प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १३ वें.
सेमेटिक संस्कृतीची जगदव्यापकता
योहानचे लेख.- योहानच्या नांवावर असलेलें शुभवर्तमान व पत्रें आणि अपोकालिप्स (नव्या करारांतल्या शेवटच्या पुस्तकांस सांगितल्याप्रमाणें सेंट जॉन यांस झालेला साक्षात्कार) या लेखांचा एक स्वतंत्रच वर्ग होत असल्यामुळें योहानचीं पत्रें कॅथोलिक पत्रांच्या सदारांत येत असतांहि त्यांच्यासंबंधीं विवेचन योहानचे लेख या सदराखालीं करणें सोईचे पडतें. या लेखासंबंधीं सर्व संमत मुद्दे म्हटले म्हणजे २ पीटर या पत्राखेरीज हे बहुधा नव्या करारांतील सर्वांत अलीकडचे लेख असावेंत. हे सर्व लेख एका स्वतंत्र वर्गांतील दिसतात तरी ते लिहिण्यास कितीजणांचे हात लागले असतील हें नक्की सांगतां येत नाही. ते सर्व लेख पहिल्या शतकाच्या अखेरीस लिहिलेले आहेत. अपोकालिप्स हे रीनॅश व यर्नाक यांच्या मते इ. स. ९३ च्या सुमारास तयार झाले होते, व बाकीचे लेख बहुतेक डोमिशिअन (इ .स. ८१-९६) याच्या कारकीर्दीत लिहिले गेले असावेत. कांहीं संशोधकांच्या मतें या दुस-या लेखांचा रचनाकाल सुमारें वीस वर्षें नंतर असावा. या लेखांचा इफिसच्या (इफिसकर) जॉन (योहान) शीं थोड्या बहुत प्रमाणांत कांहीं तरी संबंध असावा. उलट पक्षी ज्या मुद्यासंबंधीं सर्वांत जास्त मतभेद आहे. ते मुद्दे पुढें दिल्याप्रमाणें आहेत. हा योहान कोण होता-ज्याला 'प्रियशिष्य' म्हणतात तोच हा काय ? आद्यसंप्रदाय प्रसारक झेबंडीपुत्र तोच हाच कीं दुसरा कोणी ? शुभवर्तमानाचा व पत्रांचा लेखक तोच आपोकालिप्पसचाहि काय ? इफिसकर योहान व शुभवर्तमान यांच्यामधील नक्की संबंध काय ? तो शुभवर्तमानाचा खास कर्ता आहे किंवा केवळ त्याचीं वचनें त्यांत दिलेलीं आहेत ? ३ या शुभवर्तमानाच्या लेखकाचा ऐतिहासिक दृष्टि ठेवण्याचा कितपत विचार होता, व तो कितपत साध्य झाला आहे ? हा शेवटचा प्रश्नच सर्वांत जास्त महत्त्वाचा आहे.
या गुंतागुंतीच्या प्रश्नाचा अखेर कांहीहि निकाल लागो, एवढे मात्र निःसशंय आहे कीं, चर्चच्या इतिहासांत व ख्रिस्ती दैवतशास्त्रांत चौथ्या शुभवर्तमानानें फार महत्त्वाचें कार्य केलें आहे. त्यानें आद्यसंप्रदायप्रसारकांच्या कालांस कार्य करीत असणा-या सर्व शक्ती आपणामध्यें एकवटल्या आणि उपोद्धाताच्या रूपानें ग्रीक तत्त्वज्ञानांशीं संबंध जोडून ख्रिस्ती संप्रदायाच्या प्रमुख मतांनां असें स्वरूप दिलें कीं, तो संप्रदाय यहुदी समाजाच्या बाहेरील लोकांनां पूर्वींपेक्षांअधिक प्रिय झाला आणि त्या शुभवर्तमानाला यूरोपीय जगाच्या विचारांत प्रमुखस्थान मिळालें. ख्रिस्ती संप्रदायाला व्यवस्थित स्वरूप देण्याचा पुढील काळांत प्रयत्न झाला त्यावर या शुभवर्तमानाइतका दुस-या कोणत्याहि आद्यकालीन ख्रिस्तसांप्रदायिक लेखाचा परिणाम झालेला नाहीं.