प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ४ थें.
दाशराज्ञ युद्ध अथवा भरतदिग्विजय.

सुदास तृत्सु होता काय:- सुदासविषयीचा एक मोठा प्रश्न म्हटला म्हणजे सुदास हा तृत्सु होता काय? हा होय. या प्रश्नाच्या स्पष्टीकरणाकडे आतां आपण वळू.

तृत्सूंविषयीं आपणांस अनेक विधानें दृष्टीस पडतात. तीं येणें प्रमाणें.

(१) इंद्रानें अनवांचे धन तृत्सूला दिलें.
(.१८,१३).

(२) यमुना नदी व तृत्सु यांनी इंद्राचें रक्षण केलें.
(.१८,१९).

(३) इन्द्राशीं युद्ध करीत असतां तृत्सु पळाले व पळतांना धन सुदासाला दिलें. किंवा इंद्रासह ते चाल करुन गेले.
(.१८,१५).

(४) आर्याचे गोसंघ तृत्सूंपासून हरण केले आणि युध्दांत त्यांनां ठार मारलें.
(.१८,७)

(५) श्तुति करणा-या वसिष्ठाचें स्तोत्र इंद्रानें ऐकलें आणि तृत्सूंचा देश विस्तीर्ण केला. (पाऊस पाडला).
(.३३,५).

(६) बैलांनां मारण्याची काठी ज्याप्रमाणें अल्प पर्णयुक्त असते त्याप्रमाणें हे भरत अल्प होते. नंतर जेव्हां तृत्सूंचा पुरोहित वसिष्ठ झाला तेव्हां तृत्सूंचे लोक खूपच वाढले.
(.३३,६).

(७) हे इन्द्रावरुणानों, घातुक शस्त्रानें समोर न येणा-या भेदाला मारणारे तुम्हीं सुदासाचें काळजीपूर्वक रक्षण करा. माझे यजमान तृत्सु यांची युध्दांतील (बोलावणी) स्तोत्रें ऐकलीत यावरुन माझें तृत्सूंचे पौरोहित्य सफल झालें.
(७.८३,४).

(८) दाशराज्ञ युध्दांत तृत्सूंसह सुदासाला रक्षिलें.
(.८३,६)

(९) धीवन्तो असपन्त तृत्सव:
(.८३,८)

तृत्सूंनी स्तुति केली (तेथें सुदासाला रक्षिलें). सुदास तृत्सु होता की नाही?- सुदास व तृत्सु भिन्न या म्हणण्यास .१८,१५ हें स्थल आधार म्हणून देतां येईल. या ठिकाणी 'इन्द्राशी युद्ध खेळतांना तृत्सु पळाले व त्यांचे धन सुदासाला मिळालें असें म्हटले आहे. यावरुन सुदास व तृत्सु भिन्न तर होतातच परंतु त्यांचे शत्रुत्वहि व्यक्त होतें. यावरुन असा प्रश्न उपस्थित होतो कीं असा एखादा काळ नसेलना कीं ज्या काळांत तृत्सु व सुदास हे एकमेकांविरुद्ध होते व पुढें ते एक झाले असावेत. दुसरें एक स्थळ संशयास्पद आहे. .८३,६ येथें ' तृत्सुभि: सह प्रसुदासमावतं' तृत्सूंसह सुदासाला रक्षिलें असें स्पष्ट म्हटलें आहे. यावरुनहि तृत्सु व सुदास हे एक होते असें जसें निघतें तसेंच ते एक नव्हते असेंहि निघूं शकतें. याच मंत्रांतील 'उभयास:' हें पद सुदास व तृत्सु त्यांच्या भिन्नतेचें प्रतिपादक म्हणून महत्वाचें आहे. वरील विधानाप्रमाणेंच दुसरें विधान .८३,८ या ॠचेंत आहे.

हे इंद्रावरुणानों ! दहा राजांच्या युध्दांत चहूंकडून वेष्टिलेल्या सुदासाला ज्या ठिकाणी निर्मलवृत्ति, जटाधारी बुद्धिमान अशा तृत्सूंनीं तुमचीं हविरत्राने व स्त्रोत्रांनीं स्तुति केली त्या ठिकाणीं रक्षण केले.

हें वसिष्ठमंडळ आहे. त्यामुळें व वसिष्ठाचा ज्या ज्या लोकांशी संबंध त्यांचा त्यांचा उल्लेख एखाद्या माहितगार माणसाप्रमाणें यांत येणें स्वाभाविक आहे. या मंडळांतील विधानावरुन सुदास आणि तृत्सु यांचे भिन्नत्व जरी दिसून येतें तथापि सुदास आणि तृत्सु यांचा निकट संबंध होता. हें नाकबूल करितां येणार नाही. त्यांचा अत्यंत निकट संबंध होता याची चिकित्सा करतांना त्या दोहोंत मित्रभाव होता अगर शास्यशासक भावहि होता हें ठरविलें पाहिजे, आणि भरत व तृत्सु यांचा संबंध शोधिला पाहिजे.

या विवेचनामध्यें शिरतांना विवेचनास पोषक पण प्रथम अप्रस्तुत दिसणा-या एका प्रश्नाकडे वळलें पाहिजे. तो प्रश्न म्हटला म्हणजे आर्य या शब्दाचा कांही ॠचांतील उपयोग होय. तृत्सु आणि आर्य यांच्या संबंधाविषयीं प्रश्न उत्पन्न करणारी एक ॠचा आहे. 'आर्यस्य गव्या तृत्सुभ्यो अजगन्युधानृन्' (७.१८,७). अन्वय:-सधमा: आर्येस्य गव्या तृत्सुभ्य: अनयत् युधा नृन् अजगतू 'आर्यांच्या गाई तृत्सूंपासून सोडविल्या आणि त्यांनां ठार मारलें. यावरुन आर्य आणि तृत्सु परस्पर विरुद्ध होते असें दिसतें.

आर्य हा मानववंश समजून त्या मानववंशामध्यें वसिष्ठशिष्य तृत्सूंचा अंतर्भाव होत नाही म्हणून घाबरा झालेला ग्रिफिथ तृत्सूंनां आर्य समजतो व वरील स्थलीं गव्या शब्दाचा मित्र असा अर्थ करितो. विल्सनला हें ग्रिफिथचें म्हणणें मान्य नाही. तथापि तृत्सु आर्यन या सोवळया वर्तुळांतून बाहेर पडण्याचें भय मुळींच नाही. सदर उल्लेखाचा अर्थ एवढाच कीं ज्यांच्या गाई होत्या तो वर्ग यजन कणारा होता. वरील वाक्यांत आर्यन् नान्-आर्यन् यांचें सामुच्चयिक युद्ध नसून ''भक्तांची पाठ राखलीस देवा'' अशा अर्थाचें विधान आहे.

पूर्वी भरत थोडे होते पण वसिष्ठास पौरोहित्य मिळाल्यामुळें तृत्सु चोंहोकडे पसरले असें विधान करणारी एक ॠचा मागें दिली आहे. आतापर्यंत घेतलेल्या उता-यांत आपणास खालील गोष्टी स्पष्ट दिसतात.

भरतांचे एका काळी उपाध्ये विश्वामित्र.
भरतांचे दुस-या काळीं उपाध्ये वसिष्ठ.
तृत्सूंचे एका काळीं उपाध्ये वसिष्ठ.
तृत्सूंचे एका काळी शत्रु सुदास.
तृत्सूंचे दुस-या काळीं मित्र सुदास.
सुदासाचे एका काळी पुरोहित वसिष्ठ.
सुदासाचे दुस-या काळीं (अश्वमेध काली) पुरोहित विश्वामित्र.
सुदासाच्या पूर्वजांचे पुरोहित भारद्वाज.
सुदासाचे मित्र पृथु आणि परशु.
सुदासाचे तृत्सु एका काळी शत्रु.
सुदासाचे तृत्सु दुस-या काळी मित्र.
तृत्सुंचे मित्र भरत; एकाकाळीं शत्रु.
सुदास हा भरत होता.

तृत्सूंचा व विश्वामित्राचा संबंध कोठेच वर्णिला नाहीं. त्यावरुन भरत व तृत्सु हे एक नसावेत. दिवोदास किंवा सुदास हा भरत राजा असावा. त्याच्या कुलाचा एका काळीं भारद्वाजाशी संबंध असेल परंतु दाशराज्ञयुध्दाच्या थोडया पूर्वीच्या काळांत सुदास पुरोहित विश्वामित्र होते यांत शंका नाहीं. वसिष्ठप्रमुख तृत्सु आणि विश्वमित्रसुदासप्रमुख भरत यांचे वैर झालें असावें. पुढील युध्दामध्यें केव्हां तरी तृत्सूंचा पराजय झाला असावा (७.१८,१५) आणि केव्हां तरी जय झाला असावा (७.३३,६) (.१८,१५ व .३३,६) या दोन ॠचा परस्पर विरुद्ध अर्थ देणा-या आहेत. समजा, या दोन्ही ॠचा नसत्याच तर काय झालें असतें ? या ॠचांच्या अभावी फार तर तृत्सु व भरत यांचे कांही काल शत्रुत्व होतें ही गोष्ट सिद्ध व्हावयास कठिण जाईल. पण ते तेवढयानें भरत व तृत्सु यांचे परस्पर भिन्नत्व खोटें ठरत नाहीं. तृत्सु व भरत यांमध्यें सख्य वसिष्ठामुळें किंवा वसिष्ठाच्या देववशीकरणशक्तीवर विश्वास भरतांमध्येंहि उत्पन्न झाल्यामुळें झालें असावें व वसिष्ठामुळें तृत्सूंचे व भरतांचे एकीकरण झालें असावें.

तृत्सु आणि तृत्सूंचा देश किंवा प्रान्त कोंठे असावा त्या स्थलासंबंधी विचार आतां करुं. त्यांच्या देशाचा नक्की निर्देश करण्यास मुख्य दोनच साधनें उपलब्ध आहेत. एक 'आवदिद्रं यमुना तृत्सवश्च' या उल्लेखावरुन आणि दाशराज्ञ युध्दाचे वसिष्ठ सूक्त ७.१८ मध्यें वर्णिलेलें स्थल परुष्णी असल्यामुळें यांच्यामधील प्रदेश तृत्सूंचा असावा अशी कल्पना होते. तृत्सूंना 'पतृद' असेंहि म्हटलें आहे. 'आवो गच्छाति प्रतृदो वसिष्ठ:' ७.३३,१४ या स्थळी 'प्रतृद' शध्दाचा 'तृत्सु' अशा अर्थी उपयोग केला असून वसिष्ठांच्या सूक्तामध्यें आणखीहि अनुमानिक माहिती मिळेल.

सुदासाची ऐतिहासिक कामगिरी समजून घेण्यासाठी त्याच्या पूर्वजांची कामगिरी समजून घेतली पाहिजे. जें काम बाप सुरु करतो तेंच मुलास पुढें चालवावें लागतें. राजास जे शत्रु किंवा मित्र बाप उत्पन्न करुन ठेवील तेच मुलास पत्करावे लागतात. यासाठीं प्रथम दिवोदास (हा सुदासाचा बाप अगर आजा असावा) याचें कार्य लक्षांत घेऊं. दिवोदास, अतिथिग्व यासंबंधी संहितेंत पुढील उल्लेख आढळतात.

त्वं कुत्सं शुष्णहत्येश्वाविथारंन्धयोतिथिग्वाय शम्बरम् |
महान्तं चिदर्बुदं निक्रमी: पदा सनादेव दस्यु हत्याय जज्ञिषे ||
(.५१,६.)

शुष्णाचा जेव्हां वध करण्यांत आला त्या वेळेस कुत्साचें तूं रक्षण केलेंस; अतिथिग्वाला भक्षणार्थ शंबर दिलास. शक्तिमान् अर्बुदालाहि तूं पायाखालीं तुडविलेंस. दस्यूंचा वध करण्याकरितां तूं पुरातन काली जन्मास आलास.

त्वं करञ्जमुत पर्णयं बधीस्तेजिष्ठयातिथितग्वस्य वर्तनी |
त्वं शता वंगृदस्याभिनत्पुरोनानुद: परिषूता ॠजिश्वना ||
(.५३,८).

करंज व पर्णय यांचा तूं अतिथिग्वाच्या अत्यंत वैभवशाली फे-यांत वध केला आहेस. ॠजिश्वनानें वेढा घातला त्या वेळेस शरण न जाणा-या वंगृदाच्या शंभर किल्यांचा नाश केला आहेस.

त्वमाविथ सुश्रवसं तवोतिभिस्तव त्रामभिरिन्द्र तूर्वयाणम् |
त्वमस्मै कुत्समतिथिग्वमायुं महेराज्ञे यूने अरन्धय: ||
(.५३,१०).

हे इंन्द्रा ! तूं मदत करुन सुश्रवसाचें रक्षण केलें आहेस, आणि तुझ्या मदतीनें तूर्वयाणाचें (रक्षण केलें आहेस.) कुत्स, अतिथिग्व, आयु ह्यांना ह्या तरुण व बलवान् राजाचें अंकित केलेंस.

याभिर्महामतिथिग्वं कशोजुवं दिवोदासं शंबरहत्य आवतम् |
याभि: पूर्भिद्ये त्रसदस्युमावतंताभिरुषु उफ्तिभिरश्विनागतम् ||
(.११२,१४)

हे अश्वीहो ! तुम्हीं मोठा अतिथिग्व दिवोदास व कशोजु ह्यांचें शंबराचा वध करुन त्रसदस्यूचे किल्यांचा चुराडा करुन ज्या साधनांनी पालन केलेंत, ती साधनें घेऊन तुम्ही येथें आमचेकडे या.

यदयातं दिवोदासाय वर्तिर्भरद्वाजायाश्विना हयन्ता |
रेवदुवाह सचनो रथो वां वृषभश्व शिंशुमारश्व युक्ता ||
(.११६,१८).

हे अश्वीहो ! तुम्ही दिवोदासाच्या घरी आलांत, भरद्वाजाप्रत त्वरेंनें आलात-ते वेळीं तुमचे बरोबर आलेला रथ उत्तम धन घेऊन आला, त्याला एक शिंशुमार व एक बैल एकत्र जोडलें होते.

युवं भुज्युं भुरमाणं विभिर्गतं स्वयुक्तिभिर्निवहन्ता पितृभ्य आं |
यासिष्ठं वर्तिर्वृषणा विजेन्यं दिवोदासाय महि चेति वामव: ||
(.११९,४).

भुज्यु पाण्याच्या पुरांत धडपड करीत असतां तुम्ही त्याजकडे आलात; उडणा-या व स्वत:च जोडलेल्या पक्ष्यांकडून तुम्ही त्याला त्याचे वडिलाजवळ नेलें. हे बलवान् हो ! तुम्हीं दूर असलेल्या घराप्रत गेलांत; आणि दिवोदासाला तुम्हीं दिलेली मोठी मदत प्रसिद्ध आहे- ग्रिफिथ.

भिनत्पुरो नवर्तिमिंद्र पूरवे दिवोदासाय महिदांशुषे नृतो वज्रेण दाशुषे नृतो |
अतिथिग्वाय शम्बरं गिरेरुग्रो अवाभरत् |
महो धनानि दयमान ओजसा विश्वा धनान्योजसां ||
(.१३०,७).

तुझ्या कृपेतला दास कामना पुरविणारा (पुरु) जो दिवोदास त्याकरितां-तुझ्या भक्ताकरितां- हे इन्द्रा ! हे नृत्यकर्त्या !तूं आपल्या वज्रानें नव्वद किल्यांचा चुराडा केलास. त्या बलवानानें अतिथिग्वाकरितां शंबराला पर्वतावरुन खालीं आणलें व आपल्या बलानें महाधन वाटलें; आणि आपल्या बलानें सर्व धन देऊन टाकलें.

स नो गव्येभिर्वृषकर्मन्नुक्थै: पुरां दर्त: पायुभि: पाहि शग्मै: |
दिवोदासेभिरिन्द्रस्तवानो वावृधीथा अहोभिरिव द्यौ: ||
(.१३०,१०)

हे पराक्रमी (इंद्रा) ! हे किल्ले फोडणा-या आमच्या नूतन सूक्तांनीं गाईलेला तूं बळकट करणा-या मदतीनें आमचें रक्षण कर. हे इन्द्रा ! दिवोदासाच्या वंशजांनी स्तविलेला तूं, द्यु जसा दिवसांनी मोठा होत जातो तसा तूं वैभवांत वृध्दिंगत हो.

अध्वर्यवो य: शतमासहस्त्रं भूम्या उपस्थेव पज्जघन्वान् |
कुत्सुस्यायोरतिथिग्वस्य वीरान्यावृणग्भरतां सोममस्मै ||
(.१४,७)

ज्यानें एक लक्ष (लोकांचा) वध केला व त्यांना खालीं पृथ्वीच्या वक्षस्थलावर फेकून दिलें; ज्यानें अतिथिग्व, कुत्स व आयु यांच्या वीरांनां {kosh वीर याचा अर्थ सायणांनी अभिगन्तृ=शत्रु असा केला आहे.}*{/kosh} मारलें त्याला हे अध्वर्यो ! सोम आणा.

सरन्धयत्सदिव: सारथये शुष्णमशुषं कुयवं कुत्साय |
दिवोदासाय नवतिं च नवेन्द्र: पुरो व्यैरच्छम्बरस्य ||
(.१९,६).

एकदां त्यानें आपल्या कुत्स सारथ्याला अधाशी व पिकें भक्षण करणारा शुष्ण देऊन टाकला; आणि इन्द्रानें दिवोदासासाठी शंबराचे नव्याण्णव किल्ले पाडून टाकले.

अहं पुरो मन्दसानो व्यैरं नवसाकन्नवती: शम्बरस्य |
शततमं वेश्यं सर्वताता दिवोदासमतिथिग्वंयदावम् ||
(.२६,३).

सोमाच्या उन्मत्त आनंदांत मी शंबराचे नव्याण्णव किल्ले एकत्र पाडून टाकले; आणि दिवोदास अतिथिग्वाला सहाय्य करतांना शंबराचें वसतिस्थान पूर्णपणें (मोडून टाकलें).

शतमश्मन्मयीनां पुरामिन्द्रो व्यास्यत् |
दिवोदासाय दाशुषे ||
(.३०,२०,).

हवि देणा-या दिवोदासाकरिता इंद्रानें दगडांचे शंभर किल्ले उलथून टाकले.

त्वमिमा वार्या पुरु दिवोदासाय सुन्वते |
भरद्वाजाय दाशुषे ||
(.१६,५).

पुढें ओतणा-या दिवोदासाला-पारितोषिकें (किंवा देणग्या) देणा-या भरद्वाजाला-तूं हे पुष्कळ वर दिलेस.

प्रतत्ते अद्या करणं कृतं भूत्कुत्सं यदायुमतिथिग्वमस्मै |
पुरु सहस्त्रा निशिशा अभिक्षामुत्तूर्वयाणं धृषता निनेथ ||
(.१८,१३).

तूं आज केलेलें कृत्य प्रसिद्ध आहे.(आज) तूं त्याच्या करितां इतर पुष्कळ हजारोसंह कुत्स, आयु व अतिथिग्व यांनां नमविलेंस; आणि तूर्वयाणाला धैर्यानें मुक्त केलेंस.

त्वं कविं चोदयोर्कसातौ त्वं कुत्साय शुष्णं दाशुषे वर्क |
त्वं शिरो अमर्मण: पराहन्नतिथिग्वाय शंस्यं करिष्यन् ||
(.२६,३).

सूर्यप्रकाश जिंकण्यास तूं त्या ॠषीला भाग पाडलेंस; सुशील कुत्सासाठी शुष्णाचा नाश केलास, अभेद्य राक्षसाचें डोकें तूं कापलेंस त्या वेळेस अतिथिग्वाची स्तुति तूं जिंकलीस.- ग्रिफिथ

त्वं तदुक्थमिन्द्र बर्हणा क: प्रयच्छता सहस्त्रा शूर दर्षि |
अबगिरेर्दासं शम्बरं हन्प्रावो दिवोदासं चित्राभिरुती ||
(.२६,५).

हे वीरा! तूं ज्या वेळेस लढणा-या एक लक्ष शत्रूंचा वध केलास त्या वेळेस तूं स्तुतीचें फल दिलेंस. पर्वतावरच्या दासशंबराचा तूं वध केलास आणि चमत्कारिक साधनांनी दिवोदासाला मदत केलीस.

त्वं शतान्यव शम्बरस्य पुरो जघन्थाप्रतीनि दस्यो: |
अशिक्षो यत्र शच्या शचीवो दिवोदासाय सुन्वते सुतक्रे भरद्वाजाय गृणते वसूनि ||
(.३१,४).

दस्युशंबराचे शंभर अभेद्य किल्ले तूं त्या वेळेस जमीनदोस्त केलेस. ज्या वेळेस हे बलवान् ! हवि देणा-या दिवोदासाला तूं बलानें मदत केलीस आणि हे सोम विकत घेणा-या ! तुझी स्तुति करणा-या भरद्वाजाला श्रीमान् केलेंस.

यस्य त्यच्छम्बरं मदे दिवोदासाय रन्धय: |
अयं स सोम इन्द्र ते सुत: पिब ||
(.४३,१).

ज्याच्या उन्मत्त आनंदांत तूं एकदां शंबराला दिवोदासाचें भक्ष्य केलेंस तो हा सोम तुझ्यासाठी दाबून काढला आहे. हे इन्द्रा, पी.

प्रस्तोक इन्नु राधसस्त इन्द्र दश कोशयीर्दश वाजिनोदात् |
दिवोदासादतिथिग्वस्य राध: शाम्बरं वसु प्रत्यग्रभीष्म ||
(.४७,२२).

इन्द्रानें त्या धनांतून प्रस्तोकाला दहा कोश (म्हणजे द्रव्यनिधि) व दहा जोमदार घोडे दिले आहेत. दिवोदासापासून आम्हांला शंबराचें धन-अतिथिग्वानें दिलेली देणगी-मिळाली आहे.

दशाश्वान्दश कोशान्दश वस्त्राधिभोजना |
दशो हिरण्यपिण्डान्दिवोदासादसानिषभ् ||
(.४७,२३).

दहा घोडे, दहा द्रव्यनिधीच्या पेटया आणि त्यांच्या भरीला दहा वस्त्रांची आणखी एक देणगी ही व सोन्याच्या दहा लगडी दिवोदासाच्या हातांतून मला मिळाल्या आहेत.

इयमददाद्रभससृणच्युतं दिवोदासं वध्यश्वाय दाशुषे |
या शश्वन्तमाचखादावसं पणिं ता ते दात्राणि तविषा सरस्वति ||
(.६१,१).

केवल आत्महित पाहणारे, दान न देणारे अशा पणींनां जिनें खाऊन टाकलें आणि यज्ञ करणा-या वध्रयश्वाला ॠणमोचक दिवोदास नांवाचा पुत्र दिला ती (ही सरस्वती होय). हे सरस्वती. तुझें हें दान फार मोठें आहे.

इमं नरो मरुत: सश्वतानु दिवोदासं न पितरं सुदास: |
अविष्टना पैजवनस्य केतं दूणाशं क्षत्रमजरं दुर्वायु ||
(.१८,२५).

सुदासाचा पिता दिवोदास याची ज्याप्रमाणें तुम्ही सेवा केली तशी हे शूर मरुत हो ! तुम्ही त्याची-सुदासाची सेवा करा. अनुग्रह करुन पैजवनाच्या इच्छेला पाठिंबा द्या. त्याच्या टिकणा-या व बळकट प्रदेशाचें विश्वासानें रक्षण करा.

प्रियास इत्ते मधवन्नभिष्टौ नरो मदेम शरणे सखाय: |
नितुर्वशं नियाद्वं शिशह्यितिथिग्वाय शंस्यं करिष्यन् ||
(.१९,८).

हे मधवन् ! ज्या मित्रांवर तूं प्रेम करतोस ते आम्ही अतिथिग्वाची इच्छा पूर्ण करण्यास व तुर्वश व यदु यांचा गर्व हरण्यास खुषी असे-तुझ्या संरक्षणाखालीं तुझ्या सन्निध आनंदांत असो.

य आयुं कुत्समतिथिग्वमर्दयो वावृधानो दिवे दिवे |
तं त्वा वयं हर्यश्वं शतक्रतुं वाजयन्तो हवामहे ||
(.५३,२).

उत्कर्ष पावणा-या ज्यानें आयु, कुत्स आणि अतिथिग्व यांचा फडशा पाडला त्या नीलाश्व इन्द्राला हविर्युक्त आम्ही दररोज बोलावितों.

