पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड
प्रकरण २ रें.
भरतखंड वर्णन.
नैसर्गिक - आशिया खंडाच्या तीन ओबड धोबड आणि अव्यवस्थित आकाराच्या द्वीपकल्पांपैकीं हिंदुस्थान हें मध्य द्वीपकल्प आहे. आशिया खंडाच्या मुख्य जमिनीपासून दक्षिणेकडे हें पसरलेलें असून साधारपणें यूरोपखंडांतील इटलीसारखें भासतें. याचा आकार मोठ्या त्रिकोणासारखा म्हटला तर त्रिकोणाचा पाया हिमालयपर्वतावर बसेल आणि त्याचे टोंक समुद्रांत बरेंच लांब जाईल. याचा पश्चिमेकडील भाग अरबी समुद्रानें भिजला असून पूर्वेकडील मुख्य भाग बंगालच्या उपसागरानें भिजला आहे. हा देश ८ ते ३७ उत्तर अक्षांशापर्यंत पसरला आहे. म्हणजे भूमध्य प्रदेशांतील अतिशय उष्ण भागापासून समशीतोष्ण कटिबंधाच्या पार आंत हा देश गेलेला आहे. हिंदुस्थानची दक्षिण- उत्तर लांबी व पूर्व पश्चिम रुंदी हीं अजमासे १९०० मैल आहेत. या प्रदेशाला ब्रिटिश सरकानें ब्रह्मदेश जोडून दिला पण अगदीं जवळचें सिलोनचें बेट मात्र याच्यापासून तोडलें. अंदमान आणि निकोबार हे बंगालच्या उपसागरांतील दोन द्वीपसमूह, अरबी समुद्रांतील लखदीव हा एक द्वीपसमूह, तांबड्या समुद्राच्या मुखाजवळील एडनचें ठाणें, पेरिम आणि सोकोत्रा हीं सर्व हिंदुस्थान साम्राज्यांत राजकीय दृष्टीनें समाविष्ट होतात. पण इकडे वसाहतीमुळें ब्रिटिश हिंदुस्थानचा मुलुख मधून मधून तुटल्यासारखा झालेला आहे.
सरहद्दी- हिंदुस्थान हें उत्तरेकडे आशियाखंडाला हिमालयपर्वतसमूहामुळें अगदीं बंद झाल्यासारखें आहे. नेपाळ आणि भूतान हीं स्वतंत्रें संस्थानें, तसेंच त्या सागचें तिबेटचें मोठें पठार हीं याच हिमालय पर्वतांत बसलीं आहेत. हिंदुस्थानच्या वायव्य कोणांत काश्मीर संस्थान बसलेलें दिसतें. या वायव्यकोणापासून (उत्तर अक्षांश ३५० आणि पूर्व रेखांश ७४०) या पर्वताचा एक भाग खालीं आल्यामुळें अफगाणिस्तानापासून हिंदुस्थान अगदीं विभागलें गेले आहे. सफेदकोह आणि सुलेमान हे पर्वत विभाजक बनले आहेत. तसेंच बलुचिस्तानहि याच पर्वताच्या लहान लहान श्रेणींमुळें अलग झालें आहे. आणखी दक्षिणेकडे गेल्यास हिंदुस्थान हें पश्चिम आणि नैर्ॠत्य दिशेस अरबी समुद्र आणि हिंदी महासागर यांनीं परिवेष्ठिलेलें आढळतें. अगदी दक्षिणेकडचें टोंक जें कन्याकुमारी (उत्तर अक्षांश ४० २०’ पूर्व रेखांश ९८० ३२’) तेथून वर उत्तरेकडे गेलेली बंगालच्या उपसागराची लांबलचक समुद्ररेषा बहुतेक पूर्व भागाची सरहद्द बनली आहे. पण वायव्येप्रमाणें ईशान्येकडेहि हिंदुस्थानला जमिनीचीच सरहद्द लागली आहे. कारण ईशान्येकडे हिमालय पर्वतांनीं आग्नेयीकडे आपले हात पसरले असल्यामुळें पूर्वबंगाल हा आसाम आणि ब्रह्मदेश यांपासून विभागला गेला आहे. इरावतीच्या मुखापासून पुन्हां आग्नयीकडे डोंगराच्या रांगा ओळीनें खालीं आल्याकारणानें ब्रह्मदेशाचा तेनासेरीम प्रांत सयामपासून अलग राहिलेला आढळतो. ही सरहद्द रेषा तेनासेरीमच्या अगदीं टोंकाशीं व्हिक्टोरीया पॉईंट (उतत्र अक्षांश ९१० ६९, पूर्व रेखांश ९८० ३२’) पर्यंत खालीं गेली आहे.
वरील सरहद्दींत समाविष्ट झालेलें हिंदीसाम्राज्य उंच सखल जमीन, हवमान, देखावे यांच्या विविधतेमुळें अगदीं सर्व समृध्द असें वाटतें. हा एक देश म्हणण्यापेक्षां खंड म्हणणें चांगलें. आकाशयानांतून या देशाकडे खालीं पाहिल्यास याचे अगदीं वेगवेगळाले तीन विभाग पडलेले दिसतील.
