचा नाश केला तेथपर्यंतची हकीकत आहे;