पुर: सद्य इत्थाधिये दिवोदासाय शम्बरम् |
अध त्यं तुर्वशं यदुम् ||
(.६१,२).

सत्वशील दिवोदासाकरितां जलदीनें किल्ले व शंबर यांचा चुराडा केला; नंतर यदु आणि तो तुर्वश (यांचा चुराडा केला).

अहं गुङ्गुभ्यो अतिथिग्वमिष्करमिषं न वृत्रतुरं विक्षु धारयम् |
यत्पर्णयघ्न उत वा करञ्जहे प्राहं महे वृत्रहत्ये अशुश्रवि ||
(१०.४८,८).

ज्या वेळेस शत्रुला ठार मारणा-या मोठया लढार्इंत-जींत करंज पडला व पर्णय पडला तीत-मीं वैभव संपादन केलें, त्या वेळेस गुङ्गूंच्या विरुद्ध मी अतिथिग्वाला शक्तिमान् केलें आणि सामर्थ्य जिंकणा-या वृत्राप्रमाणें त्याला मी लोकांच्या मध्यें ठेविलें.

वरील उता-यांत खालील ऐतिहासिक महत्वाची स्थलें येतात.

(१) कुत्सानें शुष्णास मारिलें.

(२) अतिथिग्वानें शंबरास मारिलें.

(३) करंज आणि पर्णय यांचा अतिथिग्वाच्या फे-यांत नाश झाला.

(४) ॠजिश्वानें वेढा देऊन वंगृदाचीं शंभर पुरें विध्वंसिलीं.

(५) जी ॠचा तूर्वयाणाच्या रक्षणाबद्ल इंद्रास गाते तीच सुश्रव्याच्या रक्षणाबद्दल कुत्स, अतिथिग्व आणि आयु हे एका तरुण राजाचें अंकित झाल्याबद्ल इंद्राची स्तुति करते.

(६) शंबरास मारण्यानें दिवोदासाप्रमाणें कशोजूचेंहि पालन झालें व किल्याच्या नाशानें त्रसदस्यूचें रक्षण झालें.

(७) भरद्वाजाप्रत अश्वीच्या आगमनाचा परिणाम दिवोदासाच्या घरी अश्वी येण्यांत होतो.

(८) जो गात्याचा पक्ष दिवोदासाच्या तर्फेचा होता तो भुज्यूंच्या सोडवणुकीबद्ल अश्वीची स्तुति करतो.

(९) दिवोदासांनीं भरद्वाजाला धन दिलें.

(१०) तूर्वयाणाकडून अतिथिग्वादि त्रयीच्या पराभवाबद्ल इंद्राची स्तुति भरद्वाजांकडून होत आहे

(११) दिवोदासानें शंबराची संपत्ति भारद्वाजांस दिली.

(१२) सरस्वतीनें वध्र्यश्वाला दिवोदास दिला व पणींनां खाल्लें अशी भरद्वाज स्तुति करतात.

(१३) तुर्वश व यदु यांचा गर्व हरण झाल्यानें अतिथिग्वाची इच्छा पूर्ण होते.

(१४) अतिथिग्वाला गुंगूंच्या विरुद्ध इंद्रानें शक्तिमान् केलें. ही गोष्ट करंज व पर्णय यांच्या दिवोदासाकडून पराभवाच्या प्रसंगी झाली.

 आता या विधानांची परस्परसंगति कितपत लागते तें पाहूं.

दिवोदास, आयु व कुत्स हा मित्रसंध दिसतो. यांचा तूर्वयाणानें पराभव केला. उलट एकदां या मित्रसंघानें तूर्वयाणाचा पराजय केला असावा. दिवोदास यानें शंबर, पर्णय, करंज व गुंगूलोक यांचा पराजय केला. दिवोदासानें शंबरास मारुन कशोजूचें रक्षण केलें. दिवोदासानें तुर्वश व यदु यांचा गर्व हरण केला' कुत्सानें शुष्णाचा पराजय केला.

त्रसदस्यु व दिवोदास यांचा एका ॠचेंत उल्लेख आहे. पण त्यावरुन त्यांचें समकालीनत्व सिद्ध होत नाहीं. दोन भिन्नकालीन क्रियांचे श्रेय उत्तरकालीन गायकांनी देवतेस दिलें आहे. तसेंच पणी व वध्र्यश्व यांचाहि विरोध सिद्ध होत नाही. भुज्यु व दिवोदास यांचेंहि समकालीनत्व सिद्ध होत नाहीं.

ॠजिश्वानें वेढा देऊन वंगृदाचीं शंभर पुरें विध्वंसिलीं, यावरुन कल्पनेचे बरेच वळसे दिल्याशिवाय वंगृदाचें व शंबराचें ऐक्य व ॠजिश्वाचें व अतिथिग्वाचें ऐक्य सिद्ध होत नाही.

भारद्वाजांनी दिवोदासाच्या घरची दक्षिणा खाऊन तूर्वयाणाकडून अतिथिग्वादि त्रयीचा पराभव झाला याबद्ल इन्द्राची स्तुति करावी हें जरा चमत्कारिक दिसतें. असेंहि शक्य आहे कीं, ज्याप्रमाणें विश्वामित्र आणि वसिष्ठ हे कामापुरते गुरुवर्य पैजवनानें निर्माण केले त्याप्रमाणेंच भारद्वाजहि तात्पुरते पुरोहित असावेत. कां कीं, पैजवन जर पुरुंपैकीं असतील तर त्यांचे उपाध्याय अत्रि ठरतात. असें शक्य आहे कीं, राजे व उपाध्याय हे बरोबर हिंडत नसावेत आणि स्थानिक उपाध्यायांचा स्वीकार हा तत्कालीन राजनीतीचा एक भाग असावा.

एवंच दिवोदासाविषयीं आपणांस माहिती येणेंप्रमाणें देता येईल.

दिवोदासअतिथिग्व यांसंबंधी अनेक उल्लेखांवरुन अगदीं प्राचीन वैदिक युगांत दिवोदासअतिथिग्व याचें प्रामुख्य दिसून येतें. तो वध्र्यश्वाचा (ॠ..६१,१) मुलगा व भरत लोकांमधील प्रसिद्ध राजा सुदास ह्याचा बाप किंवा आजा होता. दिवोदास हा भरत (ॠ..१६,४;;१९) होता व तुर्वश व यदु (ॠ..१९,८;.६१,२) ह्या लोकांचा वैरी होता. हेंच धन त्यानें आपला मुलगा सुदास यास पैतृक धन म्हणून देऊन ठेविलें. असो. त्याचा मुख्य शत्रु शंबर दास हा होय. हा डोंगरांत राहणा-या लोकांचा मुख्य असून त्याचा पराभव अनेकदां दिवोदासानें केलेला आहे. दिवोदास हा आपल्या बापाप्रमाणें अग्नीचा मोठा उपासक होता. कारण ॠग्वेदामध्यें अग्नीला दिवोदासाच्या नांवानें संबोधिलें आहे. उलटपक्षीं त्याचा आयु व कुत्स यांच्या बरोबर इंद्राच्या मदतीनें तूर्वयाणानें पराजय केला असें वर्णन आलेलें आहे (.१८,१३ वगैरे.)

एकदां (६.६१,१ व पुढील) असा उल्लेख आला आहे की दिवोदासाचें पणी, पारावत व बृसय यांच्याशीं युद्ध झालें. त्यावरुन हिलेब्रँटनें असें अनुमान काढलें आहे की, तो अरकॉशियामधल्या ज्या जाती होत्या त्यांच्याशीं लढण्यांत गुंतला होता; व ज्या अर्थी दिवोदास ह्याचा अर्थ स्वर्गांतला दास असा होतो त्या अर्थी तो स्वत:च दास असावा हें अनुमान असंभवनीय दिसतें. कारण ज्या सरस्वती नदीवर दिवोदास व अरकॉशियामधील जाती यांमध्यें युद्ध झालें ती व अरकॉशियामधल्या हरक्विटी ही नदी एक असणें शक्य नाहीं. अर्थात् ही सरस्वती नदी मागाहून प्रसिद्ध झालेली सरस्वती नदीच असली पाहिजे. ही गोष्ट एकदां कबूल केली म्हणजे पंचविंश (९.४,११) ब्राह्मणांत यमुना नदीजवळ पूर्वेकडे पारावत होते असा जो उल्लेख आलेला आहे त्याला बाध येतो. बर्गेनचें असें मत आहे कीं, दिवोदास व अतिथिग्व ह्या दोन निराळया व्यक्ती होत्या पण ज्या अर्थी ह्या दोन निरनिराळया माणसांची कृत्ये अगदी तंतोतंत सारखींच आहेत त्या अर्थी ह्या दोन व्यक्ती निरनिराळया मानणें युक्त दिसत नाहीं.

दिवोदासानें ज्या लढाया मारल्या त्या अर्थात् दाशराज्ञयुध्दापूर्वीच्या होत्या. सिंहावलोकनासाठीं त्या लढाया पुन्हां देतों.

(१)    तूर्वयाणाबरोबर मित्रसंघाची पहिली लढाई.
(२)    शंबराबरोबर लढाया.
(३)    तुर्वश व यदु यांबरोबर लढाई,
(४)    पर्णय व करंज यांबरोबर लढाई.
(५)    गुंगूलोकांबरोबर लढाई.

ॠजिश्वाची वंगृदाबरोबर लढाई केव्हां झाली व तिचा दिवोदासाशीं संबंध काय होता हे स्पष्ट होत नाही. भुज्यू कोणत्या लढाईंत होते हें कळत नाहीं.

दाशराज्ञयुध्दापूर्वी मित्रसंघानें आणखी एक युद्ध करुन तूर्वयाणाचा पराभव केलेला दिसतो. हा पराभव सुदासाच्या कारकीर्दीत झाला. या पराभवामुळें तूर्वयाणानें दडपलेली राष्ट्रें स्वतंत्र होऊन पुढें भांडूं लागलीं असावीत; आणि त्यांत सुदास इतरांवर वर्चस्व स्थापण्यास जेव्हां उद्युक्त झाला तेव्हां त्याच्या विरुद्ध असलेल्या यदुतुर्वशांस पुरुहि मिळाले असावेत असें दिसतें.

सुदास, दिवोदास व पिजवन:- सुदासाला ''चत्वारो मा पैजवनस्य दाना ............सुदासें'' (.१८,२३). येथे ''पैजवनस्य सुदास:'' असें म्हटलें आहे. त्याचप्रमाणें त्याच सूक्तांत ('दिवोदासं न पितरं सुदास:') सुदासाचा पिता दिवोदास त्याला ज्याप्रमाणें सेवीत होतां त्याप्रमाणें या सुदासाला सेवा असें म्हटलें असून पैजवन सुदासाचें घर राखा असें 'अविष्टना पैजवनस्य केतम्' (.१८,२५) या त्या पुढीलच वाक्यानें दर्शित केलें आहे.

याशिवाय आणखी एका स्थळी 'द्वे नप्तु र्देववत: शते गो:.........सुदास: | अर्हन्नग्ने पैजवनस्य' येथें 'देववतो नप्तु: पैजवनस्य सुदास:' असा स्पष्ट उल्लेख आहे.

सु दा सा चा बा प, आ जा व प त्नी.- वरील विवेचनावरुन सुदास हा दिवोदासाचा पुत्र होता व पैजवन होता इतकें स्पष्ट होतें. पिजवन हा शब्द ॠग्वेदांत येत नाहीं. निरुक्तकारांनीं पिजवन हा सुदासाचा बाप म्हणजे दिवोदास असें म्हटलें आहे. पण त्यास खात्रीलायक पुरावा नाहीं. पैजवन हे कुलनाम असणें शक्य आहे.

सुदासाच्या बायकोचें नांव उल्लेखिलें गेलें आहे असा संशय येतो. तें नांव सुदेवी होय. ती त्याला अश्वीनी दिली. 'याभि: सुदास: ऊहथु: सुदेव्यम्' या ठिकाणीं सायणांनीं 'सुदेव्यं' याचा अर्थ ' प्रशस्तं धनं' असा केला आहे. परंतु 'सुदेव्यं' हे 'सुदेवी' असें पाणिनीच्या व्याकरणाप्रमाणें करतां येतें (पा.सू..१,१०६;१०७).

'इयमददाद्रभसमृणच्युतं दिवोदासं वध्र्यश्वाय'-' इयं (सरस्वती) दिवोदासं वध्र्यश्वाय अददात् '- ही वध्र्यश्वाला दिवोदास देती झाली, या भरद्वाजाच्या म्हणण्यावरुन दिवोदास हा वध्र्यश्वाचा मुलगा ठरतो.

याच्या उलट एके स्थली 'नप्तु: देववत:- .........सुदास: | अर्हन्नग्ने पैजवनस्य' | या ठिकाणीं देववताचा नातू सुदास (पैजवन) असें म्हटलें आहे.

यावरुन सुदास याचा पिता दिवोदास पिजवन असें ठरतें. परंतु दिवोदास पिजवनाचा बाप देववत् कीं वध्र्यश्व याचें उत्तर स्पष्टपणें देतां येणार नाहीं. या ठिकाणीं वध्र्यश्व आणि देववत् भिन्न दिसतात. या दोघांस सुदासामार्फत न जोडतां स्वतंत्रपणें जोडणारा उल्लेख नाहीं. देववत् हें वध्र्यश्वाचें विशेषणहि असणें शक्य आहे. किंवा सुदास हा देववताचा दौहित्र असणें शक्य आहे. भरद्वाजमंडळांत म्हणजे सहाव्या मंडळांत-भरद्वाज दिवोदासाची वाखाणणी करितो. त्याच मंडळांत 'वध्र्यश्वा' ला दिवोदास सरस्वतीनें दिल्याचा उल्लेख आहे व 'देववताचा नातू' अशा प्रकारचा सुदासाविषयीं उल्लेख वसिष्ठ मंडळांत-म्हणजे सातव्या मंडळांत-आहे. 'देववताचा नातू' असें म्हणण्यांत वसिष्ठांचा कांही हेतु तर नसेलना ?

सु दा सा चा अ श्व मे ध:- सुदासानें एक घोडा सोडल्याचा उल्लेख आहे. 'उप प्रेत कुशिकाश्चेतयध्वमश्वंराये प्रमुञ्चता सुदास:'- हे कुशिकांनों ! चला. सावध व्हा. पैसे मिळविण्याकरितां सुदासाचा अश्व सोडा असें विश्वामित्राच्या तिस-या मंडळांत म्हटलें आहे (.५३,११). त्याच सूक्तांत विश्वामित्रानें सुदासाकडून यज्ञ करविला ['' विश्वामित्रो यदवहत्सुदासम्'' (.५३,९) ] असाहि उल्लेख आला आहे. 'आशुश्च नेदभिपित्वे जगाम' (.१८,९) या स्थळावरुन, सुदासानें. अश्वमेधाचा घोडा सोडला होता आणि अश्वाला कोणीं तरी अटकाव केला, परंतु इन्द्राच्या मदतीनें तो त्याला मिळाला असें निघतें, ऐतरेय ब्राह्मणांत 'वसिष्ठाच्या पौरोहित्याखालीं सुदासानें अश्वमेध यज्ञ केला' असा उल्लेख आहे, अशी शंका घेण्यास जागा आहे. तथापि त्या उल्लेखाचें स्वरुप लक्षांत घेतल्यास शंका दुर्बल ठरते. ऐतरेय ब्राह्मणांत 'वसिष्ठ: सुदासं पैजवनमभिषिषेच ........पृथिवी जयन्..........अश्वेन मेध्येनेजे' असा उल्लेख आला आहे. असें असावें कीं, अश्वमेध वसिष्ठाच्या हातून न होतां केवळ साम्राज्याभिषेक वसिष्ठाच्या हातून झाला असावा.

सु दा स आ णि हिं स क लो क:- सुदास हा विशेष प्रकारें सुधारलेला, थोर व अहिंसक आणि सुदासाचे शत्रू हिंसक असा भेद स्तोत्रकर्त्या वसिष्ठांनीं कांही ठिकाणी दर्शित केला आहे.

'जहि वधर्वनुषो मर्त्यस्य' म्हणजे हिंसक लोकांचे हत्यार नाहींसे कर असें एके ठिकाणीं म्हटलें आहे. 'वनुष्' चा अर्थ हिंसक असल्याची निरुक्तांत व सायणाचार्यांच्या भाष्यांत अनेक ठिकाणीं उदाहरणें आलीं आहेत, यावरुन 'वनुष् म्हणजे 'हिंसक' म्हणून कोणी प्रसिद्ध लोक असावेत व तदितर लोक आपणांस अहिंसक असें ह्मणवीत असावेत.

सु दा सा चे श त्रु:- आतां सुदासाच्या शत्रूंकडे वळूं.

शि म्यु:- सुदासाच्या विरुद्ध लढणा-या दहा राजांत शिम्यु हा एक होता. शिम्यु हें एक प्रकारच्या लोकांचे किंवा राजाचें नांव असून दाशराज्ञ युध्दांत सुदासानें यांचा पराभव केला (.१८,५). दस्युबरोबर याचा उल्लेख दाखविण्यांत आला आहे त्यावरुन हा दस्यु असावा असें विधान झिमरनें केलें असावें. शिम्यूंस त्यांचे विरोधी दस्यू म्हणत यावरुन दस्यु म्हणून एक जात होती आणि शिम्यु तिचा एक पोटभेद होता असें म्हणणें हां मात्र कल्पनेचा बाजार आहे, हें आर्य आणि दस्यु यांविषयींच्या विवेचनावरुन लक्षांत येईल.

कांही ॠचांवरुन असें स्पष्ट दिसतें कीं शिम्यु आणि नहुष् यांचा कांही तरी संबंध असावा. याशिवाय भरत, वार्षागिर, कक्षीवंत यांच्याशीहि त्याचा कांही तरी संबंध असावा हें खालील ॠचा दाखवितात.

(शिम्युसहोक्त अगरसंबंधी व्यक्ती:- नहुष, आयु, मनु, इला, आश्वन्ध ॠज्राश्व, अंबरीष, सहदेव, भयमान व सुराधस्.)

न यस्य देवा देवता न मर्ता आपश्वन शवसो अन्तमापु: |
स प्ररिक्का त्वक्षसा क्ष्मो दिवश्व मयत्वान्नो भवत्विंद्र ऊती ||
(ॠ. .१००,१५).

ज्याच्या बळाचा अंत द्युलोकामध्यें देवास (लागलेला) नाहीं, मर्त्य मनुष्यांस (लागलेला) नाही व उदकालाहि लागलेला नाही, तो (इंद्र आपल्या) तेजानें पृथिवी व द्युलोक यांस व्यापून टाकणारा (होय). (तो) मरुतांसहित इंद्र आमचा संरक्षिता होवो.

रोहिच्छयावा सुमदंशुर्ललामीर्द्युक्षा राय ॠजाश्वस्य |
वृषश्वन्तं बिभ्रती धूर्षु रथं मन्द्रा चिकेत नाहुषीषु विक्षु ||
(ॠ. १०.१००,१६).

आरक्त वर्णाची (आणि) श्याम वर्णाची, अंगानें भरलेली, कपाळावर अलंकार असलेली (आणि) स्वर्गी वास करणारी इंद्राची आनंददायक (अश्वमालिका) इंद्राला रथांत घालून तो रथ धुरांस आपल्या माना देऊन ॠज्राश्वाला संपत्ति (देण्यासाठी) ओढून आणीत असतांना नाहुषांस (लोकांस) दृष्टी पडत असते.

एतत्यत्त इन्द्र वृष्ण उक्थं वार्षागिरा अभि गृणन्ति राध: |
ॠज्राश्व: प्रष्टिभिरम्बरीष: सहदेवो भयमान: सुराधा: ||
(ॠ. .१००,१७).

तर हे इंद्रा, हें तुझें स्तोत्र, वृषागिराचे पुत्र ॠज्राश्व, अंबरीष, सहदेव, भयमान (आणि) सुराध आणि त्यांचें सखे तुज समर्थाप्रत गाऊन तुला हवि अर्पण करीत आहेत.

दस्यूंञ्छिम्यूंश्व पुयहूत एवैर्हत्वां पृथिव्यां शर्वा नि बर्हीत् |
सनत्क्षेत्रं सखिभि: श्वित्न्येभि: सनत्सूर्यं सनदप: सुबज्र: ||
(ॠ. .१२२,१८).

बहुभक्त (इंद्रानें) दस्यू शिम्यूंनां चपलगामी मरुतांच्या साहाय्यानें पृथिवीवर मारुन वज्रानें भेदून टाकिलें. त्या आपल्या तेज:पुंज मित्रांच्या साहाय्यानें क्षेत्र घेतलें, सूर्य हरण करुन घेतला सुंदर वज्र धारण करणा-या (इंद्रा) नें उदकें हरण केली.

शिम्यूंनां वरील ॠचांत दस्यू म्हटलें आहे. व इंद्राविरुद्ध केलें आहे. तेव्हां शिम्यूंस जो कवि अनुकुल नाहीं अशाचें हे सूक्त आहे. या सूक्तांत १८ व्या ॠचेंत, नहुषांशी, शिम्यूंशीं व भरतांशी लुडविग ह्मणतो त्याप्रमाणें दोस्ती दिसत नाहीं. येथेंच काय पण सबंध वेदांत शिम्यूंविषयीं फारच थोडी माहिती आपणास मिळते.

या सूक्तांत ॠज्राश्वाला संपत्ति देण्यासाठी इंद्ररथ ओढिला जात आहे ही गोष्ट नहुषांच्या दृष्टीस पडत असते म्हणून विधान आहे. याचा अर्थ काय तें कळत नाहीं. वरील विधानावरुन जर नहुषांस ती संपत्ति पाहून दु:ख होतें असा ध्वनि निघत असेल तर ती कल्पनाच आहे. तेवढयावरुन नाहुषांस ॠज्राश्वाचे शत्रू करावे, व सूक्तांत शिम्यूंनां दस्यू ह्मटलें आहे ह्मणून शिम्यूंसहि ॠज्राश्वाचे शत्रू बनवावे ही कल्पनेची फार मोठी उडी होय. शिम्यु व नहुष यांची दोस्ती जडविणें ही तर त्याहूनहि उद्दाम उडी आहे. यांच्या दोस्तीत शिम्यूचे शत्रू भरत कसे आणलें हें कळत नाही.

वार्षागिराचा इतरांशीं संबंध कांही कळत नाहीं.

न हु ष:- आतां आपण नहुषांसंबंधी उतारे घेऊं आणि काय माहिती मिळते तें पाहूं.

त्वामग्ने प्रथममायुमायवे देवा अकृण्वन्नहुषस्य विश्पतिम् |
इळामकृण्वन्मनुषस्य शासनीं पितुर्यत्पुत्रो ममकस्य जायते ||
 (.३१,११).

हे अग्ने, देव तुला प्रथम आयूकरिंतां नहुषाचा मनुष्यरुपधारी सेनापति करते झाले. नंतर मनुष्यांनां (धर्म) शिक्षण देणारी मनूची इळा नांवाची कन्या निर्माण केली नंतर आमच्या पित्याचा पुत्र झालास.- सायण

हे अग्ने देवांनी तुला सचेतन मानवांत पहिलाच असा जो नहुष त्याच्या घराण्याचा मुख्य केलें. इळेला मानवी प्रजेची उपदेशिका केली व त्या वेळींच आमच्या वंशाच्या जनकास एक पुत्र झाला. ग्रिफिथ

चत्वारो मा मशर्शारस्य विश्वस्त्रयो राज्ञ आयवसस्य जिष्णो: |
रथोवां मित्रावरुणा दीर्घाप्सा: स्यूमगभस्ति: सूरो ना द्यौत् ||
(.१२२,१५).

मशर्शाराचे चार व जयशाली आयवस राजाचे तीन पुत्र मला छळतात. हे मित्रावरुण हो तुमचा अति विस्तृत व सुखकरदीप्ति असा रथ सूर्याप्रमाणें प्रकाशो (आमच्या शत्रूंनां भयजनक होवो).

यस्ते अग्ने नमसा यज्ञमीद्द ॠतं सपात्यरुषस्य वृष्ण:|
तस्य क्षय: पृथुरासाधुरेतु प्रसर्स्राणस्य नहुषस्य शेष: ||

(.१२,६).

