प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ४ थें.
दाशराज्ञ युद्ध अथवा भरतदिग्विजय.
सातवें मंडल १८ वे सूक्त
त्वे हयत्पितरश्विन्न इंद्र विश्वा वामा जरितारो असन्वन् |
त्वे गाव: सुदुघास्त्वे ह्यश्वा स्त्वं वसु देवयते वनिष्ट: ||१||
हे इंद्रा, आमच्या वाडवडिलांनी देखील तुझी स्तोत्रें गाऊन ज्याअर्थी सर्व प्रकारची उत्तम संपत्ति मिळविली, (त्या अर्थी आम्हीं देखील धनप्राप्तीच्या इच्छेनें तुझें स्तवन करतों. कारण) तुजजवळ उत्तम दुधाच्या गाई व चांगले घोडे (आहेत). तूं यज्ञ करणा-या लोकांनां धन देणारा (आहेस).
राजेव हि जनिभि: क्षेष्येवाव द्युभिरभि विदुष्कवि:सन् |
पिशा गिरो मघवन्गोभिरश्वैस्त्वायते: शिशीहि राये अस्मान् ||२||
हे इंद्रा राजा ज्याप्रमाणें आपल्या स्त्रियांसह (सुखानें) रहातो (त्याप्रमाणें) तूं देखील द्युतीनीं युक्त असतोस. हे धनसंपन्ना, तूं ज्ञानसंपन्न असल्यामुळें तुझी स्तुति करणा-या आम्हांस सुवर्ण, गाई, घोडे, वाहनें दे व तुझ्या ठिकाणीं दृढ प्रेम असलेल्या आम्हांस संपत्ती करतां सुसंस्कृत कर.
इमा उत्वा पस्पृधानासो अत्र मन्द्रा गिरो देवयंतीरुपस्यु: |
अर्वाची ते पथ्या राय एतु स्याम ते सुमताविंद्र शर्मन् || ३ ||
हे इंद्रा ह्या यज्ञांत (एकमेकींमध्यें) अहमहमिका करणा-या अशा (ह्या आमच्या) आनंदित करणा-या स्तुती तुजप्रत येवोत. तुझ्या संपत्तीचा मार्ग आम्हाकडे (मोकळा) असो; तसेंच तुझ्या स्तोत्रांत गढलेल्या आम्हांस सुख प्राप्त होवो.
धेनुं न त्वा सूयवसे दुदुक्षन्नुप ब्रह्माणि ससृजे वसिष्ट: |
त्वामिन्मे गोपतिं विश्व आहा न इन्द्र: सुमतिं गन्त्वच्छ || ४ ||
हे इंद्रा तृणानें परिपूर्ण (असलेल्या) गोठयांत असणा-या गाई प्रमाणें उत्तम हवींनी युक्त असलेल्या यज्ञगृहांत (राहणारा जो तूं त्या तुझ्यापासून आपल्या) मनोरथाची पूर्णता करुन घेऊं इच्छिणारा मी वसिष्ठ स्तोत्रें म्हणतों (कीं ज्यायोगानें) माझा परिवार तुलाच गोपति म्हणतो, इंद्रानें आमच्या स्तोत्रानें आगमन करावें.
आर्णांसि चित्पप्रथाना सुदास इंद्रो गाथान्यकृणोत्सुपारा |
शर्धंतं शिम्युमुचथस्य नव्य: शापं सिंधूनामकृणोदशस्ती: || ५ ||
*”पुस्तु” (अफगाणांची भाषा) हा शब्द पक्थ शब्दाचा अपभ्रंश आहे.
स्तवलेला इंद्र यानें पाणी खोल असतांना देखील तरुन जाण्यास योग्य असें सुदास राजाकरितां केलें, व त्यानें शिम्यूला नद्यांच्या पुरांनां शाप द्यावयास लावलें.
