प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
वेदादि ग्रंथ मुखोद्रत करण्याच्या पूर्वपरंपरागत रूढीचीं कारणें:- महाभारत, स्मृतिग्रंथ, पुराणें आदिकरून ज्या ग्रंथांत अनेक प्रक्षिप्त भाग आढळून येतात व ज्यांच्या मूळच्या मजकुरांत वारंवार भर पडत जाऊन त्यांच्या संकलनाचें कार्य खिती शकाच्या आरंभानंतर केव्हां तरी करण्यांत आलें असें मानलें गेलें आहे, त्यांचा आधार प्रस्तुतच्या विवेचनांत मुद्दाम घेतला नाही हें लक्षांत ठेविलें पाहिजे. वेदादि जे ग्रंथ आज पिढ्यानुपिढ्या अक्षरश: जसेचे तसेच चालत आले आहेत त्यांच्याच आधारावर भरतखंडातील लेखनकलेचें प्राचीनत्व दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. येथें कोणी अशी शंका घेईल की, भरतखंडात जर लेखनकला पुरातन काळापासून अस्तित्वांत असती, तर वेदादि ग्रंथ मुखोद्गत करण्याची चाल पसरण्याचें प्रयोजन काय ? वेदसंहितांचें पठन केलें जाऊन त्या गुरूमुखानें पुन्हां नवीन पिढीस शिकविण्यांत येत होत्या, यावरूनच केवळ त्या काळीं वेदसंहिताच्या लिहिलेल्या पोथ्या नव्हत्या असें प्रतिपादन करणें बरोबर नाहीं. कारण वेदांतील स्वरांचें शुद्ध उच्चारण व्हावें म्हणून वेदाच्या लिहिलेल्या पोथ्या असूनहि ते गुरूमुखानें शिकण्याची आवश्यकता भासत असली पाहिजे. स्वराचा शुद्ध उच्चार करण्यांत आला नाहीं तर लागलाच मंत्राच्या अर्थामध्यें फरक [ दुष्ट:शब्द: स्वरतो वर्णतो वा मिथ्या प्रयुक्तो न तमर्थमाह स वाग्वज्रो यजमानं हिनस्ति यथेन्द्रशत्रु: स्वरतोऽपराधात ! (पतंजलीचें महाभाष्य प्रथम आन्हिक) ] होत असल्यामुळें, गुरुनें एक एक मंत्रच नव्हे पण एक एक पदहि आपल्या शिष्यांस म्हणून दाखवून व त्याप्रमाणें त्यांच्याकडून तें म्हणवून घेऊन वेदपठन करविण्याची ऋग्वेद काळांतहि वहिवाट होती [ ऋग्वेद ७.१०३,५ ( यदेषा मन्योन्यस्य वाचं शाक्तऽस्येव वदति शिक्षमाण:)], पोथीवरून वेद पठन करणें निषिद्ध मानलें गेलें आहे [‘ यथैवान्याय विज्ञाताद्वेदाल्लेख्यादिपूर्वकात् | शुद्रेणाधिगताद्वापिधर्मज्ञा नं नसंमतम् || (कुमारिलचें तंत्रवार्तिक, १.३). ‘ गीती शीघ्री शिर: कम्पी तथा लिखितपाठक: | अनर्थज्ञोऽल्पकण्ठश्च षडेते पाठकाधमा: ||’ (याज्ञवल्क्य शिक्षा)] याचें तरी कारण हेंच आहे. गुरूमुखानेंच फक्त वेद शिकण्यांत यावा असा नियम घालून दिल्यानें श्रोत्रियांविषयींचा आदरहि कायम रहात होता. यज्ञकर्म चाललें असतांना प्रंसग पडल्याबरोबर लागलाच त्या त्या विषयांसंबंधी मंत्र म्हणतां यावा हें वेद मुखोद्रत करण्यांचें दुसरें मुख्य कारण आहे. आपल्या ज्ञानाचा आपणास वेळेवर उपयोग व्हावा म्हणूनच न्याय, व्याकरण इत्यादि शास्त्रांवरील ग्रंथहि पाठ करून ठेवण्याची वहिवाट पडली आहे [ पुस्तकस्थातु या विद्या परहरस्तगंत धनम् | कार्यकाले तु संप्राप्ते न सा विद्या न तद्धनम् || (चाणक्यनीति) ]. याचकरितां निरनिराळ्या शास्त्रांवरील ग्रंथात संक्षिप्त स्वरूप देऊन ते सूत्रात्मक करण्यांत आले. अमरकोश, लीलावती इत्यादि फार मागून तयार झालेले ग्रंथहि श्लोकबद्ध करण्यांत आले याचें देखील हेंच कारण आहे. श्रौतसूत्र, गृह्मसुत्र, शुल्बसूत्र, पाणिनीची अष्टाध्यायी इत्यादि सूत्रात्मक ग्रंथ पाहून जें पंडित असें प्रतिपादन करतात कीं, त्या काळी ग्रंथ लिहून ठेवण्याची सोय नव्हती म्हणूनच लक्ष्यांत ठेवण्यास सोपें जावें या उद्देशानें यांनां इतकें क्लिष्ट स्वरूप देण्यांत आलें, त्यांनां आम्ही असें विचारतों कीं, मग ब्राह्मणांसहि असें संक्षिप्त स्वरुप कां देण्यांत आलें नाहीं, व ज्या वेळीं हिंदुस्थानामध्यें लेखनकलेचा सार्वत्रिक प्रसार झाला होता याबद्दल मतभेद नाही अशा काळीं देखील, अमरानें आपला संस्कृत कोश व लीलावतीच्या कर्त्यानें आपला गणित विषयावरील ग्रंथ श्लोकबद्ध लिहिण्याचा नसता उपद्व्याप कां केला ? ज्या ग्रंथांच्या पठनांत वेदांप्रमाणें स्वरभेदाची कांहीं भानगड नव्हती व जे घोकून ठेवण्याची विशेष आवश्यकताहि नव्हती, असेहि ग्रंथ पुढें केवळ जुन्या रूढीमुळें मुखोद्रत करण्यांत येऊं लागले, याच्या मुळाशीं हिदुंस्शानच्या लोकांतील गतानुगतिकपणाहि कांही अंशीं आहे यांत शंका नाहीं: म्हणूनच हिंदुस्थानांत कागदाचा इतका प्रसार झाल्यावरहि अजून देखील ताडपत्रावर ग्रंथ लिहिणें फार पवित्र मानण्यांत येतें व छापलेल्या पोथीवरूनच पठन करण्यांत कित्येकांना भूषण वाटतें.
भारतीय इतिहाससंशोधक मंडळाच्या संमेलनाच्या वेळी १९२१ सालीं रा. य. दाते यांनी याविषयी अधिक पुरावा पुढें मांडला होता तो येणेंप्रमाणें:-