प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ४ थें.
दाशराज्ञ युद्ध अथवा भरतदिग्विजय.
सुदास तृत्सु होता काय:- सुदासविषयीचा एक मोठा प्रश्न म्हटला म्हणजे सुदास हा तृत्सु होता काय? हा होय. या प्रश्नाच्या स्पष्टीकरणाकडे आतां आपण वळू.
तृत्सूंविषयीं आपणांस अनेक विधानें दृष्टीस पडतात. तीं येणें प्रमाणें.
(१) इंद्रानें अनवांचे धन तृत्सूला दिलें.
(७.१८,१३).
(२) यमुना नदी व तृत्सु यांनी इंद्राचें रक्षण केलें.
(७.१८,१९).
(३) इन्द्राशीं युद्ध करीत असतां तृत्सु पळाले व पळतांना धन सुदासाला दिलें. किंवा इंद्रासह ते चाल करुन गेले.
(७.१८,१५).
(४) आर्याचे गोसंघ तृत्सूंपासून हरण केले आणि युध्दांत त्यांनां ठार मारलें.
(७.१८,७)
(५) श्तुति करणा-या वसिष्ठाचें स्तोत्र इंद्रानें ऐकलें आणि तृत्सूंचा देश विस्तीर्ण केला. (पाऊस पाडला).
(७.३३,५).
(६) बैलांनां मारण्याची काठी ज्याप्रमाणें अल्प पर्णयुक्त असते त्याप्रमाणें हे भरत अल्प होते. नंतर जेव्हां तृत्सूंचा पुरोहित वसिष्ठ झाला तेव्हां तृत्सूंचे लोक खूपच वाढले.
(७.३३,६).
(७) हे इन्द्रावरुणानों, घातुक शस्त्रानें समोर न येणा-या भेदाला मारणारे तुम्हीं सुदासाचें काळजीपूर्वक रक्षण करा. माझे यजमान तृत्सु यांची युध्दांतील (बोलावणी) स्तोत्रें ऐकलीत यावरुन माझें तृत्सूंचे पौरोहित्य सफल झालें.
(७.८३,४).
(८) दाशराज्ञ युध्दांत तृत्सूंसह सुदासाला रक्षिलें.
(७.८३,६)
(९) धीवन्तो असपन्त तृत्सव:
(७.८३,८)
तृत्सूंनी स्तुति केली (तेथें सुदासाला रक्षिलें). सुदास तृत्सु होता की नाही?- सुदास व तृत्सु भिन्न या म्हणण्यास ७.१८,१५ हें स्थल आधार म्हणून देतां येईल. या ठिकाणी 'इन्द्राशी युद्ध खेळतांना तृत्सु पळाले व त्यांचे धन सुदासाला मिळालें असें म्हटले आहे. यावरुन सुदास व तृत्सु भिन्न तर होतातच परंतु त्यांचे शत्रुत्वहि व्यक्त होतें. यावरुन असा प्रश्न उपस्थित होतो कीं असा एखादा काळ नसेलना कीं ज्या काळांत तृत्सु व सुदास हे एकमेकांविरुद्ध होते व पुढें ते एक झाले असावेत. दुसरें एक स्थळ संशयास्पद आहे. ७.८३,६ येथें ' तृत्सुभि: सह प्रसुदासमावतं' तृत्सूंसह सुदासाला रक्षिलें असें स्पष्ट म्हटलें आहे. यावरुनहि तृत्सु व सुदास हे एक होते असें जसें निघतें तसेंच ते एक नव्हते असेंहि निघूं शकतें. याच मंत्रांतील 'उभयास:' हें पद सुदास व तृत्सु त्यांच्या भिन्नतेचें प्रतिपादक म्हणून महत्वाचें आहे. वरील विधानाप्रमाणेंच दुसरें विधान ७.८३,८ या ॠचेंत आहे.
हे इंद्रावरुणानों ! दहा राजांच्या युध्दांत चहूंकडून वेष्टिलेल्या सुदासाला ज्या ठिकाणी निर्मलवृत्ति, जटाधारी बुद्धिमान अशा तृत्सूंनीं तुमचीं हविरत्राने व स्त्रोत्रांनीं स्तुति केली त्या ठिकाणीं रक्षण केले.