पुरोळा हत्तुर्वशो यक्षुरासीद्राये मत्स्यासो निशिता अर्पाव |
श्रुष्टिं चक्रुर्भृगवो दुह्यवश्व सखा सखायमतरद्विषूचो: || ६ ||
१ यज्ञकुशल असा व दानें देणारा असा तुर्वश नांवाचा राजा होता, त्यांने मत्स्य देशावर स्वा-या केल्या व त्यामुळें भृगूंनी व द्रुह्यूनीं तुर्वशाचें प्रिय केलें व त्या वेळी तुर्वशाच्या मित्रभूत इंद्रानें मित्रास (तुर्वश) संकटांतून तारलें.:- सायण
२ चालून जाणारा आणि यज्ञकुशल असा तुर्वश राजा होता त्यानें धनेच्छेनें सुदासावर स्वारी केली. मत्स्यासारखे परतंत्र असूनहि भृगु व द्रुह्यु तात्काल मदत करते झाले. सुदास आणि तुर्वश यांमध्यें मित्रइंद्र सुदासाला द्रुह्यूंसह तारिता झाला.:- सायण
३ तुर्वश यज्ञकुशल व दानशील होता. त्यानें मत्स्यांना (लोकांना) त्रास दिला. भृगु आणि द्रुह्यूनीं तुर्वशाला मदत केली. दोघांमध्यें तुर्वशसखा इंद्र यानें तुर्वशाचें रक्षण केलें.:- सायण
आ पक्थासो भलानसो भनंतालिनासोविषाणिन: शिवास: |
आयोनयत्सधमा आर्यस्य गव्या तृत्सुभ्यो अजगन्युधानन् || ७ ||
पक्थ, भलानस, अलिनास, शिवास, विषाणिन् हे बरोबर आले. (सायणानें प्रत्येक राष्ट्रनामाचा गुणवाचक अर्थ केला आहे, तो येणेंप्रमाणें:- हवि शिजविणारे, गोड बोलणारे, तप करुन हि पोरकट असणारे, खाजविण्याकरितां (कृष्ण) विषाण हातांत घेतलेले, (व) लोककल्याण करणारे इंद्राला स्तविते झाले.) जो सोममदयुक्त (इंन्द्र) आर्यांच्या गाई तृत्सूकरितां (हरण करुन) आणता झाला व युध्दानें शत्रूंना ठार करिता झाला.
दुराध्यो ३ अदितिं स्त्रेवयन्तोचेतसो विजगृभ्रे परुष्णीम् |
मन्हा विव्यक्पृथिवीं पत्यमान: पशुष्कविरशयच्चायमान: || ८ ||
दुष्ट, मूर्ख, (सुदासाचे शत्रु) परुष्णीच्या काठावर राहणारे (परुष्णी) नदीचें तीर फोडते झाले. (इन्द्रप्रसादलब्ध) सामर्थ्यानें तें जल पृथिवीभर पसरलें. (परंतु सुदासचा शत्रु) चायमान कवि (यज्ञांतल्या) पशूप्रमाणें मेला.
ईयुरर्थ नन्यर्थं परुष्णीमाशुश्व नेदभिपित्वं जगाम |
शुदास इंद्र: सुतुकाँ अमित्रा नरंधयन्मानुषे वध्रिवाच: || ९ ||
परुष्णी नदी पूर्वस्थलीं वाहूं लागली. भलत्या ठिकाणीं तिचें पाणी वाहीनासें झालें. (राजा सुदासचा) घोडा हि प्राप्तव्य स्थलीं गेला. इंन्द्रानें सुदासाकरितां व्यर्थ बडबडे व पुत्रयुक्त अशा शत्रूंनां ताब्यांत आणलें.
ईयुर्गावो न यवसादगापा यथाकृतमभिमित्रं चितास: |
पृश्निगाव: पृश्निनिप्रेषितास: श्रुष्टि चक्रुर्नियुतो रंतयश्व || १० ||
कुरण सोडून, कळपांतून न चालणा-या गायींप्रमाणें प्रसंगानुसार एखाद्यां मित्राच्या गळयाला मिठी मारुन ते (नबुडलेले पळपुटे) गेले. पश्नीनें खाली धाडून दिलेले व चित्रविचित्र घोडे हांकणारे (मरुत) यांनी श्रवण करुन योध्दे आणि सरंजाम चढविलेले घोडे दिले.
एकं च यो विंशतिं च श्रवस्या वैकर्णयोर्जनान्नाराजान्यस्त: |
दस्मो न सद्मन्निशिशाति बर्हि: शूर: सर्गमकृणोदिंद्र एषाम् || ११ ||
जो अन्नेच्छेनें (परुष्णीच्या तीरावरील) दोन वैकर्ण देशामधील एक आणि विस लोकांना मारतो तो सुंदर सुदास यज्ञगृहांत दर्भ ज्याप्रमाणें तोडतात त्याप्रमाणें शत्रूंनां तोडतो. शूर इन्द्र मरुतांची उत्पत्ति (त्या युध्दांकरितां) करिता झाला.
