प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ४ थें.
दाशराज्ञ युद्ध अथवा भरतदिग्विजय.

यासूक्तापासून तेवीस इतिहासविषय निघतात.- प्रस्तुत सूक्तांतील वक्ता वसिष्ठ आहे व इन्द्रस्तुतीचा फलभोक्ता सुदास राजा आहे. तृत्सूंचा आणि सुदासाचा संबंध या सूक्तांत स्पष्ट होत नाही. या सूक्तांमध्यें ब-याच राष्ट्रांचे व लोकांचे उल्लेख आले आहेत आणि यामुळें हें सूक्त इतिहासविषयक प्रश्नांचें सूचक म्हणून प्रथम मांडण्यांत येत आहे. यांत परिचित होणारी नांवे व त्यासंबंधी विधानें येणेंप्रमाणें.

(१). सुदास राजा यासाठी इन्द्रानें नदीचें पाणी तरुन जाण्यास योग्य असें केलें. इन्द्रानें सुदासा करितां व्यर्थ बडबडे व पुत्रयुक्त (सुतुका: व वध्रिवाच:) अशा शत्रूंनां ताब्यांत आणलें. सुदासाला शत्रूंनी आपली संपत्ति दिली. सुदास हा पैजवन होता. त्यानें सूक्तगायकास घोडे दिले. सुदासाचा बाप दिवोदास होता. सुदासाचे प्रतिस्पर्धी बलवान् होते असें वसिष्ठाचें मत होतें असें बक-याकडून सिंहाला मारविलें या रुपकावरुन दिसतें.

(२). शिम्यु- नद्यांच्या पुरांनां हा शाप देतो.

(३). तुर्वश- हा यज्ञकुशल व दानें देणारा होता. मत्स्य देशावर यानें स्वा-या केल्या. भृगू आणि द्रुह्यु यांनी तुर्वशाचें प्रिय केलें. मित्रभूत इन्द्रानें तुर्वशास संकटांतून तारलें.

(४). भृगू-तुर्वश पहा.

(५). द्रुह्यु-तुर्वश पहा. यांनां इन्द्रानें पाण्यांत बुडविले. धार्मिकांकरितां द्रुह्युंस व अनूंस ससैन्य इन्द्रानें मारिलें.

(६). तृत्सु-यांच्या करितां इन्द्रानें आर्यांच्या गाई हरण केल्या. अनूच्या मुलांची संपत्ति इन्द्रानें तृत्सूंनां दिली. हे इन्द्राच्या काळजीच्या देखरेखीखाली जोरानें चाल करुन गेले.

(७). वैकर्ण (दोन) येथील लोकांचा अभिभव (कदाचित् सुदासाकडून) उल्लेखिला गेला आहे.

(८,९,१०). श्रुत, कवष, वृद्ध यांस द्रुह्यूंसह इन्द्रानें पाण्यांत बुडविलें.

(११). चायमान-कवि पशूप्रमाणें मेला.

(१२). पुरु-यज्ञांत आम्हीं पुरुला जिंकूं असें वसिष्ठ म्हणतो.

(१३). देवक-मन्यमानाचा मुलगा देवक याला इन्द्रानें मारिलें.

(१४). शंबर-यास इन्द्रानें मारिलें.

(१५). युध्यामधि-ॠचेतील गाइलेल्या राजाचा शत्रु.

(१६,१७) पराशर शतयातु-हे ॠषी व वसिष्ठ इंद्राची स्तुति घरोघर करितात.

(१८). वसिष्ठ-देववाताच्या वंशजाकडून २०० गाई व सुदासाकडून घोडयासहित दोन रथ अशी देणगी मिळवितो.

(१९). देववात-वसिष्ठ पहा.

(२०). भेद-भेदाला (सुदासानें) नागविलें म्हणून यमुना नदी आणि तृत्सू यांनी इन्द्रास संतुष्ट केले.

(२१). अजास यांनीं घोडयांची डोकी नजर केली (सुदासाला खंडणी म्हणून किंवा इन्द्राला बलि म्हणून).