हें वसिष्ठमंडळ आहे. त्यामुळें व वसिष्ठाचा ज्या ज्या लोकांशी संबंध त्यांचा त्यांचा उल्लेख एखाद्या माहितगार माणसाप्रमाणें यांत येणें स्वाभाविक आहे. या मंडळांतील विधानावरुन सुदास आणि तृत्सु यांचे भिन्नत्व जरी दिसून येतें तथापि सुदास आणि तृत्सु यांचा निकट संबंध होता. हें नाकबूल करितां येणार नाही. त्यांचा अत्यंत निकट संबंध होता याची चिकित्सा करतांना त्या दोहोंत मित्रभाव होता अगर शास्यशासक भावहि होता हें ठरविलें पाहिजे, आणि भरत व तृत्सु यांचा संबंध शोधिला पाहिजे.
या विवेचनामध्यें शिरतांना विवेचनास पोषक पण प्रथम अप्रस्तुत दिसणा-या एका प्रश्नाकडे वळलें पाहिजे. तो प्रश्न म्हटला म्हणजे आर्य या शब्दाचा कांही ॠचांतील उपयोग होय. तृत्सु आणि आर्य यांच्या संबंधाविषयीं प्रश्न उत्पन्न करणारी एक ॠचा आहे. 'आर्यस्य गव्या तृत्सुभ्यो अजगन्युधानृन्' (७.१८,७). अन्वय:-सधमा: आर्येस्य गव्या तृत्सुभ्य: अनयत् युधा नृन् अजगतू 'आर्यांच्या गाई तृत्सूंपासून सोडविल्या आणि त्यांनां ठार मारलें. यावरुन आर्य आणि तृत्सु परस्पर विरुद्ध होते असें दिसतें.
आर्य हा मानववंश समजून त्या मानववंशामध्यें वसिष्ठशिष्य तृत्सूंचा अंतर्भाव होत नाही म्हणून घाबरा झालेला ग्रिफिथ तृत्सूंनां आर्य समजतो व वरील स्थलीं गव्या शब्दाचा मित्र असा अर्थ करितो. विल्सनला हें ग्रिफिथचें म्हणणें मान्य नाही. तथापि तृत्सु आर्यन या सोवळया वर्तुळांतून बाहेर पडण्याचें भय मुळींच नाही. सदर उल्लेखाचा अर्थ एवढाच कीं ज्यांच्या गाई होत्या तो वर्ग यजन कणारा होता. वरील वाक्यांत आर्यन् नान्-आर्यन् यांचें सामुच्चयिक युद्ध नसून ''भक्तांची पाठ राखलीस देवा'' अशा अर्थाचें विधान आहे.
पूर्वी भरत थोडे होते पण वसिष्ठास पौरोहित्य मिळाल्यामुळें तृत्सु चोंहोकडे पसरले असें विधान करणारी एक ॠचा मागें दिली आहे. आतापर्यंत घेतलेल्या उता-यांत आपणास खालील गोष्टी स्पष्ट दिसतात.
भरतांचे एका काळी उपाध्ये विश्वामित्र.
भरतांचे दुस-या काळीं उपाध्ये वसिष्ठ.
तृत्सूंचे एका काळीं उपाध्ये वसिष्ठ.
तृत्सूंचे एका काळी शत्रु सुदास.
तृत्सूंचे दुस-या काळीं मित्र सुदास.
सुदासाचे एका काळी पुरोहित वसिष्ठ.
सुदासाचे दुस-या काळीं (अश्वमेध काली) पुरोहित विश्वामित्र.
सुदासाच्या पूर्वजांचे पुरोहित भारद्वाज.
सुदासाचे मित्र पृथु आणि परशु.
सुदासाचे तृत्सु एका काळी शत्रु.
सुदासाचे तृत्सु दुस-या काळी मित्र.
तृत्सुंचे मित्र भरत; एकाकाळीं शत्रु.
सुदास हा भरत होता.
