प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता

मनुष्योत्पत्ति जलप्रलय व भाषावैचित्र्य अब्राहाम काल.- उत्पत्ति पुस्तकांतील पहिल्या बारा अध्यायांत अब्राहामच्या कालापर्यंतचा इतिहास दिला आहे तो येणेंप्रमाणें 'उत्पत्ति' पुस्तकांत सहा दिवसांत ईश्वरानें सृष्टीची उत्पत्ति कशी केली या संबंधानें कथा आहे (अ.१); सातव्या दिवशीं ईश्वरानें विश्रांति घेतली (२.२); आदाम  म्हणजे प्रथम पुरूषाची उत्पत्ति; त्यास बागेंतील एक खेरीज सर्व फळें खाण्यास अनुज्ञा (१७); प्रथम पुरूषाच्या बरगडींतून प्रथम स्त्रीची उत्पत्ति (२२); साप हाच सैतान व तो त्या निषिद्ध झाडाचें फळ स्त्रीपुरुषांकडून खाववितो; त्यामुळें त्यांस बरें वाईट कळूं लागलें. परमेश्वरानें या आज्ञाभंगाबद्दल आदाम, स्त्री व साप या सर्वांस शाप दिला (अ.३) आदामच्या मुलांची हकीगत (अ.४.५) ईश्वराचे मुलगे आणि मानवांच्या मुली यांपासून प्राचीन मोठ्या लोकांची उत्पत्ति (अ.६) मनुष्याच्या दुष्टत्वामुळें त्यांस व इतर पशुपक्ष्यांस नाहींसे करण्याची ईश्वरास इच्छा होते. परंतु नोहावर मात्र परमेश्वर कृपादृष्टि करतो. जलप्रलय. नोहा परमेश्वरसूचनेनें मोठें तारूं करतो व आपले आप्त व प्रत्येक जातीच्या प्राण्याची नरमादी यांस तारवांत घेतो व वांचवितो (अ.७-८) प्रजावृद्धीसाठीं ईश्वर नोहाच्या संततीस आज्ञापितो (अ.९) नोहाचे पुत्र शेम, हाम व याफेथ यांचा वंशविस्तार (१०). माणसें आकाशापर्यंत जाईल असा मोठा व उंच बुरूज बांधण्याची तयारी करतात. तें ईश्वराला नापसंत होतें. म्हणून ईश्वर लोकांत अनेक भाषा उत्पन्न करून त्यांस पुढें काम चालू ठेवण्यास असमर्थ करतो (अ.११). शेमच्या वंशांत अब्राम उत्पन्न होता (११.२७). अब्राम ईश्वरप्रेरणेनें देशत्याग करतो आणि मिसरला पोंचतो, आपली बायको बहीण आहे असें सांगून राजास देतो व त्याबद्दल देणग्या मिळवितो न कळत परस्त्रीगमनाबद्दल फारोस ईश्वर दपटशा देतो व फारो अब्रामास स्वदेशीं रवाना करतो (अ.१२) अब्रामास अब्राहाम हें नांव पुढें प्राप्त होतें.

दुस-या पोटवर्गांत 'कालवृत्तांत' (क्रॉनिकल्स) पासून नेहम्यापर्यंतचीं पुस्तकें येतात व त्यांत आदामापासून नहेम्यानें यरूशलेमला ख्रि. पू. ४३२ मध्यें दुसरी भेट दिली तेथपर्यंतची माहिती आहे. या दोन्ही पोटवर्गांतील पुस्तकांत एक मोठें साम्य आहे तें हें कीं, त्यांपैकीं कोणतेंहि पुस्तक मूळ अथपासून इतिपर्यंत एकट्यानें लिहिलेलें नाहीं, तर प्रत्येक पुस्तक अनेक जुने लेख एका इसमानें किंवा अनेक इसमांनीं अनेक निरनिराळ्या वेळीं एकत्र केल्यानें तयार झालेलें आहे. ही जुळणी अशी झाली आहे कीं, मधले सांधे स्पष्टपणें लक्षांत येतात. एक एक पुस्तक निरनिराळ्या काळांतील लेखकांनीं आपआपल्या इच्छेप्रमाणें पूर्वकालीन लिखाणापैकीं निरनिराळा मजकूर घालून व स्वतः कांहीं कांहीं मजकूर लिहून बनविलें आहे. त्यामुळें एकाच पुस्तकांत अनेक लेखनत-हा आढळतात. पूर्वकालीन लिखाणांतून घेतलेले उतारे कांहीं ठिकाणीं लांबलचक व साग्र आहेत, तर कांहीं ठिकाणीं लहानलहान आहेत.