प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ४ थें.
दाशराज्ञ युद्ध अथवा भरतदिग्विजय.

वरील ॠचांतील सुदासाविषयीं व इतर माहिती- या ॠचांच्या समुच्चयावर आतां थोडेंसें भाष्य करुं. प्रथम दिलेल्या सूक्तांत आपणांस विविध व्यक्तींविषयीं आणि लोकांविषयी जी माहिती मिळाली त्या माहितींत या वरील ॠचांनीं काय फरक पडतो तें पाहूं. यांपैकीं कांही ॠचांमध्यें उदाहरणार्थ .२५,३; .५३,३; .६०,८-९; यांमध्यें सुदासाचा अर्थ चांगलें दान देणारा असा आहे. याशिवाय या ॠचांत कांही विधानें अधिक नजरेस येतात.

(१)    पुरुकुत्स आणि सुदास यांच्या सामान्य शत्रूंचा नाश इंद्रानें केला आणि त्यामुळें पुरु श्रीमंत झाले.

(२)    अश्वींनीं सुदासाला सुदेवी नांवाची बायको मिळवून दिली.

(३)    सुदासाकडून विश्वामित्रानें अश्वमेध करविला.

(४)    शुदासाला पूर्वेस पश्चिमेस व उत्तरेस जय मिळवावयाचा होता. आणि नंतर यज्ञ करावयाचा होता.

(५)    ६.६१ या सूक्ताच्या गात्यानें दिवोदासाच्या जन्माचें श्रेय सरस्वतीस दिलें आहे.

(६)    गाता पणीच्या नाशाचें श्रेय सरस्वतीस देतो.

(७)    दास, वृत्र तसेंच आर्य यांचा नाश करुन सुदासाचें रक्षण इंद्रावरुणांनी केलें.

(८)    पृथु आणि पर्शु हे प्राचीकडे जातात.

(९)    लढाईच्या प्रसंगी तृत्सूंची स्तुति इंद्रावरुणांनी ऐकली त्यामुळें वसिष्ठाचें तृत्सूंच्या घरचें पौरोहित्य खरें ठरलें.

(१०) इंद्रावरुणांनां दोन्ही पक्षांनी (दहाराजे व सुदास) यांनी हांक मारली पण देवांनी तृत्सूसमवेत असलेल्या सुदासालाच मदत केली.

(११) तृत्सु यांचे वर्णन श्वित्यंच: (शुभ्रवेषधारी किंवा निर्मल) कपर्दिन: (जटाधारी) धीवंत: (बुद्धिवान, स्तोत्रपटु) अशी तीन विशेषणें देऊन केलें आहे.

(१२) भरत पूर्वी थोडे होते. वसिष्ट त्यांचा नायक झाल्यामुळें तृत्सूंची कुळें जिकडे तिकडे पसरलीं. या अधिक माहितीमुळें कांही प्रश्न उपस्थित होतात. एक प्रश्न असा कीं मागच्या सूक्तांत जर पुरु हे सुदासाच्या शत्रूंमध्यें घातले आहेत तर पुरुकुत्स आणि सुदास यांच्या सामान्य शत्रूचा नाश केल्यामुळें पुरु श्रीमंत कसे होतील ? सुदास हाहि पुरुच होता काय ? याचें उत्तर असें देतां येईल कीं एकदां पुरु व दिवोदास हे मित्र होते आणि त्या काळांत दिवोदास पुरुकुत्स आणि आयु यांचा पराभव तूर्वयाण (पक्थ) यानें केला असें दाखविणा-या कांही ॠचा आहेत. त्या पराभवाच्यानंतर म्हणजे सुदासाच्या कारकीर्दीत या त्रयीनें आपल्या सामान्य शत्रूचा मोड केला असा उल्लेख हा दिसतो.

मागच्या सूक्तांत सुदासाचा पुरोहित वसिष्ठ म्हणून दिला आहे. येथें विश्वामित्र सुदासाकडून अश्वमेध करवीत आहे व सुदासाला दिग्विजयी प्रेरणा करीत आहे. वसिष्ठ आणि विश्वामित्र हे दोघेहि ॠषी पैजवनांच्या पौरोहित्यासाठीं स्पर्धा करतांना आपणांस वेदांत दृष्टीस पडतात.