तृत्सूंचा व विश्वामित्राचा संबंध कोठेच वर्णिला नाहीं. त्यावरुन भरत व तृत्सु हे एक नसावेत. दिवोदास किंवा सुदास हा भरत राजा असावा. त्याच्या कुलाचा एका काळीं भारद्वाजाशी संबंध असेल परंतु दाशराज्ञयुध्दाच्या थोडया पूर्वीच्या काळांत सुदास पुरोहित विश्वामित्र होते यांत शंका नाहीं. वसिष्ठप्रमुख तृत्सु आणि विश्वमित्रसुदासप्रमुख भरत यांचे वैर झालें असावें. पुढील युध्दामध्यें केव्हां तरी तृत्सूंचा पराजय झाला असावा (७.१८,१५) आणि केव्हां तरी जय झाला असावा (७.३३,६) (७.१८,१५ व ७.३३,६) या दोन ॠचा परस्पर विरुद्ध अर्थ देणा-या आहेत. समजा, या दोन्ही ॠचा नसत्याच तर काय झालें असतें ? या ॠचांच्या अभावी फार तर तृत्सु व भरत यांचे कांही काल शत्रुत्व होतें ही गोष्ट सिद्ध व्हावयास कठिण जाईल. पण ते तेवढयानें भरत व तृत्सु यांचे परस्पर भिन्नत्व खोटें ठरत नाहीं. तृत्सु व भरत यांमध्यें सख्य वसिष्ठामुळें किंवा वसिष्ठाच्या देववशीकरणशक्तीवर विश्वास भरतांमध्येंहि उत्पन्न झाल्यामुळें झालें असावें व वसिष्ठामुळें तृत्सूंचे व भरतांचे एकीकरण झालें असावें.
तृत्सु आणि तृत्सूंचा देश किंवा प्रान्त कोंठे असावा त्या स्थलासंबंधी विचार आतां करुं. त्यांच्या देशाचा नक्की निर्देश करण्यास मुख्य दोनच साधनें उपलब्ध आहेत. एक 'आवदिद्रं यमुना तृत्सवश्च' या उल्लेखावरुन आणि दाशराज्ञ युध्दाचे वसिष्ठ सूक्त ७.१८ मध्यें वर्णिलेलें स्थल परुष्णी असल्यामुळें यांच्यामधील प्रदेश तृत्सूंचा असावा अशी कल्पना होते. तृत्सूंना 'पतृद' असेंहि म्हटलें आहे. 'आवो गच्छाति प्रतृदो वसिष्ठ:' ७.३३,१४ या स्थळी 'प्रतृद' शध्दाचा 'तृत्सु' अशा अर्थी उपयोग केला असून वसिष्ठांच्या सूक्तामध्यें आणखीहि अनुमानिक माहिती मिळेल.
सुदासाची ऐतिहासिक कामगिरी समजून घेण्यासाठी त्याच्या पूर्वजांची कामगिरी समजून घेतली पाहिजे. जें काम बाप सुरु करतो तेंच मुलास पुढें चालवावें लागतें. राजास जे शत्रु किंवा मित्र बाप उत्पन्न करुन ठेवील तेच मुलास पत्करावे लागतात. यासाठीं प्रथम दिवोदास (हा सुदासाचा बाप अगर आजा असावा) याचें कार्य लक्षांत घेऊं. दिवोदास, अतिथिग्व यासंबंधी संहितेंत पुढील उल्लेख आढळतात.
त्वं कुत्सं शुष्णहत्येश्वाविथारंन्धयोतिथिग्वाय शम्बरम् |
महान्तं चिदर्बुदं निक्रमी: पदा सनादेव दस्यु हत्याय जज्ञिषे ||
(१.५१,६.)
शुष्णाचा जेव्हां वध करण्यांत आला त्या वेळेस कुत्साचें तूं रक्षण केलेंस; अतिथिग्वाला भक्षणार्थ शंबर दिलास. शक्तिमान् अर्बुदालाहि तूं पायाखालीं तुडविलेंस. दस्यूंचा वध करण्याकरितां तूं पुरातन काली जन्मास आलास.
त्वं करञ्जमुत पर्णयं बधीस्तेजिष्ठयातिथितग्वस्य वर्तनी |
त्वं शता वंगृदस्याभिनत्पुरोनानुद: परिषूता ॠजिश्वना ||
(१.५३,८).
करंज व पर्णय यांचा तूं अतिथिग्वाच्या अत्यंत वैभवशाली फे-यांत वध केला आहेस. ॠजिश्वनानें वेढा घातला त्या वेळेस शरण न जाणा-या वंगृदाच्या शंभर किल्यांचा नाश केला आहेस.
त्वमाविथ सुश्रवसं तवोतिभिस्तव त्रामभिरिन्द्र तूर्वयाणम् |
त्वमस्मै कुत्समतिथिग्वमायुं महेराज्ञे यूने अरन्धय: ||
(१.५३,१०).
हे इंन्द्रा ! तूं मदत करुन सुश्रवसाचें रक्षण केलें आहेस, आणि तुझ्या मदतीनें तूर्वयाणाचें (रक्षण केलें आहेस.) कुत्स, अतिथिग्व, आयु ह्यांना ह्या तरुण व बलवान् राजाचें अंकित केलेंस.
