प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
हिअरेटिक, ग्रीक, फिनीशियन, आसुरी व ईजिअन लिपि:- यूरोपीय लोकांत अशी दंतकथा प्रचलित आहे कीं, मिसर देशच्या किंवा बाबिलोनच्या लोकांपासून फिनीशियांतील लोक लेखनकला शिकले, व कदमस नामक एक फिनीशियाचा माणूस ती युरोपांत घेऊन आला. या दंतकथेंतील कदमस हें नांव जरी शुद्ध ग्रीक लोकांच्या कल्पनासृष्टीत निर्माण झालेलें आहे, तरी उत्तरकालीन ग्रीसमधील वर्णमाला फिनीशियांतून आली असणें पुष्कळ संभवनीय आहे, असें आतां एकोणिसाव्या शतकांतील पंडितांच्या परिश्रमानें सिद्ध झालें आहे. फिनीशियांतील लोकांनी आपली वर्णमाला कोणापासून घेतली यासंबंधी मात्र विद्वानांचें एक मत नाहीं. कोणी म्हणतात की फिनीशियाची लिपि मिसर देशाच्या चित्रलिपीपासून तयार झाली होती, तर कोणाच्या मतें तो मान बाबिलोनच्या कीलाकृति लिपीस दिला पाहिजे.
परंतु यापैकीं कोणतेंच मत खरें नाही असें कदाचित् पुढें नवीन शोधांअंतीं आढळून येईल. मिसरदेशीय संस्कृतीच्या अभ्यासकांनी फिनीशियाची लिपि ही इजिप्तमधील चित्रलिपीच्या हिअरेटिक ( पुरोहिती ) नांवाच्या रूपांतरित लिपीपासून बनविली असल्याचें सिद्ध केलें आहे असें वाटतें न वाटतें तोंच, असुरसंस्कृतीचे अभ्यासक पुढें आले व म्हणूं लागले कीं, बाबलोनी लिपींतील कांही अक्षरांचे फिनीशियाच्या वर्णमालेंतील अक्षरांशी साम्य दिसत असून ही गोष्ट केवळ यदृच्छेनें घडून आली असेल असें म्हणतां येत नाहीं. आणि पुढें ह्या वादाचा निकाल लावण्याची अशा जेव्हां जवळ जवळ संपत आली, तेव्हां इजिप्तमधील जमीन पोखरीत असणार्या संशोधकांना असें आढळून आलें कीं ,ज्या अक्षरांबद्दल पंडितांमध्यें वाद चालू होता त्यांच्याशी अधिक साम्य असलेली अक्षरें अगदी स्वतंत्रपणें भूमध्यसमुद्राच्या सर्व किनार्यावर बहुतेक इतिहासपूर्वकालापासून प्रचलित होती !!
ईजिअन संस्कृतीचें मुख्य स्थान जें कीट बेट, तेथील नॉसॉस आदिकरून पुरातन काळापासून जमिनीखाली पुरलेल्या शहरांच्या जागा पोखरून ज्या गोष्टी आढळून आल्या ( आर्थर इव्हॅन्स यांचे प्रकाशित ग्रंथ पहा ) त्याहि पर्व समजुतीशीं तितक्याच विसंगत होत्या. या ठिकाणी लागलेल्या शोधावरून असें दिसून आलें की, पुरातनवस्तुशास्त्रज्ञ पुरातन ग्रीक संस्कृतीच्या नाशास कारण झालेली जी एक दोरिअन लोकांची स्वारी गृहीत धरतात, त्या स्वारीच्याहि पूर्वी क्रीट बेटामध्यें लेखनकला अवगत होती; व तिचा तेथील लोक उपयोगहि करीत होते. याचा अर्थ असा कीं, वर सांगितलेल्या पौराणिक गोष्टींतील कदमसच्याहि पूर्वी युरोपमध्यें लेखनकला प्रचारांत होती. तथापि कीटमधील प्राचीन लिपीचें ग्रीसमधील इतिहासकाळांतील लिपीशीं सादृश्य दिसत नसल्यामुळें, व उलटपक्षी ग्रीक लिपि ही फिनीशियन लिपीच्या वंशातील आहे हें निर्विवाद सिद्ध झालें असल्यामुळें कदमसची आख्यायिका कांही अगदीच चूक ठरत नाहीं.
फिनीशियन लिपीच्या वर्णमालेंतील चिन्हांसारखी अक्षरें फार पुरातन कालापासून अस्तित्वांत होतीं, ही गोष्ट गेल्या तीस चाळीस वर्षांत पुरातनवस्तुशास्त्रामध्यें जे नवीन शोध लागले आहेत त्यांशी विसंगत दिसत नाही. हे सर्व शोध जी एक गोष्ट सिद्ध करतात ती ही कीं, मानवी संस्कृतींतील बहुतेक महत्त्वाचे भाग यूरोपीय पंडितांस पूर्वी वाटत होते त्याहून अतिशय प्राचीन आहेत. तथापि एवढें मात्र खरें कीं, फिनीशियन वर्णमालेचा उत्पत्तिकाळ केवळ स्थूलमानानें ठरविण्यास देखील अद्याप आपणांस कांही पुरावा उपलब्ध झाला नाहीं. उपरिनिर्दिष्ट वर्णमालेंतील अक्षरें ध्वनिसूचक म्हणून उपयोजिलीं जाण्याच्या कदाचित् हजारों वर्षें अगोदर स्वामित्वदर्शक, मोजण्याच्या किंवा दुसर्या कसल्या तरी खुणा म्हणून प्रचारांत असूं शकतील. जी एक गोष्ट निश्चित दिसते ती ही कीं, मनुष्यास लेखनकला साध्य करून घेण्यास बराच कालावधि लागला असावा व प्रयासहि फार पडले असावे. वर्णमालेची कल्पना येण्याइतकें भाषेतील ध्वनींचे पृथक्करण करण्याचा विचार सामाजिक विकासाच्या फार पुढच्या अवस्थेंत व लेखनकलेंत बरीच सुधारणा होत होत शेवटीं सुचला असावा. ह्या बौद्धिक विकासाच्या निरनिराळ्या अवस्था कोणत्या होत्या हें केवळ कल्पना करूनच समजणें शक्य आहे. ह्या विकासांतील मुख्य मुख्य पायर्या पुढें दिल्याप्रमाणें असाव्यात.