(२२). शिगु्र

(२३). यक्षु

येणे प्रमाणें येथें तेवीस व्यक्ति व समूह मिळून इतिहास-विषय उत्पन्न होतात. या सूक्तांवर दुस-या कांही सूक्तांनी प्रकाश पडल्यास पाहूं. यांत उल्लेखिलेल्या अनेक लोकांचा ऐतिहासिक संबंध काय होता तो आपणांस ज्ञातव्य आहे. अनेक ठिकाणच्या उल्लेखांवरुन ज्या व्यक्तीची नांवे आपणांस कळतात त्यांचा प्रथम हिशोब घेऊं व नंतर विवेचनाकडे वळूं. प्रथमत: सुदास राजाबरोबर ज्यांचा प्रत्यक्ष उल्लेख येतो असे लोक घेऊं आणि नंतर त्या लोकांबरोबर आणखी कोणाचा उल्लेख येतो तिकडे वळूं सुदासाचे सहाय्यक म्हणून आपणांस चार समुच्चय दिसतात ते (१)तूर (२) भरत (३) पृथु (४) पर्शु हे होत. सुदास विरुद्ध जे राजे होते त्यांची नांवें कांही लोकांच्या मतें खालीलप्रमाणें आहेत.

या विषयीं विवेचन मॅकडोनेलनें केलें आहे.

(१) शिम्यु (२) तुर्वश (३) द्रुह्यु (४) कवष (५) पुरु (६) अनु-आनव (७) भेद (८) शंबर (९) वैकर्ण (१०) दुसरा वैकर्ण (११) यदु (१२) मत्स्य (१३) पक्थ (१४) भलानस् (१५) अलिन (१६) विषाणिन् (१७) अज (१८) शिव (१९) शिग्रु (२०) यक्षु.

पहिल्या दहा नांवांपेक्षा दुस-या दहा नांवांबद्ल विशेष मतभेद आहे. त्यांत विशेषत: खालील पांच व्यक्तीबद्ल विशेषच मतभेद आहे. (१) मत्स्य (२) पक्थ (३) भलानस् (४) अलिन (५) विषाणिन्

हिं नांवे राजांची किंवा लोकांची नाहीत तर मत्स्य खेरीज चार हि नांवे ॠत्विजांची आहेत असें सायणाचार्यांचें म्हणणें आहे.

याशिवाय सुदासाचे कांही शत्रू शिल्लक राहतातच. त्यांची नांवे :-

(१) युध्यामधि. (२) याद्व. (३) देवक-मान्यमान. (४) चायमान कवि. (५) सुतुक. (६) उचथ. (७) श्रुत. (८) वृद्ध (९) मन्यु. (१०) पृथु.

या एकंदर शत्रूंच्या याद्यांवरुन सुदासाचे दहा शत्रु कोण होते व त्यांचे अनुयायी कोण होते हें निवडणें कठीण आहे. व ते दहाच होते असें निश्चयानें म्हणवत नाहीं. वरील यादीपैकीं श्रुत, वृद्ध व मन्यु {kosh गीताभाष्य पान ५३५. यांत अग्निहोत्री शंकरराव राजवाडे यांनी मन्यूस व्यक्ति केले आहे असे दिसते.}*{/kosh}  हे खरोखरच कोणी विद्यमान शत्रु होते की ते विशेषणभूत शब्द आहेत याबद्ल मतभेद आहे.

शत्रु व मित्र याशिवाय महत्वाच्या दुस-या व्यक्ती म्हटल्या म्हणजे पुरोहित व त्यांची कुलें होत. पुरोहित हे केवळ यजन करणारे नसून जयापजयाबद्ल जबाबदार असे लोक होते आणि त्यामुळें त्यांचे स्वरुप जितकें पारमार्थिक होतें त्याहून राजकीय अधिक होतें यासाठीं त्या पुरोहित कुलांकडे हि लक्ष देऊं. ॠग्वेदामध्यें कांहीच्या उपाध्यायांची माहिती आपणांस मिळते. ते उपाध्याय व त्यांची कुलें ही वेदकालीन, प्रसिद्ध घराणी असून जवळजवळ ॠग्वेदांत उल्लेखिलेल्या सर्व व्यक्तींचा व कुलांचा त्यांच्याशी परंपरेनें संबंध पोचतो. तो खालीलप्रमाणें


 