याभिर्महामतिथिग्वं कशोजुवं दिवोदासं शंबरहत्य आवतम् |
याभि: पूर्भिद्ये त्रसदस्युमावतंताभिरुषु उफ्तिभिरश्विनागतम् ||
(१.११२,१४)
हे अश्वीहो ! तुम्हीं मोठा अतिथिग्व दिवोदास व कशोजु ह्यांचें शंबराचा वध करुन त्रसदस्यूचे किल्यांचा चुराडा करुन ज्या साधनांनी पालन केलेंत, ती साधनें घेऊन तुम्ही येथें आमचेकडे या.
यदयातं दिवोदासाय वर्तिर्भरद्वाजायाश्विना हयन्ता |
रेवदुवाह सचनो रथो वां वृषभश्व शिंशुमारश्व युक्ता ||
(१.११६,१८).
हे अश्वीहो ! तुम्ही दिवोदासाच्या घरी आलांत, भरद्वाजाप्रत त्वरेंनें आलात-ते वेळीं तुमचे बरोबर आलेला रथ उत्तम धन घेऊन आला, त्याला एक शिंशुमार व एक बैल एकत्र जोडलें होते.
युवं भुज्युं भुरमाणं विभिर्गतं स्वयुक्तिभिर्निवहन्ता पितृभ्य आं |
यासिष्ठं वर्तिर्वृषणा विजेन्यं दिवोदासाय महि चेति वामव: ||
(१.११९,४).
भुज्यु पाण्याच्या पुरांत धडपड करीत असतां तुम्ही त्याजकडे आलात; उडणा-या व स्वत:च जोडलेल्या पक्ष्यांकडून तुम्ही त्याला त्याचे वडिलाजवळ नेलें. हे बलवान् हो ! तुम्हीं दूर असलेल्या घराप्रत गेलांत; आणि दिवोदासाला तुम्हीं दिलेली मोठी मदत प्रसिद्ध आहे- ग्रिफिथ.
भिनत्पुरो नवर्तिमिंद्र पूरवे दिवोदासाय महिदांशुषे नृतो वज्रेण दाशुषे नृतो |
अतिथिग्वाय शम्बरं गिरेरुग्रो अवाभरत् |
महो धनानि दयमान ओजसा विश्वा धनान्योजसां ||
(१.१३०,७).
तुझ्या कृपेतला दास कामना पुरविणारा (पुरु) जो दिवोदास त्याकरितां-तुझ्या भक्ताकरितां- हे इन्द्रा ! हे नृत्यकर्त्या !तूं आपल्या वज्रानें नव्वद किल्यांचा चुराडा केलास. त्या बलवानानें अतिथिग्वाकरितां शंबराला पर्वतावरुन खालीं आणलें व आपल्या बलानें महाधन वाटलें; आणि आपल्या बलानें सर्व धन देऊन टाकलें.
स नो गव्येभिर्वृषकर्मन्नुक्थै: पुरां दर्त: पायुभि: पाहि शग्मै: |
दिवोदासेभिरिन्द्रस्तवानो वावृधीथा अहोभिरिव द्यौ: ||
(१.१३०,१०)
हे पराक्रमी (इंद्रा) ! हे किल्ले फोडणा-या आमच्या नूतन सूक्तांनीं गाईलेला तूं बळकट करणा-या मदतीनें आमचें रक्षण कर. हे इन्द्रा ! दिवोदासाच्या वंशजांनी स्तविलेला तूं, द्यु जसा दिवसांनी मोठा होत जातो तसा तूं वैभवांत वृध्दिंगत हो.
अध्वर्यवो य: शतमासहस्त्रं भूम्या उपस्थेव पज्जघन्वान् |
कुत्सुस्यायोरतिथिग्वस्य वीरान्यावृणग्भरतां सोममस्मै ||
(२.१४,७)
ज्यानें एक लक्ष (लोकांचा) वध केला व त्यांना खालीं पृथ्वीच्या वक्षस्थलावर फेकून दिलें; ज्यानें अतिथिग्व, कुत्स व आयु यांच्या वीरांनां {kosh वीर याचा अर्थ सायणांनी अभिगन्तृ=शत्रु असा केला आहे.}*{/kosh} मारलें त्याला हे अध्वर्यो ! सोम आणा.
सरन्धयत्सदिव: सारथये शुष्णमशुषं कुयवं कुत्साय |
दिवोदासाय नवतिं च नवेन्द्र: पुरो व्यैरच्छम्बरस्य ||
(२.१९,६).