हे अग्ने, यज्ञयोग्य अशा तुला स्तुतीसह हवि अर्पण करतों, दीप्तिमान् व सर्व कामना पूर्ण करणा-या अशा तुझीं (स्तुतिरुप) स्तोत्रें रक्षण करतों, त्या नहुषाचें घर विस्तीर्ण होवो आणि त्याची संतति वाढो.

आ संयतमिद्रण: स्वस्ति शत्रुतूर्याय बृहतीममृध्रं |
ययां दासान्यार्याणि वृत्रा करो वज्रिन् सुतुका नाहुषाणि ||
(.२२,१०).

हे इंद्र, ज्या संपत्तीच्या योगानें वृत्रादि जे आमचे शत्रू त्यांचा आम्ही नाश करुं आणि दास व नहुष (नहुष-मनुष्यजात-सायण) यांनां चांगल्या मार्गाला लावूं तसेंच सारखा झरा वहात असल्यामुळें जी नाश न पावणारी व क्षेमकारक अशी आहे ती संपत्ति तूं आम्हांला दे.

हे इंद्रा, शत्रूला जिंकण्यासाठी आम्हांस मोठी व अक्षय अशी शाश्वत समृद्धि दे. त्या योगानें आर्य आणि दास यांचे वैर वृध्दिंगत कर आणि नहुषाचे बाहु बलिष्ठ होऊं दे. -ग्रिफिथ

यदिंद्र नाहुषीष्वाँओजो नृम्णे च कृष्टिषु |
यद्वां पंचक्षितीनां द्युम्नमाभर सत्रा विश्वानि पौस्याँ ||
(.४६,७).

हे इंद्र, नहुषजातीचे सर्व शौर्य आणि धन तसेंच पंचजनांचे सर्व शौर्यासह असलेले तेज आम्हांला दे.

इंद्रा, नहुषांच्या जातींत आढळणारीं सर्व शक्ति व पराक्रम आणि पंचजन अनुभवीत असलेली दिव्य कीर्ती आणि सर्व पौरुष व प्रभाव एकदम घेऊन ये.-ग्रिफिथ

उतत्यदाश्वश्व्यं यदिन्द्र नाहुषीश्वा |
अग्रे विक्षु प्रदीदयत् ||
(.६,२४).

हे इंद्रा. नहुषराजाच्या प्रजेमध्यें जें अश्वसंघात्मक सामर्थ्य दिलें तेंच आम्हांस दे.

आणि हे इंद्रा, प्राचीन काळीं नहुषांच्या जातीमध्यें जी वेगवान् अश्वांची संपत्ति चमकत होती ती सर्व संपत्ति आम्हांला दे.- ग्रिफिथ

आयातं नहुषस्पर्यान्तरिक्षात्सुवृक्तिभि: |
पिबाथो अश्विनामधु कण्वानां सबने सुतम् ||
(.८,३).

हे अश्विनांनो, नाहुष लोकांतून, दोषविहीन अशा स्तोत्रांनी आकर्षिले गेलेले जे तुम्ही ते येथें या. त्याच प्रमाणें अन्तरिक्षांतून इकडे येऊन कण्वगोत्रीय जे आम्ही त्या आमच्या सवनामध्यें पिळलेला मधुर सोमरस प्राशन करा.- सायण

योमइमंचिदुत्मना मन्दाच्चित्रं दावने |
अरद्र्वे अक्षे नहुषे सुकृत्वनि सुकृत्तराय सुक्रतु: ||
(.४६,२७).

जो तूं (पृथुश्रवा) हें पुढे असणारे गवाश्वादिक धन मला दान देण्याकरितां स्वबुद्धीनेंच मान्य करता झालास, शोभनकर्मा तो तूं (मला दान देणें) या पुण्य कर्माकरितां अरट्व, अक्ष, नहुष, सुकृत्वन् (यांनां हुकूम करता झालास). -सायण

किंवा अरट्वादि राजांपैकीच सुकृत्तर हेंहि एक नांव घेतां येणें शक्य आहे.

वैभवशाली नहुषासह भक्कम रथांत ओढून नेल्या जाणा-या ह्या वैभवशाली व स्वत: उदार असणाराचें मन मला पारितोषिकें देण्याकडे तूं वळविता झालास. हा नहुष मनुष्य जितका विद्वान् असूं शकेल तितका विद्वान् आहे पण मनुष्यापेक्षांहि अधिक पुण्यवान् आहे. ग्रिफिथ

र्स ई रथो न भूरिषाळयोजि मह: पुरुणि सातये वसूनि |
आदीं विश्वा नहुष्याणि जाता स्वर्षाता वन उर्ध्वानवन्त ||
(.८८,२).

आम्हांला विपुल संपत्ति देण्याकरितां रथाप्रमाणें बहुत भार सहन करणा-या सोमाची योजना केली जाते. योगानंतर आम्हांला विरोधी असणारीं सर्व माणसें संग्रामांत उन्मुख जावोत (म्हणजे नष्ट होवोत).- सायण

हे शक्तिमान् (इंद्रा) ! विपुल संपत्ति मिळविण्याकरितां एखाद्या ऐसपैस रथांमध्यें सोम जोडला आहे. नंतर नहुमीं संग्रामांत मिळे. ग्रिफिथ

संग्रामांत मिळविलेल्या विजयांचा उत्सव त्यांनी यज्ञांत केला. [वरील ॠचेच्या दुस-या चरणाचा आपणास यत्किंचितहि अर्थ समजत नाहीं अशी ग्रिफिथनें आपल्या पुस्तकांत प्रांजलपणें कबुली दिली आहे.]

वीती जनस्य दिव्यस्य कव्यैरधि सुवानो नहुष्येभिरिन्दु: |
प्रयोनृभिरमृतोमर्त्येभिर्मर्मृजांनो विभिर्गोभिरद्भि: ||
(.९१,२).

सज्जनांनी स्तुति केलेला, नहुष्यानीं पिळलेला व मरणाधीन मानवांनी बैलांच्या पवित्र चर्माच्या (सोमरस पिळण्यास तयार केलेल्या यंत्राच्या) योगानें व पवित्र उदकांच्या योगानें पिळलेला अमर असा सोमरस, स्वर्गस्थ देवांनी भक्षण करावा म्हणून यज्ञाप्रत जातो.-सायण

बकरी, गाई व उदकें ह्यांच्या साहाय्यानें मरणाधीन मनुष्यांनीं सुंदर व अमर केलेले व हुशार नहुष्यांनीं पिळलेले सोमरसाचें थेंब स्वर्गनिवासी लोकांचे भक्ष्य होतात.- ग्रिफिथ

अहं सप्त हा नहुषो नहुष्टर: प्राश्रावयं शवसातुर्वशं यदुम् |
अहन्य न्यं सहसा सहस्करं नवव्राधतो नवतिंच वक्षयम् ||
(१०.४९,८).

इंद्र ह्मणतो:- नमुची वगैरे सात दैत्यांचा मी संहार केला आहे तसेंच शत्रूंचाहि शत्रु असणारा जो मी त्यानें स्वसामर्थ्यानें तुर्वश व यदु ह्या दोघांनां (शत्रु संबंधी गाईच्या प्रदानानें) प्रसिद्धीस आणिलें. त्याचप्रमाणें माझ्या एका स्तोत्रकर्त्याला अत्यंत बलिष्ठ असा केला, आणि शत्रूच्या भरभराटीस चढणा-या नव्याण्णव पुरांचा नायनाट (विध्वंस) केला.

मी नहुषापेक्षां बलिष्ठ आहे; मी सातांनां मारलें. मी बलानें यदु व तुर्वश यांनां उर्जितावस्थेस आणलें. मीं दुस-या एकाला खालीं आणिलें व बलानें मी बलिष्ठ नव्याण्णवांची सत्ता वाहूं दिली.- ग्रिफिथ

सद्रुरह्वणे मनुष ऊर्ध्वसान आसाविषदर्शसानाय शरुम् |
सनृतमो नहुषोस्मत्सुजात: पुरोभिनदर्हन्दस्युहत्ये ||
(०.९९,७).

तो इंद्र शत्रूकडून मारला जाणारा जो आपला मानवी स्वभक्त त्याला शौर्यादि साधनसम्पत्ति देऊन व शत्रुहिंसक आयुधें देऊन शत्रूंचा फडशा पाडतो. त्याचप्रमाणें मनुष्यांचा नेता व पूज्य असणारा तो इंद्र आमच्या करितां प्रादुर्भूत होऊन संग्रामामध्यें शत्रूंच्या शरीराचा भेद करतो (शत्रूंचा संहार करतो).

तो स्वत: उच्चत्व पावला आणि त्यानें कपटी व बलात्कार करणा-या शत्रूवर बाण सोडला. बलिष्ठ दीप्तिमान् व वीर्यवान् अशा त्यानें जेव्हां दस्यूंनां मारलें तेव्हा आमच्या करितां नहुषाचें किल्ले फोडले.- ग्रिफिथ

वर उध्दृत केलेल्या उता-यांवरुन जे मुद्दे सुचतात ते येणेंप्रमाणें:-

(१) आयूकरितां नहुषांचा सेनापति अग्नीला केलें-म्हणजे नहुषाच्या पराक्रमानें अग्नीचा कांही फायदा व्हावयाचा होता असा ध्वनि काढावा कीं आयूला ठोक देण्याकरितां नहुषाचा सेनापति अग्नि बनला असें समजावें, हा प्रश्न १.१३१,११ मध्यें उत्पन्न होतो.

(२) दास व नहुष यांनां चांगल्या मार्गाला लावूं, या उल्लेखाचाहि अर्थ समजत नाहीं.

(३) नहुष जातीचें सर्व शौर्य आणि धन तसेंच पंचजनांचें शौर्य कवीनें आपल्या लोकांकरितां मागितले आहे.

(४) नहुष राजाचें सामर्थ्य अश्वसंघात्मक होतें असें दिसतें.

(५) अश्वीनां नहुषांकडून बोलावून घेतलें आहे. म्हणजे ८.८,३ चाही कर्ता नहुषांच्या विरुद्ध आहे.

(६) ८.४६,२७ चे दोन अर्थ सायणांनी इतके भिन्न दिले आहेत कीं त्यांवरुन कांही एक निर्णय काढतां येत नाही.

(७) ९.८८,२ या ॠचेवरुन कांही एक बोध होत नाहीं.

(८) १०,४९,८ मध्यें इंद्र 'मी नहुषापेक्षां बलिष्ठ आहे' असें म्हणतो त्यावरुन आणि पूर्वीच्या नहुषांचे बल याचणा-या उल्लेखावरुन नहुषांचें बल स्पष्ट होत आहे.

(९) १०.९९,७ मध्यें दस्यूंनां मारणें व नहुषांचें किल्ले फोडणें या दोन्ही इन्द्राच्या क्रिया दाखविल्या आहेत. त्यावरुन गाता नहुषांस दस्यूंप्रमाणें लेखीत होता असें दिसतें.

(१०) १०.६३,१ मध्यें 'ययातेर्येनहुष्यस्य बर्हिषि देवा आसते ते अधिब्रुवन्तु न:' येथें ययातीला नहुष्य म्हटलें आहे.

न हु ष.- वरील उल्लेखावरुन असें दिसतें कीं नहुष हें राष्ट्र बलवान् असावें. त्या लोकांपाशीं घोडे असावेत, पण त्यांचा व शिम्यूंचा कांही एक संबंध नसावा. दाशराज्ञयुध्दामध्यें त्यांचा कांही एक संबंध लावतां येत नाही. पुढें महाभारतांत नहुषास इन्द्रपद देवविलें आहे, आणि शचीकरितां नहुष हा धडपडतो आहे असें हि दाखविलें आहे. या कथेला उगम उत्पन्न होईल अशा कांही कथेचें अस्तित्व ॠचा दाखवितात. नहुषांनां दस्यू म्हटलें आहे.

महाभारतांत नहुषास आयूचा पुत्र म्हटलें आहे, परंतु त्याला वेदांत आधार सांपडत नाहीं. मशर्शाराचे चार व आयवसाचे तीन पुत्र मला पीडा देतात, असा उल्लेख १.१२२,१५ मध्यें आहे. पण त्यावरुन तो नहुषाचा उल्लेख आहे असें वाटत नाहीं. आयवस व मशर्शार हे वार्षागिरांचे राजे होते असा संबंध लुडविग् लावूं पहात आहे, तो आम्हांस मान्य करतां येत नाहीं.

तु र्व श.- आतां तुर्वशांकडे वळूं हे बडे जाडे प्रतिस्पर्धी दिसतात आपल्या पद्धतीप्रमाणें परिचयार्थ तुर्वशा संबंधाच्या कांही ॠचा अगोदर घेऊं.

अग्निना तुर्वशं यदुं परावत उग्रादेवं हवामहे |
अग्निर्नयन्नववास्त्वं बृहद्रथं तुर्वीतिं दस्यवे सह: ||
(.३६,१८).

अग्नीच्या द्वारें तुर्वशाला, यदूला व उग्रादेवाला दूर प्रदेशाहून बोलावितो. राक्षसाविरुद्ध सारथि अग्नी नववास्त्व, ब्रृहद्रथ (व) तुर्वीति यांजला येथें आणो.

त्वमाविथ नर्यं तुर्वशं यदुं त्वं तुर्वीर्ति बय्यं शतक्रतो |
त्वं रथमेतशं कृत्ये धने त्वं पुरो नवतिं दम्भयो नव ||
(.५४,६),

हे शतप्रज्ञ इन्द्रा तूं नर्याला, तुर्वशाला, यदुला, तुर्वीतीला व वय्याला रक्षिलेंस. नव्याण्णव नगरें विध्वंसिलीस.

त्वं धुनिरिन्द्र धुनिमतिर्ॠणोरप: सीरा न स्रवन्ती: |
प्रयत्समुद्रमति शूरपर्षि पारया तुर्वशं यदुं स्वस्ति ||
(१.१७४,९).

हे इंद्रा ! तूं (शत्रूंनां) कांपविणारा आहेस; धुनि नामक असुरानें अडविलेलें पाणी तूं जोरानें वाहणा-या नद्यांप्रमाणे खाली सोडून दिलेंस. जेव्हां तूं हे शूरा ! समुद्राचें अतिक्रमण करशील तेव्हां यदु आणि तुर्वश यांनां सुखरुपपणें पार पाड.

अयं य: सृंजये पुरो दैववाते समिध्यते |
द्युमाँ अमित्रदम्भन: ||
(४.१५,४).

जो हा प्रसिद्ध अग्निं देववतपुत्र सृंजय सोनयाजीच्या यागासाठीं पूर्वदिशेस असणा-या उत्तरवेदीवर पेटविला आहे, तो शत्रुहिंसक अग्नि दीप्तिमान् झालेला आहे.

उत त्या तुर्वशा यदू अस्नातारा शचीपति: |
इन्द्रो विद्वाँ अपारयत् ||

शचीपति इंद्रानें स्नानरहित अशा यदुतुर्वशांनां पार तरुन नेलें.
(.३०,१७).

त्वमपो यदवे तुर्वशायारमय: सुदुघा: पार इंद्र |
उग्रमयातमवहोह कुत्सं संहयद्वामुशनारंत देवा: |
(.३१,८).

हे इंद्र पाण्याच्या (नदीच्या) तीरावर तूं यदु आणि तुर्वश यांनां रमविलेंस. नंतर तूं आणि कुत्स उग्र अशा शुष्णाकडे जाऊन त्याला मारलेंस, आणि नंतर तूं कुत्साला आपल्या घरीं पोंचविलेंस. त्या वेळीं तुझी आणि उशना व देव यांची भेट झाली.

इंद्रा, तूं लांबच्या तीरावर यदु आणि तुर्वश यांच्या करितां जोरानें वाहणारें पाणी थांबविलेंस. तुम्ही दोघांनी (इंद्र आणि कुत्स यांनी) उग्र अशा (राक्षसा-शुष्णा) वर चाल केली. कुत्साला (घरीं) नेलेंत; त्या वेळीं देव आणि उशना तुझ्याकडे एकाच वेळीं आले-ग्रिफिथ.

त्वं धुनिरिन्द्र धुनिमती र्ॠणोरप: सीरा न स्त्रवन्ती: |
प्रयत्समुद्रमति शूर पर्षि पारया तुर्वशं यंदु स्वस्ति ||
(.२०,१२).

शंत्रूंनां कंपित करणा-या इंद्रा, धुनिनामक असुरानें अडवून ठेविलेली उदकें तूं नद्याप्रमाणें वहावयास लावलीस; आणि ज्या वेळी तूं समुद्रांतून (पाण्यांतून) पलीकडे गेलास तेव्हां तूं आपल्या बरोबर यदु व तुर्वश यांनांहि नेलेंस.

त्वामीळे अधद्विता भरतो वाजिभि: शुनम् |
ईजे यज्ञेषु यज्ञियम् ||
(.१६,४).

हे अग्ने भरत नामक राजानें सुखाच्या इच्छेनें यज्ञामध्यें यज्ञार्ह अशा तुला हवी अर्पण करुन स्तुति केली असतां तूं त्याला दोन प्रकारचें (इष्टप्राप्त्यनिष्टपरिहाररुप) सुख प्राप्त करुन दिलेंस.

त्वमिमा वार्या पुरु दिवोदासाय सुन्वते |
भरद्वाजाय दाशुषे ||
(.१६,५).

हे अग्ने दिवोदासाला, हवी अर्पण करणा-या भरद्वाजाला तूं पुष्कळ वर देतोस.

वधीदिन्द्रो वरशिखस्य शेषोभ्यावर्तिने चायमानायशिक्षन् |
वृचीवतोयद्धरियूपीयायां हन्पूर्व अर्धे भियसापरो दर्त ||
(.२७,५).

अभ्यावर्ती चायमानाकरितां इन्द्रानें वरशिखाचें बीज नष्ट केलें. ''हरियूपीया'' येथें त्यानें वृचीवतांच्या अघाडीच्या सैन्याचा नाश केला व मागच्या रांगेतील सैन्य भीतियुक्त होत्सातें पळून गेलें.

यस्य गावावरुषा सूयवस्यू अंतरुषु चरते रेरिहाणा ||
स सृंजयाय तुर्वशं परादाद्वृचीवतो दैववाताय शिक्षन् ||
(.२७,७).

ज्या इंद्राचे घोडे उत्तम प्रकारच्या गवताची इच्छा करणारे, अत्यंत शोभिवंत व आपलें तोंड आपल्या अंगावर घासणारे आहेत अशा इंद्रानें तुर्वशाला सृंजयाच्या ताब्यांत दिलें व वृचीवंतासाठीं दैववाताला शिक्षा केली.

य आनयत् परावत: सुनीती तुर्वशं यदुं
इंद्र: स नो युवा सखा ||
(.४५,१).

ज्या इंद्रानें आमच्या पासून दूर असलेले यदु आणि तुर्वश यांनां परत आणलें तो इंद्र आमचा सखा होवो.

प्रियास इत्ते मधवन्नभिष्टौ नरो मदेम शरणे सखाय: |
नि तुर्वशं नि याद्वं शिशीह्यतिथिग्वाय शंस्यं करिष्यन् ||
(.१९,८).

हे इंद्रा तुला प्रिय असणारे आणि तुझी स्तुति करणारे आणि मित्रभूत आम्ही घरीच आनंदित आहों, तथापि आमचा राजा अतिथिग्व याचें कल्याण करणारा तूं तुर्वश आणि याद्व यांनां नाहीसें कर.

यदिन्द्र प्रागपागुदङ्न्यग्वा हूयसे नृभि:
सिमा पुरु नृषूतो अस्या न वेसि प्रशर्ध तुर्वशे ||
(.४,१).

हे इंद्रा, पूर्व, पश्चिम, उत्तर, खालीं, वर इत्यादि कोणत्याहि दिशाकडे असलेल्या राजांनी स्तोत्रांनीं तुझें आव्हान केलें असलें तरी तूं आनु नामक राजाकडे येतोस, हे पराभिभवी, तुर्वशाकडेहि तूं प्रेरित केला जातोस.- सायण

इंद्रा जरी तुला लोक पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे, दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे बोलावतात, तरी तूं, लोक येण्याविषयीं ज्याला आग्रह करतात अशा शूर वीरा, मुख्यत्वेंकरुन आनव आणि तुर्वश यांच्याकडे असतोस.-ग्रिफिथ

मा भेम माश्रभिष्मोग्रस्य सख्ये तव ||
महत्ते वृष्णो अभिचक्ष्यं कृतं पश्येम तुर्वशं यदुम् ||
(.४,७).

हे इंद्रा, बलवान् अशा तुझ्या मैत्रीची प्राप्ति झाल्यावर आम्हांला भीति राहणार नाहीं, श्रम होणार नाहींत; सर्व काम पूर्ण करणा-या तुझीं मोठमोठीं कृत्यें स्तवनीय आहेत. कारण, तुर्वश नामक व यदुनामक राजांनां तुझ्या प्रसादानें अत्यंत सुखी झालेले आम्ही पहातच आहोंत.-सायण.

हे बलवन्ता, तूं आमचा मित्र असल्यावर आम्ही भिणार नाहीं. किंवा आम्हांला श्रम वाटणार नाहींत. आम्ही तुर्वश आणि यदु यांनां पाहूं. हे शूरा, तुझीं मोठालीं कृत्यें प्रशंसलींच पाहिजेत.- ग्रिफिथ

स्थूरं राध: शतश्वि कुरुङ्गस्य दिविष्टिषु |
राज्ञस्त्वेषस्य सुभगस्य रातिषु तुर्वशेश्वमन्महि ||
(.४,१९).
कुरुङ्ग राजाच्या यज्ञांत दानें देत असतां तुर्वश लोकांत खूप श्रेष्ठ (असें) शताश्व दान मीं मिळविलें.

पेनाव तुर्वशं यदुं येन कण्वं धनस्पृतम् |
राये सुतस्य धीमहि ||
(.७,१८)

ज्या तुम्हीं आपल्या सामार्थ्यानें तुर्वश व यदु नामक राजांचे संरक्षण केलेंत; किंवा धनेच्छु अशा कण्व ॠषीचें संरक्षण केलेंत, त्या तुम्हीं आमच्या संपत्तीचें रक्षण करावेंत म्हणून, हे मरुत हो, आम्ही तुमचें सुंदर ध्यान करतों.- सायण

ज्या योगानें तुम्हीं यदु, तुर्वश आणि ज्याला लूट मिळाली आहे असा कण्व यांनां मदत केलीत त्या तुमच्या (शक्तीचें) आम्ही धनाकरितां ध्यान करतो.:- ग्रिफिथ

आ नूनं यातमश्विनेमा हव्यानि वां हिता |
इमे सोमासो अधि तुर्वशे यदाविमे कण्वेषु वामथ ||
(.९,४१).

हे अश्विनीदेव हो इकडे या कारण, हीं पुढें असलेलीं हविर्द्रव्यें तुमच्या करितांच तयार आहेत. त्याचप्रमाणें तुर्वश व यदु यांच्या जवळ असलेले सोम हे तुमचेच असून तुम्हींच ते आम्हां कण्वांप्रत दिले आहेत.-सायण

हे अश्विनांनो, आतां इकडे या. येथें तुमच्या करितां हवी तयार ठेविले आहेत. ही सोमपेयें कण्वाच्या पुत्रांमध्यें तुम्हाला अर्पण केलीं आहेत.-ग्रिफिथ

यदद्याश्विना वपाग्यत्प्राकूस्थो वाजिनीवसू |
यद्रुह्यव्यनवि तुर्वशे यदौ हुवेवामथ मागतम् ||
(.१०,५).

हे अश्विनी हो, जर तुम्ही पश्चिमेस असाल, हे अन्नधनयुक्त हो जर तुम्ही पूर्वदिशेस असाल, द्रुह्यु, अनु, तुर्वश आणि यदु यांमध्यें जर तुम्ही असाल, तर मी तुम्हांस बोलावितों.

सत्यं तत्तुर्वशे यदौ विदानो अह्नवाय्यम् |
व्यानद् तुर्वणे शमि |
(.४५,२७)

तुर्वश आणि यदु यांची सत्यकर्मे जाणणा-या त्वां संग्रामांत अन्हवाय्याला नाहींसें केलेंस.

पुर: सद्य इत्थाधिये दिवोदासाय शम्बरम् |
अध त्यं तुर्वशं यदुम् |
(.६१,२).