(१) हिमालय पर्वत समूह- पहिला विभाग हिमालय पर्वत आणि त्यांच्या दक्षिणेकडे गेलेल्या श्रेणी होत. हा भाग जगांत सर्वांत उंच आहे. टॉलेमीनें हिमालयपर्वतांनां एमोडस असें नांव दिलें होतें. यांचा आकार जंबीयासारखा असून पात्याचा भाग दक्षिणेकडे आहे. हीच हिंदुस्थानची १५०० मैलांची उत्तर सरहद्द होय. या सरहद्दीच्या ईशान्य कोणाशीं तिबेटची सानपो आणि आसामची ब्रह्मपुत्रा यांनां जोडणारी दिहांग नदी श्रेणीच्या मध्यांतून वर उसळली आहे. समोरच्या बाजूस म्हणजे वायव्य कोणाशीं सिंधू ही हिमालयाला फोडून खालीं पंजाबांत उतरते. हा ओसाड पर्वतप्रदेश पुष्कळ ठिकाणीं माणसांनां आगम्य असा असून आधुनिक लष्कराला तर कोठेंच वाट देत नाहीं. प्राचीन प्रसिध्द व्यापारी मार्ग अद्याप आहेतच. त्या मार्गांनीं पंजाबाचा माल १८००० फूट उंचीवरल्या पूर्वतुर्कस्तान आणि तिबेट या देशांत जातो. मुझतक, काराकोरम आणि चंचीनमो हे मार्ग सर्वांत जास्त प्रसिध्द आहेत.
हिंदुस्थानच्या उत्तरेस आपली दुहेरी भिंत घालून हिमालयानें त्याचें संरक्षण केलें आहे. एवढेंच नसून पूर्व आणि पश्चिम टोंकापासूनहि दक्षिणेस श्रेणी पाठवून ईशान्य आणि वायव्य सरहद्द घालून मजबूत केली आहे. ईशान्येकडे या श्रेणींना नागा आणि पटकोई पर्वत म्हणतात व ते आसामांतील सुधारलेला प्रदेश व उत्तर ब्रह्मदेशांतील रानटी जाती यांमध्यें भिंतीप्रमाणें उभे आहेत. तिकडे वायव्य सरहद्दीवरील पर्वतश्रेणी संबंध ब्रिटिश सरहद्द व्यापून समुद्रापर्यंत पोंचल्या आहेत. या श्रेणी दक्षिणेकडे जात असतांना त्यांच्या डोळ्यांत भरणार्या भागांनां सफेद कोह, सुलेमान आणि हाला पर्वत अशीं नांवें पडलीं आहेत. पण ही पर्वताची अभेद्य भिंतहि कोंपर्यांत फोडलेली दिसत असून तींतून काबूल नदी हिंदुस्थानांत शिरते. जवळच खायबर मार्ग, त्याच्या दक्षिणेस कुर्रम मार्ग, डेराइस्माईलखानजवळ गोमल मार्ग, गोमल आणि कुर्रम यांमधील टोंची मार्ग, आणखी दक्षिणेकडे असलेला बोलन मार्ग हे हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांमधील रस्ते होत. हिंदुस्तान आणि बलुचिस्तान यांमधील हाला, ब्राहुइ आणि पाब पर्वत कमी उंचीचे आहेत.
नद्यांची मैदानें- हिंदुस्थानचा दुसरा नैसर्गिक विभाग म्हणजे हिमालयांतून निघणार्या नद्या ज्यांतून वहातात तीं विस्तृत मैदानें होत. हीं मैदानें पूर्वेकडे बंगालच्या उपसागारपासून पश्चिमेकडे अफगाण सरहद्द आणि आरबी समुद्र येथपर्यंत पसरलीं आहेत. यांमध्यें अतिशय समृध्द व अतिशय दाट लोकवस्तीचे प्रांत आहेत. या प्रदेशावर वायव्येकडून आणि ईशान्येकडून इतिहासपूर्वकालापासूनहि एकामागून एक हल्ले झालेले आहेत. परकीय लोक नदीमार्गांनीं पुढें पुढें येऊन आपल्या पूर्वी आलेल्या लोकांनां दक्षिणेकडे समुद्राच्या बाजूला लोटीत नेत. सुमारें १७ कोटी लोक या विभागांत राहात असून बंगाल, आसाम, संयुक्त प्रांत, पंजाब, सिंध, राजपुताना व इतर देशी संस्थानें यांत आहेत. यांतून तीन नदीसमूह वाहतात. पहिला हिमालयापलीकडील उथळ खळीसारख्या भागांत उगम पावून हिमालयाच्या पश्चिम श्रेणींतून पंजाब प्रांतावर सिंधू आणि सतलज नद्यांच्या रूपानें बाहेर पडतो. दुसरा समूह हिमालयाच्या दुहेरी भिंतीपलीकडे पहिल्या समूहाशेजारच्या उगमाशेजारींच उगम पावून पूर्वेकडे वळतो व हिमालयांच्या पूर्व टोकांशीं हिंदुस्थानांत ब्रह्मपुत्रा या नांवानें अवतीर्ण होतो. या नद्या हिमालयाच्या उत्तरेच्या उतारावरील गाळ हिंदुस्थानांत वाहून आणतात. हिमालय पर्वताचा हा एक विशेष आहे कीं, तो आपल्या उत्तरेकडील उतरणीवरील व त्याचप्रमाणें दक्षिणेकडील उत्तरणीवरील पावसाचें पाणी हिंदुस्थानच्या मैदानांत पाठवून देतो. तिसर्या नदीसमूहाच्या योगानें दक्षिणेकडील उतरणीवरील गाळ व पाणी उत्तर हिंदुस्थानांत येऊन पडतें. हा समूह गंगा नदीला येऊन मिळतो. अशा रीतीनें हिमालयाच्या दक्षिण व उत्तर उतारावरील पाणी बंगालच्या मैदानांत येऊन पडतें.