एकदां त्यानें आपल्या कुत्स सारथ्याला अधाशी व पिकें भक्षण करणारा शुष्ण देऊन टाकला; आणि इन्द्रानें दिवोदासासाठी शंबराचे नव्याण्णव किल्ले पाडून टाकले.
अहं पुरो मन्दसानो व्यैरं नवसाकन्नवती: शम्बरस्य |
शततमं वेश्यं सर्वताता दिवोदासमतिथिग्वंयदावम् ||
(४.२६,३).
सोमाच्या उन्मत्त आनंदांत मी शंबराचे नव्याण्णव किल्ले एकत्र पाडून टाकले; आणि दिवोदास अतिथिग्वाला सहाय्य करतांना शंबराचें वसतिस्थान पूर्णपणें (मोडून टाकलें).
शतमश्मन्मयीनां पुरामिन्द्रो व्यास्यत् |
दिवोदासाय दाशुषे ||
(४.३०,२०,).
हवि देणा-या दिवोदासाकरिता इंद्रानें दगडांचे शंभर किल्ले उलथून टाकले.
त्वमिमा वार्या पुरु दिवोदासाय सुन्वते |
भरद्वाजाय दाशुषे ||
(६.१६,५).
पुढें ओतणा-या दिवोदासाला-पारितोषिकें (किंवा देणग्या) देणा-या भरद्वाजाला-तूं हे पुष्कळ वर दिलेस.
प्रतत्ते अद्या करणं कृतं भूत्कुत्सं यदायुमतिथिग्वमस्मै |
पुरु सहस्त्रा निशिशा अभिक्षामुत्तूर्वयाणं धृषता निनेथ ||
(६.१८,१३).
तूं आज केलेलें कृत्य प्रसिद्ध आहे.(आज) तूं त्याच्या करितां इतर पुष्कळ हजारोसंह कुत्स, आयु व अतिथिग्व यांनां नमविलेंस; आणि तूर्वयाणाला धैर्यानें मुक्त केलेंस.
त्वं कविं चोदयोर्कसातौ त्वं कुत्साय शुष्णं दाशुषे वर्क |
त्वं शिरो अमर्मण: पराहन्नतिथिग्वाय शंस्यं करिष्यन् ||
(६.२६,३).
सूर्यप्रकाश जिंकण्यास तूं त्या ॠषीला भाग पाडलेंस; सुशील कुत्सासाठी शुष्णाचा नाश केलास, अभेद्य राक्षसाचें डोकें तूं कापलेंस त्या वेळेस अतिथिग्वाची स्तुति तूं जिंकलीस.- ग्रिफिथ
त्वं तदुक्थमिन्द्र बर्हणा क: प्रयच्छता सहस्त्रा शूर दर्षि |
अबगिरेर्दासं शम्बरं हन्प्रावो दिवोदासं चित्राभिरुती ||
(६.२६,५).
हे वीरा! तूं ज्या वेळेस लढणा-या एक लक्ष शत्रूंचा वध केलास त्या वेळेस तूं स्तुतीचें फल दिलेंस. पर्वतावरच्या दासशंबराचा तूं वध केलास आणि चमत्कारिक साधनांनी दिवोदासाला मदत केलीस.
त्वं शतान्यव शम्बरस्य पुरो जघन्थाप्रतीनि दस्यो: |
अशिक्षो यत्र शच्या शचीवो दिवोदासाय सुन्वते सुतक्रे भरद्वाजाय गृणते वसूनि ||
(६.३१,४).
दस्युशंबराचे शंभर अभेद्य किल्ले तूं त्या वेळेस जमीनदोस्त केलेस. ज्या वेळेस हे बलवान् ! हवि देणा-या दिवोदासाला तूं बलानें मदत केलीस आणि हे सोम विकत घेणा-या ! तुझी स्तुति करणा-या भरद्वाजाला श्रीमान् केलेंस.
यस्य त्यच्छम्बरं मदे दिवोदासाय रन्धय: |
अयं स सोम इन्द्र ते सुत: पिब ||
(६.४३,१).
ज्याच्या उन्मत्त आनंदांत तूं एकदां शंबराला दिवोदासाचें भक्ष्य केलेंस तो हा सोम तुझ्यासाठी दाबून काढला आहे. हे इन्द्रा, पी.
प्रस्तोक इन्नु राधसस्त इन्द्र दश कोशयीर्दश वाजिनोदात् |
दिवोदासादतिथिग्वस्य राध: शाम्बरं वसु प्रत्यग्रभीष्म ||
(६.४७,२२).
