प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २ रें.
लहान राष्ट्रांचा काल.
लहान राष्ट्रकांचें अस्तित्व - लहान राष्ट्रांचा काळ ही स्थिति जगांत सार्वत्रिक होती. एखादें राष्ट्र उदयास यावयाचें, त्यानें आसपासच्या राष्ट्रांवर ताबा चालवावयाचा. तें पुन्हा पडावयाचें या प्रकारचा इतिहास चोहोंकडे दिसतो. पुष्कळदां संस्थानें अगर राष्ट्रकें साम्राज्यास वैकल्य आलें असतां पुन्हां स्वतंत्र व्हावयाचीं किंवा अधिकारारूढ सुभेदारांनीं सुभेदारीपणा टाकून राजपद घ्यावयाचें ही रीतीहि अनेक ठिकाणीं दिसून येते.
इजिप्त, बाबीलोनी, इराणी साम्राज्यांचा इतिहास त्याप्रमाणेंच ग्रीक, रोमन व मौर्य साम्राज्यांचा इतिहास अनेक लोकांच्या डोक्यावर साम्राज्य लादल्यानेंच झाला. तो इतिहास जाणण्यासाठीं प्रकृतिभूत राष्ट्रकें आपण गोळा केलीं पाहिजेत.
बुद्धकालीन राष्ट्रकें - प्रथमतः बुद्धाच्या हयातीच्या काळांत कोणतीं राष्ट्रें, साम्राज्यें, भाषा व मनुष्यसंघ होते याचा हिशोब घ्यावा. आणि पुढें ज्या चळवळी झाल्या त्यांमुळें काय काय परिणाम होत गेले तें पहावें.
विशिष्ट संप्रदाय आणि संस्कृति यांच्या साम्राज्याखालीं कोणतीं राष्ट्रें आली, तसेंच एखाद्या विशिष्ट शासनसत्तेच्या साम्राज्याखालीं कितीं राष्ट्रें आलीं हें पहावें. विशिष्ट शासनसत्ता, भाषा व पारमार्थिक संप्रदाय यांच्या आश्रयानें राष्ट्रांस विशिष्ट प्रकारचें वळण कसें मिळत गेलें याचा परामर्श घ्यावा.
हिरोडोटस हा ग्रीक इतिहासकार बुद्धाशीं समकालीन होता.
याच्या इतिहासाचें पृथक्करण केलें असतां त्रिखंडांत अनेक राष्ट्रांचें अस्तित्व दिसून येतें. हिरोडोटसनें वर्णन केलेलीं राष्ट्रें व लोकसमुच्चय येथें देतों.
हे लोक अर्थात् बुद्धपूर्व होत. हिरोडोटसच्या ग्रंथांत बर्याच अगोदरच्या काळाचा इतिहास येतो. आणि ज्या राष्ट्रांचा इतिहास त्याच्या ग्रंथांत येतो तीं राष्ट्रें शेंपन्नास वर्षे किंवा अनेक शतकें अगोदरचीं असलीं पाहिजेत.
हिरोडोटसच्या ग्रंथांतील राष्ट्रें पुढें दिलीं आहेत. त्यांत प्रथमतः राष्ट्रांचीं नावें अक्षरानुक्रमानें घेऊन त्यांचें प्रांतवार वर्गीकरण करूं.
हिरोडोटसच्या इतिहासांत उल्लेखिलेली राष्ट्रे |
येथें एक गोष्ट सांगितली पाहिजे. ही यादी अनेक कारणांमुळें अपूर्ण आहे. एक तर हिरोडोटसच्या पुस्तकाचा कांहीं भाग किंवा दुसरें एखादें पुस्तक लुप्त आहे, असें उपलब्ध पुस्तकांतील हवाल्यांवरून दिसतें. शिवाय हिरोडोटसला सर्व राष्ट्रांची माहिती असणेंहि अशक्य आहे.
हिरोडोटसच्या वेळची हिंदुस्थानची स्थिति येथें वर्णीत नाहीं. हा ग्रंथकार आशियांतला; व आशियाविषयीं या ग्रंथकारानें दिलेली माहिती अधिक पूर्ण करण्यास आपणांपाशीं साहित्य आहे. खुद्द महाभारतांत दोनतीनशें राष्ट्रांचा उल्लेख आहे. पाली ग्रंथ आणखी पुरावा पुढें मांडतील. हिरोडोटसच्या कालावरून आपणांस पुढें जावयाचें आहे. प्राचीन राष्ट्रांपैकीं अनेकांच्या नांवांखेरीज आपणांस इतर माहिती कांहीं नाहीं. प्राचीन राष्ट्रें नष्ट होऊन आजची राष्ट्रमालिका कशी तयार झाली हें जाणण्याची आपणांस स्वाभाविकपणें इच्छा असणार. हिंदुस्थानचा व इतर आशियाचा परामर्श आपण मग घेऊं; आणि सध्यां यूरोपच्या घटनेकडेच दृष्टि ठेवूं.
हिरोडोटसचा ग्रंथ हा ग्रीक पुरावा होय. यूरोपच्या प्राचीन स्थितीविषयीं जे अनेक ग्रंथकार आपणांस कामास येतात त्यांत ग्रीक व रोमन हे मुख्य होत. रोमन लोकांच्या ग्रंथांपैकीं ज्या ग्रंथांत यूरोपांतील प्राचीन राष्ट्रांची बरीच माहिती आहे असा ग्रंथ म्हटला म्हणजे ज्यूलिअस सीझरचा कामेंटरी नांवाचा ग्रंथ होय.
ज्यूलिअस सीझरनें ज्या जातिस्वरूपी राष्ट्रांचा उल्लेख केला आहे तीं राष्ट्रें येणेंप्रमाणें : |
आशिया, यूरोप, आफ्रिका या तीन खंडांस एकमेकांशीं जोडणारा जो भूभाग त्याच्या आसपास बुद्धकालांत कोणकोणतीं लहान लहान राष्ट्रें होतीं त्याची कल्पना वर दिलेल्या याद्यांवरून येईल. यांपैकीं पश्चिमेकडील बरींच राष्ट्रें बुद्धपूर्वकालीं इजिप्त असुरिया व बाबिलोनिया या साम्राज्यसत्तांखालीं ख्रि. पू. पांच हजारपासून ख्रि. पू. सातव्या शतकापर्यंत होतीं. या प्राचीन साम्राज्यांचा इतिहास तिसरा विभाग 'बुद्धपूर्व जग' यांत आलाच आहे. त्यानंतर या राष्ट्रकांपैकीं बर्याच राष्ट्रकांचा एका सत्तेखालीं समावेश करणारें जें इराणचें प्राचीन साम्राज्य त्याच्या इतिहासाकडे आतां वळूं.