उत्तरेकडील पठार- हिंदुस्थानचा तिसरा नैसर्गिक विभाग म्हणजे तीन बाजू असलेलें पठार होय. हें पठार हिंदुस्थानचा दक्षिणार्थ किंवा द्वीपकल्पीय भाग व्यापून राहिलें आहे. पूर्वी ह्याला दक्षिण किंवा दख्खन म्हणत व त्यांत वर्हाड आणि मध्यप्रांत, मुंबई आणि मद्रास इलाखे, हैद्राबाद, म्हैसूर आणि इतर संस्थानी मुलूख येतो. पठाराचा उत्तरभाग विंध्य पर्वत म्हणतां येईल. विंध्य हा पर्वत अनेक निरनिराळ्या टेंकड्या मिळून झालेला आहे. यावर अबू आणि पारसनाथ हीं पश्चिम आणि पूर्व बाजूचीं शिखरें आहेत. १५०० ते ४००० फूट उंची पर्यंतच्या विंध्य पर्वताच्या निरनिराळ्या रांगा या उत्तरेकडील भिंतीप्रमाणें असून मध्य पठाराला त्यांचा चांगला आधार आहे. आंत जरी त्यांमधून रेल्वे आणि सडका गेलेल्या आहेत तरी प्राचीन काळीं दक्षिण हिंदुस्थान आणि उत्तर हिंदुस्थान यांच्यामधील पर्वत आणि जंगल मिळून झालेली मोठी आडकाठीच होती. यामुळेच संबंध हिंदुस्थान एकाच साम्राज्याखालीं आणण्यास कठीण पडत असे. मोठमोठीं जंगलें, डोंगराच्या रांगा आणि शिखरें यांनीं व्याप्त असलीं तरी लागवडीखालीं असलेलीं खोरी आणि रुंद व उंच मैदानें यांत आहेत.
घाट- दक्षिणात्य उंच त्रिकोणाच्या दोन बाजू म्हणजे पूर्व आणि पश्चिम हे दोन घाट होत. विंध्य पर्वताच्या पूर्व आणि पश्चिम टोंकापासून दक्षिणेकडे हे पसरत गेल्यानें हिंदुस्थानच्या पूर्व आणि पश्चिम किनार्यावर आलेले आहेत. पूर्वघाट खडबडीत व कमीजास्त आंत बाहेर आलेला असून घाटाचा पायथा आणि किनारा यांच्यामध्यें बरींच रुंद सपाट मैदानें आहेत. मद्रास इलाखा यांनी व्याप्त आहे. पूर्व घाट, मुंबई इलाख्याची समुद्रावरची मोठी भिंतच बनल्यासारखी आहे. घाट आणि किनारा यांच्यामध्यें फारच अरुंद पट्टी आहे. पुष्कळ ठिकाणीं हे घाट भव्य कडे आणि पठारें यांनीं युक्त असून समुद्र किनार्यापासून वर जाण्याला हीं जिन्यासारखीं वाटतात. पूर्व घाटांची सरासरी उंची १५०० फूट असून पश्चिम घाटांची ३००० आहे. दक्षिणेकडे दोन्ही घांट मिळाले आहेत. घाट आणि विंध्य पर्वत यांनी परिवेष्टिलेलें आंतील तिकोनी पठार समुद्रसपाटीपासून १००० ते ३००० फूट उंच आहेत. हा भाग डोंगरांच्या रांगांनीं आणि शिखरांनीं व्याप्त आहे. निलगिरी हा सर्वांत प्रख्यात डोंगर असून त्यावर उटकमंड (उंची ७००० फूट) हें मद्रास सरकारचें हवा खाण्याचें ठिकाण आहे. सर्वांत उंच शिखर दक्षिणेकडील कोनांत असलेलें दोड्डबेट्टा (उंची ८७६० फूट) आहे.
वरील तिकोनी पठाराच्या उत्तर बाजूकडील गाळ व पाणी गंगेमध्यें जाऊन पडतें. विंध्य आणि सातपुडा पर्वताच्या दक्षिण उतरणीवरील पाणी नर्मदा आणि तापी या नद्या खंबायतच्या आखतांत नेऊन सोडतात. पण सुरतेपासून कन्याकुमारीर्पंत कोणचीहि मोठी नदी आंतल्या पठारापासून पश्चिमकिनार्याला वाहात जात नाहीं. म्हणजे मध्य पठार आणि हिंदी महासागर यांचं पाणी एकवटूं न देणारा हा उंच अत्रुटित असा प्रतिबंध म्हणतां येईल. अशा स्थितींत पठारावरचें पाणी व गाळ पूर्वेकडचे वाहात जाणार. गोदावरीं, कृष्णा आणि कावेरी या मद्रास इलाख्यांतील मोठ्या नद्या पश्चिम घाटांत उगम पावून पूर्वेकडे वाहात जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात.