येथें आपणांस एक प्रश्न उत्पन्न करणारें एक सूक्त दृष्टीस पडतें. सरस्वतीच्या प्रसादानें वध्ऱ्यश्वाला दिवोदास हा पुत्र झाला असें विधान आहे. या विधानावरुन दिवोदास गांधाराकडून पूर्वेकडे दिग्विजय करीत येत होता या कल्पनेस बाध उत्पन्न होतो काय हा प्रश्न आहे. आमच्या मतें बाध येत नाही. कां कीं दिवोदास हा मुलगा सरस्वतीनें दिला म्हणजे सरस्वती नदीच्या कांठी दिवोदासाचा जन्म झाला असें नाही तर उत्तरकालीन कवींनी दिवोदासाच्या जन्माचें श्रेय त्यांच्या तत्कालीन देवतेस सरस्वती नदीस दिलें आहे एवढेंच यावरुन निघतें.

पृथु आणि पर्शु हीं दोन राष्ट्रें सुदासाच्या मदतीस होती आणि ती पूर्वेकडे जात आहेत असा उल्लेख आहे, तो सुदासाच्या स्वारीची दिशा स्पष्ट करतो.

भरतांचे नांव वर आलें आहे. ते पूर्वी थोडे होते आणि त्यांचा नायक वसिष्ठ झाल्यानंतर त्यांचीं कुलें चोहोंकडे पसरली असा उल्लेख आहे. एवढया उल्लेखावरुन भरत, तृत्सु, वसिष्ठ आणि सुदास यांचा संबंध स्पष्ट होत नाही. तो होण्यासाठी आणखी संशोधन केलें पाहिजे.

भरत व तृत्सु:- विवेचनसौकर्यासाठी भरत व तृत्सूंविषयीचें उतारे येथें घेऊ. तृत्सूंचा ॠग्वेदांत उल्लेख फक्त सातव्या मंडळांत आठ वेळा आलेला आहे. (.१८,७; १३; १५; १९; ३३,५; ६; ८३,४; ६; ८.) त्यांपैकीं पहिल्या चार ॠचा पूर्वी येऊन गेल्याच आहेत व पुढील चार विवेचन करतांना पुढें घेतल्या आहेत. येथें भरतांविषयीं उल्लेख देतों. त्यांत प्रथम भरतांनी विपाटशुतुद्रि या नद्यांच्या संगमामधून मार्ग आक्रमण केल्याची कथां गाणारें तिस-या मंडळांतील तेहेतिसावें सूक्त प्रथम घेऊं.

विश्वामित्र आणि नद्या:-

प्र पर्वतानामुशती उपस्थादश्वेइव विषिते हासमाने |
गावेव शुभ्रे मातरा रिहाणे विपाट् छुतुद्री पयसा जवेते || १ ||.

दोन घोडया तबेल्यांतून सुटून एकमेकीशीं चढाओढ करुन चालाव्या त्याप्रमाणें चालणा-या दोन गाईंप्रमाणें शोभणा-या, दोन गाई माता असाव्या आणि त्या जिव्हेनें वत्सांनां चारण्यासाठीं त्वरेनें धांवत असाव्या त्याप्रमाणें धांवणा-या, विपाश व शुतुद्री या नद्या पर्वतांच्या मांडीवरुन निघून समुद्राला जाण्याच्या इच्छेनें आपल्या जलासह त्वरेनें जात आहेत.

इन्द्रेषिते प्रसवं भिक्षमाणे अच्छा समुद्रं रथ्येव याथ: |
समारणे ऊर्मिभि: पिन्वमाने अन्या वामन्यामप्येति शुभ्रे || २ ||

हे नद्यांनो ! इन्द्राच्या अनुज्ञेची भिक्षा मागणा-या व त्यानें अनुज्ञा देऊन पाठविलेल्या तुम्ही सरळ समुद्राकडे जात आहां; दोन गाडीवाले आपल्या ठरीव ठिकाणीं जावें त्याप्रमाणें तुम्ही जात आहां. तुमच्यांपैकी प्रत्येक दुसरीशीं मिळून जात आहे. तुम्ही शोभायुक्त आहां.