अधश्रुतं कवषं वृद्धमप्स्वनुद्रुह्युं निवृणग्वज्रबाहु: |
वृणाना अत्र सख्याय सख्यं त्वायन्तो ये अमदन्ननुत्वा || १२ ||
नंतर वज्रबाहु इन्द्रानें श्रुत, कबष, वृद्ध आणि द्रुह्यु यांना क्रमानें पाण्यांत बुडविलें. या वेळीं तुझ्या सख्याची इच्छा करणारे जे तुला स्तविते झाले त्यांच्याशीं तूं सख्य केलेंस.
विसद्यो विश्वा दृंहितान्येषमिंद्र: पुर: सहासा सप्तदर्द: |
व्यानवस्य तृत्सवे गयं भाग्जेष्म पूरुं विदथे मृध्रवाचम् || १३ ||
इंद्रानें आपल्या विजयी बलानें, त्यांची सर्व बळकठ स्थानें आणि सात किल्ले एकदम नाश करुन टाकलें. अनूच्या मुलाची संपत्ति त्यानें तृत्सूला दिली. यज्ञांत आम्ही तिरस्कृत पूरुला जिंकू.
निगव्यवो नवो द्रुह्यवश्व षष्टि: शता सुषुपु: षद् सहस्त्रा |
षष्टिर्वीरासो अधिषड्दुवोयु विश्वेदिन्द्रस्य वीर्या कृतानि || १४ ||
लुटीच्या शोधांत असणारे, साठ शंभर, सहा हजार आणि सहासष्ट जास्त, असे अनव आणि द्रुह्युवीर निजले आहेत (मारले गेले). इंद्राचे हे सर्व अचाट पराकम धार्मिकांकरितां होते.
इन्द्रेणैते तृत्सवो वेविषाणा आपो न सृष्टा अधवन्त नीची: |
दुर्मित्रास: प्रकलविन्मिमाना जहुर्विश्वानि भोजना सुदासे || १५ ||
इन्द्राशीं युद्ध करुं लागलेले हे मूर्ख व दुष्ट तृत्सु लोक सखल प्रदेशीं वाहणा-या पाण्याप्रमाणें धावूं लागले. नंतर त्रस्त झालेल्या तृत्सूंनी सर्व धन सुदासाला दिलें.: - सायण
मोकळे असणारें पाणी खाली वेगानें येत, त्याप्रमाणें हे तृत्सू इंद्राच्या काळजीच्या देखरेखीखाली जोरानें चाल करुन गेले. अगदी बारकाईनें संपत्ति मोजणारें असून देखील शत्रूंनी आपली सर्व संपत्ति सुदासाला देऊन टाकली.:- ग्रिफिथ
अर्धे वीरस्य श्रृतपामनिंद्रं पराशर्धन्तं ननुदे अभिक्षां |
इन्द्रो मन्युं मन्युम्यो मिमाय भेजे पथो वर्तनिं पत्यमान: || १६ ||
इन्द्रानें जगांत वीरांनां मारणारे, पक्क पदार्थ पिणारे व इन्द्राचा द्वेष करणारे अशांचा फडशा पाडला. आणि क्रुद्ध शत्रूंचा क्रोध नाहींसा केला. व सुदासाच्या शत्रूंना पळवाट काढावयास लावलें.
आघ्रेण चित्तद्वेकं चकार सिंह्यं चित्पेत्वेना जघान |
अवस्त्रक्तीर्वेश्यावृश्वदिंद्र: प्रायच्छद्विश्वा भोजना सुदासे || १७ ||
अशक्तांकंडून देखील हा अतुलनीय पराक्रम त्यानें करविला. बक-यांकडून देखील त्यानें सिंहाला मारविलें. त्यानें यूपाचे कोन सुईनें मोडले. याप्रमाणें इंद्रानें सुदासाला सर्व संपत्ति दिली.
शश्वन्तो हि शत्रवो रारधुष्टे भेदस्य चिच्छर्धतो विन्द रन्धिम् |
मर्ताएँन: स्तुवतो य: कृणोति तिग्मं तस्मिन्नि जहि वज्र मिन्द्र || १८ ||
तुझे सर्व शत्रु तुला शरण आले आहेत. अग्र अशा भेदांला सुद्धां तूं आपल्या अंकित केलें आहेस. हे इंद्रा, तुझी स्तुति गाणा-यांना जे पीडा करतात त्यांच्यावर (भेदावर) तुझें तीक्ष्ण वज्र फेक.