वर वर्णिलेल्या हिंदुस्थानच्या तीन नैसर्गिक विभागांपैकी पहिला विभाग जो हिमालय पर्वत तो ब्रिटिश हद्दीबाहेर असला तरी भारत आणि भारतीय यांचा इतिहास त्याच्याशीं फार संबंध्द आहे. उत्तर हिंदुस्थानांतील नद्यांचा मैदानांनीं युक्त असा दुसरा विभाग हा प्राचीन सर्व चळवळीचें क्षेत्र म्हणतां येईल. एकंदर हिंदुस्थानची सुधारणा आणि भवितव्यता याच क्षेत्राशीं निगडित आहे. तिसरा विभाग जें दक्षिणेंतील तिकोनी पठार तें वरील दोन्ही विभागांपासून अगदीं भिन्न असून त्याच्या प्रगतीचा इतिहासहि स्वतंत्र आहे. तसेच हिमालयापलीकडे मोंगल मानववंशी जाती राहत असून उत्तर हिंदुस्थानांतील नद्यांच्या मैदानी प्रदेशांत अद्यापि शुध्द आर्यवंशी लोक आहेत. तिकोनी पठारावर आर्य व दक्षिणेतील द्रवीड यांच्या बर्याच झटपटी झालेल्या आहेत असें दिसून येईल.
हवामान- हिंदुस्थानचें हवामान एकाच प्रकारचें नाहीं. दक्षिणेकडून उत्तरेकडे जों जों जावें तों तों हवा कमी उष्ण होत जाते. तसेंच समुद्रापासून अंतर जसजसें वाढत जातें तसतसें हिवाळा व उन्हाळा यांतील फरक वाढत जातो. हवा तीन प्रकारची साधारणतः पुढील प्रांतांतून दृष्टीस पडते. (१) उष्ण व दमट- मद्रास इलाख्याचा दक्षिणभाग, ओरिसा, बंगाल व आसाम. (२) उष्ण व कोरडी राजपुताना, पंजाब, संयुक्तप्रांत आणि सिंधचा उत्तरभाग, (३) मध्यम उष्ण व कोरडी- पंजाब, संयुक्तप्रांत कांही भाग, माळवा व महाराष्ट्र. मन्सून (पावसाळी) वार्यामुळें हवामानाला कांहीं नियमितपणा आलेला आहे. उष्णतामान १२० अंशापासून शून्यापर्यंतहि जातें. संबंध हिंदुस्थानचें पावसाचें सरासरी मान ४५ इंच आहे. कोठें पाऊस २ इंच पडतो, तर कोठें ५०० इंच पडतो. निरनिराळ्या प्रांतांतील पावसाचें मान पुढीलप्रमाणें आहे. सिंध व कच्छ १० इंच; पंजाब २२, राजपुताना २८; महाराष्ट्र, कर्नाटक ३०-३५, गुजराथ ३०-४५; मध्य हिंदुस्थान ४२; बहार ४४; ओरिसा ४७; मद्रास पूर्वकिनारा व मध्यप्रांत ५०; पूर्वबंगाल ४९; दक्षिणबंगाल ६६; कोंकण व मद्रास इलाख्याचा पश्चिम किनारा १००-१२५ इंच. सह्याद्रीवर ४०० इंचांपर्यंत व आसामांत ६०० इंचांपर्यंत देखील पाऊस पडतो. या हवामानासंबंधी माहिती ज्ञानकोशांत भूपृष्ठवर्णन लेखांत (ज्ञा. को. १८) (भ) ५० पासून पुढें) दिलेली आहेच. भूस्तरशास्त्राच्या दृष्टीनें हिंदुस्थानचे तीन निरनिराळे विभाग पडतात. हिमालयीन, द्वीपकल्पीय आणि या दोहोंमधील गंगा-सिंधुमैदान. हिमालयाचा बराचसा भाग पुराणयुगापासून नवप्रभात (एओसीन) काळापर्यंत समुद्रांत बुडालेला असल्यामुळें त्यावर सामुद्रिक अवशेष सांपडतात. याच्या उलट द्वीपकल्पीय विभाग पर्मियत काळापासून तरी जमीनीचा होता असें दिसतें. गंगासिंधूचें मैदान वार्यानें वाहून आणलेली वाळू आणि मळी यांनी व्याप्त आहे. या मैदानाचे क्षेत्रफळ सुमारें ३००००० चौरस मैल आहे. या मैदानावरील मळीची भर भूस्तरशास्त्रांतील अर्वाचीन काळची आहे. भारतीय भूस्तरासंबंधीं विवेचन ‘भूस्तरशास्त्र’ (ज्ञानकोश १८ (भ १०७-०९) लेखांत केलेलेंच आहे, तेव्हां या ठिकाणीं पुन्हां द्विरुक्ति करीत नाहीं.
