प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता

नव्या करारांत अंतर्भूत न झालेलें वाङ्मय.- नव्या करारांतील लेख हे कांही ख्रिस्ती सांप्रदायिक वाङ्मयांतील अखेरचेच लेख नाहींत. उलटपक्षी त्यांच्याशीं कमी अधिक प्रमाणांत सादृश्य असलेले इतर बरेच लेख यानंतरच्या काळांत निर्माण झाले. पुष्कळ अंशी नीवन कराराच्या धर्तीवर असलेले असे अँपॉस्टॉलिक, वस्तुतः सब-अँपॉस्टॉलिक म्हणजे आद्य ख्रिस्त संप्रदायप्रसारकांच्या नंतरच्या काळांतील धर्मगुरूंचे लेख. उदाहरणार्थ, रोमच्या क्लेमेंटचीं कॅरिंथकरांस पत्रें. डायडॅची, बर्नाबत, इग्नेशिअसचीं पत्रे पॉलिकार्प (पत्रगुच्छां) मधील एकटें पत्र, हर्मसचा मेंढपाल व ज्या क्लेमेंटचें दुसरें पत्र म्हणतात तें व्याख्यान. हे सर्व चर्चमधील पुढारी लोकांचे लेख असून त्यांनीं आपल्यापूर्वीं होऊन गेलेल्या आद्य ख्रिस्तसंप्रदायप्रसारकांचें कार्य पुढें चालू ठेवलें होते. यांशिवाय हिब्रू, इजिप्शियन, पीअर, ट्रुथ वगैरेंचीं शुभवर्तमानें; जेम्सचे प्रोटेव्हँजेलिअम; थॉमसचें शुभवर्तमान; पायलटचीं कृत्यें; पीटरचीं उपदेशपर व्याख्यान; पीटरचें आपोकालिप्स इत्यादि अँपॉक्रिफळ (अनिर्णीतकर्तृक) शुभवर्तमानें व कृत्यें या सदरांत मोडणारे लेख आहेत. जसजसे दुसरें शतक लोटूं लागलें तसतसे आग्रिप्पा, कॅस्टर क्वाड्रेटस, अँरिस्टियटीझ यांचे वादविवादात्मक व तत्त्वज्ञानात्मक लेख बाहेर पडूं लागले. त्या शतकाच्या मध्यांत जस्टिन मार्टिर सारखा प्रख्यात ग्रंथकार होऊन गेला. या जस्टिनबरोबर आद्य संप्रदायप्रसारकांनंतरचा संधिप्रकाशाचा काळ समाप्त होऊन चर्चच्या ख-याखु-या इतिहासास सुरूवात होते.