भेद= (१) सुदाससाचा शत्रु (२) नस्तिक-सायण.
आवदिन्द्रं यमुना तृत्सवश्व प्रात्र भेदं सर्वतातामुषायत् |
अजासश्व शिग्रवो यक्षवश्व बलिं शीर्षाणि जभ्रु रश्व्यानि ||१९||
या युध्दांत भेदाला (सुदासानें) नागविलें म्हणून यमुना नदी आणि तृत्सुलोक यांनी त्याला संतुष्ट केलें. आणि अजास् शिग्रु, यक्षु यांनी घोडयांची डोकी नजर केली.
न त इन्द्र सुमतयो न राय: संचक्षे पूर्वा उषसो न नूस्ना: |
देवकं चिन्मान्यमानं जघन्थावत्मना बृहत: शंबरं भेत् ||२०||
हे इंद्रा, तुझी संपत्ति आणि कृपा अतिरस्करणीय व प्राचीन आणि नूतन उषांप्रमाणें आहे. मन्यमानाचा मुलगा देवक याला तूं मारलेंस आणि उंच पर्वतावरुन शंबराला उडवून दिलेंस.
प्रये गृहादममदुस्त्वाया पराशर: शतयातुर्वसिष्ठ: |
न ते भोजस्य सख्यं भृषन्ताधासूरिभ्य: सूदिना व्युच्छान् ||२१||
जे पराशर, शतयातु, वसिष्ट (हे) ॠषी तुझ्या इच्छेनें घरोघर तुझी स्तुति करितात. ते पालक अशा तुझ्या स्तोत्राला किंवा मित्रभावाला कधीहि विसरत नाहींत. म्हणून त्या स्तोत्यांनां चांगले दिवस प्राप्त होतात.
द्दे नप्तुर्देववत: शते गो र्द्वारथा वधूमन्ता सुदास:
अर्हन्नग्ने पैजवनस्य दानं होतेव सद्म पर्येमि रेभन् ||२२||
हे अग्ने, देवताच्या वंशाकडून दोनशें गाई, सुदासाकडून घोडयांसहित दोन रथ अशा त-हेची पैजवनाची देणगी मिळवून पुरोहिताप्रमाणें स्तुति गात मी वेदीभोंवती प्रदक्षिणा करतो.
श्वत्वारोमा पैजवनस्यदाना: स्मद्दिष्टय: कृशनिनो निरेके |
ॠज्रासो मा पृथिविष्ठा: सुदासस्तोकं तोकाय श्रवसे वहन्ति ||२३||
पिजवनपुत्र सुदासाचे सुलक्षणी, सुवर्णालंकारयुक्त, दु:स्थिती असतांनाहि सरलगामी, पृथिवीवर उभे असलेले (दान दिलेले) चार घोडे मला मुलाला (वसिष्टाला) मुलासाठी अन्न्नाकरितां किंवा पोराबाळांच्या यशाकरितां वाहून नेतात.
यस्य श्रवो रोदसी अंतरुर्वी शीर्ष्णेशीर्ष्णे विबभाजा विभक्ता |
सप्तेदिद्रं न स्त्रवतो गृणन्ति नि युध्यामधिमशिशादभीके ||२४||
ज्याचें यश विस्तीर्ण द्यावापृथिवींत (पसरलेलें) आहे. जो दाता सर्व श्रेष्ठ श्रेष्ठ माणसांना धन देता झाला त्या (सुदासा) ला सर्व लोक इंद्राप्रमाणें स्तवितात. आणि नदीच्या तीरी युध्यामधि नांवाच्या त्याच्या शत्रूला ठार मारते झाले.
इमं नरो मरुत: सश्वतानुदिवोदासं न पितरं सुदास: |
अविष्टना पैजवनस्य केतं दूणाशं क्षत्रमजरं दुवोयु ||२५||
हे मार्गदर्शक मरुत् हो, या सुदासाला त्याचा बाप दिवोदास त्याप्रमाणें सेवा. आणि परिचरणेच्छु पैजवन-सुदास याचें घर रक्षा. आणखी सुदासाचें सामर्थ्य अविनाशी आणि अशिथिल असो.