वनस्पती- हिंदुस्थान देश अवाढव्य आहे तरी वनस्पति दृष्टया त्याला इतर देशांप्रमाणें कांही वैशिष्ट्य नाहीं. याच्या वायव्य बाजूस इराण व भूमध्यक्षेत्राचा आग्नेय भाग यांतील वनस्पती, उत्तरेस साबेरियांतील, पूर्वेस चीनमधील आणि आग्नेयीस मलायांतील वनस्पती कमी अधिक मिश्रण झालेल्या आढळून येतात. हिंदुस्थानांतील वनस्पतीचें साधारणतः चार स्वतंत्र वर्ग पाडतां येतील ते असेः-
(१) हिमालयावरील- तिबेटच्या पठारांकडे जाणार्या हिमालयाच्या उतरणीवर सायबेरियन समशीतोष्ण (टेंपरेट) वनस्पती उगवतात. उत्तर गोलार्धातील सबंध समशीतोष्ण कटिबंधांत याच वनस्पती आहेत. हिमालयाच्या पश्चिम प्रदेशांत या वनस्पतिजातींशीं कोलंबाईन व हॅथॉर्न यांसारख्या यूरोपियन वनस्पतिजातींचें मिक्षण झालेलें आढळतें, पूर्वेकडे येत असतांना ही भिन्न जात कमी कमी होत जाऊन कुमाउनच्या पलीकडे मुळींच आढळत नाहीं. हिमालयाच्या पायथ्याशीं मलाया जातीच्या वनस्पतींचा एका अरुंद पट्टा दिसतो; तर त्याच्याच वर समशीतोष्ण वनस्पती अगदीं बहरली असून ती उत्तर चीनमधील वनस्पतिविस्तार म्हणून वाटते. हीच पश्चिमेकडे जातांना हळुहळु यूरोपियन जातींत शिंरू लागते. आसामांत अतिशय माजणारी चिनी चाहाचीं झाडें प्रसिध्दच आहेत. शंक्वाकार झाडें दोन्हीं भागांत सारखींच आहेत. चीर झाडें (प्रायनस लाँगिफोलिया) तर हिंदुकुशापर्यंत गेलीं आहेत. लीम किंवा काइल (पायनस एक्सेलसा) सिक्किम खेरीज सर्वत्र आढळतें. अफगाणिस्तान आणि वायव्य हिमालय या पर्वतावर सारखें उगवणारें देवदार ऍटलांटिक व लेबानॉन सीडर झाडासारखें जवळजवळ आहे. पश्चिम हिमालयीन वनस्पती यूरोपियन वनस्पती यांचा निकट संबंध दाखविणारी विशेष गोष्ट म्हणजे होम ओक चें झाड होय. हें झाड म्हणजे मेडिटरेनियन क्षेत्रांतील विशिष्ट वनस्पति होय.
(२) वायव्येकडील- पंजाब आणि सिंध या भागांतील वनस्पतींचा हा वर्ग आहे. या भागंतील हवा अगदीं कोरडी असून जमीन पाटबंधार्याच्या पाण्याशिवाय लागवडीला योग्य नसते. या वनस्पतिवर्गात जाती फारच कमी आहेत. पण हा वर्ग इराण, दक्षिण अरबस्तान, आणि ईजिप्त यांतील वनस्पतिसदृश आहे. करील (कॅपारिस अफिला), बाभूळ, पाप्युलस युफ्रेटिका, (विलो) साल्व्हाडोरा पर्सिका, बोर वगैरे सपाटीवरील जंगलांतून आढळणारी झाडें या वर्गातील विशेष जाती होत. यांतील कोरड्या वनस्पति आग्नेयीकडे जात जांत पश्चिम द्वीपकल्पांतील वनस्पतींशीं मिश्रण पावतात. या प्रकारच्या संकर वनस्पती गंगेच्या उत्तर सपाटीवर व सर्वत्र देशाच्या कोरड्या भागांत आढळून येतील.
(३) आसाम आणि मलाया द्वीपकल्पांतील- इमारती लांकूड, रबर, चहा, तमाखू, कोको, काफी वगैरे वनस्पती या वर्गात मोडत असून नेहमी दमट असणार्या हवेंतील बहुतेक वनस्पती यांत मोडतात.
(४) पश्चिम हिंदुस्थानांतील- या वर्गाचें वैशिष्टय सांगणे कठीण आहे. मागील दोन वर्गाच्या मध्यंतरी हा वर्ग बहृंशी पडेल. आफ्रिकन उष्णकटिबंधांतील वनस्पती आणि या वर्गातील वनस्पती यांत कांही साम्य आढळून आलें आहे. मेथी, नीळ या जातींचीं झाडें प्रातिवार्षिक असून तीं दर पावासाळ्यांत उगवतात. हिंदुस्थानांतल्याप्रमाणें आफ्रिकेंतहि या वनस्पती आहेत. दोन्हीहि देशांत ताडीची झाडें फार कमी येतात. तथापि दक्षिण हिंदुस्थानांत खारका, नारळ, ताड हीं बरींच लागवडींत असतात. येथील जंगलें मलायन जातीपेक्षां जास्त रुंद आणि खुरटीं असतात. इमारती लांकडाच्या जातींपैकी महत्त्वाच्या तूण, साल, भेडा, चंदन, सागवान या जाती होत.
