प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
श्रुतिग्रंथातील व्याकरणविषयक उल्लेख:- वास्तविक पाहिलें असतां व्याकरणशास्त्राचें पारिभाषिक शब्द उपनिषदांपासून वेदसंहितांपावेतों सर्वच ग्रंथांत मधून मधून आढळून येतात. छांदोग्योपनिषदांत अक्षर [ हिंकार इति त्र्यक्षंर प्रस्ताव इति त्र्यक्षरं तत्समं|१| आदिरिति दव्यक्षरं (छांदोग्योपनिषद् २.१०)]; ईकार, ऊकार व एकार [ अग्निरीकार आदित्य ऊकारो निहव एकार: (छांदोग्योपनिषद् १.१३)]; स्वर,ऊष्मन् व स्पर्शवर्ण [ सर्वे स्वरा इन्द्रस्यात्मान: सर्व ऊष्माण: प्रजापतेरात्मान: सर्वे स्पर्शां मृत्योरात्मानो यदि स्वरेषूपालभे तेन्द्र शरणं... (छांदोग्योपनिषद् २.२२.३)]; हे शब्द सांपतात, व तैत्तिरीय उपनिषदांत वर्ण व मात्रा या शब्दांचा उल्लेख आलेला आहे [वर्ण: स्वर: । मात्रा बलम् (तैत्तिरी योपनिषद् १.१)]. ऐतरेय आरण्यकांत ऊष्मन्, स्पर्श, स्वर, अंत:स्थ [ तस्यैतस्यात्मन: प्राण ऊष्मरूपमस्थीनि स्पर्शरूपं मज्जान: स्वररूपं मांसं लोहितमित्येदन्यच्चतुर्थमन्त: स्था रूपमिति (ऐ.आ.३.२.१) ]; व्यंजन व घोष [तस्य यानि व्यंजनानि तच्छरीरं यो घोष: स आत्मा य ऊष्माण: स प्राण: (ऐ. आ. २.२.४,)]; हे व्याकरणांतील पारिभाषिक शब्द आले असून नकार व णकार आणि सकार व षकार यांच्यामध्यें भेद केलेला आढळून येतो [ स यदि विचिकित्सेत्सणकारं ब्रवाणो ॐ अणकारा ॐ इति.......सषकारं ब्रवाणो ॐ अषकारा ॐ इति (ऐ. आ.३.२.६)] व संधि [पूर्वमेवाक्षरं पुर्वरूपमुत्तमुत्तररूपं योऽवकाश: पूर्वरूपोत्तररुपेऽन्तरेण येन संधि विवर्तयति येन स्वरास्वरं विजानाति येन मात्रामात्रां विभजते......संधिविज्ञपनो साम...... (ऐ० आ० ३.१-५)] शब्दाचेंहि विवेचन मिळतें. या बहुतेक सर्व गोष्टी शाखायन आरण्यकांतहि आलेल्या आहेत. शतपथ ब्राह्मणांत एकवचन व बहुवचन यांमध्यें [थो नेदे कवचनेन बहुवचनं व्यवायामेति (शतपथ ब्रा० १३.५-१-१८)] भेद केलेला दिसून येतो; व व्याकरणांतील तीनहि लिंगांचा [ त्रेधविहिता इष्टका उपधीयन्ते पुंनाम्न्य: स्त्रीनाम्न्यो नपुंसकनाम्न्यस्त्रेधाविहितानि उ एवेमानि पुरुषस्याड्गानि पुंनामानि स्त्रीनामानि नपुंसकनामनि (शतपथ ब्राह्मण १०.५-१-२); वाक् ह एवैतत्सर्वे यत्स्त्री पुमान् नपुंसकं (शत.ब्रा. १०-५-१-३) ] उल्लेख सांपडतो. तैत्तिरीय संहितेंतील ऐंद्रवायव ग्रहाच्या म्हणजे सोमपात्राच्या कथेंत इंद्रानें आपणास व वायूस अशा दोघांनां मिळून एकच सोमपात्र दिलें जावें असा वर मागून घेऊन भाषेंचें व्याकरण केलें असें म्हटलेलें आहे [ वाग्वै पराच्यव्याकृतावदत्. ते देवा इन्द्रमब्रुवन् ‘ इमां नो व्याकुरू ‘ इति सोऽब्रवीद्वरं वृणै मह्यं चैवैष वायवे च सह गृह्याता इति तस्मादैन्द्रवायव: सह गृह्यते. तामिन्द्रो मध्यतोऽवकम्य व्याकरोत्तस्मादिंय व्याकृता वागुद्यते. तस्मात्सकृदिन्द्राय मध्यतो गृह्यते...... (तैत्ति. सं. ६.४.७)]. शतपथ ब्राह्मणांतही निरूक्त व निर्वचन हे शब्द योजून तीच कथा सांगितली आहे [ शतपथ ब्राह्मण ४.१-३-१२,१५-१६ ].ऐतरेय ब्राह्मणांत ॐ हें अक्षर अकार, उकार व मकार ह्या तीन वर्णांच्या संयोगानें झालें असल्याचें दाखविलें आहे [ तेभ्योऽभितप्तेभ्यस्त्रयोवर्णा अजायन्ताकार उकारो मकार इति तानेकधा समभरत्तदेतदो ॐ इति (ऐ. ब्रा. ५-३२). त्याचप्रमाणें कौशीतकी ब्राह्मण (२६-५) व आश्वलायन श्रौतसूत्र (१०-४) यांतही असेंच म्हटलें आहे ].
वर जीं श्रुतिग्रंथांतील व्याकरणविषयक पारिभाषिक शब्दांच्या उल्लेखांची उदाहरणें दिली आहेत, त्यांवरूनच केवळ आपणांस त्या काळांतील लोकांच्या व्याकरणासंबधीं ज्ञानाचें अनुमान काढतां येत नाहीं, कारण वेद, ब्राह्मणें, आरण्यकें किंवा उपनिषदें हें कांही व्याकरणविषयावरील शास्त्रीय ग्रंथ नाहीत. विषयाच्या अनुसंधानानें व्याकरणशास्त्रांतील जेवढे शब्द सहजगत्या येऊं शकले तेवढेच फक्त आपणांस ह्या ग्रंथांत पहावयास मिळतात. त्या काळांतील व्याकरणग्रंथ आज उपलब्ध नाहीत तरी हे शब्द मूळ व्याकरणशास्त्रंतच घडले गेले असले पाहिजेत हें उघड आहे. पाणिनीच्या व यास्काच्या पूर्वी वयाकरणविषयावर स्वतंत्र ग्रंथ झाले होते हे त्यांच्या ग्रंथातील निरनिराळ्या प्राचीन व्याकरणकारांच्या व निरुक्तकारांच्या नांवाच्या व मतांच्या उल्लेखांवरून सिद्ध झालें आहे. अर्थात् श्रुतिग्रंथ रचले जात असतांना व्याकरणशास्त्राचाहि अभ्यास होत होता असें मानणें प्राप्त होत असून ज्या अर्थी लेखनिबद्ध वाङ्मयाच्या अभावीं व्याकरण विषयावरील ग्रंथ तयार होणें संभवनीय दिसत नाहीं, त्या अर्थी वेदांइतक्या प्राचीन काळीहि भरतखंडांतील लोक लेखनकलेस अनभिज्ञ नव्हते असें अनुमान करावें लागतें.