प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ४ थें.
दाशराज्ञ युद्ध अथवा भरतदिग्विजय.
भरतदौष्षंतीवरुन राष्ट्रनामाची अशक्यता:- दाशराज्ञ युध्दामध्यें जे भरत दृष्टीस पडतात त्यांचा भरत दौष्षन्तीशी संबंध होता अगर नव्हता हा प्रश्न आहे. होता असें धरल्यास राष्ट्रसंस्थापक भरत हा राष्ट्राचें नांव उत्पन्न व्हावयाच्या पूर्वीच झाला असला पाहिजे. तसें धरल्यास दौष्षन्ति भरताची यज्ञभूमि कुरुक्षेत्र ही न राहतां ती कोठें तरी हिंदुस्थानापलीकडे आहे असें म्हणावें लागेल. कारण भरत राजा दिवोदास हा गांधारापासून दिग्विजय करीत आला होता. अर्थात् भरत कुलास नांव देणारा भरत दिवोदासापूर्वीचा असला पाहिजे व तो गांधार अथवा त्या पलीकडील प्रदेशांत रहात असला पाहिजे. कदाचित् असेंहि शक्य असेल की, ज्यापमाणें राष्ट्रांची उत्पत्ति एका पुरुषापासून करण्याचा मोह फेरिस्तासारख्यांसहि पडतो त्याप्रमाणेंच मंत्रकालीन ''इतिहासकारां''स पडला असावा. तसा तो पडला असल्यास त्यांनी भरत राष्ट्राची उत्पत्ति करण्याकरितां भरत राजा निर्माण करावा यांत नवल नाही. किंवा असेहि असेल की, या प्रदेशास भारतवर्ष असें नांव अगोदरच पडत चाललें असून कुरुंमध्यें उत्पन्न झालेल्या दिग्विजयी राजपुत्राशीं उत्तरकालीनांनी राष्ट्रनामाचा संबंध जोडला असावा. या प्रकारच्या कृतीनें देश्य व भरत यांचे एकीकरण होण्यास मदत झाली असावी.
राष्ट्रसंस्थापक भरतांचे मूळस्वरुप व पराक्रम आपणांस ॠग्मंत्रांतच शोधिले पाहिजेत. ॠग्मंत्रांत भरत लोक आहेत पण दुष्यंत शकुंतला नाही किंवा दौष्षंति भरतहि नाही. यावरुन ॠग्मंत्ररचनाकारांस भरत, दुष्यंत, शकुंतला हीं ठाऊक नसावीं असा संशय येतो. ठाऊक नसण्याचें करण या व्यक्तींची मंत्ररचनोत्तरता किंवा काल्पनिक अस्तित्व किंवा अन्यप्रदेशता असावी, या तिहीपैकी कोणतें तरी एखादें कारण असलें पाहिजे. मंत्ररचनोत्तरता असणें शक्य नाही. कां की, मंत्ररचना पारिक्षित जनमेजयाच्या कालापर्यंत होत होती आणि संहितांत ते वाङमय शिरले होतें. अन्य प्रदेशता किंवा काल्पनिक अस्तित्व या दोहोंपैकीं कोणतीहि गोष्ट खरी असली तरी त्यांत पुरोहिती करामत दिसून येते. असो.
दाशराज्ञ युध्दाचा संबंध ज्याप्रमाणें अत्यन्त प्राचीन राजकीय घडामोडीशीं येतो त्याप्रमाणें तो भरद्वाज, वसिष्ठ व विश्वामित्र या तीन मंत्रद्रष्टया कुलांशी येतो.
भरतांचा पूर्वेकडे जो प्रसार दाखविला आहे तो प्रसार अडथळयाशिवाय झालेला नाही एवढेंच नव्हे तर कांही प्रसंगीं भरतांस मारहि मिळाला आहे. पक्थांचा म्हणजे अफगाणांचा राजा तूर्वयाण यानें दिवोदास, आयु व कुत्स यांच्या संयुक्त सैन्याचा पराभव केल्याचे उल्लेख आहेत. आयु हा पुरुरवसाचा पुत्र असेल तर दाशराज्ञ युध्दापासून ॠग्वेदमंत्राचा विषय झालेलें पुरुरवस्उर्वशीचें जोडपें फार दूरचे नसावें. दाशराज्ञ युध्दापासून ॠग्वेदांत उल्लेखिलेले अनेक राजे फार दूर असलेले दिसत नाहींत. ॠग्वेदांतील सूक्तें ही आपणांस त्यांच्या व्याकरणरुपांच्या बाहुल्यानें जितकी जुनी वाटतात तितकीं नसावींत, दाशराज्ञ युध्दानंतरच मधुच्छंदादि ॠषीचीं सूक्तें येणार. ॠग्वेदांतील बहुतेक वाङमय दाशराज्ञ युध्दापासून कुरुयुध्दापर्यंतचें आहे असें म्हणण्यास हरकत नाही. दाशराज्ञ युध्दांत प्रवेश करण्यासाठी एक सूक्त विषयपरिचयासाठीं प्रथम देतों. तें अत्यन्त महत्वाचें आहे व ते सातव्या मंडळांतील अठरावें आहे.