प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता
येशूची व्यक्तिविषयक माहिती.- पॉलचे कार्य कितीहि मोठें असलें तरी ख्रिस्ती संप्रदायाचा उत्पादक नाझारेथचा येशू होय ही गोष्ट विसरून चालणार नाहीं. या येशूविषयीं आपणास निश्चित माहिती फारच थोडी आहे. हा यहुदी होता असें गृहीत धरलें आहे, आणि तो यहुदी असावा असें आजपर्यंतच्या पुराव्यावरून वाटतें. तथापि हा जन्मतः यहुदी नसून आर्यन रक्ताचा असावा असें सिद्ध करण्याचे प्रयत्नहि दृष्टीस पडतात. येशूच्या भाविक भक्तांनीं त्याची पूर्वजपरंपरा यहुदी राजा दावीद याच्या घराण्याशी नेऊन भिडविली आहे. ख्रिस्ती संप्रदायसंस्था त्याचा जन्म ईश्वरी अद्भुत करणीमुळें झाला असें शिकविते. येशू प्रसिद्धपणें उपदेश करूं लागल्यापूर्वीचा काळ आपला बाप योसेफ आणि आई मेरी यांच्या बरोबर सुतारकाम करण्यांत घालवीत असावा असा समज आहे. येशूच्या बाल्यानंतर आपणांस योसेफचें नांव ऐकूं येत नाहीं. येशूच्या या कालांतील आयुष्यक्रमाविषयीं आपणांस निश्चित अशी माहिती कांहींच नाहीं. येशू तीस वर्षांचा झाल्यानंतर तो उपदेशक म्हणून पुढें आला, आणि थोड्याच कालानंतर त्याला त्याच्या देशबंधूंच्या फिर्यादीवरून रोमन अधिका-यांकडून क्रूसीं चढविण्यांत आलें. त्याच्या उपदेशाचा काल किती असावा याविषयी निश्चितपणें कांहीं सांगतां येत नाहीं. हा उपदेशकाल १८ महिने असावा असा अजमास करण्यांत आला आहे, आणि जगद्वयापक संप्रदायाच्या स्थापनेस आधारभूत झालेलें असें त्याचें कार्य केवळ या १८ महिन्यांतलेंच होय. येशूचें शिक्षण फारसें झालें नसावें; तथापि त्यास हिब्रूंच्या पवित्र ग्रंथांची साधारण बरी माहिती होती असें दिसतें. येशू हा उच्च वर्गांतील नव्हता किंवा हिब्रूच्या पंडितवर्गांपैकींहि नव्हता परंतु हा सामान्य वर्गांतील होता तरी इतरांपेक्षां त्यांत कांहीतरी निराळेपणा होता हें उघड आहे. हा निराळेपणा आनुवंशिक संस्कारानें किंवा शिक्षणाच्या उच्चतेमुळें आला नसून त्याच्या व्यक्तिविशिष्टत्वामुळें आला होता असें म्हणतां येईल.
येशूचें कार्य लक्षांत घ्यावयाचें म्हणजे त्याच्या पैतृक धर्माचें कार्य लक्षांत घेतलें पाहिजे. कारण यहुदी लोकांचें जें पूर्वसंचित येशूस लाभलें त्याच्या पायावरच येशूनें आपल्या कार्यांची उभारणी केली होती. हें हिब्रूंचें पूर्वसंचित म्हणजे कांहीं परस्परांशीं सुसंगत अशा आचारविचारांची संस्था नव्हती. त्यांची धर्मसंस्था आणि धार्मिक वाङ्मय ही ब-याच कालच्या आचारांचा आणि अनेक प्रवक्त्यांच्या विचारांचा संचय होऊन तयार झाली होती असें दिसतें. हें वाङ्मय म्हणजेच जुना करार होय. त्याचें स्वरूपवर्णन पुढें दिलें आहे. त्या वाङ्मयाकडे सूक्ष्म दृष्टीनें अवलोकन केलें असतां त्यांत भारतीय धर्मविकास व विचारविकास यांशी अनेक सादृश्यें दृष्टीस पडतात. ईश्वराविषयीं जंगली समजुतीपासून सुधारलेल्या लोकांस साजतील अशा समजुतीपर्यंत सर्व कल्पना जुना करार नांवाच्या संहितेंत आढळून येतील.