प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ४ थें.
दाशराज्ञ युद्ध अथवा भरतदिग्विजय.

या युध्दाचें वाङ्मयीन आणि ऐतिहासिक महत्व:- या युध्दावर इतकें वाङ्मय निर्माण झालें व तें ॠग्वेदांत अंतर्भूत झालें यास त्या युध्दाचें ऐतिहासिक महत्व हेंच कारण होय. या युध्दांत गाजलेले क्षत्रिय पुराणांनीं वर्णिले नाहीत. पण या युध्दाशीं प्रसिद्ध ॠषींचा संबंध आला आहे. राजे म्हणून युध्दाशीं संबंध असलेल्या व्यक्तीहि अनेक असून त्यांचा उल्लेख बहुतेक मंडळांत येतो.

कोणत्या तरी व्यक्तीच्या संबंधानें दाशराज्ञ युध्दाचा उल्लेख सर्वच मंडळांत आला आहे. तथापि सातवें मंडळ व त्यांतहि कांही सूक्तें हीं युध्दाचें विशेष वर्णन करणारीं आहेत. ॠग्वेदसूक्तांतील इतिहास काढून घेण्यासाठी प्रस्तुत युध्दांत भाग घेणा-या व्यक्ती ज्या स्थळीं निर्दिष्ट असतील ती स्थळें जमविलीं पाहिजेत, आणि त्यांत उल्लेखिलेल्या व्यक्तींशी संबंध दाखविणारे इतर उल्लेखहि एकत्रित केले पाहिजेत. दाशराज्ञ युध्दाच्या सन्निकर्षानें अनेक कथा, पुरुष व स्थित्यंतरें यांवर कालस्थलसंबंधात्मक प्रकाश पडणार आहे.

पार्गिटेर असें दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे कीं, पुरोहितांनीं किंवा ॠषींनी वेदासारख्या ब्राह्मणी  वाङ्मयांत ज्यांचे स्तोम गायिलें ते राजे क्षत्रिय वाङमयांत उल्लेखिलेले नाहीत किंवा महत्वानें वर्णिलेले नाहींत; आणि रामायण महाभारतासारख्या क्षत्रिय वाङमयांतून महत्व पावलेल्या राजांचा गौरव वेदांत नाही. हें विधान कदाचित् सत्य असेल; तथापि यांतून पार्गिटेर असा जो ध्वनि काढतो कीं, ब्राह्मणी वाङमयांतून ज्यांचें वर्णन झालें त्यांचे राजकीय महत्व नाहीं, तो मात्र बरोबर नाही. दाशराज्ञ युध्दासंबंधानें पुढें जें विवेचन येईल त्यावरुन असें दिसून येईल कीं, वरील पार्गिटेरच्या समजुतीला आधार नाहीं. फिलिपशिकंदराप्रमाणें दिवोदास व सुदास यांची जोडी दिग्विजयी होती. धृतराष्ट्र व धर्मराज ज्यांस प्राचीन म्हणत असतील, अशा कालीं तिनें अनेक राष्ट्रे पराभूत करीत गांधारापासून कुरुक्षेत्रापर्यंत ज्या लढाया मारल्या व जे शत्रू पाडाव केले त्यांचा उल्लेख ॠग्वेदांत अक्षर शब्दांनी आला आहे. हिंदुस्थानास ''भारतवर्ष'' हें नांव ज्या परिस्थितीत प्राप्त झालें त्या परिस्थितीचा प्रारंभ जर कोठें सांपडेल, तर तो या ब्राह्मणी वाङमयांतच सांपडेल. प्राचीन इतिहासाच्या दृष्टीनें, ज्या लोकांनी इतर लोकांस जिंकून सर्व देशास आपलें नांव दिलें त्या लोकांच्या वर्णनापेक्षां भारतीय राष्ट्राच्या इतिहासकथनास दुसरा महत्वाचा प्रसंग कोणता? देशनामस्पष्टीकरणाचें महत्व जाणण्याइतकी इतिहासबुद्धि प्राचीनांत होती. पौराणिकांनी 'भारतवर्ष' या नांवाचा ऐतिहासिक उलगडा करण्याचा प्रयत्न करुन या विषयाच्या महत्वाची ओळख दाखविली आहे.