अच्छा सिंधु मातृतमामयासं विपाशमुर्वी सुभगामगन्म |
वत्समिव मातरा संरिहाणे समानं योनिमनु सच्चरन्ती ||३||

(वत्साला) चारणा-या दोन आया वत्साप्रत ज्याप्रमाणें जातात त्याप्रमाणें एकच मूल ठिकाण-समुद्र-याकडे वाहत जाणा-या, मातृसम वाहणारी शुतुद्रि आणि मोठी भाग्यशाली अशी विपाश् या दोन नद्या यांप्रत मी आलो आहे.

एना वयं पयसा पिन्वमाना अनुयोनिं देवकृतं चरन्ती: |
न वर्तवे प्रसव: सर्गतक्त: किंयुर्विप्रो नद्यो जोहवीति ||४||

पाण्यानें भरलेल्या आम्ही देवानें निर्माण केलेल्या समुद्राकडे जात आहोत. उत्पत्तिस्थानाकडे जाण्याकरितां आरंभलेला हा उद्योग परत फिरण्याकरितां नाही (मग) काय इच्छा करणारा हा ब्राह्मण आम्हा नद्यांना बोलावितो आहे.

रमध्वं मे वचसे सोम्याय ॠतावरिरुप मुहूर्तमेवै: |
प्रसिन्धुमच्छा बृहती मनीषावस्युरह्वे कुशिकस्य सूनु ||५||

हे नद्यांनो, माझ्या शांत भाषणानें तुम्ही मुहूर्तभर गमन थांबवावें. अर्थपूर्ण स्तुतीनें स्वत:चें संरक्षण करण्याची इच्छा करणारा कुशिक पुत्र विश्वामित्र (हे शुतुद्रि) बोलावतो आहे.

इन्द्रो अस्माँ अरदद्वज्रबाहुरपाहन्वृत्रं परिर्धि नदीनाम् |
देवोऽनयत्सविता सुपाणिस्तस्य वयं प्रसवे याम उर्वी: ||६||

वज्रधारी इन्द्रानें आमच्या (प्रवाह जाण्याच्या) खांचा खणल्या. आमचे प्रवाह आडवणा-या वृत्राला त्यानें मारिले. सुदंर हस्ताच्या सवित देवानें आम्हांला नेलें (म्हणजे वाट दाखविली); आणि त्यानें पाठविल्यामुळें विस्तृत होऊन आम्ही वाहतों.

प्रवाच्यं शश्वधा वीर्य तदिन्द्रस्य कर्म यदहिं विवृश्वत् |
वि वज्रेण परिषदो जघानायन्नापोऽ यनमिच्छमाना: ||७||

अहीचे तुकडे तुकडे करुन टाकण्याचे जें शूर कृत्य इन्द्रानें केलें त्या कृत्याची स्तुति नेहमीं केली पाहिजे. अडवणूक करणा-यांचा त्यानें चुराडा केला आणि (नंतर) पुढील मार्ग आक्रमण करण्यास उत्सुक झालेल्या नद्या पुढें वाहिल्या.

एतद्वचो जरितर्मापि सृष्ठा आ यत्ते घोषानुत्तरा युगानि |
उक्थेषु कारो प्रति नो जुषस्व मानो निक: पुरुषत्रा नमस्ते ||८||

हे गायका! पुढील पिढया ज्याचा पुनरुच्चार करितील असा हा तुझा शब्द कधीहि विसरु नकोस. हे कवे ! तुझ्या मनांत आमचे विषयी असलेला प्रेमयुक्त प्रेमळपणा सूक्ते गाऊन दाखीव. मनुष्यामध्यें आम्हांस कमीपणा आणूं नकोस. तुझा जयजयकार असो!

