प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता
पहिली सहा पुस्तके. - (उत्पत्ति-यहोशवा) इस्त्राएलाइट लोकांमध्यें स्वतःच्या राष्ट्राच्या उत्पत्तीबद्दल व आद्य इतिहासाबद्दल ज्या दंतकथा प्रचलित होत्या त्या ख्रि. पू. १० व्या किंवा ९ व्या शतकाच्या सुमारास ज्यूडा येथील एका प्रवक्त्यानें लिहून काढल्या. हा प्रवक्ता 'जे' या संक्षिप्त नांवानें संशोधकांत प्रसिद्ध आहे. या लेखकाची लेखनपद्धति फार ओजस्वी व धार्मिक भावनांनीं भरलेली आहे. या लेखकानें मूळ मनुष्यप्राणि मातीपासून देवानें कसा उत्पन्न केला, नंतर मनुष्यप्राण्यानें पहिलें पापाचरण कोणतें केलें व त्याचे काय परिणाम झाले, याची हकीकत दिली आहे (जेनिसिस २.४ - ३.२४); पुढें आद्य मनुष्यजातीची कसकशी सुधारणा होत गेली (जेनिसिस ४.), जलप्रलय कसा झाला (जेनिसिस ६-८), आणि निरनिराळ्या भाषा कशा झाला हें सांगून नंतर मोझेस, निर्गम (एक्झोडस), व निर्जन मुलखांतला प्रवास यांची हकीकत व कॅनान जिंकून घेतल्याची हकीकत दिली आहे.
'जे' या लेखकानंतर दुस-या 'ई' या संक्षिप्त नांवानें ज्ञात असलेल्या लेखकानें उत्तरेकडील इस्त्राएल लोकांसंबंधाची आणखी कांहीं दंतकथात्मक माहिती लिहून काढली. या 'ई' नें लिहिलेला मजकूर जेनिसिस १५,२०.१-१७, २१. ८-३२,२२. १-१४,४०-४२ व ४५; एक्झोडस १८; २०-२३ वगैरे पुस्तकांस पहावयास सांपडतो.
ख्रि. पू. ७२२ मध्यें उत्तरेकडील राज्य नष्ट झाल्यानंतर लवकरच ज्यूडा येथील एका प्रवक्त्याच्या मनांत आपल्या लोकांविषयींचा सविस्तर इतिहास लिहिण्याची कल्पना उद्भवली. याकरितां त्यानें 'जे' व 'ई' या दोघांहि लेखकांच्या लेखांतील उतारे घेऊन एक सुसंगत इतिहास बनविला. हा संयुक्त इतिहासग्रंथ 'जे-ई' या नांवानें अभ्यासकांत प्रसिद्ध आहे. या लेखकाची भाषा पद्धतीहि चांगली जोरदार व धार्मिकभावनायुक्त अशी आहे. देव अंगांत संचरून बोलणा-या प्रवक्त्याला साजेल असाच हा ग्रंथ आहे.