प्राणी, सस्तनप्राणी- सिंहः- हिंदुस्थानांतील क्रूर व जंगली प्राण्यांपैकीं पहिला सिंह होय. हा काठेवाडांतील जंगलांत आज सांपडतो; पण याला आयाळ नसते. या जातीचा चांगला सिंह ९ ते ९॥ फूट लांब असतो.
वाघः- वाघ हा संहारक प्राण्यांत अगदीं वरचा येईल. हिमालयाच्या उतरणीपासून तों सुंदरवनाच्या दलदलीपर्यंत सर्वत्र हा सोंपडतो. लागवडीची वाढ व शिकार यामुळें वाघांची संख्या कमी कमी होत आहे. दक्षिण पठारावरच्या जंगलांतूनहि वाघ दृष्टीस पडतात. नाकापासून तो शेंपटीच्या टोंकापर्यंत वाघाची लांबी ९-१० फूट असते. हरिण, काळवीट, व रानडुक्कर हें त्याचें आवडतें भक्ष्य होय. ज्या ठिकाणीं हें मिळणार नाहीं त्या ठिकाणीं तो गुरांढोरांवर झडप घालतो. कांही वाघ माणसाच्या रक्ताला चटावलेले असतात. असें माणसें खाणारें वाघ कधीं कधीं एका वर्षात ७५।८० माणसें मारतात. हत्तींवर बसून किंवा जंगलांत झाडवर मचान बांधून तेथून वाघाची शिकार करण्यांत येत असते. मध्य हिंदुस्थानांत जमीनीवर उभे राहूनच वाघाला मारण्यांत येते तर आसामांत बोटींतून भाल्यानें त्याला जाया करतात. हिमालयावर पक्षी घरण्याच्या चिकट्यानें वाघाला गिरफदार करतात असें म्हणतात.
चित्ता- हिंदुस्थानांत वाघापेक्षां चित्ता सर्व भागांत फारकरून आढळतो. तो वाघापेक्षां कमी क्रूर नसतो. याची जास्तीत जास्त लांबी ७ फूट ६ इंच येईल. अगदीं दक्षिणेकडे एक काळी जात आढळते. दक्खनामध्यें ज्याला शिकवून हरणाची शिकार करण्यास तयार करतात तो चित्ता अगदीं वेगळ्या जातीचा आहे. तो मांजराच्या कुळींतला नसून कुत्र्याच्या कुळींतला वाटतो. याची धांवण्याच्या कामी चपलता दुसर्या कोणाहि सस्तन प्राण्याला साधणार नाहीं. शिकारीवर पहिला हल्ला चुकल्यास हा परत हल्ला मुळीच करीत नाहीं तर धन्याकडे माघारा येतो. याखेरीज चित्त्याचे आणखी कांही प्रकार हिंदुस्थानांत आढळतात.
लांडगा-कोल्हा- लांडगे उघड्या मैदानी भागांत बहुतेक आढळत असून जंगलीं प्रांतांतून फार क्वचित राहातात. त्यांचें आवडतें भक्ष्य म्हणजे शेळ्यामेंढ्या. कधीं कधीं ते माणसांवरहि हल्ला करतात. तिबेट व हिमालयावर पांढरे, तांबड व काळे अशा लांडग्यांच्या तीन निरनिराळ्या जाती आढळतात. खोकड फार कमी असतात. पण कोल्हे सर्वत्र दिसतात; व रात्रीं भीतिदायक कोल्हेकुई करूं लागतात. युरोपियन लोक जे शिकारी कुत्रे पाळतात ते कोल्ह्याचीच शिकार करतात, खोकडाची नव्हे.
कुत्रा- सर्व दाट जंगलांतून रानटी कुत्रे आढळतात. यांचे वैशिष्टय म्हणजे हे टोळ्या करून शिकार करतात. एका टोळींत तीस चाळी कुत्रे असतात एकदां कां टोळीनें जनावराचा पाठलाग केला म्हणजे त्याचें आयुष्य संपलेंच म्हणून समजावें. ब्रह्मदेशांतील करेण डोंगरांत जंगली कुत्र्याची एक अगदीं निराळी जात आहे. माँग्रेसप्रमाणें पराया, दक्षिणेकडील पोलीगार, ग्रेहाऊंड व तिबेट- भूतानमधील मॅस्टिफ या आणखी हिंदुस्थानांतील कुत्र्याच्या जाती होत. लांडगा ज्या ठिकाणीं नसतो त्या ठिकाणीं तरस सांपडतें.
अस्वलः- खडकाळ भागांत व अरण्यांतून सर्वत्र काळें अस्वल सांपडते. त्याच्या छातीवर घोड्याच्या नालाच्या आकाराची एक पांढरी खूण असते. त्याचें खाद्य म्हणजे मुंग्या, मध व फलें होत. त्याला त्रास दिला तर तो माणसांवरहि चांगला हल्ला करतो व तोंड ओरबाडून टाकतो. पंजाबपासून आसामपर्यंत हिमालयीन किंवा तिबेटी अस्वलें (सनबेअर) आढळतात. मलायन अस्वल (वरील जातीचेंच) खालच्या ब्रह्मदेशांत दिसून येईल.