(सोमरसपानानें मत्त झालेल्या इंद्रानें) त्याच दिवशीं शत्रूंचे किल्ले मोडले. सत्कर्माचरण करणा-या दिवोदासासाठी शम्बराला व नंतर तुर्वश राजाला व यदु राजाला (वश केलें).-सायण

(इंन्द्रानें) त्वरेंनें किल्ले व शंबर यांचा चुराडा केला; तदनंतर धर्मशील दिवोदासासाठी यदूचा व तुर्वशाचा चुराडा केला.-ग्रिफिथ

अहं सप्तहा नहुषो नहुष्टर: प्राश्रावयं शवसा तुर्वशं यदुम् |
अहं न्यं न्यं सहसा सहस्करं नव व्राधतो नवतिं च वक्षयम् ||
(१०.४९,८).

या ॠचेच्या अर्थासाठी (हाच विभाग पृष्ठ १३५) नहुषविषयक विवेचन पहा.

आतांपर्यत जे उतारे दिले आहेत त्यावरुन काय दृष्टीस पडतें तें पाहूं.

(१)    कवि, कण्व, तुर्वश, यदु व उग्रादेव यांस अग्नीमार्फत बोलावीत आहे व नववास्त्व, ब्रृहद्रथ, तुर्वीति यांस दस्यूंसह नेण्यास अग्नीस सांगतो.

(२)    कवि, नर्य, तुर्वश, यदु, तुर्वीति व वय्य यांचें रक्षण केल्याबद्ल, रथ आणि एतश यांचे रक्षण केल्याबद्ल व नव्याण्णव नगरें पाडण्याबद्ल इन्द्राची स्तुति करीत आहे.

(३)    कवि इन्द्रानें धुनीस मारुन पाणी नद्यांप्रमाणें खाली सोडल्याबद्ल त्याची स्तुति करतो, तुर्वश व यदु यांस समुद्रपार नेण्यास विनंति करतो.

(४)    तुर्वश व यदु यांनां शचीपति इन्द्रानें पुराच्या पार नेलें.

(५)    इन्द्रानें तुर्वश व यदु यांच्या करितां पाणी थांबविलें. इन्द्र व कुत्स यांनीं उग्र (राक्षस) याजवर चाल केली. त्या वेळी उशना व देव बरोबर इन्द्राकडे आले.

(६)    इन्द्रानें तुर्वशास सृंजयाच्या ताब्यांत दिलें व दैववाताकरितां वृचीवानास शिक्षा केली.

(७)    तुर्वश पुरोडाश यानें भृगु व द्रुह्यु यांवर स्वारी करुन धन मिळविलें. (७.१८,६).

(८)    कवि अतिथिग्वाकरितां तुर्वश व याद्व यांचा नाश करण्यासाठी इन्द्राची प्रार्थना करतो.

(९)    इन्द्र पूर्व, पश्चिम व उत्तर, या दिशांतील राजांकडे न जातां अनु व तुर्वश यांच्याकडे येतो असें स्तोता म्हणतो.

(१०) कण्वांस तुर्वशांकडून सोम मिळतो.

(११) अन्हवाय्यास इंद्रानें तुर्वश व यदु यांच्यासाठीं नाहींसें केलें.

(१२) तुर्वश, यदु यांनां इंद्रानें दिवोदासाच्या स्वाधीन केलें.

(१३) कुरुंगाच्या यज्ञांत कवीनें तुर्वशांत (श्रेष्ठ असें) शताश्व हें मोठें दान मिळविलें.

(१४) अभ्यावर्तिन् चायमानाकरितां इन्द्रानें वरशिखाचें बीज नष्ट केलें. हरियूपिया येथें वृचीवानाच्या           
       सैन्याचा नाश केला.

वरील विधानांवरुन येणेप्रमाणें अनुमानें निघतात:-

(१)    यदुतुर्वशांची मोठी गट्टी दिसतें.

(२)    उग्रादेव, तुर्वीति व नर्य हे यदुतुर्वशांचे कांही वेळ मित्र होते.

(३)    तुर्वीति हा एकदां मित्र व एकदां शत्रु दिसतो.

(४)    तुर्वशांचे निरनिराळया काळांत. (१) नववास्त्व, (२) बृहद्रथ, (३) तुर्वीति, (४) दस्यु, (५) धुनि व (६) सृंजय असे निरनिराळे शत्रू दिसतात.

(५)    यांचे पुरोहित कण्व हे होत. सोम तुर्वशांकडून कण्वास मिळाला.

(६)    कुरुंग हा कोणी तुर्वश असावा.

परंतु हापकिन्स हा कोणताही पुरावा न देतां तुर्वश हे यदू लोकांच्या राजाचें नांव आहे असें म्हणतो. अनेक प्रमाणांनी तुर्वश आणि यदू हे लोक भिन्न होते असे सिद्ध होते. 'तुर्वशा यदू' (.३०,१७) व 'यदुस्तुर्वश्च' (१०.६२,१०) असा किंवा यदु, पुरु, अनु, द्रुह्यु व तुर्वश या पांच जातींचा ॠग्वेदांत जो उल्लेख आहे त्यावरुन यदु आणि तुर्वश हे भिन्न होते हें उघड होतें. त्याचप्रमाणें, 'तुर्वश' हें नांव पडण्याचें कारण म्हणून 'लढाईंतून त्वरित पळून जाणारे ते तुर्वश' अशी व्युत्पत्ति हापकिन्सनें दिली आहे तीहि हास्यास्पद आहे.

तु र्व शां चा मु ख्य प रा क्र म.- तुर्वशांचा विशेष पराक्रम म्हणजे दाशराज्ञ युध्दांत सामील होणें हा आहे. त्या युध्दांत जे अनेक लोक सामील झाले होते त्यांत तुर्वश व यदू हे बरेच प्रमुख होते. व त्यांच्यावर इंद्राची कृपाहि होती. तथापि त्या युध्दांत तुर्वशांचा पराभवच झाला. ते 'अनु आणि द्रुह्यु' यांच्या प्रमाणें पाण्यांत बुडून न मरतां इन्द्रकृपेनें सुटलें. इंद्रानें हि 'सुदास' याची दहा राजांच्या तडाख्यांतून विजयपूर्वक सुटका केली, तर 'तुर्वश' आणि 'यदु' यांची पराजयपूर्वक सुटका केली. इन्द्रानें दोघांवरहि कृपाच केली असें सूक्तकारांनी दाखविलें आहे. कांही स्थलांवरुन असेंहि ह्मणतां येईल की, 'तुर्वश' आणि 'यदु' यांच्यावर इन्द्राची अवकृपा असे. इन्द्राचें स्तवन करणें झाल्यास त्या स्तुतीत 'हे इंद्रा तूं 'तुर्वश' व 'यदु' यांचे संरक्षण केलेंस' असें अनेक कवीनीं म्हटलें आहे. तुर्वश इन्द्रपूजक होते असे ॠग्वेदांत उल्लेख आहेत. तुर्वश आणि यदु राजांनी सरयू नदीच्या तीरी अर्ण आणि चित्ररथ राजांनां मारिलें असें ग्रिफिथचें म्हणणें आहे. परंतु तें बरेंच संशयग्रस्त असून त्याला चांगलासा आधार नाहीं. अर्ण आणि चित्ररथ यांचीहि माहिती अन्यत्र नाहीं. चित्ररथ राजा व सरयू नदी यांच्या संबंधावरुन तुर्वश, पंचाल वगैरेंचा स्थलनिर्णय करण्यास फारच उत्तम साधन आहे.

तुर्वश आणि यदु यांचे सुदासचा पिता दिवोदास याच्याशींहि वैर होतें असें एका स्थलावरुन दिसतें. तेथें खालील प्रमाणें उल्लेख आहे.

पुर: सद्य इत्थाधिये दिवोदासाय शम्बरम् |
अध त्यं तुर्वशं यदुम् |
(.६१,२).

अर्थ:- इन्द्रानें त्याच दिवशी शत्रूंचे किल्ले मोडलें. सत्कर्माचरण करणा-या दिवोदासासाठी शम्बराला, तुर्वश राजाला व यदु राजाला वश केलें.

वृचीवान् आणि तुर्वश एक नव्हते.- वृचीवान् आणि तुर्वश हे एक होते असें म्हणण्यासहि पुरेसा निश्चयात्मक पुरावा नाही व ते एक नव्हते असें म्हणण्यासहि सबळ पुरावा नाहीं; दोघेहि वेगळे होते, परंतु एकाच मित्रसंघांत दाखल होते, असें मानल्यास कोणताच विवादप्रश्न उपस्थित होत नाहीं, असें मॅकडोनेलचें म्हणणे आहे. व दोघे एकच होते असें झिमरचें म्हणणें आहे.

परंतु ते दोघेहि भिन्न होते असें निश्चित म्हणतां येतें. एकाच ॠचेंतील उल्लेखानें ही गोष्ट सिद्ध होते. ती ॠचा खालील प्रमाणें आहे:-

स सृंजयाय तुर्वशं परादाद्दृचीवतो दैववाताय शिक्षन् |
(.२७,७).

अर्थ:- इन्द्रानें सृंजयाला तुर्वश दिले आणि दैववाताकरितां वृचीवानाचें हित केलें.

यावरुन दैववात व सृंजय यांच्या विरुद्ध युद्ध करण्याकरितां तुर्वश उभा राहिला होता आणि वृचीवान् त्याच्या मदतीकरितां आला होता.

यव्यावती व हरियूपीया या नदीच्या तीरीं वरशिखाच्या मुलाला मारलें, अभ्यावर्तिन्-चायमानाचें हित केलें आणि वृचीवानाला नष्ट केले असा उल्लेख आला आहे
(.२७,५).

या एकंदर हकीकतीवरुन तुर्वश आणि वृचीवान, हे एक नव्हतें हें प्रामुख्यानें सिद्ध होतें.

उत्तरकालीन ग्रंथांतहि यांचा उल्लेख आहे. हे पांचालांत मिळून गेले असें पांचाल व तुर्वश यांचा जो निकट संबंध दाखविण्यांत येतो त्यावरुन दिसतें.

तुर्वशांचे राहण्याचें ठिकाण व त्यांनी सुदास याजवर कोणच्या बाजूनें चाल केली हें बरेंच अनिश्चित आहे. तथापि त्यांनीं परुष्णी नदी ओलांडिली होती यांत संशय नाहीं. बहुतेक ते पश्चिमेकडून पूर्वेकडे केले असावेत हें संभवनीय दिसतें.

तुर्वशांचा आणि वृचीवानांचा संबंध असा दाखविला गेला आहे कीं, वृचीवान आणि तुर्वश यांचा सृंजय राजा दैववात यानें पराभव केला. येथेंच चायमानाच्या विजयाचाहि उल्लेख आहे.

वधीदिंद्रोवरशिखस्य शेषोभ्यावर्तिने चायमानाय शिक्षन् |
वृचीवतो यद्धरियूपीयायां हन् पूर्वे अर्धे भियसापरोदर्त ||
(.२७,५).

अभ्यावर्तिन् चायमानाकरितां इन्द्रानें वरशिखाचें बीज नष्ट केलें. ''हरियूपिया'' येथें वृचीवानांच्या आघाडीच्या सैन्याचा नाश केला; व मागच्या रांगांतलें सैन्य भीतियुक्त होत्सातें पळून गेलें. कांही लोकांचे म्हणणें वरशिख हा वृचीवानाच्या कुलांतील होता ही गोष्ट कांही लोकांना संमत नाही. तथापि ते दोघे भिन्न असून त्या दोघांचा मित्रसंबंध किंवा शास्यशासक संबंध असावा. यांतील बहुतेक दुसराच संबंध असणें निश्चित दिसतें.

पार्थव अभ्यावर्तिन् चायमान हा पार्थियन होता काय :- वरशिख आणि वृचीवान् यांचा अभ्यावर्तिन् चायमानाकरितां इन्द्रानें पराभव केला. अभ्यावर्तिन् चायमान हा पार्थव होता. पार्थव आणि पार्थियन हे एकच होत असें शब्दसाम्यावरुन कांहीचें म्हणणें आहे. पार्थियन (पर्शियन) या शब्दावरुन इराणशीं या शब्दांचा व शब्दावरुन व्यक्तींचा संबंध जोडतां येतो. याला यव्यावती व हरियूपीया या नद्यांच्या उल्लेखांचा आधार देतां येण्यासारखा आहे. यावरुन अभ्यावर्तिन् चायमान हा हिंदुस्थानच्या पश्चिमेस इराणांत रहात होता. तो अरकोसिया (Arachosia) मध्यें रहात होता असें हिलेब्रँटचें म्हणणें आहे; पण हे हिलेब्रॅटचें स्थलनिर्णायक विधान स्वीकारतां येत नाही.

पार्थवांच्या औदार्याची भरद्वाजांनी फारच सुंदर स्तुति केली आहे. ती येणें प्रमाणें:-

अभ्यावर्ति चायमानो ददाति दूणाशेयं दक्षिणा पार्थवानाम् |
(.२७,८).

अर्थ:- अभ्यावर्तिन् चायमान वीस गाईबैलांच्या जोड्या मला देतो. ही त्या पार्थवाची दक्षिणा कोणालाहि नाहींशी करतां येणार नाहीं (ही कीर्ति पृथ्वीच्या अन्तापर्यत टिकेल).

सृंजय, दैववात आणि अभ्यावर्तिन् चायमान हे एक होत असें सायणाचें म्हणणें बरोबर दिसते. हे वेगळे असावेत असें झिमरचें म्हणणें आहे. पार्थव आणि पार्थियन यांचा संबंध नसावा असें म्हणणारे लोक आहेत.


तुर्वश आणि तुर्वीति:- तुर्वश आणि तुर्वीति यांचा कांही संबंध होता कीं काय हें सांगतां येत नाहीं. एके ठिकाणीं तुर्वश, यदु, उग्रादेव, बृहद्रथ, व तुर्वीति यांचा उल्लेख आला आहे तो असा:-

अग्नीकडून यदु, तुर्वश व उग्रादेव यांनां मी बोलावितों. नायक अग्नि, नववास्त्व, बृहद्रथ व तुर्वीति यांनां शत्रुहननाला मदत म्हणून आणो (.३६,१८).

'तुर्वीति हा इन्द्रकृपेंतला होता. त्याकरितां एकदां इन्द्रानें पाणी उथळ केलें' असें दुस-या एका ठिकाणी वर्णन आलें आहे
(.६१,११).

अश्वीदेवांची त्याच्यावर कृपा असे
(.११२,२३).

तुर्वीति बरोबर दभीति हेंहि नांव अश्वीदेवांच्या कृपेंतल्या व्यक्तीचें म्हणून आलें आहे. दभीतीनें इन्द्राकरितां सोमवल्लीचा रस काढून दिला, त्याचें कारण दभीतीचें शत्रू धुनि आणि चुमुरि यांनां इन्द्रानें मारलें
(.२६,६).

यांचा उल्लेख शंबर, पिप्रु व शुष्ण यांच्या बरोबर येतो. चुमुरि हें नांव नॉन आर्यन् लोकांचें द्योतक आहे असें एक लेखक म्हणतो. यांचे किल्ले इन्द्रानें फोडले. दभीतीकरितां ३०००० दास ठार मारले होते (.३०,२१). व दस्यूंनां दो-यांनी बांधून टाकलें होतें
(.१३,९).

क्रिवि:- 'क्रिवि' ही वेदकालीन एक जात असावी असें पुष्कळांचें म्हणणें आहे. त्याला शतपथ ब्राह्मणांत (१३.५,४,७) आधार आहे. क्रैव्य पांचाल राजानें परिवक्त्रा नदीवर अश्वमेध केला अशी कथ तेंथें आहे. हा शब्द ॠग्वेदांत अनेक वेळां आला असून सायणाचार्यानीं पुष्कळ वेळां त्या शब्दाचा अर्थ विहीर असा घेतला आहे (.२०,२४ आणि .२२,१२). हे किवीसंबंधाचे उल्लेख पाश्चात्य संशोधकानीं लोकांविषयीं आहेत असें धरलें आहे क्रिवि हा शब्द जेथें विशिष्ट लोक या अर्थानें लागू पडत नाहीं ते उल्लेख येणें प्रमाणें.

आ व इन्द्रं क्रिविं तथा वाजयन्त: शतकतुम् |
मंहिष्ठ सिञ्च इन्दुभि: ||
(.३०,१).

बलप्राप्तीच्या इच्छेनें आम्ही अत्यंत उदार व हजारों शक्तींचा स्वामी जो इंद्र त्यास विहीर जशी पाण्यानें भरतात तसें सोमरसाच्या बिदूंनीं भरुन तृप्त करुन टाकतों.

यूयं न उग्रा मरुत: सुचेतुनारिष्टग्रामा: सुमतिं पिपर्तन |
यत्रा वो दिद्युद्रदति क्रिविर्दती रिणाति पश्व: सुधितेव बर्हणा ||
(.१६६,६).

ज्यांच्या संघाला कोणी उपद्रव करुं शकत नाहीं अशा उग्र मरुतांनों, संतुष्ट चित्तानें आमची चांगली इच्छा पुरी करा. (ती अशा वेळी कीं,) ज्या वेळीं तुमच्या क्रिवी (=विक्राळ किंवा क्षेपणशील) दांताचें अस्त्र (मेघांनां) कांपते व चांगल्या नेम धरलेल्या शस्त्राप्रमाणें पशूंना मारतें.

सास्मा अरं बाहुभ्यां यं पिताकृणोद्विस्मादा जनुषो वेदसस्परि |
येना पृथिव्यां नि क्रिविं शयध्यै वज्रेण हत्व्यवृणक्तुविश्वाणि: ||
(.१७,६).
सर्व प्रकारच्या मौल्यवान् धनापासून पित्यानें निर्माण केलेलें व त्याच्या बाहूंनां आवरण्याजोगें हें वज्र आहे. या मोठयानें ओरडणा-या वज्रानें त्यानें क्रिवीला खालीं पाडलें आणि मरेपावेतों मारुन जमिनीवर टाकून दिलें.

अध त्विषीमाँ अभ्योजसा क्रिविं युधा भवदारोदसी अपृणदस्यमज्मना प्रवावृधे |
अधत्तान्यें जठरे प्रेमरिच्यत सैनं सश्वद्देवो देवं सत्यमिद्रं सत्य इन्दु: ||
(.२२,२).

यानंतर दीप्तिमान् इंद्रानें बलाच्या योगें क्रिवीला युध्दांत जिंकलें. (आपल्या तेजानें) द्यावापृथिवी व्यापून टाकिली. याच्या (सोमाच्या) बलानें वाढला. (सोमाचे दोन विभाग करुन) एक आपल्या पोटांत घातला व दुसरा देवांनां दिला. तो दैदीप्यमान् आणि सत्य इंदु (सोम) या दैदीप्यमान् आणि सत्य इंद्राला व्यापून टाको.

प्र व एते सुयुजो यामन्निष्टये नीचीरमुष्मै यम्य ॠतावृध: |
सुयंतुभि: सर्वशासैरभिशुभि: क्रिविर्नामानि प्रवणे मुषायति ||
(.४४,४).

हीं एकमेकांत मिसळून असणारीं किरणें खालीं येतात, भक्तांच्याकरितां आदित्य त्या किरणांच्या योगानें उतरत्या उदकांचे प्रवाह वाहवितो. (या मंत्रांत सायणांनी 'क्रिवि' शब्दाचा 'कर्ता' असा अर्थ केला आहे.)

चांगल्या रीतीनें जुंपलेले असे हे यज्ञविधींत मदत करण्याकरितां तुजकडे येतांत. आवळेजावळे असे ते (भाऊ) त्याच्याकरितां (अग्नी करितां) यज्ञास मदत करण्यासाठी येतात. लगामांनीं ते सहज वाट दाखविले जातात; ते सर्वांवर अम्मल चालवितात. (उंच अंतरावरुन) खोल पडल्यावर समुद्र यांची नावें लपवितो (म्हणजे तें पाणी समुद्रांत गडप होतें) :-ग्रिफिथ

याभि: सिन्धुमवथ याभिस्तूर्वथ याभिर्दशस्यथाक्रिविम् |
मयोनो भूतोतिभिर्मयोभुव: शिवाभिरसचद्विष: ||
(.२०,२४).

मरुतहो ! तुमची सेवा न करणा-यांचा द्वेष करणारे व सुखदायक असे तुम्ही ज्या साधनांनी विजयी होतां, सिंधूचें उत्तम रक्षण करतां व जरुर त्या वेळेस क्रिवीला मदत करितां त्या साधनांनीं आम्हांला तुम्ही सुखी करा. :-ग्रिफिथ

ताभिरायातं वृषणोप मे हवं विश्वप्सुं विश्ववार्यं |
इषा मंहिष्ठा पुरुभूतमा नरा याभि: क्रिविं वावृधुस्ताभिरागतम् ||
(.२२,१२).

हे अश्वींनो, सर्व सुखें देणारें व निरनिराळया स्वरुपांत असणारें असें मी तुम्हांस बोलवणें केलें म्हणजे ह्या (सूक्तां) तून तुम्ही या. क्रिवीला अतिशय धान्य देणारे तुम्ही (मीं म्हटलेल्या सूक्तांतून) या.

प्र यो ननक्षे अभ्योजसा क्रिविं वधै: शुष्णं निघोषयन् |
यदेदस्तंभी त्प्रथयन्नमून्दिव मादिज्जनिष्ट पार्थिव: ||
(.५१,८).

ज्यानें आपल्या बलानें क्रिवीचा पाडाव केला व आपल्या आयुधानें शुष्णाला ठार मारिलें त्यानें थोडयाच अंतरावर असलेल्या आकाशाला आधार दिला त्या वेळेस प्रथम प्रार्थिव जन्मास आला.

द्युन्नी वां स्तोमो अश्विना क्रिविर्नसेक आगतम् |
मध्व: सुतस्य स दिवि प्रियो नरा पातं गौराविवेरिणे ||
(.८७,१).

हे अश्वीनों तुमची स्तुती सुंदर आहे. प्रवाह भरण्याकरितां झ-याप्रमाणें या. हे स्वर्गाच्या स्वामीनों, दोन रानटी बैल ज्याप्रमाणें एखाद्या तळयाचें पाणी पितात त्याप्रमाणें (पिळला जाणारा) गोड (सोम) रस तुम्ही प्या. तो तुम्हांला आवडतो.

अभि वह्निरमर्त्य: सप्त पश्यति वावहि: |
क्रिविर्देवीरतर्पयत् ||
(.१,६).

जो यज्ञ पार पाडणारा व अत्यन्त तृप्तिजनक सोम सात नद्यांनां जाऊन मिळतो तो कूपरुपानें (क्रिवि:) असणारा नद्यांना तृप्त करतों.

क्रि वि आ णी कु रु.- वर दिलेल्या पुराव्यावरुन क्रिवि नांवाचे एक राष्ट्र होतें अशी आमची खात्री होत नाही. क्रिवींचा संबंध कुरुंशी जोडण्यांत येतो पण कुरुंसंबंधानें फारच थोडी माहिती आपणांस वैदिक वाङमयांत उपलब्ध होते. कुरु, कौरव, आणि कौरम असे तीन प्रकारचे शब्द वैदिक वाङमयांत आढळतात. कुरुंची प्रसिद्धि मंत्रभागापेक्षां ब्राह्मणभागांत अधिक आहे.

द्रु ह्यु.- आतां दुह्यूंकडे वळूं. द्रुह्यु हा शब्द एकवचनीं व अनेक वचनीं मिळून सहा वेळ (.१०८ ८; .४६, ८;.१८,६; १२; १४; .१०,; या ठिकाणीं) आला आहे. यांपैकी .१८ मधील तीन उल्लेख असणा-या ॠचा मागें दिल्याच आहेत. त्याशिवाय ज्या तीन ॠचा आहेत त्या येणेंप्रमाणें.

यदिन्द्राग्नी यदुषु तुर्वशेषु यद्द्रुह्युश्वनुषु पूरुषु स्थ:|
(.१०८,८).

हे इंद्राग्नीहो, जरी तुम्ही यदु किंवा तुर्वश, दुह्यु, अनु (किंवा) पुरु यांच्या येथें असाल (तरी या).

यद्वा तृक्षौ मधवन् द्रुह्यावाजने यत्पूरौ कच्च वृष्ण्यं |
अस्मभ्यं तद्रिरीहि स नृषाह्येमित्रान् पृत्सु तुर्वणे ||
(.४६,८).

हे धनवान, (इंद्रा) तृक्षि, द्रुह्यु आणि पूरु यांच्याजवळ असलेलें सर्व बल युध्दांत शत्रूंचा नाश करण्यासाठी आम्हाला दे.

यदद्याश्विनावपाक् यत् प्राक्स्थो वाजिनीवसू |
यद्द्रुह्यव्यनवि तुर्वशे यदो हुवे वामथ मागतं ||
(.१०,५).

