प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ४ थें.
दाशराज्ञ युद्ध अथवा भरतदिग्विजय.

ॠग्वेदांत सर्वव्यापक प्रसंग दाशराज्ञयुद्धच होय.- ॠग्वेदांतील अनेक सूक्तांत अनेक कथांचे व प्राचीन इतिहासाचे अंश आले आहेत. त्या सूक्तोक्त उल्लेखांनीं परिचित होणा-या व्यक्तीचा परस्परांशीं संबंध व्यक्त करुन दाखविण्यास आपणांस विवेचनासाठी असा एक प्रसंग घेतला पाहिजे की, त्याशीं सर्व व्यक्तींचा संबंध कसा तरी लावतां येईल व त्या व्यक्तीचा अन्योन्याश्रय स्पष्ट करतां येईल. व्यक्तीच्या अगर राष्ट्रांच्या विशेष कृत्यांची एखाद्या प्रसंगाच्या अनुरोधानें आपणांस ओळख होईल तर पाहिजे. ॠग्वेदांतील अनेक व्यक्तींचा संबंध प्रासंगिक रीत्या जुळविणें झाल्यास तो हेतु साधण्यासाठीं जो एकच प्रसंग सांपडतो तो ''दाशराज्ञ युद्ध'' हा होय, हें मागील प्रकरणांत सविस्तर दाखविलेंच आहे. ह्या प्रसंगाशिवाय अनेक व्यक्तीचा समावेश करणारा व सर्व मंडळांशी संबंधित असलेला असा दुसरा महत्वाचा व व्यापक असा प्रसंग ॠग्वेदांत नाही. वेदोल्लिखित घडामोडींत दाशराज्ञ युध्दाचें स्थान सर्वांत श्रेष्ठ दर्जाचें आहे तें ह्याच दृष्टीनें होय.