राजा किंवा कुल उपाध्याय
(१) द्रुह्यु १) भृगु (दुस-या मंडळाचा कर्ता गुत्समद हा
भृगुवंशातील होता.)(और्व, अप्रवाण, भृगवाण ही ही नांवे भृगूंचीच       असावीत.) (अड्गिरसाचा निकट संबंध)
(२) पुरु (अ)   कुरुश्रवण (२) अत्रि (पाचव्या मंडळाचा कर्ता) कवष
(३) सुदास् (१) वसिष्ठ (सातवें मंडळ)
(२) विश्वामित्र (तिसरे मंडळ)
जमदग्नि व कण्व यांच्याशी निकट संबंध
(३) भरद्वाज (सहावें मंडळ)
(४) भरत (तुत्सु) दिर्घतमस् मामतेय
(५) तुर्वश कण्व
(६) यदु


आतां प्रत्येक उल्लेखिताचा परामर्श घेऊं. हा घेतांना आपलें लक्ष स्वाभाविकपणें दिग्विजयी सुदासाकडे प्रथम जातें.

सुदास- सुदासाविषयी संहिता काय म्हणतें तें पाहूं.

सुदासे दस्रा वसु बिभ्रता रथे पृक्षो वहतमश्विना |
र्राय समुद्रादुत वा दिवस्पर्यस्मे धत्तं पुरुस्पृहं ||
(.४७,६).

हे अश्वी देव हो, तुम्हीं सुदासाकरितां धनधान्यादि संपत्ति रथांत भरुन आणली. आमच्यासाठीं द्युलोकांतून अथवा समुद्रावरुन स्पृहणीय असें धन घेऊन या.

त्वं हत्यदिंद्र सप्त युध्यन् पुरो वज्रिन् पुरुकुत्सायदर्द: |
बर्हि र्न यत्सुदासे वृथा वर्गंहो राजन् वरिव: पूरबे क: ||
(.६३,७).

हे इंद्रा, युद्ध करणा-या पुरुकुत्साकरितां शत्रूंच्या सात नगरांचे तूं विदारण केलेंस; सुदासाच्या शत्रूला बर्हींप्रमाणें कापून टाकलेंस आणि पुरुचें दारिद्रय नाहीसें केलेंस.

याभि: पत्नीर्विमदाय न्यूहथुराघवा याभिररुणीरशिक्षतं |
याभि: सुदास ऊहथु: सुदेव्यं ताभिरुषु ऊतिभिरश्विनागतम् ||
(.११२,१९).

हे अश्वी देव हो, ज्या स्तोत्रांच्या योगानें तुम्हीं विमदाला बायको आणून दिली अथवा अरुणवर्ण गाई दिल्या. तसेंच ज्यांच्या योगानें तुम्ही सुदासाला सुदेवी आणून दिली त्या स्तुतीसह येथे या. (सुदेव्यं ह्याया अर्थ सायण उत्तम धन असा करितात.)

महाँ ॠषिर्देवजा देव जूतोऽस्तभ्नात्सिंधुमर्णवंनृचक्षा: |
विश्वामित्रो यदवहत्सुदासमप्रियायत कुशिकेभिरिन्द्र: ||
(.५३,९)
देवजात, देवप्रेरित मनुष्यनायक महान् ॠषि (विश्वामित्र) जलागाध नदीला थांबविता झाला. जेव्हां सुदासाकडून विश्वामित्र यज्ञ करविता झाला तेव्हां इन्द्र कुशिकांनां प्रिय झाला.

उपप्रेत कुशिकाश्वेतयध्वमश्वं राये प्रमुञ्चता सुदास: |
राजा वृत्रं जङ्घनत्प्रागपागुदगथा यजाते वर आ पृश्विव्या: ||
(.५३,११).

कुशिकांनों, तुम्ही चला. सावधान व्हा. सुदासाचा अश्व धनासाठी सोडा. राजा (इंद्र) पूर्वेस, पश्चिमेस आणि उत्तरेस शत्रूला मारुन टाकील. न्नंतर सुदास पृथिवीच्या श्रेष्ठ स्थली यज्ञ करो.

ऐतान् रथेषु तस्थुष: क: शुश्राव कथा ययु: |
कस्मै सस्त्रु: सुदासे अन्वापय इळाभिर्वृष्टय:सह ||
(.५३,२)

या रथावर बसलेल्याचें कोण ऐकेल. कसे जातील. कोणत्या सुदासाला (चांगले दान देणाराला) अन्नयुक्त व आप्तभूत वृष्टी प्राप्त होतील.

शतं वे शिप्रिन्नूतय: सुदासे सहस्त्रं शंसा उतरातिरस्तु |
ज्ञहि वधर्वनुषो मर्त्यस्यास्मे द्युम्नमधिरत्नं च धेहि ||
(.२५,३).