हे अन्नवान् अश्वीहो, तुम्ही पश्चिमेकडे, पूर्वेकडे अथवा द्रुह्यु, अनु, तुर्वश, यदु यांच्या येथें असला तरी मी तुम्हाला बोलावीत आहे. माझ्याकडे या.

यांमध्यें द्रह्युविषयी खालील माहिती मिळते:-

(१) यदुतुर्वशांबरोबर उल्लेख.

(२) इन्द्राग्नीचें त्यांच्याकडे अस्तित्व.

(३) सुदासाच्या विरुद्ध लढांईत त्यांच्यांतील लोक मारले गेले.

(४) श्रुत, कवष व वृद्ध यांबरोबर ते मारले गेले.

(५) ते सामर्थ्यवान् असून त्यांचे शौर्य गायकानें देवापाशी याचिलें आहे.

(६) अश्वीचें द्रुह्यू व त्यांचे सहकारी यांच्या घरीं अस्तित्व. यदु, तुर्वश, द्रुह्यु, अनु व पुरु या सर्व प्रसिद्ध वैदिक जाती होत्या. हे पांच यथातीचे पुत्र असून त्याला ते त्याची वृध्दावस्था घेऊन आपलें तारुण्य देण्यास तयार न झाल्यामुळें ययातीनें त्यांना राज्य न देतां तुम्हीं हलक्या जातीचे व्हाल वगैरे शाप दिला, ही कथा जातींच्या उत्पत्तीच्या स्पष्टीकरणार्थ पौराणिक प्रयत्न या दृष्टीनें लावतां येईल.

 

पुरु.- आतां पुरुविषयीं काय माहिती मिळते ती पाहूं.

प्रनू महित्वं वृषभस्य वोचं यं पूरवो वृत्रहणं सचन्ते |
वैश्वानरो दस्युमग्निर्जघन्वाँ अधूनोत्काष्ठा अव शंबरंभेत् ||
(.५९,६).

मेघहन्त्या ज्या वैश्वानराला पुरुलोक सेवितात त्याचें माहात्म्य मी तुम्हांला सांगतों. त्या वैश्वानर अग्नीनें दस्यूंनां मारलें. सर्व दिशा हलविल्या (पाऊस पाडला) आणि मेघ फोडीला.

त्वं हत्यदिन्द्र सप्त युध्यन् पुरो वज्रिन् पुरुकुत्साय दर्द: |
बर्हिर्नयत् सुदासे वृथा वर्गंहो राजन् वरिव: पूरवे क: ||
(.६३,७).

हे वज्रयुक्त इंद्रा तूं पुरुकुत्साकरितां युद्ध करुन सात किल्यांचा नाश करतोस. तृणाप्रमाणें सहज तूं सुदासाकरितां त्याच्या (शत्रूंना) तोडलेस, हे राजा, पुरुंस लूट मिळवून दिलीस.

भिनत्पुरो नवतिमिन्द्र पूरवे दिवोदासाय महिदाशुषे नृतो वज्रेण दाशुषे नृतो |
अतिथिग्वाय शम्बरं गिरेरुग्रो अवाभरत् |
महोधनानि दयमान ओजसा विश्वाधनान्योजसा ||
(.१३०,७).
हे इंद्रा ! हे नृत्य करणा-या ! आपला भक्त व कृपेंतला चाकर जो पुरु-दिवोदास-त्याच्यासाठी तूं आपल्या वज्रानें नव्वद किल्यांचा चुराडा केलास. अतिथिग्वासाठीं त्या बलाढय (इंद्रानें) शंबराला पर्वतावरुन खालीं लोटून दिलें; त्यानें आपल्या बलानें मोठया धनराशीची वांटणी केली.

विदुष्टे अस्य वीर्यस्य पूरव: पुरो यदिन्द्र शारदीरवातिर: सासहानो अवातिर: |
शासस्तमिन्द्र मर्त्यमयज्युं शवसस्पते |
महीममुष्णा: पृथिवीमिमा अपो मन्दसान इमा अप: ||
(.१३१,४).

हे इंद्रा, तूं शरदाचीं नगरें (मेघमंडलें) मोठा जय मिळवून भंगिलीस. हा जो तुझा पराक्रम, तो पुरु जाणून आहेत. हे बलोपेता इंद्रा, तूं यज्ञ न करणा-या मनुष्याला शासन करुन ही विस्तीर्ण पृथ्वी व ही उदकें हर्षयुक्त होऊन काढून घेता झालास. (म्ह० वृत्राला मारुन त्यापासून विस्तीर्ण पृथ्वी व मेघोदकें हिरावून घेतलीस.)

दनो विश इन्द्र सृध्रवाच: सप्तयत्पुर: शर्म शारदीर्दर्त |
ॠणोरपो अनवद्यार्णा यूने वृत्रं पुरुकुत्साय रन्धी: ||
(.१७४,२).

ज्या टोळ्या (जाती) उदामपणानें बोलल्या त्यांचे आश्रयस्थान जे सात शरद किल्ले त्या किल्यांचा चुराडा करुन तूं त्या टोळयांनां दनि केलेंस. हे निर्दाषी (इन्द्रा), लाटांच्या पाण्याला तूं पूर आणलास व त्याच्या शत्रूला तरुण पुरुकुत्साच्या ताब्यांत (नाशार्थ) दिलेंस.

एवा वस्व इन्द्र: सत्य: सभ्राढ्ढन्ता वृत्रं वरिव: पूरवे क: |
पुरुष्टुत क्रत्वा न: शग्धि रायो भक्षीयतेवसो दैवस्य ||
(.२१,१०).

या प्रकारें स्तविलेला सत्यशाली धनाचा पति व वृत्राचा हन्ता इन्द्र पुरुला धन देतो. अनेक यजमानांकडून स्तवनकर्मानें स्तविल्या जाणा-या हे इन्द्रा ! तूं आम्हांला धन दे. तुझ्याकडून मिळणारें दैवी अन्न मीं सेवन करावें.

महश्वर्कर्म्यर्वत: क्रतुप्रा दधिक्राव्ण: पुरुवारस्य वृष्ण: |
यं पूरुभ्यो दीदिवासं नाग्निं ददथुर्र्मित्रावरुणा ततुरिम् ||२||
(.३९,२).

कर्मांचा पूरक मी त्या महान्, वेगवान् दानशील व बहुतांनां वरणीय अशां दधिक्रावा देवाचें स्तवन करतों. हे मित्रावरुण हो ! या तारक दधिक्राव्याला तुम्ही दीप्तिमान् अग्नीप्रमाणें पुरुंच्या कल्याणासाठीं धारण करतां.- सायण

आ यज्ञैर्देव मर्त्य इत्था तव्यांसमूतये |
अग्निं कृते स्वध्वरे पूरुरीळीतावसे ||
(.१७,१).

स्वत:च्या तेजानें दीप्तिमान् असणा-या ज्या अग्नीला मनुष्यें हविर्भाग अर्पण करतात त्या अग्नीची पुरु स्वत: करीत असलेल्या यज्ञांत स्वसंरक्षणासाठीं स्तुति करतो.

सनेम तेवसा नव्य इंद्र प्र पूरव: स्तवंत एना यज्ञै: |
सप्त यत्पुर: शर्म शारदीर्दर्धन्दासी: पुरुकुत्साय शिक्षन् ||
(.२०,१०).

हे इंद्रा, तुझ्या नूतन अनुग्रहानें आमचा फायदा होवो, अशी तुझी स्तुति पुरु यज्ञ करुन करतात. 'दासांचे' वसतिस्थान जे सात किल्ले ते तूं मोडून टाकलेस, व त्यांच्या (म्हणजे) दासांच्या जाती तूं ठार मारुन टाकल्यास व पुरुकुत्साला तूं मदत केली आहेस.

त्वद् भिया विश आयन्नसिक्रीरसमना जहतीर्भोजनानि |
वैश्वानर पूरवे शोशुचान: पुरो यदग्ने दरयन्नदीदे: ||
(.५,३).

जेव्हां हे वैश्वानर अग्ने, पुरु करितां प्रकाशून तूं त्याचे किल्ले पेटवलेस आणि भग्न केलेस, तेव्हां तुझ्या भीतीनें दूरवर पसरलेल्या कृष्णवर्ण जाती आपली संपत्ति टाकून देऊन पुढें धांवल्या.

प्रप्रायमग्निर्भरतस्य श्रृण्वे वि यत्सूर्यो न रोचते बृहद्भा: |
अभि य: पूरुं पृतनासु तस्थौ द्युतानो दैव्यो अतिथि: शुशोच |
(.८,४).

हा भरतांच्या मालकीचा अग्नि फार कीर्तिमान् आहे; हा सूर्याप्रमाणें मोठया दीप्तीनें प्रकाशतो. ज्यानें युध्दांत पुरुचा पराभव केला तो स्वर्गीय अतिथि परिपूर्ण तेजानें प्रकाशला आहे.

त्वं धृष्णो धृषता वीतहव्यं प्रावो विश्वाभिरुतिभि: सुदासम् |
प्र पौरुकुत्सिं त्रसदस्युमाव: क्षेत्रसाता वृत्रहत्येषु पूरुम् ||
(.१९,३).

हे धीरा, तूं आपली सर्व मदत देऊन, ज्याचा हवि स्वीकारलास त्या सुदासाला, देश जिंकण्याच्या आणि शत्रूंनां मारण्याच्या कामीं पुरुला आणि पुरुकुत्साचा मुलगा जो त्रसदस्यु त्याला मोठया धिटाईनें रक्षिलें आहेस.

उभे यत्ते महिना शुभ्रे अंधसी अधिक्षियन्ति पूरव: |
सानो बोध्यवित्री मरुत्सखा च्रोदराधोमघोनाम् ||
(.९६,२).

हे रुपवती, जर पुरु आपल्या सामर्थ्याच्या समृध्दींत तुझ्या दोनहि गवताळ किना-यावर वास करतात, तर हे मरुत्सखे, आमच्यावर कृपादृष्टि ठेव. आमच्या वरिष्ठांच्या धनाला चालना दे.

प्र ते यक्षि प्र त इयर्मि मन्म भुवो यथा वन्द्यो नो हवेषु |
धन्वन्निव प्रपा असि त्वमग्न इयक्षवे पूरवे प्रत्नराजन् ||
(१०.४,१).

हे अग्ने ! मी तुला हवि देतों, माझ्या मनांत आलेली स्तुति मी उच्चारितों. कारण, हे वन्द्य ! देवांनां आव्हान करतांना तूं नेहमी सन्निध असतोस. हे पुराण राजन् ! निरुदक प्रदेशामध्यें ज्याप्रमाणें पाणपोई त्याप्रमाणें तूं पुरुस (किंवा हंवीच्या योगानें देवांनां संतुष्ट करणा-या मनुष्यांनां) पाणपोई सारखा (म्हणजे सुख देणारा) आहेस.-सायण

कुरुश्रवणमावृणि राजानं त्रासदस्यवम् |
मंहिष्ठं वाघतामृषि: ||
(१०.३३,४).

विपुल धन देणारा त्रसदस्यूचा मुलगा जो कुरुश्रवण (ॠत्विजांनीं केलेली स्तुति ऐकणारा) नामक राजा त्याच्याजवळ मी ॠषि, ॠत्विजांनां देण्याच्या धनाविषयी प्रार्थना करतो.- सायण.

अहमिन्द्रो न पराजिग्य इद्धनं न मृत्यवेवतस्थे कदाचन |
सोममिन्मा सुन्वतो याचतावसु नमे पूरव: सख्ये रिषाथन ||
(१०.४८,५).

इंद्र म्हणतो:- मी सर्व धनाचा स्वामी आहे. माझ्या द्रव्याचें हरण कोणीहि करुं शकत नाही. तसेंच माझ्या भक्तांवर मृत्यूचा ताबा चालूं शकत नाही. (अर्थात् माझ्यावर चालत नाही, हें सांगावयास नकोच) हे सोम कुठणारे यजमानांनो तुम्हांला अपेक्षित असणा-या द्रव्याची तुम्ही मजजवळच मागणी करा. हे लोक हो (पुरव:) माझे सख्य सोडूं नका.- सायण.

मी इंद्र आहे; कोणी कधीहि माझे द्रव्ये घेऊं शकत नाही. मी कधीहि मृत्यूच्या अंकित होत नाही. सोम पिळून माझ्या जवळच संपत्ति मागा, हे पुरुंनो, माझे स्नेही असतांना तुम्हाला कोणतीहि पीडा सहन करावी लागणार नाही.-ग्रिफिथ.

.६३,७ मधील सुदासास मदत करणा-या पुरुकुत्साचा उल्लेख दाशराज्ञयुद्धविषयक नसून, तूर्वयाणाविरुद्ध असलेल्या मित्रसंघाच्या विजयाबद्लचा असावा. .१७४,२;.२०, १० व .५,३ मधील पुरुकुत्साविषयींचा उल्लेख वरील लढाईविषयीच असावा असें वाटतें. .८,४ मध्यें भरत व पुरु यांचें वैमनस्य दृष्टीस पडतें. .१९,३ वरुन त्रसदस्यु हा पुरुकुत्साचा मुलगा अगर वंशज होता असें दिसतें. १०.३३,४ मध्यें कुरुश्रवण हा त्रसदस्यूचा वंशज असल्याविषयीं उल्लेख आहे.

पु रुं चे श त्रु मि त्र व त्यां च्या ल ढा या:- सायणाचार्याच्या भाष्यांत पुरु शब्दाचा मनुष्य असा अर्थ पुष्कळ वेळां आला आहे. यास्कानें जातिवाचक सर्व शब्द मनुष्यवाचक म्हणून स्वीकारले आहेत, त्याचा हा परिणाम असावा. यास्कानें हे शब्द जातिवाचक न लिहितां मनुष्यवाचक का लिहिले हा एक विचारणीय प्रश्न आहे.

हे अनुद्रुह्यु वगैरे बरोबर एकदां आले असून तृत्सूंचे शत्रु म्हणून त्यांचा उल्लेख येतो आणि तेथें त्यांना बडबडे-मृध्रवाचं-असें म्हटलें आहे. पुरु साणि सुदास यांच्यामध्यें पुरुकुत्साच्या कालांत स्नेहसंबंध व ऐक्य उत्पन्न झालें असावें. कां कीं, सुदासाकरितां शत्रूस मारिलें आणि पुरुंस धन प्राप्त करुन दिलेंस असा उल्लेख. १.६३,७ मध्यें आहे.

दुस-या ठिकाणीं (७.८,४) भरतांच्या अग्नीनें त्याचा पराभव केला असें म्हटलें आहे. सुदास हा भरत होता. याबद्ल मतैक्य आहे. आणि पुरुंवर मिळालेल्या विजयाप्रीत्यर्थच मोठा उत्सव चालू होता असें सदर ॠचेंत केलेल्या अग्नीच्या स्तुतीवरुन दिसतें.

उलट पुरुंचा जय झाला, असें वर्णन करणा-या अनके ॠचा आपणांस उपलब्ध होतात (.१३१,४; .१७४,२;.२१,१०;.२०,१०). कांही स्थळी पुरुंच्या सामर्थ्याचा इतका महिमा गाइला आहे की इतर भक्तांनीं पुरुंच्या सामर्थ्यासारखें सामर्थ्य देवतांपाशीं मागितलें आहे.

(यत्पूरौ कच्च वृष्ण्यम् | अस्मभ्यं तद्रिरिहि ६.४६,८.).

हे पुरुंचे जय ज्या लोकांवर होत असत ते काळया रंगाचे होते एतद्विषयक उल्लेख खालील प्रमाणें आहे:-

त्वद् भिया विश आयन्नसिक्री रसमनाजहतीर्भोजनानि |
वैश्वानर पूरवे शौशुचान: पुरो यदग्ने दरयन्नदीदे: ||
(.५,३).

जेव्हां हे वैश्वानर अग्ने, पुरुकरितां प्रकाशून तूं त्यांचे किल्ले पेटविलेस आणि भग्न केलेस तेव्हां तुझ्या भीतीनें दूर पळालेलें काळे लोक संपत्ति टाकून पुढें धांवले.

यावरुन काळया लोकांविरुद्ध लढणारा पुरु हा गौरवर्ण असावा. हे काळे लोक बहुधा हिंदुस्थानांतील मूळ रहिवाशी असावेत असें कांहीचें मत आहे ! हे दाशराज्ञ युध्दांतील सुदासाचे प्रतिस्पर्धी होते असें दिसतें.

पुरुंपैकीं मोठमोठे राजे पुरुकुत्स, त्रसदस्यु वगैरे होत. यांचाच पुरु ह्या नांवानें उल्लेख येणें संभवनीय आहे. पुरु हें व्यक्तीचें नांव नसावें. तें एका जातीचे किंवा समाजाचे नांव असून संस्कृत वाङमयांतील नेहमीच्या पद्धतीप्रमाणें त्या जातीतील किंवा समाजांतील मुख्याचें किंवा मुख्य व्यक्तीचें तें नांव बनलें असावें. त्याप्रमाणें दोनहि प्रकाराने या शब्दाचा उल्लेख आला आहे. यांचे राहण्याचें ठिकाण सरस्वतीच्या कांठी होतें असे स्पष्ट उल्लेख आहेत. (.९६,२).

दाशराज्ञ युध्दांत सुदासाविरुद्ध लढणा-या राजमालिकेंत 'पुरु' हें नांव झळकतें. परंतु त्या व्यक्तीचें विशेष नांव कळणें आवश्यक आहे. याकरितां त्या वंशांतील ॠग्वेदांत उपलब्ध होणा-या राजांचा इतिहास क्रमानें पहाणें आपणांस अवश्य आहे.

पु रु कु त्स- तो सुदाससमकालीन होता काय? पुरु वंशापैकी पुरुकुत्स याचा उल्लेख ॠग्वेदांत अनेक वेळां आला आहे. तो दासांचा जेता आणि इन्द्राची कृपा संपादन केलेला राजा होता.
(६.२०,१०).

याभि: सुचन्तिं धनसां सुषंसदं तप्तं धर्ममोम्यावन्तमत्रये |
याभि: पृश्निगुं पुरुकुत्समावतं ताभिरुषुऊतिभिरश्विनागतम्  ||
(.११२,७).

हे अश्वी हो, ज्या प्रसादांनीं धनाढय शुचंतीला तुम्ही चांगलें घर दिलेंत; आणि अत्रीचा प्रखर अग्नि शांत केलात, त्याचप्रमाणें ज्या प्रसादांनी पृश्निगूचें व पुरुकुत्साचें रक्षण केलेंत त्या प्रसादांनीं युक्त हे अश्वी हो, तुम्ही येथें अवश्य या.-सायण.

त्वं ह त्यदिन्द्र सप्त युध्यन्पुरो वज्रिन्पुरुकुत्साय दर्द: |
बर्हिर्नयत्सुदासे वृथा वर्गंहो राजन्वरिव: पूरवे क: |
(.६६,७)

हे वज्रधारी इंद्रा, त्वां पुरुकुत्सनामक ॠषीकरितां शत्रूंच्या सप्त नगरीचा पुरा नाश केलास. तसेंच, सुदास राजाकरितां तं अंहुसंज्ञक दैत्याचा नाश करुन अनायासानें त्याच्या पासून द्रव्य हरण केलेंस. हे स्वामिन् इंद्रा, तुझ्यावांचून त्वद्याजक सुदासाला समृद्ध कोण बरें करणार ? (अर्थात् तूंच).-सायण.

दनो विश इन्द्र मृध्रवाच: सप्त यत्पुर: शर्म शारदीर्दर्त |
ॠणोरपो अनवद्यार्णा यूने वृत्रं पुरुकुत्साय रन्धी: ||
(.१७४,२).

हे इन्द्रा, ज्या वेळी तूं शत्रूंची सात नगरें विध्वंसिलींस त्या वेळी (शत्रुसैन्यांतील) बडबडया लोकांची बडबड बंद केलसि; आणि हे दोषरहित इन्द्रा, तूं चपल अशा उदकांनां खाली सोडिलेंस व वृत्राला पुरुकुत्साच्या ताब्यांत दिलेंस.

पुरुकुत्स सुदासशीं समकालीन होता असें लुडविग व हिलेब्रँट म्हणतात परंतु या म्हणण्यास आधार नाहीं. ते आधार म्हणून जी ॠचा स्वीकारतात त्या ॠचेंत फक्त पुरुकुत्स आणि सुदास यांचा उल्लेख आला आहे; परंतु त्या उल्लेखावरुन पुरुकुत्स आणि सुदास हे समकालीन होते असें म्हणतां येणार नाहीं. कारण, एखाद्या स्तुतिपर मन्त्रांत अनेक भक्तांचें उल्लेख आले म्हणून ते समकालीन ठरविणें अयोग्य आहे असें काहींचें मत आहे.

एका ॠचेंत तो अश्विनांच्या कृपेनें यशस्वी झाला असें म्हटलें आहे (.११२,७). त्याच ॠचेंत 'शुचंतीला घर दिलेंत, अत्रीचा प्रखर अग्नि शांत केलात व पृश्निगूंचे संरक्षण केलें हे उल्लेख आले आहेत.
पुरुकुत्साची पत्नी, पुत्र, पिता व कुल;- पुरुकुत्साच्या मुलाचें त्रसदस्यु असें नांव होतें. पुरुकुत्साची पुरुकुत्सानी बायको होती. याबद्ल फारच स्पष्ट उल्लेख आहे. तो असा:-

अत्माकमत्र पितरस्त आसन्सप्त ॠषयो दौर्गहे बध्यमनि ||
त आयजन्त त्रसदस्युमस्यां इन्द्रं न वृत्रतुरमर्धदेवम् ||
(.४२,८).

दुर्गहाचा पुत्र बद्ध झाल्यावर ते सप्तर्षी आमचे पितर झाले. ते तिला इन्द्रासारखा शत्रुजेता आणि अर्धदेव त्रसदस्यु देते झाले.

पुरुकुत्सानी हि वामदाशद्धव्येभिरिन्द्रावरुणा नभोभि: |
अथा राजानं त्रसदस्युमस्या वृत्रहणं ददथुरर्धदेवम्  ||
(.४२,९).

कारण, हे इन्द्रावरुणहो, पुरुकुत्साची बायको तुम्हांला हविर्द्रव्य आणि नमस्कार यांनी प्रसन्न करती झाली, नंतर शत्रुघ्न आणि अर्धदेव असा त्रसदस्यु राजा तिला दिला.

या दोनहि ॠचा अत्यन्त महत्वाच्या आहेत. या ॠचांतील पुरुकुत्सानी व दौर्गह या शब्दांवरुन आपणांस त्रसदस्यूची आई, बाप व आजा यांसंबंधी माहिती मिळते.

पु रु कु त्सा चा सु दा सा क डू न दा श रा ज्ञ यु ध्दां त प रा भ व व त्या चा तु रुं ग वा स:- पुरुकुत्स तुरुंगांत असतां राजा पाहिजे म्हणून सप्तर्षीच्या कृपेनें इन्द्रावरुणांना प्रसन्न करुन घेऊन 'त्रसदस्यु' हा पुत्र पुरुकुत्सपत्नीनें जन्मास आणला. ही हकीकत सायणाचार्यांनीं पूर्वग्रंथाधारपूर्वक भाष्यांत दिली आहे. ती हकीकत अशी:-

पुरुकुत्सस्य महिषी दौर्गहे बन्धनस्थिते |
पत्यावराजकं दृष्ट्वा राष्ट्रं पुत्रस्य लिप्सया ||
यदृच्छयां समायातान् सप्तर्षीन् पर्यपूजयत् |
तेच प्रीता: पुन: प्रोचुर्यजेन्द्रावरुणौ भृशम् ||
साचेन्द्रावरुणाविष्ट्वा त्रसदस्युमजीजनत् ||

(ॠ. .४२,८ वरील भाष्यांत सायणांनी दिलेला बृहद्देवतेंतील उतारा).

उत्तरकालीन वाङमयांत पुत्रप्राप्तीकरितां अश्वमेध केल्याची वर्णनें आहेत. त्याप्रमाणें पुरुकुत्सानें बायको मिळविण्याकरितां अश्वमेध केल्याचें उदाहरण आहे असें शतपथ ब्राह्मणांतील दुजो-यावरुन म्हणावयास जागा आहे. 'दौर्गह' शब्दाचा' दुगर्हपुत्र' असा अर्थ न घेतां त्याचा घोडा असा घ्यावा. याला शतपथ ब्राह्मणांतील 'दौर्गह' या शब्दाच्या हकीगतीनें (१३.५,४,५) जोड मिळते. परंतु हें निश्चित नाहीं.