ओ षु स्वसार: कारवे शृणोत ययौ वो दुरादनसा रथेन |
नि षू नमध्वं भवता सुपारा अधोअक्षा: सिन्धष: स्त्रोत्याभि: ||९||

हे भगिनी हो, माझें स्तोत्र लक्षपूर्वक ऐका. मी गाडी आणि रथ यांनी तुम्हाकडे फार दूरुन आलों आहे. प्रवाहानें कण्याच्या खालपर्यंत जा व सहज तरुन जातां येईल अशा व्हा.

आ ते कारां शृणवामा वचांसि ययाथ दूरादनसा रथेन |
निते नंसै पीप्यानेव योषा मर्यायेव कन्या शश्वचै ते ||१०||

हे स्तोत्रकर्त्या (विश्वामित्रा) ज्या अर्थी तूं गाडी आणि रथ यानें दूरवर आला आहेस त्याअर्थी तुझी बोलणीं आम्ही ऐकतों. आणि बाळाला पाजणा-या आईप्रमाणें किंवा कन्या बापापुढें किंवा भावापुढें नमते त्याप्रमाणें आम्हीं नम्र (उथळ) होतो.

यदङ्गत्वा भरता: सन्तरेयुर्गव्यन्ग्राम इषित इन्द्रजूत: |
अर्पादह प्रसव: सर्गतक्त आवो वृणे सुमर्र्ति यज्ञियानाम् ||११||

ज्याअर्थी तुम्हीं तुमच्या मधून पार जाण्याची अनुज्ञा दिली त्याअर्थी भरत तुमच्या एकीभूत समूहामधून पार निघून जातील. तुमचीं उदकें ओलांडून जाऊं इच्छिणारा भरतांचा संघ तुमच्याकडून अनुज्ञा मिळाल्यानें आणि इंद्र्राकडून प्रेरित झाल्यामुळें तुमच्या मधून पार निघून जाईल. त्यांचा गमन प्रवृत्तीचा उद्योग पूर्वीच तुमच्याकडून अनुज्ञात झालेला आहे. मी मात्र तुम्हां यज्ञार्ह नद्यांची सुंदर स्तोत्रे गात रहाण्याचेंच पत्करितों.

अतारिषुर्भरता गव्यव: समभक्त विप्र: समुतिं नदीनाम् |
प्रपिन्वध्वमिषयन्ती: सुराधा आवक्षणा: पृणध्वं यात शीभम् ||१२||

गाईंची इच्छा करणारे ते भरत त्या नद्यांच्या पार निघून गेले. विप्र विश्वामित्र त्या नद्यांची सुंदर स्तुति करीत राहिला. अन्न उत्पन्न करणा-या व उत्तम धनानें युक्त अशा तुम्हीं कालव्यांनां आनंदित करा. त्यांनां चोहोंकडून भरुन टाका व आपली वाट त्वरेंनें चालत रहा.

उद्व ऊर्मि: शम्या हन्त्वापो योत्क्राणि भुञ्चत |
मादुष्कृतौ व्यनसा घ्नौ शूनमारताम्  ||१३||

हे नद्यांनों ! तुमची लाट शिवळीवर (जोखडावर) आपटूं दे; तुम्हीं दोरखंडांनां स्पर्श करुं नका. निरुपद्रवी व पापरहित अशी बैलांची जोडी कधींही नाश न पावो. सुदासविषयक उतारे पूर्वी दिलेच आहेत. त्यांखेरीज कांही महत्वाचे उतारे आणखी येथें देतों.

हंसा इव कृणुथ श्लोकमद्रिभिर्मदन्तो गीर्भिरध्वरे सुते सचा |
देवेभिर्विप्रा ॠषयो नृचक्षसो विपिबध्वं कुशिका: सोम्यं मधु ||
(.५३,१०).