हत्तीः- वायव्य भागाखेरीज सर्वत्र हत्तीं सांपडतात. हिंदुस्थानांत हा प्राणी मैदानचा रहिवासी नसून डोंगरी रहिवासी वाटतो. डोंगरावर सुद्धा तो दरींत राहत नसून उंच कड्यावर व पठारांवर राहतो. हिंदुस्थानद्वीपकल्पांतून म्हणजे दक्षिण भागांतून त्यांचें उच्चाटन होत आहेसे दिसतें. कारण तो कूर्ग, म्हैसूर आणि त्रावणकोर यातील जुनांट अरण्यांतच फक्त आढळतो. हिमालयीन तराईत तो अद्यापि टिकून आहे. आसाम ते ब्रह्मदेश या ब्रिटिश हिंदुस्थानच्या अति डोंगराळ भागांतूनच हल्लीं हत्तीचा मोठा पुरवठा होतो. गुंडा (दंती) व मकना (बिदंती) अशा हत्तीच्या दोन मुख्य जाती आहेत. हत्तीची जास्तीत जास्त उंची १२ फूट असते. हत्तीची शिकार करणें मोठें धोक्याचें असतें. आज हक्कीचा मक्ता सरकारकडे असून त्यांनां विशिष्ट कारणांशिवाय मारण्याची बंदी आहे. हत्तींच्या संरक्षणाचा कायदा म्हणून एक विशिष्ट कायदा आहे (१८७९ चा ६ वा). हत्ती कमी होत आहेत तथापि त्यांनां फार मागणी असते. सरकारी वाहतुक व लांकडाचा व्यापार या कामीं त्यांचा मुख्य उपयोग असतो. शिवाय राजेरजवाडे डामडौलासाठीं हत्ती बाळगतात.
गेंडा- गेंड्याच्या तीन जाती असतात. दोहोंमध्यें एक शिंग व एकांत दोन शिंगं असतात. एक शिंगी गेंडा बहुधां पाहण्यांत येतो. तो ब्राह्मपुत्रां दरींत सांपडतो. त्याची उंची ६ फुटांपर्यंत असून शिंग १४ इंचापावेतों वाढतें. या शिंगाला औषधी म्हणून लोक फार चाहतात. जावानी गेंडा सुंदरबनांत व ब्रह्मदेशांतहि आढळतो. यालाहि एकच शिंग असतें. द्विशृंगी सुमात्रा गेंडा चितागांगच्या दक्षिणेस आढळतो.
रानडुक्करः- लागवडींत असणार्या प्रदेशांत राहून हा प्राणी शेतकर्यांनां फार त्रास देतो. नेपाळ आणि सिक्किमच्या तराईत कधीं कधीं ठेंगू डुक्करें आढळतात. त्यांची उंची फक्त १० इंच असून वजन १२ पौंडांपेक्षां जास्त असत नाहीं.
रानगाढवः- सिंध आणि कच्छमधील वाळवंटांत हा राहत असून, माणसाला भिऊन हा खूप जलद पळत असल्यानें याविषयीं विशेष कांहीं सांगतां येत नाहीं.
बकरीं व शेळ्या मेंढ्या - हिमालय पर्वताच्या भागांत यांच्या बर्याच विविध व रानटी जाती आढळतात. कांही जाती (उदाहरणार्थ ओव्हिस अमॉन) तिबेटी आहेत., तर कांहीं लडख व सुलेमानपर्वत यांतील शेळ्यामेंढ्या सारख्या आहेत. यांपैकी कांही समुद्रसपाटीपासून २००० फूट उंचीच्या खालीं कधीहि उतरत नाहींत. आल्प्स पर्वतावरच्या जातीसारखीहि एक जात हिमालयावर व अत्युच्च अशा दक्षिण हिंदुस्थानांतील पर्वतश्रेणींवर आढळते. शामाय मृगासारखी सरऊ नांवाची जात हिमालयापासून आसाम-ब्रह्मदेश पर्वतभागांत बरींच सांपडते.
काळवीटः- हा प्राणी माळरानांत विशेषतः मिठागरांच्या मैदानांत दिसतो. गुजराथ आणि ओरिसा यांतील किनार्यांवरील भागांत एका नर काळविटाच्या सहवासांत ५० माद्या आहेत असे कळप आढळतात. मादीला शिंगें नसून तिचा रंग हरणासारखा फिक्का असतो. नराचा रंग अगदीं पिंगट काळसर असून पोटाच्या पांढर्या रंगामुळें तो उठून दिसतो. नराचीं निमुळतीं पिळदार शिंगें ३० इंचांपर्यंतहि लांब असतात. नीलगाय ही जातहि सर्वत्र आढळते; पण विशेषतः गुजराथ आणि उत्तर हिंदुस्थान या भागांत असते. हिंदु ही जात गाईप्रमाणेंच पवित्र मानतात. काळविटाच्या आणखीहि कांही जाती आहेत.
हरिणः- सांभर हा हरिणांचा राजा आहे. हा सर्वत्र अरण्यमय डोंगरांवर आढळतो. याचा रंग गर्द पिंगट असून याच्या मानेवर आयाळाप्रमाणें केंस असतात. याची उंची ५ फूट असून शिंगाच्या फांट्यांची लांबी ३ फुटांपर्यंत येते. याच्या खालोखाल उंचीला ‘बाराशिंग’ हरिण येईल. तें खालच्या बंगाल व आसाम या भागांत फार सांपडतें. ‘चिताळ’ (ठिपक्याचें) हरिण सर्व प्राण्यांत अतिशय सुंदर असतें. हरणाच्या इतरहि आणखी जाती असतात. कस्तुरीमृग तिबेटांत आढळतो.