असो; पुरुकुत्सानीवर पुरुकुत्स तुरुंगांत पडल्यामुळें संकट आलें असें निश्चित धरलें तरी पुरुकुत्साला कोणी तुरुंगांत टाकलें हा प्रश्न राहतोच.

सुदासानें दाशराज्ञयुध्दांत पुरुंचा पराभव केला त्यामुळें पुरुकुत्स तुरुंगांत पडून तेथेंच त्याचा अंत होण्याचा संभव आहे. त्या प्रसंगामुळेंच पुरुकुत्सानीनें त्रसदस्यूला मिळवून तें संकट निवारण केलेलें दिसतें.

पु रु व इ क्ष्वा कु ए क च का य:- शतपथ ब्राह्मणांत पुरुकुत्साला ऐक्ष्वाक असें म्हटलें आहे. इक्ष्वाकु हें नांव फक्त एकदांच ॠग्वेदांत आलें आहे. तथापि त्या शब्दावरुन राजा असा अर्थबोध होतो. ज्याचें नांव असमाति-सूक्तांत आहे त्याला इक्ष्वाकुवंशीय असें समजतात. अथर्ववेदांत हि इक्ष्वाकूचा फक्त एकदांच उल्लेख आला आहे. परंतु तेथेहि मूळपुरुष की वंशज ही शंका पुन: कायम राहतेच. पुरुकुत्स हा ऐक्ष्वाक होता असें शतपथ ब्राह्मणांत म्हटलें आहे. यावरुन त्रसदस्यु हा इक्ष्वाकु होता ही गोष्ट प्रचारांत आली आहे. यावरुन पुरुंनांच पुढें इक्ष्वाकू म्हणूं लागलें असें होतें. झिमर म्हणतो कीं, त्यांची वस्ति उत्तर सिन्धूकडे असावी परंतु याबद्ल निश्चित सांगतां येत नाही. त्यांची पूर्वेकडे वस्ति असण्याचा विशेष संभव आहे. इक्ष्वाकू यांचा अयोध्येशीं संबंध पुढें आला.

पुरुकुत्साला 'दौर्गह' असें म्हटलें आहे. तसेंच त्रसदस्यूला 'गैरिक्षित' असें म्हटलें आहे. दुर्गह आणि गिरिक्षित् यांबद्ल कांही विशेष माहिती नाहीं.

पु रु कु त्स्य त्र स द स्यु:- त्रसदस्यूचा पौरुकुत्सि (.१९,३) व पौरुकुत्स्य (.३३,८; .१९,३६) ह्या नांवांनी उल्लेख आला आहे. दिवोदासाचें आणि पुरुलोकांचे वैर होतें. सुदासाशीं पुरुलोकांचें वैर होतें हें दाशराज्ञयुध्दावरुन आपणांस दिसतें. तथापि ती लढाई पुरुकुत्साच्या वेळीच समाप्त झाली होती. त्रसदस्यूशीं त्या लढाईचा कांही एक संबंध नाही.

त्रसदस्यूला ' हिरणिन् ' नांवाचा एक मुलगा होता असें लुडविंगचें म्हणणें आहे. परंतु ती ॠचा लुडविगला समजलेली नाही. कारण, 'हिरणिन्' हें धनवान् अशा अर्थाचें विशेषण आहे.
(.६३,९; .५३,८).

कालान्तरानें कुरु आणि पुरु हें दोनहि लोक एक झाले, याचें उदाहरण त्रसदस्युपुत्र कुरुश्रवण हें मानितां येईल. कुरुश्रवण आणि तृक्षि (.२२,७) या दोघांनांहि 'त्रासदस्यव' असें म्हटलेलें आहे. द्रुह्यु व पुरु लोकांबरोबरहि एके ठिकाणी (.४६,८) तृक्षीचा उल्लेख आला आहे. 'तार्क्ष्य', हा घोडा तृक्षीचा होता की नाहीं हें सांगता येत नाही. विरुद्ध पुरावा दिसे तोपर्यंत हे दोघे भाऊ होते असें म्हणण्यास कांही हरकत नाहीं.

कुरु लोकांचें राहण्याचें ठिकाण मध्यदेश होय. पुरुलोक सरस्वतीच्या कांठी राहात होते असा उल्लेख येतो, ती सरस्वतीहि मध्यदेशांतलीच होय हेंहि ह्या कुरुपुरुंच्या संबंधावरुन ध्यानांत येतें.

'त्र्यरुण त्रैवृष्ण' यालाहि 'त्रसदस्यु' असें म्हणत असत असें ब्राह्मणग्रंथांवरुन म्हणतां येतें. सायणाचार्य ही गोष्ट स्वीकारीत नाहींत. (.२७, १-३).

ॠग्वेदांत त्रसदस्यु, त्र्यरुण, त्र्यैवृष्ण, व अश्वमेध (.२७, ४-६) हीं सर्व एकाच व्यक्तीची नांवे दिसतात. 'त्रैवृष्णस्त्रसदस्युश्च अश्वमेध इति त्रय:' असें बृहदेवतेच्या पांचव्या अध्यायांतील १२ व्या श्लोकांत म्हटलें आहे. या ठिकाणी उल्लेखिलेला अश्वमेध आणि ॠग्वेदाच्या आठव्या मंडळांत येणारा अश्वमेध यांचा पैतृक संबंध होता कीं काय हें सांगण्यास आश्वमेध शब्दाच्या व्युत्पत्तीशिवाय दुसरा आधार नाहीं. आश्वमेधाचें नांव पूतक्रतु असावें असें स्पष्ट दिसतें (.६८,१७).

ॠग्वेदेतर अनेक ग्रंथांत प्राचीन कालांतला प्रसिद्ध यज्ञ करणारा म्हणून त्रसदस्यु पौरुकुत्स्य{kosh हा राजा आपला पुरोहित वृशजान ह्याला बरोबर घेऊन रथांत बसला असतां पुरोहित त्याचा रथ फार जोरानें चालवूं लागला, व त्यामुळें त्याजकडून एका ब्राह्मणाच्या मुलाची हत्या घडली. राजा पुरोहिताला म्हणाला, 'तूं रथ हांकीत असतां मुलगा मेला त्यापक्षीं तूं हत्या केलीस' परंतु पुरोहित राजाला म्हणाला, 'रथ तुझा आहे त्यापक्षी त्वां हत्या केलीस' याप्रमाणें दोघेजण आपसांत भांडत भांडत यक्ष्वाकु राजाला विचारावयास गेले. इक्ष्वाकु राजाने सांगितले की, वृशजान रथ हांकीत होता त्यापक्षी हत्या करणारा तोच होय. नंतर वृशजानानें वार्शसाम या नांवाचें स्तोत्र म्हणून मुलाला पुन्हां जिवंत केलें, तरी इक्ष्वाकु राजाने पक्षपात करुन वृशजानालाच दोषी ठरविले. या कारणास्तव इक्ष्वाकु राजाच्या घरांतून आग्नि नाहीसा झाला व घरांत स्वयंपाक वगैरे होणे बंद झालें. तेव्हां विचाराअन्तीं राजाला समजलें कीं वृशजानाला आपण दोषी ठरविल्यामुळें अग्नि निघून गेला आहे. नंतर राजा वृशजानाजवळ गेला व वृशजानानें पूर्ववत् वार्शसाम सूक्त म्हणून अग्नीचें तेज परत आणल्यामुळें राजाच्या येथील स्वयंपाक वगैरे सर्व व्यवहार पूर्ववत् भुरु झाले [ॠ. ५.२,१. वरील. भाष्यांत सायणांनी उध्दृत केलला शाटयायन ब्राह्मणोक्त इतिहास].

बृहद्देवता (५.१४) व ताण्डय ब्राह्मण यांमध्यें ही कथा थोडयाफार फेरानें दिली आहे. सायणाचार्यांनीं शाटयायन ब्राह्मणांतील उतारा घेतला आहे परंतु या कथेचा ॠग्वेदांत संबंध जोडणें अशक्य आहे.}*{/kosh} याचा पर आटणार, वीतहव्य श्रायस व कक्षीवंत औशिज यांबरोबर उल्लेख आलेला आहे (तै.सं. .६,५,३ काठ.सं. २२.३).


उ प म श्र व स् (१०.३३,४.६-७).- सायणाचार्य उपमश्रवस् यास मित्रातिथीचा व कुरुश्रवण यास त्रसदस्यूचा पुत्र मानतात. मूळ ॠग्वेदांतील ॠचांत 'कुरुश्रवणं त्रासदस्यवम्' व 'उपमश्रव: नपात् मित्रातिथे:' असे उल्लेख आले आहेत. ग्रिफिथ हा नपात् शब्दाचा अर्थ सायणाचार्यांप्रमाणेंच पुत्र असा करतो; परंतु त्रासदस्यव कुरुश्रवण म्हणजे त्रसदस्यूचा नातू कुरुश्रवण असें देतो. मॅकडोनल हा नपात् याचा नातू असा अर्थ करुन मित्रातिथीचा पुत्र कुरुश्रवण व कुरुश्रवणाचा पुत्र उपमश्रवस् असें नातें जोडतो. बृहद्देवतेप्रमाणें (.३५,३६) कवषऐलूष हा आजोबा मित्रातिथीच्या मृत्यूबद्ल उपमश्रवस् याचें सान्त्वन करीत आहे. ह्या कथेस कांही आधार आहे, पण गेल्डनर म्हणतो की कवष ऐलूष हा उपमश्रवस् याजकडून वाईट रीतीनें वागविला गेला व त्याला विहिरीत फेंकण्यांत आले. तेथें त्यानें दयेकरीतां पदर पसरला आहे. परंतु या कथेस कांहीच आधार नाही.

क व ष व त्या चा कु रु श्र व णा शीं सं बं ध.- पुरुराजा कुरुश्रवण याचा कवषाशी कांही संबंध होता काय हें पाहिलें पाहिजे. दाशराज्ञ युध्दांत इन्द्रानें द्रुह्यूंबरोबर ज्यांनां जिंकले त्यांपैकी एक कवष आहे. त्याचेंच 'श्रुत' हे विशेषण असावें असें ग्रिफिथ वगैरेंचें म्हणणें आहे. सायणहि ॠग्वेदांतल्या एका ॠचेवरील भाष्यांत 'श्रुत' हें स्वतंत्र व्यक्तीचें नांव आहे असें मानितात.

'अध श्रुतं कवषं' (७.१८,१५). ही ती ॠचा होय. सदरील फक्त एकाच ठिकाणीं कवषाचा प्रत्यक्ष निर्देश आला आहे.  'कवष' यानें केली म्हणून ॠग्वेदांत प्रसिद्ध असलेली दहाव्या मंडळांतील ३१.३२ व ३३ हीं तीन सूक्तें आहेत. ३१ व्या सूक्ताच्या शेवटची ॠचा अशी आहे:-

उत कण्वं नृषद पुत्रमाहुरुत श्यावो धनमादत्तवाजी |
प्रकृष्णाय रुशदपिन्वतोधर्ॠतमत्र नकिरस्मा अपीपेत् |

आणि कण्वाला नृषदाचा पुत्र असें म्हणतात. अन्नयुक्त काळया कण्वास (हि) धन मिळालें. या नार्षद कण्वालाहि (अग्नीकडून) तेजस्वी रुप मिळालें. कण्वाच्या यज्ञाची वृद्धि अग्निशिवाय कोणीहि केली नाही.

बत्तिसाव्या सूक्तांतल्या शेवटल्या ॠचेवरुन सूक्तकर्ता (कवष) हा कुरुश्रवणाचा उपाध्याय होता असें दिसतें. ती ॠचा अशी:-

एतानि भद्रा कलश क्रियाम
कुरु श्रवण ददतो मघानि ||
दान इद्वो मधवान: सो अस्त्व-
यं च सोमो हृदि यं विभर्मि ||
(१०.३२,९).

हे संपन्ना कुरुश्रवणा, धन देणा-या तुझ्याकरितां आम्ही ही कल्याणकारक कर्मे करीत आहोंत. हे स्तोतेहो, तो इन्द्र तुम्हांला दाता होवो. हा सोम ज्याला मी हृदयांत धारण करतों तो तुम्हांला दाता होवो.

विरुद्ध पुराव्याच्या अभावी वरील मंत्रावरुन 'कवष' हा कुरुश्रवणाचा प्रतिनिधिभूत उपाध्याय होता असें दिसतें.

तेहेतिसाव्या सूक्तावरुनहि आपणांस कुरुश्रवण आणि कवष यांचा संबंध दृढ करतां येतो. तेथें खालीलप्रमाणें उल्लेख आला आहे.

कुरुश्रवणमावृणि राजानं त्रासदस्यवम् |
मंहिष्ठं वाघतामृषि: ||  
(१०.३३,४).

त्रसदस्यु पुत्र, राजा कुरुश्रवण याजजवळ ॠत्विजांकरितां मी पेसै मागतों.

कुरुश्रवणावरील आपत्ति.- १ कुरुश्रवण याला मोठी दु:स्थिति प्राप्त झाली होती असें तेहेतिसाव्या सूक्ताच्या प्रारंभीच्या ॠचांरुन दिसतें. त्या ॠचा अशा:-

सं मा तपन्त्यभित: सपत्नीरिव पर्शव: |
नि बाधते अमतिर्नग्नता जसुर्वे र्न वेवीयते मति: ||
भूषो न शिश्ना व्यदन्ति माध्य: स्तोतारं ते शतक्रतो |
सकृत्सुनो मधवन्निंद्र मूळयाधा पितेवनो भव ||
(१०.३३,२; ३;).

'माझ्या बरगड्या सवतीप्रमाणें (शत्रूंप्रमाणें) मला चहूंकडून त्रास देत आहेत. दारिद्रयामुळें येणारी दुर्बुद्धि, वस्त्राभाव आणि क्षणिता मला त्रास देते. पक्ष्याप्रमाणें शत्रूच्या भयानें माझें चित्त कंपायमान झालें आहे. हे इंद्रा, उंदीर ज्याप्रमाणें दोरे तोडतात त्याप्रमाणें मानसिक व्यथा मला सारख्या तोडतात. हे इंद्र आम्हांला सुख दे. पित्याप्रमाणें आमचें रक्षण करणारा हो.'

वरील सायणी अर्थांत पर्शव: याचा अर्थ बरगडया असा केला आहे. परंतु परशु लोक मला चोंहोंबाजूंनीं त्रास देत आहेत असा अर्थ आम्ही जास्त सयुक्तिक समजतों.

यावरुन कवषाचा यजमान कुरुश्रवण याला निकृष्टावस्था प्राप्त झाली होती असें दिसतें, दाशराज्ञयुध्दांतील कवष आणि सूक्तकार कवष हे एकच होते की काय, हें ठरविणें कठिण आहे. झिमरचें म्हणणें पुढें दिलें आहे त्यावरुन कुरु-क्रिवीशीं कवषाचा संबंध जोडतां येत असल्यास पहावा.

कु रु श्र व ण व कु रु यां चा सं बं ध:- कुरुश्रवण या नांवांतील कुरु शब्दावरुन कुरुश्रवणाचा व कुरुचा कांही संबंध असावा असें म्हणण्यास जागा आहे. ॠग्वेदांत कुरु वंशाचा उल्लेख नाही. एवढेंच नव्हे, तर 'कुरु' हे आज्ञार्थी क्रियापदहि फक्त दोनदांच आलें आहे व तेंहि दहाव्याच मंडळांत होय (१०.१९,२; १०.१४५,२).

कुरु वंशाचें स्मरण करुन देणारे किंवा कुरुशीं संबंध दाखविणारें असे शब्द ॠग्वेदांत फक्त दोनच आहेत. एक कुरुङ्ग आणि दुसरा कुरुश्रवण.

कुरुङ्ग शब्दाचा उल्लेख खालील प्रमाणें आला आहे:-

स्थूरं राध: शताश्वं कुरुङ्गस्य दिविष्टिषु |
राज्ञस्त्वेषस्य सुभगस्य रातिषु तुर्वशश्वमन्महि ||
(.४,१९).

'त्या तेजस्वी आणि श्रेष्ठ अशा कुरुङ्ग राजाच्या यज्ञांत लोकांत (तुर्वशेषु) जे श्रेष्ठ धन शंभर घोडे ते आम्ही मानलें.

या मंत्राच्या व्याख्याप्रसंगी यास्काचार्यानें कुरुङ्ग शब्दाबद्ल,

'कुरुङ्गो राजा बभूव कुरुगमनाद्वा कुलगमनाद्वा कुरु: कृन्तते: |’

असा उल्लेख केला आहे. कुरुङ्ग नांवाचा राजा होता. कुरुंचा वंशज होता म्हणून किंवा शत्रुकुलांनां जिंकण्याकरितां जात असे म्हणून त्या कुरुङ्ग असें म्हणत असावें. (कुरुन् गच्छति) किंवा 'शत्रूंनां छेदितो तो कुरु' अशीहि कुरु शब्दाची व्युत्पत्ति देतां येते. यावरुन कुरु वंशाची माहिती किती अपुरी आहे हें वाचकांस कळून येईल.

सू क्त का र क व ष व दा श रा ज्ञ यु ध्दां त प ड ले ला क व ष ए क च का य.- निरुक्तकार यास्कांनांहि त्याबद्दल निश्चय नाहीं हें त्यांच्या दुहेरी लिहिण्यावरुन दिसतें. तथापि कुरुश्रवण येथील ''कुरु'' शब्द पुरुकुत्स येथील ''पुरु'' शब्दाप्रमाणें कुरु वंशाचा बोधक होण्याचा संभव आहे. असो. 'कवष' हा 'वैकर्ण' नांवाच्या संयुक्तजातीचा पुरोहित होता. त्या जातीत कुरु व क्रिवि लोकांचा समावेश होत असून कवष हा त्यांचा वकील होता असें कांहीचें म्हणणें आहे.

कवष हा पांच जातीचा उपाध्याय होता व कुरुश्रवणाच्या मुलानें त्याला वाईट रीतीनें वागविलें म्हणून त्यानें दहाव्या मंडळांतील तेहेतिसावें सूक्त आपल्या राजाच्या क्रोधशमनार्थ केंले. ह्या सर्व मतांची अनुमानावर विशेष भिस्त असल्यामुळें पुरावा या नात्यानें त्यांचा उपयोग बेताचाच आहे. कांही गोष्टी तर विचारार्हहि नाहींत.

कवष हा राजा होता व तो सुप्रसिद्ध होता असें, तो दाशराज्ञ युध्दांत होता व त्याला 'श्रुत' हें विशेषण लावतां येण्यासारखें आहे यावरुन म्हणतां येईल.

कवष ऐलूषाची कथा कौषीतकी व ऐतरेय ब्राह्मणांत दिली आहे. तो कवष आणि हा कवष एकच असणें शक्य आहे (ज्ञानकोश विभाग २, पृष्ठ २३७ पहा).

कवष सूक्तकार आणि दाशराज्ञ युध्दांत पडलेला कवष यांचें ऐक्य धरण्यास अडचण अशी आहे की, सुदासाशी समकालीन राजा, पुरुकुत्स होता. त्या पुरुकुत्साचा मुलगा त्रसदस्यु. कुरुश्रवण हा त्रसदस्यूचा वंशज, तर कवष   कुरुश्रवणाचा स्तुतिकर्ता कसा बनूं शकेंल ? असो.

दु ह्यु, अ नु, पु रु, य दु व तु र्व श या सं बं धी वि शे ष जि ज्ञा सा वा ट ण्या चें का र ण:- दाशराज्ञयुध्दांत गुंतलेले द्रुह्यु, अनु, पुरु, यदु आणि तुर्वश, यांविषयी दोन निरनिराळया कारणांनीं जिज्ञासा उत्पन्न होते. एक कारण म्हटलें म्हणजे पुरुंचें भरतांशी इतर ग्रंथांत वर्णिलेलें ऐक्य आणि दुसरें कारण या पांचांचा महाभारतांत एकत्र झालेला उल्लेख होय. या उल्लेखामध्यें या पांचांच्या संघांतून पुरुंस इतर चारांहून निराळें केलें आहे व दुस-या अनेकांबरोबर त्यांचे ऐक्य दाखविलें आहे.

पु रु, तृ त्सु, भ र त व कु रु, हे ए क च लो क अ सा वे त:- पुरु, तृत्सु, भरत व कुरु हे सर्व वंश एक झाले असा ध्वनि ॠग्वेदांतून व इतर ग्रंथांतून निघतो. पण असेंहि झालें असेल की, हे सर्व वंश एकाच महावंशाच्या शाखा असतील. तृत्सु व पुरु एक असावेत. कां कीं, दिवोदासाला पुरु म्हटलें आहे. तेव्हां भरत आणि पुरु हे मूळचे एकच असावेत. दिवोदास हा जर तृत्सु असला तर पुरु आणि तृत्सु त्यामुळें एक ठरतील. दिवोदास हा तृत्सु असावा यास प्रमाण हें कीं, एक तर त्याचा मुलगा हा तृत्सु होता अगर भरत होता, आणि तृत्सु आणि भरत भिन्न होते की, एक होते हें सांगण्यास कठिण पडतें. वसिष्ठ तृत्सूंचा पुरोहित म्हणवितो व भरतांचाहि पुरोहित म्हणवितो. याशिवाय दिवोदासाच्या एका वंशजास प्रतर्दन म्हटलें आहे. आणि तृत्सूंस प्रतृद् असें वारंवार म्हटलें आहे. पण तेवढयावरुनच सिद्धि होईल असें नाहीं. जेता जिंकलेल्या प्रदेशाचें नांव किंवा पदव्या आपल्या मुलाबाळांस देतो हें प्रिन्स ऑफ वेल्स यासारख्या अत्यंत परिचित उदाहरणावरुन लक्षांत येईल.

कुरु आणि पुरु हे एक होते असें म्हणण्यास आधार कुरुश्रवण हा होय. याला त्रासदस्यव असें म्हटलें आहे. त्रसदस्यु हा पुरुकुलांतील असून पुरुकुत्साचा वंशज होता.

वरील विवेचनावरुन पुरु, कुरु, भरत, आणि तृत्सु हे एकच लोक असावेत असें वाटतें. उत्तरकाली नांवाची पालट झाली नसावी असें म्हणण्यास कारण दिवोदास अतिथिग्वास पुरु म्हटलें आहे. सुदासाच्या वंशजास जर पुरु म्हटलें असतें तर उत्तरकाली भरत आपणांस पुरु म्हणवून घेऊं लागलें असावे असें दिसेल.

दाशराज्ञ युद्धविषयक ॠग्वेदांतील कथा सूत्र:- शिवाय हेंहि लक्षांत ठेविलें पाहिजे कीं जेव्हां तूर्वयाणाबरोबर लढाई झाली तेव्हां आयु (पुरुरवस् याचा मुलगा) कुत्स (पुरु), दिवोदास (पुरु) हे एक होते. म्हणजे ही पुरु व तूर्वयाण यांची लढाई होय. तूर्वयाण हे कदाचित् तुर्वश असणेंहि शक्य आहे. असें असल्यास स्पर्धा करणारी दोन राष्ट्रें तुर्वश व पुरु हीं ठरतात.

पुरुंस तूर्वयाणांनीं अगोदर जिंकले. कालांतरानें पुरु राष्ट्रसंघांतील एक राष्ट्र सुदासाच्या नेतृत्वाखालीं पुढें येऊन स्वातंत्र्य स्थापितें झालें, आणि तुर्वशादि राष्ट्रांस जिकितें झालें.

या भाडणांत इतर पुरुंपैकीं कांहीनीं कांही प्रसंगी सुदासास साहाय्य केलें तर कांहीनीं कांही प्रसंगी विरोध केला, असें कथासूत्र आपणांस दिसून येतें.