हे बुद्धिमान् मत्रंद्रष्टे हो, हे कर्मद्रष्टे कुशिक श्रेष्ठ हो, यज्ञांत दगडांनीं सोम काढला असतां हंसाप्रमाणें मोहक वाणीनें स्तोत्रें करा. आणि देवासह मधुर सोममय रस प्या.:- सायण

(सोमलता ज्या दगडांमध्यें दाबून पिळतात) त्या दाबण्याच्या दगडांनी पिळलेला सोमरस यज्ञामध्यें पिळतांना म्हटलेल्या सूक्तांनी आनंदित होणारे तुम्हीं, हंसाप्रमाणें एक स्तुतीचें गाणें तयार करा. हे गवयांनो, मनुष्यावर दृष्टि ठेवणारे कुशिक ॠषि हो ! देवांसह स्वादिष्ट सोमरस प्या.:- ग्रिफिथ

य इमे रोदसी उभे अहमिन्द्रमतुष्टवस् |
विश्वामित्रस्य रक्षति ब्रह्मेदं भारतं जनम् ||
(.५३,१२.)

ज्या मी द्यावापृथिवीमध्यें राहणा-या इंद्राला संतुष्ट केलें आहे त्या या विश्वामित्राचें स्तोत्र भरत कुळांतील जनांचें रक्षण करील.:-सायण

ही पृथ्वी व स्वर्ग ह्यांचें संरक्षण करण्यास जो इंद्र त्याची मीं स्तुति केली आहे. विश्वामित्राचें हें सूक्त किंवा ही प्रार्थना भरतांची जात (कुल) रक्षिते- (म्हणजे रक्षण करील).:-ग्रिफिथ

इम इन्द्र भरतस्य पुत्रा अपपित्वं चिकितु र्न प्रपित्वम् |
हिन्वन्त्यस्य मरणं न नित्यं ज्यावाजं परिणयन्त्याजौ ||
(.५३,२४.)

हे इंद्रा ! हे भरताचे पुत्र ताटातुटीची किंवा निकट संबंधाची पर्वा करीत नाहींत (जाणत नाहीत). आपला स्वत:चा घोडा जणूं काय दुस-याचा आहे असें समजून धनुष्याच्या दोरीप्रमाणें चपळ असणा-या त्याला लढाईस नेतात.

त्वामीळे अधद्विता भरतो वाजिभि: शुनम् |
ईजे यज्ञेषु यज्ञियम् ||
(.१६,४)

हे अग्ने भरतानें सुखाच्या इच्छेनें यज्ञामध्यें यज्ञार्ह अशा तुला हवी अर्पण करुन स्तुति केली असतां तूं त्याला दोन प्रकारचें (इष्ट प्राप्ति आणि अनिष्ट नाश) सुख प्राप्त करुन दिलेंस.

प्रप्रायमग्निर्भरतस्य श्रृण्वे वियत्सूर्यो न रोचते वृहद्भा: |
अभि य: पूरुं पृतनासु तस्थौद्युतानो दैव्यो अतिथि: शुशोच ||
(.८,४)

या भरतांचा अग्नि फार किर्तिमान् आहे. हा सूर्याप्रमाणें मोठया दीप्तीनें प्रकाशतो. ज्यानें युध्दांत पूरुचा पराभव केला तो स्वर्गीय अतिथि परिपूर्ण तेजानें प्रकाशला आहे.

तिस-या मंडळांतील तेतीसावे सूक्त वर दिलें आहे. तें त्याच मंडळांतील त्रेपन्नाव्या सूक्ताबरोबर वाचलें पाहिजे व यासाठी त्रेपन्नाव्या सूक्तांतील महत्वाचे उल्लेख वर दिलेच आहेत. तेहेतिसाव्या सूक्तांत भरतांस विपाश् आणि शतुद्री उल्लंघिण्यासाठी विश्वामित्रानें केलेली नद्यांची स्तुति आहे. त्रेपन्नाव्या सूक्तांत विश्वामित्राच्या स्तोत्रानें स्तंभन झाल्याचें वर्णन नवव्या ॠचेंत आहे. याच सूक्ताच्या अकराव्या ॠचेंत अश्वमेघांतील घोडा सोडण्याबद्ल ॠत्विजांना सूचना आहे. हे दोन्ही उल्लेख सुदाससंबंधी उल्लेखांत आले आहेत. यावरुन विपाश् आणि शतुंद्री यांचे आकमण भरतांकडून अश्वमेघापूर्वी झालें असें दिसून येतें.