गवा- हिंदुस्थानांत बैलांमध्यें कांहीं चांगल्या जाती आहेत. त्यांपैकी गौर किंवा गवा ही जात पश्चिम घाटांत, मध्य हिंदुस्थानांत व आसाम आणि ब्रह्मदेश यांतील डोंगरी जंगलांतून आढळते. याची उंची कधीं कधीं २० हात (७ फूट) सुद्धा भरते. याचीं आंखूड व बांकदार शिंगें असून डोकें फार मोठें असतें. याचा रंग काफीसारखा तपकिरी असतो. वाघ किंवा हत्ती यांच्यापेक्षां हा कमी क्रूर नसतो.
टोणगा- रानटोणगा (किंवा बैल) हा गावांतील गुरांपेक्षां फक्त जास्त मोठा आणि क्रूर असतो इतकेंच. आसाम आणि ब्रह्मदेश यांत याचे नमुने सांपडतात.
उंदीर, घूसः- घूस आणि उंदीर यांचें कुल फार मोठें आहे. घूस ही कधीं कधीं २ फूट लांब असून घरांनां व झाडांनां फार उपद्रव देते. झाडावरचा उंदीर गमतीदार असून तो ताडाच्या किंवा बांबूच्या झाडावर राहतो. शेतांतील उंदीर तर सबंध पीक फन्ना करतात.
पक्षीः- इतर उष्ण प्रदेशांतल्याप्रमाणें हिंदुस्थानांत पक्ष्यांचे सुंदर व विविध प्रकार फारसे नाहींत. तथापि कांही चांगल्या व विचित्र जाती आहेतच. कांही पक्षी आपल्या निसर्गदत्त वस्त्रांतच फार खुलून दिसतात तर दुसरे कांही आकार, बल व क्रौर्य या योगांनीं भीतिप्रद वाटतात. पोपटाची जात सौंदर्याकरितां फार प्रसिध्द आहे. हिंस्त्र पक्ष्यांत गिधाडें येतात. गरुडाच्या बर्याच जाती आहेत पण त्यांतील कोणतीहि यूरोपच्या सुवर्ण गरूडाप्रमाणें नाहीं. बहिरी ससाणेहि बर्याच प्रकारचे दिसतात. बगळे वगैरे मासेखाऊ पक्ष्यांची त्यांच्या पंखांसाठी शिकार करण्यांत येते. सर्वांत मैना ही फार लोकप्रिय दिसते. पाण्यांतले पक्षी तर असंख्य आहेत. मांसाकरितां मारल्या जाणार्या पक्ष्यांमध्यें माळढोंक पक्ष्याची (फ्लोरिकन) एक जात असून तो बहुधां दुर्मिळ समजला जातो पण ब्रह्मदेशांत त्याची एक पांढरी जात आढळते.
उरोगामीः- या प्राण्यांत सापांचा प्रामुख्यानें उल्लेख केला पाहिजे. हे सर्वत्र आढळतात. घरांत शिरतात व पुष्कळ मारलेहि जातात. पण विषारी साप कमी असतात; मात्र ते चावल्याबरोबर तात्काल जीव घेतात. नाग साप या कामीं प्रसिध्द आहेत. कांहीं हिंदू यांची पूजा करतात. मगरी व सुसरी या वर्गातच येतात. पण त्या नदींत व समुद्रांत असल्यानें फारशा त्रास देत नाहींत. विंचू तर अतिशय आढळतात.
मासेः- समुद्र, नद्या, तळीं, ओढें, वगैरे सर्व पाण्यांतून मांसे सांपडतात. गरीब लोकांचें तें मुख्य खाद्य आहे. तरी खारावलेले मासे इकडे फार क्वचित दृष्टीस पडतात. ब्रह्मदेश व मद्रास किनारा या बाजूस मासे खारावण्याचे धंदे विशेष चालतात. कांही नदींतील मासे पाटबंधारे, धरणें वगैरे अडचणींमुळें कमी होत चालले आहेत. हिंदुस्थानांतील माशांत रोही(वनपस्पत्याहारी) मासा व मांजरी- मासा हे बरेच दिसतात. महसीर मासा सर्वांत उत्तम असें मासे धरमार्यांचें मत आहे. हा सर्व डोंगरीं ओढ्यांत आढळतो. खाण्याला सर्वांत उत्तम, दुर्मिळ व महाग मासा म्हणजे हिलसा हा होय.
किडः- किड्यांच्या जाती असंख्य आहेत. उन्हाळी आणि पावसाळी हवेंत पुष्कळसे घाणेरडे व त्रासदायक किडे सैरावैरां हिंडतात पण यांबरोबरच अति उत्कृष्ट रंगाचें सुंदर किडेहि पहाण्यास मिळतात. डांस, पिसा, मुंग्या या तर विचारावयालच नको. उपयुक्त किड्यांत मधमाशा, रेशमाचे किडे व लाखेचे किडे येतात. कधीं कधीं मोठी टोळधाड येऊन कोठेंहि हिरवें म्हणून राहूं देत नाहीं.