अन्वादिराष्ट्रपंचका संबंधी महाभारतांतील उल्लेख:- आतां भारतीय कथेकडे वळून महाभारतांत अनु, द्रुह्यु, यदु, तुर्वश, व पुरु या राष्ट्रपंचकाबद्ल काय उल्लेख आले आहेत तें पाहूं.
महाभारतांत अदिति आणि कश्यप यांची उत्पत्ति सांगून पुढें असें लिहिलें आहे:-

अदित्यां कश्यपाद्विवस्थान् |
विवस्वतो मनु: |
मनोरिला इलाया: पुरुरवा: |
पुरुरवस आयु: |
आयुषो नहुष: |
नहुषस्य ययाति: |
ययातेर्द्वे भार्ये बभूवतु: |
उशनसो दुहिता देवयानी वृषपर्वणश्व दुहिता शर्मिष्ठा नाम ||
आदिपर्व,  (३३.४,७).
तत्र अनुवंशो यथा |
यदुं च तुर्वसुं चैव देवयानी व्यजायत |
द्रुह्युं चानुं च पूरुं च शर्मिष्ठा वार्षपर्वणी ||

य दु तु र्व शां चा वं श:- महाभारतांत एवढाच उल्लेख आहे. यापेक्षां तेथें जास्त माहिती नाही. यदु, द्रुह्यु वगैरे जे लोक ॠग्वेदांत सर्वपरिचित आहेत, त्यांचा हा उल्लेख असावा असें दिसतें. यांचा संबंध दाखविणारी वंशावळ पुढें दिल्याप्रमाणें मांडतां येईल.


या वंशावळींत पांडवांपर्यंत सर्व वंश क्रमानें दिला आहे. महाभारतांतील ह्या वंशावळीवरुन यदुतुर्वशादि पंचजनांच्या पूर्वजांचे आपणांस ज्ञान होतें. प्रश्न एवढाच आहे कीं, भारतान्तर्गत यदुतुर्वश वगैरेंचा व वैदिक यदु तुर्वश वगैरेंचा संबंध काय ? ते एक कीं भिन्न ! ते एकच असें आपण समजलों तर काय हरकत आहे ? या प्रश्नांचा आपण विचार करुं. प्रथम आपणास आपत्ति दिसते ती ही कीं महाभारतांत ययातीचा वृतान्त सविस्तर आला आहे व पुरुरवस्, मनु वगैरेंची हकीगतीह आली आहे; परंतु त्यांचेच जे अत्यंत पुढले वंशधारक 'यदुतुर्वश' वगैरे त्यांचा महाभारतांत पत्ताहि नाही. सध्यां आपण या प्राचीन वाङमयाचा कालानुक्रम जो स्वीकारतों त्याशीं हें अत्यंत विसदृश असें दिसतें. आपल्या विचाराची अशी दिशा असते की वेद हे सर्व ब्राह्मण, पुराणें वगैरेपेक्षां प्राचीन. वेदांत ज्या गोष्टीचा समावेश होईल त्या गोष्टी वेदपूर्वकालीन; आणि भारतांतील भारतपूर्वकालीन व वेदोत्तरकालीन. या कल्पनेस वरील वंशावळीवरुन स्पष्ट बाध येतो. कारण वरील वंशावळीतील बहुतेक व्यक्तींचा ॠग्वेदांत स्पष्ट उल्लेख आहे. देवयानी आणि शर्मिष्ठा यांचा मात्र तेथें उल्लेख नाहीं असें म्हणावें लागतें.

वैदिक व्यक्तीत आणि त्याच नांवांच्या भारतकालीन व्यक्तीत कांही भेद असेल असें म्हणण्यास पुरावा नाही.

वै दि क इ ति हा स ला व ण्या च्या का मी भा र तो क्त इ ति हा सा ची म द त.- यावरुन आपणांस थोडक्यांत असें म्हणतां येईल की भारतांत तत्कालीन हकीकतीपेक्षां अतिप्राचीन अशाहि कांही गोष्टीचा प्रसंगानें समावेश झाला आहे. वैदिक इतिहासाचें पर्यालोचन करते प्रसंगी आपणांस त्या भारतोल्लिखित वेदपूर्वकालीन गोष्टी सविस्तर ध्यानांत घेऊन वैदिक व्यक्तीवर भारतोक्त इतिहासानें जास्त काय प्रकाश पडतो हें ध्यानांत घेतलें पाहिजे. त्या दृष्टीनें या ठिकाणी आपणांस यदुतुर्वशांची व त्यांच्या द्रुह्यु, अनु व पुरु ह्या बंधूंची बरीच स्पष्ट माहिती मिळते व त्यांचा उल्लेख साहचर्यानें कां येतो याचाहि निर्णय करतां येतो.

पु रु वं श.- आतां आपण ह्या पुरुवंशाच्या प्राचीन वंशावळींत वेद आणि भारत यांचा दुवा आपणांस कोठें जोडतां येतो तें पाहूं.

त्याकरितां महाभारतांत आलेली ह्या कुलाची समग्र वंशावळ आपण डोळयांपुढे ठेवली पाहिजे. यदुतुर्वशापर्यंत वंशावलि पूर्वी दिली आहेच. ययातिपुत्र तुर्वश, द्रुह्यु व अनु यांचा उल्लेख महाभारतांत केवळ नाममात्रानेंच आला आहे व यदुपासून यादव वंशाची उत्पत्ति झाली असल्या मोघम माहितीपेक्षां यदूविषयीहि आपणांस फारच थोडें ठाऊक आहे. पुरुंचा वंश मात्र महाभारतांत विस्तारें करुन वर्णिलेला आहे. त्याची वंशावलि येणेंप्रमाणें:-



(* ही खूण ज्यांवर आहे त्यांचा ॠग्वेदांत उल्लेख आहे. sमुंबईप्रतांत परिश्रव्याच्याजागी प्रतिश्रवा असून परिश्रव्यास प्रतीप व प्रतीपास देवापि आदिकरुन तीन पुत्र होते असें म्हटलें आहे. (आदिपर्व, अध्याय ९५, श्लोक ३७९७ पहा.)

श न्त नु व ॠ ग्वे द.- सदर वंशावली पाहतां असें दिसून येतें की भीष्माचा बाप जो शन्तनु त्याचाच उल्लेख ॠग्वेदांत असावा असें म्हणण्यास कथासाम्याचा आधार आहे. भारतान्तर्गत शन्तनु आणि वैदिक शन्तनु यांत काय साम्य आहे तें आपण पाहूं. पहिलें स्पष्ट साम्य म्हणजे देवापि आणि शन्तनु या दोन व्यक्ति महाभारतांत जशा बन्धू म्हणून आल्या आहेत त्याचप्रमाणें त्यांची ॠग्वेदांतही एकत्र नांवे आली आहेत. ते भाऊ होते असें मानण्यास खुद्द ॠग्वेदांत सामीप्योच्चारणाशिवाय कांही अधिक पुरावा नाहीं.

अर्थात् यासंबंधांत यास्क व सायण हे प्रमाण आहेत. तथापि प्रथम ॠचांमधून काय काढतां येतें तें पाहिलें पाहिजे. पहिलें नामसाम्य वर आलेंच आहे. आतां थोडें चरित्रसाम्य दाखवितां येईल. महाभारतांत देवापीनें बालपणींच विरक्ति स्वीकारली आहे व ॠग्वेदांतहि तो पुरोहितरुपानें आला आहे. त्याला पोषक असा दुसरा पुरावा म्हणजे तपश्चर्येनें देवापि ब्राह्मण झाला असें शल्यपर्वांत (अ. ४० मध्यें) आलें आहे व आर्ष्टिषेणाचाहि तेथेंच उल्लेख आला आहे हेंहि महत्वाचें साम्य म्हणून स्वीकारण्यास हरकत नाही.

श न्त नु व या स्क.- आतां यास्कांनीं (२.११) दिलेली हकीगत हीहि देवापि व शन्ततु यांस जोडणारा पुरावा म्हणून किंवा वैदिक उल्लेखापासून पौराणिक कथेपर्यंत जें कथारुपांतर झालें त्याच्या पाय-या म्हणून आपणांस घेतां येईल. यास्काचार्यांनीं दिलेली माहिती पुढें दिल्याप्रमाणें आहे.

देवापिश्वार्ष्टिषेण: शन्तनुश्व कौरव्यौ भ्रातरौ बभूवतु: | स शन्तनु: कनीयानभिषेचयांश्वक्रे देवापिस्तप: प्रतिपेदे | तत: शन्तनो राज्ये द्वादश वर्षाणि देवो न ववर्ष | तमूचुर्ब्राह्मणास्त्वया चरितां ज्येष्ठं भ्रातरमन्तरित्याभिषेचितं तस्मात्ते देवो न वर्षति | स शन्तनुर्देवापि शिशिक्ष राज्येन | तमुवाच देवापि: पुरोहितस्ते ऽ सानि याजयानि च त्वेति |

अर्थ:- आर्ष्टिषेणदेवापि आणि शन्तनु हे कुरुवंशांतील दोघे भाऊ होते. धाकटया शन्तनूला राज्याभिषेक झाला. देवापि तपाला गेला. त्यामुळें शन्तनूच्या राज्यावर बारा वर्षे अवर्षण पडलें. ब्राह्मण म्हणूं लागले की थोरल्या भावास सोडून तुला राज्याभिषेक झाला म्हणून असें झालें. देवापीला शन्तनूनें राज्य दिलें. देवापि म्हणाला मी पुरोहित होतों आणि तुझ्याकडून यज्ञ करवितों.

ॠग्वेदान्तर्गत व भारतान्तर्गत इतिहासाची सांखळी.- निरुक्तांतील ह्या वृत्तान्तांतून पुढें दिल्याप्रमाणें चार मुद्दे निघतात.

   (१) देवापि व शन्तनु हे दोघे भाऊ होते.
   (२) देवापि विरक्त होता.
   (३) म्हणून धाकटा शन्तनु गादीवर बसला;
   (४) व त्यामुळें पातक घडून अवर्षण पडलें. ह्यावरुन यास्कांनांहि महाभारतांतील प्रसिद्ध देवापि व शन्तनु आणि ॠग्वेदांतील देवापि व शन्तनु हे एकच आहेत ही गोष्ट अभिमत होतीसें दिसतें. यास्कांचें म्हणणें बरोबर आहे असें गृहीत धरल्यास -व तसें गृहीत धरावें लागतें - या कथेच्या योगानें आपणांस ॠग्वेदान्तर्गत व महाभारतान्तर्गत इतिहासाची सांखळी जोडतां येतें.

वि रु द्ध पु रा वा:- उपर्युक्त सांखळी जोडण्यास विरुद्ध पुरावा काय आहे त्याचा आतां आपण विचार करुं. सदरहु सांखळीवर घेतां येण्यासारखे आक्षेप म्हटलें म्हणजे
(१)    ॠग्वेदांत भाऊ असा स्पष्ट उल्लेख नाहीं.

(२)    वेदांत आर्ष्टिषेण हें पैतृक नांव आहे; त्याचा भारताशीं मेळ बसत नाही.

(३)    भाऊ उपाध्याय कसा.

यांची उत्तरें थोडक्यांत खालील प्रमाणें देतां येतील.

(१) भाऊ म्हणून उल्लेख नाही; तथापि, निरुक्तावरुन आपणांस तसें घेतां येईल.

(२) वेदांत व निरुक्तांत देवापि व शन्तनु यांस 'आर्ष्टिषेण' असें म्हटलें आहे व भारतांत परिश्रवस् प्रतीप हें शन्तनूच्या पित्याचें नांव आहे. वंशावळींत पूर्वी कोणाचेंहि ॠष्टिषेण हें नांव नाहीं. यावरुन हें नांव कांही तरी विशेष कारणानें पडलें असावें, पैतृक नांव नसावें. निरुक्तकारांसहि या बाबतींत संशय असावा. त्यांनीं 'ॠष्टिषेणस्य पुत्र इषितसेनस्येति वा' असें म्हटलें आहे व सेना शब्दाचें विवरण 'सेश्वरा समान गति र्वा' असें केलें आहे त्यावरुन असें दिसतें कीं परिश्रव्यास जसें ' प्रतीप' हें एक नांव होतें त्याप्रमाणेंच ॠष्टिषेण असें हि दुसरें टोपणनांव असावें. 'परिश्रव्याच्या पित्याचें भीमसेन असें नांव आहे, त्यावरुन या गोष्टीस कांही विरोध येत नाहीं. येथें एक महत्वाची गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे कीं, आर्ष्टिषेण हें फक्त देवापीलाच विशेषण लावलें आहे, शन्तनूस लावलें नाहीं.

(३) स्वत:च्या घरच्या गोष्टी स्वत:च कराव्यात व सध्यांहि स्वगृहांतील ॠत्विज करण्याची सशास्त्र चाल आहे. अर्थात् भाऊ पुरोहित म्हणण्यास कांही हरकत नाही.

महाभारतांतील वंशावळी वगैरे वस्तुस्थितीशीं धरुन पूर्वापर विरोधरहित आहेत कीं नाहींत याबद्ल विचार तूर्त एका बाजूस ठेवून 'सिद्धस्य गतिश्चिन्तनीया' या न्यायानें व्यवहार करण्याचें ठरवावें असें वाटतें; व त्या त-हेनेंच आतांपर्यंत विचार केला आहे.

यावरुन राष्ट्रपंचकाचा इतिहास आपणांस भारताशीं जोडतां येतो असें कांही अंशी म्हणावयास हरकत नाहीं. आणखीहि कांही हकीकत महाभारतांत (१.७७) पहावयास सांपडते. परंतु ती सध्यां आपणांस महत्वाची नसल्यामुळें तिच्याबद्ल उहापोह करण्याचें कारण नाही.

ॠग्वेदवययातीचाशाप:- तुर्वश हा ययातिपुत्र होता व त्याच्या अभिषेकाविषयीं ययातीचा कांही शाप (१.८४) होता. ह्या सर्व गोष्टी सायणाचार्यांना कबूल होत्या असें सायणभाष्यावरुन दिसतें.

उत त्या तुर्वशायदू अस्त्रातारा शचीपति: इन्द्रो विद्वाँ अपारयत् |
(.३०,१७).

अर्थ:- सायणांप्रमाणें-तसेंच ययातिशापानें अनिभिषिक्त राहिलेल्या त्या प्रसिद्ध तुर्वश व यदु राजांना कर्मांचा पालक जो इन्द्र त्यानें सर्व गोष्टी जाणून अभिषेकार्ह केलें.

यावरुन ॠग्वेद व महाभारत यांची सांगड कशी घातली गेली होती हें समजतें.

वैदिक साहित्याच्या द्वारें महाभारतोक्त इतिहासाची तपासणी.- महाभारतांतील उल्लेखांची तपासणी वैदिक साहित्याच्या द्वारें करावयाची झाल्यास खालीलप्रमाणें शेरे मारतां येतील.

भारतकारांनीं सर्वांत प्राचीन असा राजा पुरुरवा केला आहे. हा देखील मनु व इला यांचा वंशज म्हणून दिला आहे. याला शतपथ ब्राह्मणांत (११.५,१) ऐल हें विशेषण लावलें आहे एवढाच आधार आहे. आयु हा त्याचा मुलगा होता यास वेदांत आधार नाहीं. आयूचा मुलगा नहुष या विधानालाहि वेदांत आधार नाहीं. नहुषाचा मुलगा ययाति यास वेदांत आधार आहे. ययातीचे पांच राष्ट्रसंस्थापक मुलगे ही कल्पनाच आहे. यदुतुर्वशांचें अस्तित्व वैदिक आधारावरुन ययातीच्या पूर्वीहि घालतां येईल.

ययातीच्या नंतर भरतदौष्यन्तीपर्यंत जे राजे झाले म्हणून महाभारत म्हणतें त्यांपैकीं वेदांत कोणाचाच उल्लेख नाहीं. दौष्यन्ती भरतांचा उल्लेख ब्राह्मणांत येतो. अजमीढ, संवरण देवांपि, शंतनु व धार्तराष्ट्र हे पुढचे राजे म्हणून वर्णिलेले व राजपुत्र म्हणून वेदांत उल्लेखिले आहेत; पण त्यांचा असा संबंध जोडलेला नाहीं. त्यांच्या दोन निराळया कथांमध्यें घोटाळा असावा.

ॠग्वेदांतील सूक्तावरुन देवापि हा, ज्याला औलान हें नांव होतें त्या शंतनूकरितां यज्ञ करीत होता असें निश्चित दिसतें; पण हे दोघे भाऊ होते असें त्यावरुन दिसत नाहीं व देवापि हा ब्राह्मण नव्हता तर क्षत्रिय होता ही गोष्ट ॠग्वेदावरुन सिद्ध होत नाहीं. सायण जो अर्थ करतो त्याला आधार त्यानें निरुक्ताचा घेतलेला आहे. त्याचें असें मत आहे की, देवापि हा क्षत्रिय होता पण बृहस्पतीच्या कृपेनें त्याला पुरोहिताचें काम करतां आलें. ॠग्वेदांतील सूक्तावरुन, क्षत्रियानें पुरोहिताचें काम करणें हे नेहमीच्या प्रचाराविरुद्ध होतें ही गोष्ट स्पष्ट दिसतें.

कौरवांचा उल्लेख अगदीच नाहीं असें नाहीं. वैदिक वाङमयांत शांखायन सूत्राच्या कांही हस्तलिखितांत (१२.१४,१) व अथर्ववेदांत (२०.१२७,) ज्याला कौरम म्हटलें आहे त्याचेंच कौरव हें दुसरें रुप आहे. आपि हा रुशम यांच्या मध्यें मोठा दाता होता असें दानस्तुतीत लिहिलें आहे. कुरुंचा क्रिवीशीं जसा संबंध जोडण्यांत येतो त्याप्रमाणें कृत्वन् नांवाचें एक राष्ट्र होतें असें समजून त्याशींहि जोडण्यांत आला आहे. ॠग्वेदांत एका ठिकाणा कृत्वन् हा शब्द अनेक वचनांत आर्जीक आणि पांच लोक यांच्या बरोबर लिहिला आहे. पिशेल म्हणतो कीं त्यांचा अर्थ लोक असा आहे; आणि सायण म्हणतो की कृत्वन् हे एका देशाचें नांव आहे. ह्या दृष्टीनें हें नांव कुरु अथवा क्रिवि यांच्याशीं संबंध दाखवील. तथापि हिलेब्रँट म्हणतो कीं, हें आर्जीक ह्यांचे विशेषण आहे आणि त्यांच्या प्रतिपक्षानें त्यांना तें जादूगार अशा अर्थानें लाविलें आहे. ह्या त्याच्या मताला दुजोरा म्हणून, तो असा पुरावा देतो कीं, काश्मिरी लोकांनां आसपासचे राजे इतक्या तिरस्कारानें लेखीत असत कीं त्यांच्याशी कोणत्याहि त-हेचा मित्रसंबंध ते ठेवीत नसत आणि त्यांचे नांव त्यांनीं किलि-टो (Ki. li. to) अथवा कृत्य: असें ठेविलें होतें{kosh Cunninghain, Ancient Geography of India, 93, of Roth, St. Petersburg Dictionary S.V.}*{/kosh}.

(तो म्हणतो कीं, जुन्या काळीं काश्मिरांत ज्या आर्जीकांनीं वस्ती केली त्यांची आणि नंतरचे वास करणारे त्यांचे वंशज ह्यांचीहि तीच अपकीर्ति होती.)

उपर्युक्त कृत्वन्संबंधी ॠग्वेदांत पुढे दिल्याप्रमाणें उल्लेख आला आहे:-

य अर्जिकेषु कृत्वसु ये मध्येपस्त्यानाम् | ये वा जनेषु पञ्चसु
(.६२,२३)

आर्जीक देशांतील लोक, कृत्वन् देशांतील लोक, सरस्वत्यादि नद्यांच्या समीप असणा-या देशांतील लोक आणि निषाद व चातुर्वर्ण्यांतील म्हणजे ह्या पांच जातींतील लोक जे सोमरस पिळतात (ते सोमरस आमच्यावर आकाशांतून पर्जन्यवृष्टि करवीत)- सायण.

आर्जीक लोकांत, उद्योगी माणसांत, मनुष्यांच्या घरांत किंवा पांच जातींच्या लोकांत (पिळले जाणारे सोमबिन्दू आमच्यावर आकाशांतून पर्जन्यवृष्टि करोत)-ग्रिफिथ.

अ नु:- आतां आपण दाशराज्ञ युध्दांतील सुदासाच्या इतर मुख्य शत्रूंकडे वळूं. मागें दिलेल्या ७.१८ या सूक्तांतील उल्लेखांशिवाय ॠग्वेदांत अनूंविषयी जे उल्लेख सांपडतात ते येणेंप्रमाणें:

अनवस्ते रथमश्वाय तक्षन् त्वष्टा वज्रं पुरुहूत द्युमंतं |
ब्रह्माण इन्द्रं महयन्तो अर्कै रवर्धयन्नहये वा उ ||
(.३१,४)

हे इन्द्रा तुझा रथ आनूंनी तासून तयार केला. त्वष्टा तुझें वज्र दीप्तिमान् करतां झाला. आणि इन्द्राला स्तवणारे थोर ॠषी (अङ्गिरस) किंवा मरुत अहीला मारण्याकरितां स्नोत्रांनीं तुला उत्साहयुक्त करते झाले- सायण.

यदिन्द्र प्रागपागुदङ् न्यग्वाहूयसे नृभि: |
सिमा पुरु नृषूतो अस्यानवेसि प्रशर्ध तुर्वशे |
(.४,१).

हे इन्द्रा, सर्व दिशांनी स्तोत्यांकडून तूं बोलावला जातोस. तथापि हें श्रेष्ठा, हे पराभव करणा-या, स्तोत्यांकडून आनवांविषयीं विशेष प्रेरणा केला जातोस-सायण.

यई राजानावृतुथा विदधद्रजसो मित्रो वरुणश्विकेतत् |
गभ्भीराय रक्षसे हेतिमस्य द्रोघाय चिद्वचस आनवाय ||
(.६२,९)

जो मनुष्य सर्व लोकांचे राजे असणारे जे (दोन) अश्विनीकुमार त्यांची प्रत्येक ॠतूंत सेवा करतो, त्याला मित्रावरुण देव जाणतात. त्यामुळें हा सेवा करणारा महाबलवान् असणा-या राक्षसावर शस्त्र फेंकतो. द्वेषमूलक अनूंच्या भाषणाचा नाश करतो-सायण.

या उल्लेखांत जी काय माहिती मिळत असेल ती वाचकांनी घ्यावी. ॠग्वेदांतील एका सूक्तांत (.३) उदार धनिक म्हणून ह्यांचें वर्णन आलेलें आहे. लुडविग (ॠग्वेदाचें भाषांतर .१६०) म्हणतो कीं 'अनु' हा त्याच नांवाच्या लोकांचा राजा असावा; पण ह्याबद्दलचें कारण तो सांगत नाहीं.

भे द.- भेदाविषयी जी माहिती मागें येऊन गेली तीत भरणा म्हणून एक टीप देतों. याचा ॠग्वेदांत क्वचित् उल्लेख आहे, पण अथर्ववेदांत त्याचें नांव येतें. त्याचा शेवट फार वाईट झाला. कारण, इन्द्रानें त्याजजवळ गाय (वशा) मागितली असतां त्यानें ती दिली नाही. रोठ म्हणतो {kosh St. Petersburg Dictionary सामवेद १३.}*{/kosh}  कीं आधींचा भेद व यांत कांही संबंध नाही. परंतु ही गोष्ट संशयास्पद आहे. वस्तुत: हीच गोष्ट जास्त संभवनीय दिसते कीं, याचा पराभव झाल्यामुळें दुष्ट मनुष्याच्या दुर्गतीचें हा उदाहरण मात्र झाला. शिवाय, ह्यांचें धर्मलंडपणाचें वर्तन जें एवढें गाजलें आहे त्याचें करण म्हटलें म्हणजे अनार्य अज व शिग्रु यांची कड घेऊन त्यांचे नेतृत्व यानें पत्करिलें हे होय.

आतां अज व शिग्रु हे अनार्य वन्यदैवतपूजक होते किंवा नाहीं याबद्ल निश्चित कांहीच माहिती नाहीं परंतु भेदाचा व त्यांचा संबंध आला होता.