उष्णिष् धारण करणा-या इंद्रा, तुजकडून शंभर प्रकारांनी माझें संरक्षण होवो. माझ्या सुदासाच्या इजारो कामना पूर्ण होवोत. तसेंच हिंसा करणा-या माणसांचे हिंसक शस्त्र तूं नाहीसें कर आम्हांला उत्तम प्रकारचें अन्न व रत्नें दे.

उतो हि वांरत्नधेयानि संति पुरुणि द्यावापृथिवी सुदासे |
अस्मे धत्त्तं यदसदस्कृधोयु यूंय पात स्वस्तिभि: सदा न: ||
(.५३,३).

आणखी हे द्यावापृथिवी हो, तुमच्याजवळ सुदासाकरितां (सुदासास देण्यास योग्य) असें पुष्कळ धन आहे. त्यांत जें पुष्कळ धन असेल ते आम्हांस द्या. तुम्हीं आमचें नेहमीं पालन

यद्रोपा वददिति: शर्म भद्रं मित्रो यच्छंति वरुण: सुदासे |
तस्मिन्नातोकं तनयं दधाना मा कर्म देवहेळनं तुरास: ||
(.६०,८).

अदिति, मित्र व वरुण हे देव सुरक्षित व कल्याणकारक असें घर सुदासाला (दानशील अशा मला) देतात. आणि बलयुक्त पुत्र धारण करणारे आम्हीं हे त्वरा करणारे हो (आम्ही) देवाची अवकृपा करुन घेणार नाहीं.

अव वेदिं होत्रभिर्यजेत रिप: काश्विद्वरुण भ्रुत: स: |
परिद्वेषोभिरर्यमा वृणत्कूरुं सुदासे वृषणा उ लोकं ||
(७.६०,९).

हे देवहो, स्तुति करीत शत्रु यज्ञ करो. म्हणजे वरुणहिंसित तो पापी होईल. अर्यमा देव आम्हांला शत्रुरहित करो. हे कामपूरक हो, शोभनदानाला (सुदासे) आम्हांला मोठा लोक द्या.

मित्रस्तन्नो वरुणो देवो अर्य: प्रसाधिष्ठोभि: पथिभिर्नयन्तु |
ब्रवद्यथान आदरि: सुदास इषा मदेम सह देवगोपा: ||
(.६४,३).

मित्र, वरुण, व अर्यमा हे देव आम्हांस इष्ट तें साधक मार्गानीं प्राप्त करोत. आणि आम्हांला आणि सुदासाला अर्यमा ज्याप्रमाणें बोलला त्याप्रमाणें करो आणि देवसंरक्षित आम्ही पुत्रादिकांसहित आनन्दित होऊं या.
वसिष्ठ इंद्राची स्तुति करीत आहे.

युवां नरा पश्यमानास आप्यं प्राचा गव्यंत: पृथुपर्शवो ययु: |
दासा च वृत्रा हतमार्याणि च सुदासमिंद्रावरुणावसावतम्  ||
(.८३,१).

सायणी अर्थ-हें मित्रावरुण हो, तुमच्याशी 'बंधुभावनेंने वागणारे' (आप्यं) गाईंची इच्छा करणारे (यजनकर्ते यजमान) हातांत मोठाले परशु (अश्वाच्या बरगडया) घेऊन प्राची दिशेकडे जातात. (इंद्रावरुण हो,) तुम्हीं दास, वृत्र तसेच आर्यांचा नाश करुन सुदासाचें रक्षण केलेंत.

टीप :- सुदासाच्या शत्रूंमध्यें दास, वृत्र, आणि आर्य यांचा उल्लेख केला आहे. पृथुपर्शव: पृथु (पार्थियन) व पर्शु (पर्शियन) हीं राष्ट्रे युध्दांत होती असाहि अर्थ होईल. ती कोणच्या बाजूनें लढलीं हें स्पष्ट होत नाहीं.

इंद्रावरुणावधनाभिरप्रति भेदं वन्वंता प्रसुदासमावतं |
ब्रह्माण्येषां श्रुणुतं हबीमनि सत्यातृत्सूनामभवत्पुरोहिति: ||
(.८३,४).

