प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ४ थें.
दाशराज्ञ युद्ध अथवा भरतदिग्विजय.
भरतस्वरुपस्पष्टीकरणार्थ प्रयत्न.- भरतांचे स्वरुप जाणण्यासाठीं लुडविग, गेल्डनेर, मॅकडोनेल, झिमर, हिलेब्रांट इत्यादि पाश्चात्य संशोधकांनीं या विषयावर जें थोडेंसें संशोधन केलें त्याचा मथितार्थ खोल पाण्यांत प्रवेश करण्यापूर्वी देतों. लुडविग् भरत आणि तृत्सू हे एकच असें म्हणतो. ओल्डेनबर्ग म्हणतो कीं, तृत्सू हे भरतांचे वंशस्तुतिपाठक जे वसिष्ठ त्यांपैकी होत. गेल्डनर म्हणतो की, तृत्सु हें भरतांचे राजघराणें असावें. तृत्सू आणि भरत हे शत्रू आहेत असें जें झिमरचें मत आहे तें मत भूगोलदृष्ट्यासुद्धां बरोबर नाही, असें मॅकडोनेल म्हणतो. याला तो असा आधार देतो की, झिमरच्या मताप्रमाणें तृत्सू लोक परुष्णी नदीच्या (रावीच्या) पूर्वेला रहात असत व त्यावरुन भरत हे तृत्सू लोकांवर पश्चिमेकडून हल्ला करीत असले पाहिजेत; परंतु ॠग्वेदांत तर 'देवश्रवस्' व 'देववात' हे भरत राजे सरस्वती, आपया व दृषद्वती यांच्या लगत म्हणजे हिंदुस्थानांतील पवित्र प्रदेश जो मध्यदेश तेथें रहात असत असें दाखविलें आहे. हिलेब्रँटचें असें मत आहे की तृत्सू हे या प्रदेशांतील अगोदरचे लोक असावेत आणि सुदास व भरत हे मागाहून आले असावेत, आणि तृत्सू व भरत यांचा संबंध जडून दोहोंची मिळून पुढें एकच जात झाली असावी. हे लोकमिश्रण दुस-या एका गोष्टीच्या स्पष्टीकरणार्थ गृहीत धरलें पाहिजे असें तो म्हणतो. त्याच्या मतें अशा प्रकारचा संबंध असणें अगदी अवश्य आहे. कारण, दिवोदासाचा संबंध भरद्वाज वंशाशीं येत असतां त्याचा मुलगा अगर नातू सुदास (पैजवन) याचा संबंध वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्याशीं येतो, याचें स्पष्टीकरण या त-हेचा फरक झाला होता असें गृहीत धरल्याशिवाय होणार नाही, अर्थात् पैजवनांचे पहिले पुरोहित भारद्वाज असावे आणि नंतरचे पुरोहित दोन राष्ट्रांचा संयोग झाल्यामुळें विश्वामित्र व वसिष्ठ हे झाले असावेत. हिलेब्रॅंटचें मत आम्हांस बरेचसें ग्राह्य दिसतें. कदाचित् असेंहि असेल कीं, राजकारणास ज्याचें पौरोहित्य अनुकूल होईल त्यास पुरोहित करावयाचें आणि गरज पडल्यास किंवा संपल्यास काढून टाकावयाचें ही तर पैजवनांची नीति असावी. असो.
तृत्सूंचे पुरोहित वसिष्ठ होते, आणि तृत्सूंचें भरतांशी ऐक्य होतें आणि भरतांचे पौरोहित्य वसिष्टाकडे होतें या दोन्ही गोष्टी अन्योन्याश्रयी दिसतात. वसिष्ट तृत्सूंचे व भरतांचे पुरोहित झाले पण कालांतरानें मागे पडलेल्या विश्वामित्र घराण्यानें आपली भिक्षुकी परत मिळविली असें ब्राह्मणग्रंथांवरुन दिसते. भरतांचे आणि वसिष्टांचें शत्रुत्व स्थापन झालें. रामायणांत व भारतांत वसिष्टांस भिक्षुकीसाठीं कुरुंतून कोसलाकडे घालविले आहे.