शंबर:- ॠग्वेदामध्यें इंद्राच्या शत्रूंचें हें नांव आलेलें आहे (.५१,६; ५४, ४; ५९, ६; १०१, २; १०३, ८; ११२, १४; १३०, ७; .१२, ११; १४, ६; १९, ६; .२६, ३; ३०, १४; .१८, ८; २६, ५; ३१, ४; ४३,१; ४७, २; २१. .१८, २०; ९९, ५,). त्याचें नांव शुष्ण, पिप्रु व वर्चिन् ह्यांच्या बरोबर आलेलें असून एके ठिकाणीं त्याला कुलितराचा मुलगा दास असें म्हटलेले आहे (.२६,५.). दुस-या एका ठिकाणी आपण देवक (जवळ जवळ देवाप्रमाणें) झालों असें त्याला वाटल्याचा उल्लेख आलेला आहे (ॠ. .१८,२०;). त्याची ९० (ॠ. .१३०,७), ९९ (ॠ. .१९,६,), किंवा १०० (ॠ. .१४,६) नगरें होतीं असें वर्णन आहे. हा शंबर शब्दच नपुंसकलिंगी अनेक वचनी शंबराचें किल्लें अशा अर्थानें वापरला आहे (ॠ. .२४,२). त्याचा मुख्य शत्रु दिवोदास अतिथिग्व होय. कारण, ह्यानेंच इंद्राच्या मदतीनें त्याचा पराभव केला (ॠ. .५१,६; १३०, ; २.१९, ६; . २६, ३ इत्यादि). शंबर हा कोणी खरा पुरुष होऊन गेला कीं नाही ह्याबद्ल शंकाच आहे. हिलेब्रँटचें असें ठाम मत आहे की शंबर हा दिवोदासाच्या शत्रुवर्गातील एक राजा होता. शंबराचा कोणत्या मंडळांत किती वेळ उल्लेख आला आहे याचा हिशेब करुन त्यावरुन तो असा निर्णय काढतो कीं, दिवोदासाच्या वेळच्या ॠग्वेदीय सूक्तांमध्यें तो खराखुरा शत्रु म्हणून समजलेला आहे; पण मागाहून झालेल्या ॠग्वाङमयांत उदाहरणार्थ, सातव्या मंडळांत त्याला राक्षस बनविलें आहे {kosh शंबरासंबंधी उल्लेख पहिल्या मंडळांत सात वेळां, दुस-यांत चार वेळा, चौथ्यांतं दोनदां, सहाव्यांत सहादां व सातव्यांत दोनदां आले आहेत. ह्या उल्लेखावरुन पाहिले असता इतर ठिकाणांपेक्षां सहाव्या मंडळांत खरेपणा अधिक दिसतो. दुस-या व सातव्या मंडळांतील उल्लेख काल्पनिक आहेत.}*{/kosh} कारण, त्या वेळीं वैदिक काळचे आर्यन् लोक अरेकोशिया देश सोडून हिंदुस्थानांत आले होते. ही विचारसरणी जरी सोडून दिली, तरी हिंदुस्थानांतल्या डोंगरांत राहणा-या लोकांचा हा नायक असून सुदासाचा शत्रु असावा हें शक्य आहे.

वै क र्ण.- हा शब्द ॠग्वेदामध्यें एकदां (.१८,११) दाशराज्ञाच्या वर्णनांत आलेला आहे व ह्या ठिकाणी असें वर्णन आहे की, सुदासानें राजांच्या एकवीस जनांचा किंवा दोन वैकर्णांच्या लोकांचा पराभव केला. झिमरची अशी कल्पना आहे कीं हे लोक कुरु व क्रिवी मिळून झालेले संयुक्त लोक असावे.{kosh Zimmer, Altindisches Leben, १०३}*{/kosh} ही कल्पना मॅकडोनेलच्या मतें बरीच संभाव्य दिसतें. महाभारतामध्यें (६.२१०५) विकर्ण हें एक प्रकारच्या लोकांचें नांव म्हणून आलेले आहे व एका कोशकाराच्या मतें हे विकर्ण लोक काश्मिरांत रहात असत.{kosh St. Petersburg Dictionary, S.V. Hopkins (Joural of the American Oriental Society, 15, 261 et seq.) यास 'वैकर्णौ' शब्दानें दोन वैकर्ण राजे उल्लेखिलेले वाटतात.}*{/kosh} महाभारतांतील सदरहू उल्लेख बहुधा, काश्मिरांत पूर्वी कुरु लोकांची खरोखरच वसाहत असेल तिच्या आठवणीचा दर्शक दिसतो.

दा श रा ज्ञ यु ध्दां ती ल सु दा सा चे आ ण खी श त्रूं.- दाशराज्ञ युध्दांत ज्यांचा समावेश झाला असावा असें कांहीचें म्हणणें आहे असे सुदासाचें आणखी शत्रू म्हटलें म्हणजे (१) यदु, (२) मत्स्य, (३) पक्थ, (४) भलानस, (५) अलिन, (६) विषाणिन् , (७) अज, (८) शिव, (९) शिग्रु, व (१०) यक्षु हे होत.

यांपैकीं यदु हे महत्वाचे आहेत. त्याचें बरेंचसें वर्णन तुर्वशांबरोबर पूर्वी येऊन गेलेंच आहे. दाशराज्ञ युध्दाला जें नांव मिळालें आहे तें सुदासानें दहा राजांविरुद्ध लढून जय मिळविला या गोष्टीवरुन मिळालें असावें असा समज आहे. परंतु दाशराज्ञ यांतील दश हा शब्द केवळ दहा हीच संख्या दर्शविण्याकरितां योजिलेला असेल असें दिसत नाहीं. कारण, सुदासाबरोबर ज्यांचें युद्ध झाल्याचें वर्णन आपणांत ॠग्वेदांतील ॠचांत आढळतें त्यांची संख्या दहापेक्षां अधिक दिसते व त्या सर्वांचा पराभव एकाच ठिकाणी व एकाच वेळीं झालेला दिसत नाहीं. यदुतुर्वशांचा देश व भेदाचें राज्य यांत बरेंच अंतर दिसतें व एक प्रदेश या स्वारीचा आरंभ दाखवितो तर दुसरा त्या स्वारीचा शेवट दाखवितो. यावरुन दहा ही संख्या केवळ एक ठोकळ आंकडा म्हणून दिलेला असावा. तसेंच, यदु, तुर्वश, अनु व द्रुह्यु ही ज्याप्रमाणें बलिष्ठ व सुधारलेलीं राष्ट्रें दिसतात व इन्द्र, अश्विनौ इत्यादि देवतांची उपासना करतांना आढळतात, त्याप्रमाणें पक्थ, भलानस, विषाणिम् , अलीनस् व (ॠ. १.१३०, ७; ४. ३०, १४,६. २६,५; तुलनार्थ लुडविग, ॠग्वेदाचें भाषांतर ३,१७७; मॅकडोनेल 'वेदिक मायथॉ-लॉजि' पृ. १६१; ओल्डेबनर्ग. Zeitschrift der Dentschen Morgenlandischen Gesellschaft, 42, 210; गेल्डंनर, Rigweds, Glossar, 178 पहा.)
शिव यांच्या उपासनाविषयासंबंधानें निश्चित माहिती मिळत नाहीं. त्यांची एक जूट असावी एवढें मात्र दिसतें. कदाचित् त्यांनी एकत्र होऊन सुदासास विरोध केला असावा. त्याप्रमाणेंच भेद व त्याचे अनुचर, यक्षु, शिग्रु व अज यांच्या संस्कृतीसंबंधानें निश्चित माहिती सांपडत नाहीं.

निरनिराळया काळीं सुदासाविरुद्ध असलेल्या ह्या लोकांसंबंधानें उतारें येणें प्रमाणें:-

आ पक्थासो भलानसो भनंतालिनासो विषाणिन: शिवास: |
आयोनयत्सधमा आर्यस्य गव्या तृत्सुभ्यो अजगन्युधानृन् ||
(.१८,७).

हवि शिजविणारे, भद्रमुख, तप करुन देखील न श्रमलेले, हातांत खाजविण्याकरितां विषाण घेतलेले, (जगताचें) कल्याण करणारे व सोम नि झिंगलेले असे जे लोक होते त्यांनीं आर्यांच्या गाईंचे कपळ तृत्सूपासून युध्दांत सोडविले व त्यांनां ठार केलें-सायण.

पक्थ, भलानस, अलिन, शिव, विषाणिन् हे बरोबर आले. तथापि लूट आणि वीर यांच्या आवडीनें आर्यांचा सखा तृत्सूंचा नायक होण्याकरितां आला- ग्रिफिथ.

याभि: पक्थमवथो याभिरध्रिगुं याभिर्बभुं विजोषसम् |
ताभि र्नोमक्षूतूयमश्विनागतं भिषज्यतं यदातुरम् ||
(.२२,१०).

हे अश्विदेव हो, राजा पक्थ, अध्रिगु आणि विशेष रीतीनें प्रसन्न करणारा बभ्रु यांचें ज्या स्तोत्रामुळें संरक्षण केलेंत त्याच स्तुतीनें रक्षणार्थ या (व) रोगयुक्तांनां औषध द्या-सायण.

(हे अश्विनांनों ! ) तुम्ही पक्थ, अध्रिगू आणि सोबत्यांपासून अलग झालेल्या बभ्रूला ज्या साधनांनीं मदत केली ती साधनें घेऊन तुम्ही येथें वेगानें व लवकर या व जें कांही रोगग्रस्त झालें असेल तें बरें करा-ग्रिफिथ.

इदमित्था रौद्रं गूर्तवचा ब्रह्मक्रत्वा शच्या मंत राजौ |
काणायदस्य पितरा मंहनेष्ठा: पर्षत्पक्थे अहन्ना सत्पहोतृन् ||
(१०.६१,१).

स्तोत्रकर्ता नाभानेदिष्ट रुद्रस्तुत्यात्मक स्तोत्र अंगिरसांच्या सत्रामध्यें (पित्याच्या सांगण्यावरुन) द्रव्यलालसा धरुन पठन करता झाला. अशारितीनें द्रव्यप्राप्त्यर्थ आईबापांनीं व बांधवांनीं करुन दिलेल्या त्या स्तोत्रानें (स्तोत्रसाह्यानें) सहाव्या दिवशीं (यज्ञ समाप्तीच्या दिवशी) अंगिरसांच्या सत्रामध्यें येऊन होता, प्रशास्ता, ब्राह्मणाच्छंसी इत्यादि सप्त होत्यांनां संतुष्ट करुन यज्ञ पार पाडला-सायण.

जेव्हां अतिशय उदास अशा देवानें (इंद्रानें) पक्थाकरितां त्याचे आईबाप संरक्षिलें आणि सात होत्यांवर हल्ला केला तेव्हां स्वागतवक्त्यानें (तुर्वयाणानें) लढाईच्या धुमश्चक्रित, अश्विनांनां वळविण्याकरितां हें स्तोत्र मोठयानें गाइलें-ग्रिफिथ.

आवदिन्द्रं यमुना तृत्सवश्व प्रात्र भेदं सर्वताता मुषायत् |
अजासश्व शिग्रवो यक्षवश्व बलिं शीर्षाणि जभुरश्व्यानि ||
(.१८,१९).

या युध्दांत भेदाला (सुदासानें) नागविलें म्हणून यमुना नदी आणि तृत्सु लोक यांनी त्याला संतुष्ट केलें. आणि अज, शिग्रु व यक्षु यांनी घोडयांचीं डोकीं नजर केली-सायण.

यमुना आणि तृत्सु यांनी इंद्राला मदत केली. तेथें त्यांने भेदाची सर्व संपत्ति घेऊन त्यास नागविलें. अज, शिग्रु व यक्षु यांनीं खंडणी म्हणून त्यास घोडयांचीं मुंडकी नजर केली- ग्रिफिथ.
दाशराज्ञ युध्दाचा कालनिश्चय :- आतां आपण दाशराज्ञ युध्दाचा कालनिश्चय आपणांस करतां येतो काय हें पाहूं.

पहिला प्रश्न हें युद्ध किती कालपंर्यंत चाललें असावें.? दिवोदासापासून सुदासापर्यंत चार पांच राजे मध्यें येऊन गेले असावेत असें पुराणांतील वंशावळीवरुन पारगिटेर म्हणतो. या विधानास वेदांत आधार नाहीं. दिवोदास हा सुदासाचा बापच असावा असा पुरावा पुष्कळ सांपडतो. हें युद्ध म्हणजे फार तर पन्नास वर्षे चाललें असावें.

या युध्दाशीं संबंध ज्यांचा येतो त्या पुरुषांच्या उल्लेखांच्या ॠचा वेदांत पुष्कळ आहेत. युध्दाचा काल ठरवितां आला तर वेदांतल्या ब-याचशा ॠचांचा काल ठरवितां येईल.

सुदासाचा महाभारतांत पत्ता नाहीं. दिवोदास तीन दिसतात. एक वध्य्रश्वाचा मुलगा. त्याच्याशीं वेदांतील दिवोदासाची तुलना करतां येईल, पण हरिवंशपुराणकारांनीं ज्या राजमालिकेंत व ज्या स्थली दिवादासास बसविलें आहे तेथें तो असणें शक्य नाहीं. शिवाय याच्या विजयाचा अगर लढायांचा पौराणिक ग्रंथांत पत्ताच नाही.

धार्तराष्ट्रांची उल्लेख कठसंहितेंत येतो, व पारिक्षितेंत येतो, व पारिक्षित जनमेजयाचा उल्लेख अथर्ववेदांत येतो. पण हे दोन्ही काळ भाषादृष्टीनें व यजनधर्मविकासाच्या दृष्टीनें दूरचे आहे. सुदासाला पौराणिकांनी आणि त्यांचा अनुयायी पारगिटेर यानें भारती युध्दाच्या अगोदर १३|१४ पिढया एवढेंच दूर ठेविलें आहे. म्हणजे दाशराज्ञयुध्दाचा काल त्या मताप्रमाणें कुरुयुध्दापूर्वी २५० वर्षे असावा.

पौ रा णि कां ची क ल्प ना सृ ष्टि:- पूर्वगत विवेचनावरुन प्राचीन कथा साहित्य घेऊन पौराणिकांनी त्यावरुन कल्पना कशी काय लढविली हें मात्र आपल्या चांगलें ध्यानांत येतें.

मनु हा पुराणपुरुष मंत्रांतच वर्णिला आहे; पण त्यास पौराणिकांनी एकाद्या किंवा अनेक राजघराण्यांचा पूर्वज करुन टाकलें आहे.

पुरुरवस् (पौराणिक पुरुरवस् ) आपणांस ऐल म्हणवीत असे. याज्ञिकांच्या संप्रदायांत इडा, उर्फ इळा, उर्फ इला ही देवता झाली. तिला मनूची मुलगीच म्हटलें आहे. पौराणिकांनी इळेस खरोखरीची राजकन्याच बनविली आणि पुरुरव्यास तिचा मुलगा, करुन टाकलें.

पुरुरवा हा खराखुरा राजा असावा की ही व्यक्ति कल्पना समुच्चयानें तयार झाली असावी हें सांगतां येत नाही. जो राजा स्वर्गांतील एका अप्सरेंचा नवरा झाला तो प्राचीनच असला पाहिजें. तूर्वयाणाविरुद्ध पुरुकुत्स आणि दिवोदास यांच्या तफेंनें लढणारा आयु याचा आणि पुरुरव्याचा पौराणिकांनीं संबंध जोडून दिला. अर्थात् यामुळें या आयूस बरीच प्राचीनता आली. पांच राष्ट्रे ययातीपासून निर्माण करण्याच्या खटपटीत पौराणिकांनीं, वृषपर्वा आणि त्याचा गुरु शुक्र यांच्या मुलीचें भांडण, त्यांचा पुढें ययातींशीं विवाह, इत्यादि कथा मूळ गोष्टीस जोडल्या. दौष्यंति भरत याच्या जन्माला दुष्यंतशकुंतलेची कथा जोडण्यांत आली. वगैरे अनेक कल्पनेचे प्रकार आपणांस पुराणांत दिसून येतात.

दौष्यंति भरत हा वेदाप्रमाणें बराच उत्तरकालीन पुरुष दिसतो. पण पुराणकालांत तो प्राचीन पुरुष आहे. त्याच्या पूर्वी अनेक वर्षे दिवोदास-सुदास झाले असावेत असें धरल्यास, म्हणजे आयूशीं समकालीन दिवोदास सुदास धरल्यास-आपणांस कुरुयुध्दापूर्वी दीड एक हजार वर्षे मागें जावें लागेल. दाशराज्ञयुध्दाच्या कालनिश्चयाचा प्रश्न इतका असमाधानकारक स्थितीत आहे.

वे द का ली न सां स्कृ ति क स्थि ती ब द्द ल पु रा वा.- वेदकालाची एकंदर सांस्कृतिक स्थिति कशी होती यावर पुरावा दोन प्रकारचा आहे. एक पुरावा म्हटला म्हणजे वेदांतील शब्द व वेदांतील उल्लेख आणि दुसरा पुरावा म्हटला म्हणजे महाभारतादि ग्रंथांतील प्राचीन इतिहास. याशिवाय तिसरा पुरावा आजच्या स्थितींत उपलब्ध नाहीं. पुराणवस्तुसंशोधनशास्त्राची मजल त्या कालापर्यंत पोंचली नाही.

मानववंशशास्त्र इतकें मुग्धावस्थेंत आहे कीं, भाषांचा संबंध शरीरस्वरुपाशीं निश्चितपणें लावतां येण्याइतकें तें वाढलें नाही. म्हणजे आजच्या लोकांच्या स्वरुपावरुन प्राचीन काळाच्या इतिहासाशीं नातें जोडण्याची आज शक्यता नाही.

दा श रा ज्ञ यु ध्दा सं बं धी ज म ले ली मा हि ती.- दाशराज्ञयुध्दाचा येथपर्यंत जो उहापोह झाला त्यावरुन एकंदर निष्पत्ति काय झाली हें आतां पाहूं.

जमलेल्या माहितीचे दोन विभाग करतां येतील. एक विभाग म्हटला म्हणजे दाशराज्ञयुध्दाचें ऐतिहासिक वृत्त-म्हणजें जें झालें असेल तें शोधून काढणें; आणि दुसरा विभाग म्हटला म्हणजे त्याचा ॠग्वाङमयाशी संबंध.

दा श रा ज्ञ यु ध्दा चें ऐ ति हा सि क वृ त्त.- वृत्त आपणांस येणें प्रमाणें दिसतें. दिवोदास व सुदास हा एक पक्ष ज्यांत आहे असें युद्ध झालें होतें. तें युद्ध बरेंच वर्षे टिकलें असावें. तें युद्ध ज्या पक्षांबरोबर झालें ते पक्ष निरनिराळया काळांत निरनिराळे असतील. एका वेळेस तूर्वयाण तर दुस-या वेळेस यदुतुर्वश. हे युद्ध करतांना दिवोदास सुदासांनीं स्थानिक उपाध्याय किंवा पुरोहित आपल्याकडचे करुन स्थानिक राजांचें उन्मूलन करावें अशी नीति आचरली असावी. ज्या वेळेस सुदास व दिवोदास आले त्या वेळेस ते आपणांस भरत म्हणवून घेत असतील किंवा नाहीं याविषयीं जरी खात्रीलायक विधान करतां येत नाहीं, तरी विश्वामित्र वसिष्टांचा जेव्हां संबंध आला तेव्हां ते आपणांस भरत म्हणवून घेत होते हें खास.

ज्या वेळेस या पितापुत्रांची स्वारी हिंदुस्थानांत झाली त्या वेळेस पंजाबांत अम्युपासना असावी; पण ती गंगेच्या पूर्वेकडे होती किंवा नव्हती याविषयीं खात्रीलायक विधान करतां येत नाहीं.

सुदासाच्या शत्रूंचें म्हणजे स्थानिक राष्ट्रांचें व त्यांच्या चरित्राचें पृथक्करण करतां आपणांस अनेक कुलें प्रस्थापित झालेली दिसतात. पुरु, यदु, तुर्वश व अनु यांचे बस्तान चांगलेंच बसलेलें दिसतें. महाभारतांत वर्णन केलेली कुलें गंगेच्या पूर्वेकडे होतीं. त्यांची माहिती आर्चिक कवीस किंवा ग्रंथकारांस पुढें झाली असावी. यास अपवाद फक्त कीकटांचा होय. कीकट इन्द्राकरिंतां पायस देत नाहींत म्हणून विश्वामित्राची टीका केवळ कीकटांपुरतीच असावी, किंवा अनेक लोकांसंबंधानें सुद्धां तें विधान करतां आलें असतें, या संबंधानें स्पष्ट आर्चिक उल्लेख नाहींत.

दा श रा ज्ञ यु ध्दा चा ॠ ग्वा ङम या शीं सं बं ध.- दाशराज्ञ युध्दाचा एकंदर ॠग्वाङमयांशीं संबंध येणेंप्रमाणें व्यक्त करतां येईल.

ॠग्वेदांत असें कोणतेंहि सूक्त नाही किंवा वृत्त नाहीं, कीं जें दाशराज्ञयुध्दापूर्वी निश्चयानें ढकलतां यईल.

ॠग्वेदांतील अनेक सूक्तें अशीं दिसतात कीं, ज्या सूक्तांच्या काळांत दाशराज्ञयुद्धकथा ही फार प्राचीन समजली गेली होती; आणि दिवोदास व सुदास या व्यक्ती ऐतिहासिक व्यक्तीच्या कोटीतून निघून पुराणपुरुषांच्या कोटीत जाऊन पडल्या होत्या. जेव्हां दिवोदासाकरितां किंवा सुदासाकरितां वृत्रादिकांचा संहार वर्णिला जातो, तेव्हां दिवोदास ही ऐतिहासिक व्यक्ति न राहतां पौराणिक व्यक्ति झाली होती असें म्हणण्यास हरकत नाहीं.

सुदास व दिवोदास यांशीं समकालीन असें वाङमय फारच थोडें आहे. ॠग्वेदाचा बराचसा भाग ते होऊन गेल्यावर दोनचारशें वर्षानंतर झाला असावा.

पु रु र व स् उ र्व शी क था व स र मा प णी क था.- दाशराज्ञयुध्दा- बरोबर जोडावयाच्या दुस-या कथा म्हटल्या म्हणजे, पुरुरवस्उर्वशी कथा व सरमापणीकथा या होत.

यांविषयीं आपणांस एवढेंच येईल कीं, या कथा देखील फार जुन्या आहेत; आणि यांच्या दाशराज्ञयुद्धविषयक पौर्वापर्यावर ॠग्वेद स्वतंत्र रीतीनें प्रकाश पाडूं शकत नाही. जर गंधर्वांच्या चळवळीचें स्थान अफगाणिस्थान असेल, आयु हा पुरुरवस् व उर्वशी यांचा मुलगा हें पौराणिक विधान खरें असेल आणि दिवोदासाचा मित्र आणि तूर्वयाणाचा शत्रु आयु तोच पुरुरव्याचा मुलगा असेल, तर असें म्हणतां येईल कीं दाशराज्ञयुध्दाच्या आरंभापूर्वीच्या पांचपन्नास वर्षांपूर्वी पुरुरवा होऊन गेला असावा.

देवराष्ट्र आणि असुरराष्ट्र यांचा इतिहास देऊं पहाणारें संशोधक राजारामशास्त्री यांनी असुर म्हणजे बाबिलोनियांतील लोक आणि पणी म्हणजे फिनीशियन लोक अशी २० वर्षापूर्वी कल्पना प्रगट केली. आजचें इतिहासज्ञान त्या कल्पनेच्या फारसें पुढें गेलें नाहीं.

आ र्य, द स्यु, दा स व दा श रा ज्ञ यु द्ध वि ष य क उ ल्ले ख.- ॠग्वेदांतील आर्य, दस्यु, दास या सर्वांचा व दाशराज्ञयुद्धविषयक उल्लेखांचा परामर्श घेतां, असें दिसतें कीं,

(१) दासकल्पना ही पर्शुभारतीयकालीन असावी. दास हा अहि आहे; दस्यु हा अहि आहे; तो पाणी अडवितो; वगैरे उल्लेख ज्या काळांत वृत्रकथा तयार झाली त्या काळचे सूचक आहेत. त्यांचा हिंदुस्थानांतील आर्यांच्या काल्पनिक स्वारीशीं संबंध नाही.

(२) दाशराज्ञयुद्ध ॠग्वेदांतील बहुतेक भागाच्या पूर्वी कित्येक शतकें झालें असावें. त्या युध्दाचा आर्यदासविरोधाशीं संबंध कांही नाही. दाशराज्ञयुध्दाच्या अगोदर कित्येक शतकें किंवा सहस्त्रकें हिंदुस्थान आर्यन् भाषा बोलणा-यांकडून व्यापला गेला असावा. म्हणजे हिंदुस्थानांतील आर्यन् लोकांच्या इतिहासांतील ॠग्मंत्र हा बराच उत्तरकालीन भाग होय.

(३) देशांत मंत्रकालांत चार वर्ग होतेच. परंतु त्यांनां वर्ण हें नांव प्राप्त झालें नव्हतें. वर्ण हा शब्द आर्य आणि दास यांतील भेद, म्हणजे संप्रदाय या अर्थानें वापरीत असत.