ज्याच्या शस्त्रानें वध होणें कठीण अशा भेदाला मारणारें इंद्रावरुण हो, तुम्हीं सुदासाचें रक्षण केलें. लढाईच्या प्रसंगी तृत्सूंनी तुमची स्तुति केलेली तुम्हीं ऐकलीत त्यामुळें तृत्सूंच्या येथील माझें पौरोहित्य खरें ठरलें.
टीप :- (१). वक्ता तृत्सूंचा पुरोहित आहे. (२). पुरोहितत्व कायम राखण्यासाठी त्याच्यामार्फत ईश्वरी साहाय्य मिळतें किंवा नाहीं याची परिक्षा. (३) सुदास व तृत्सु एक किंवा परस्पर सहायक होते.

युवां हवन्त उभयासं आजिष्विद्रं च वस्वो वरुणं च सातये |
यत्र राजभिर्दशभिर्निब्राधितं प्रसुदासमावतं तृत्सुभि: सह ||
(.८३,६).

हे इंद्र आणि वरुणहो, युध्दांत दोनहि पक्षाच्या लोकांनी धन मिळविण्याच्या इराद्यानें तुम्हांला हांक मारली.त्यावेळी जेव्हां दाशराज्ञांनीं त्यावर हल्ला करुन त्याला खालीं चेपलें होतें तेव्हां तृत्सूंलोकांसमवेत असलेल्या सुदासाला तुम्हीं मदत केलीत.

ज्या युध्दांत दहा राजांनी चेपलेल्या तृत्सूसह सुदासला तुम्ही रक्षिलेंत (त्याच युध्दांत) धन स्वीकारण्याकरितां ते दोघेहि इन्द्र, आणि वरुण यांना बोलावितो झाले.:- सायण

दशराजान: समिता अयज्यव: सुदासमिंद्रावरुणान युयुधु: |
सत्या नृणामद्मसदामुपस्तुतिर्देवा एषामभवन्देवहूतिषु ||
(.८३,७).

हे इंद्रावरुण हो, यजन न करणारे व युध्दास एकत्र जुळून आलेले दहा राजे (तुमच्या अनुग्रहामुळें एकटया असलेल्या) सुदासाचा पराभव करुं शकले नाहींत. हवि अर्पण करणा-या व यज्ञनेत्या ॠत्विजांनी केलेली स्तुति सफल झाली आणि त्याच्या यज्ञाला सर्व देव आले.

टीप :- दहा राजे हवि अर्पण करणारे नव्हते काय असा संशय उप्तन्न होतो.

दाशराज्ञे परियत्ताय विश्वत: सुदास इंद्रावरुणा वशिक्षतम् |
श्वित्यंचो यत्रनमसा कपर्दिनो धियाधीवन्तो असपन्त तृत्सव: ||
(.८३,८).

हे इंद्रावरुण हो, जेव्हां दाशराज्ञानी त्याला सभोंवार वेढलें तेव्हां तुम्ही सुदासाला मदत केलीत. त्या ठिकाणीं शुभ्रवस्त्रधारी, जटाधारी (वेण्या घातलेले), गानपटू असे जे तृत्सु, त्यांनीं नमन आणि स्तवन या योगें तुमची पूजा केली.

टीप- श्वित्यंच:, कपर्दिन:, धीवन्त: अशीं तीन विशेषणें तृत्सूंना दिलीं आहेत.

एवेन्नु कं सिंधुमेभिस्ततारेवेन्नु कं भेदमेभिर्जघान |
एवेन्नु कंदाशराज्ञे सुदासंप्रावदिंद्रो ब्रह्मणा वो वसिष्ठा: ||
(.३३,३)

हे वसिष्ठहो, तुमच्या स्तोत्रानें जसा इन्द्र यांच्या (सह) सिन्धु तरुन गेला, जसा यांच्याकडून भेदाचा वध केला तसेंच दहाराजांच्या युध्दांत सुदासाला संरक्षिलें नाहीं का?

दण्डा इवेद्गो अजनास आसन्परिच्छिन्ना भरता अर्भकास: |
अभवच्च पुरएता वसिष्ठ आदित्तृत्सूनां विशो अप्रथन्त ||
(.३३,६).

गोप्रेरक दंड ज्याप्रमाणें (पर्णविरहित) असतात त्याप्रमाणें भरत अरक्षित असे होते. नंतर वसिष्ठ त्यांचा नायक झाला; तेव्हां तृत्सूंचीं कुळें जिकडे तिकडे पसरलीं.