इन्द्रानें त्या धनांतून प्रस्तोकाला दहा कोश (म्हणजे द्रव्यनिधि) व दहा जोमदार घोडे दिले आहेत. दिवोदासापासून आम्हांला शंबराचें धन-अतिथिग्वानें दिलेली देणगी-मिळाली आहे.
दशाश्वान्दश कोशान्दश वस्त्राधिभोजना |
दशो हिरण्यपिण्डान्दिवोदासादसानिषभ् ||
(६.४७,२३).
दहा घोडे, दहा द्रव्यनिधीच्या पेटया आणि त्यांच्या भरीला दहा वस्त्रांची आणखी एक देणगी ही व सोन्याच्या दहा लगडी दिवोदासाच्या हातांतून मला मिळाल्या आहेत.
इयमददाद्रभससृणच्युतं दिवोदासं वध्यश्वाय दाशुषे |
या शश्वन्तमाचखादावसं पणिं ता ते दात्राणि तविषा सरस्वति ||
(६.६१,१).
केवल आत्महित पाहणारे, दान न देणारे अशा पणींनां जिनें खाऊन टाकलें आणि यज्ञ करणा-या वध्रयश्वाला ॠणमोचक दिवोदास नांवाचा पुत्र दिला ती (ही सरस्वती होय). हे सरस्वती. तुझें हें दान फार मोठें आहे.
इमं नरो मरुत: सश्वतानु दिवोदासं न पितरं सुदास: |
अविष्टना पैजवनस्य केतं दूणाशं क्षत्रमजरं दुर्वायु ||
(७.१८,२५).
सुदासाचा पिता दिवोदास याची ज्याप्रमाणें तुम्ही सेवा केली तशी हे शूर मरुत हो ! तुम्ही त्याची-सुदासाची सेवा करा. अनुग्रह करुन पैजवनाच्या इच्छेला पाठिंबा द्या. त्याच्या टिकणा-या व बळकट प्रदेशाचें विश्वासानें रक्षण करा.
प्रियास इत्ते मधवन्नभिष्टौ नरो मदेम शरणे सखाय: |
नितुर्वशं नियाद्वं शिशह्यितिथिग्वाय शंस्यं करिष्यन् ||
(७.१९,८).
हे मधवन् ! ज्या मित्रांवर तूं प्रेम करतोस ते आम्ही अतिथिग्वाची इच्छा पूर्ण करण्यास व तुर्वश व यदु यांचा गर्व हरण्यास खुषी असे-तुझ्या संरक्षणाखालीं तुझ्या सन्निध आनंदांत असो.
य आयुं कुत्समतिथिग्वमर्दयो वावृधानो दिवे दिवे |
तं त्वा वयं हर्यश्वं शतक्रतुं वाजयन्तो हवामहे ||
(८.५३,२).
उत्कर्ष पावणा-या ज्यानें आयु, कुत्स आणि अतिथिग्व यांचा फडशा पाडला त्या नीलाश्व इन्द्राला हविर्युक्त आम्ही दररोज बोलावितों.
पुर: सद्य इत्थाधिये दिवोदासाय शम्बरम् |
अध त्यं तुर्वशं यदुम् ||
(९.६१,२).
सत्वशील दिवोदासाकरितां जलदीनें किल्ले व शंबर यांचा चुराडा केला; नंतर यदु आणि तो तुर्वश (यांचा चुराडा केला).
अहं गुङ्गुभ्यो अतिथिग्वमिष्करमिषं न वृत्रतुरं विक्षु धारयम् |
यत्पर्णयघ्न उत वा करञ्जहे प्राहं महे वृत्रहत्ये अशुश्रवि ||
(१०.४८,८).
ज्या वेळेस शत्रुला ठार मारणा-या मोठया लढार्इंत-जींत करंज पडला व पर्णय पडला तीत-मीं वैभव संपादन केलें, त्या वेळेस गुङ्गूंच्या विरुद्ध मी अतिथिग्वाला शक्तिमान् केलें आणि सामर्थ्य जिंकणा-या वृत्राप्रमाणें त्याला मी लोकांच्या मध्यें ठेविलें.
वरील उता-यांत खालील ऐतिहासिक महत्वाची स्थलें येतात.
(१) कुत्सानें शुष्णास मारिलें.
(२) अतिथिग्वानें शंबरास मारिलें.
(३) करंज आणि पर्णय यांचा अतिथिग्वाच्या फे-यांत नाश झाला.