प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.          
 
शक राजांचे लेख:- शक लोकांनी ग्रीकांपासून बॅक्ट्रियाचें राज्य जिंकून घेतल्यावर ते हिदुकूश पर्वत ओलांडून दक्षिणेस आले; व त्यांनीं पश्चिमेस हिरातपासून पूर्वेस सिंधूनदीपावेतों सर्व मुलूख पादाक्रान्त केला. नंतर त्यांनीं हळू हळू पुढें सरकून आणखीहि राज्यविस्तार केला. त्यांच्या नाण्यांवरहि एका बाजूस ग्रीक व दुसर्‍या बाजूस खरोष्टी अक्षरें दृष्टीस पडतात [ गा.; कॉ. ग्री. सी. प्लेट १६-२१. व्हाइटटेड; कॅ.कॉ. पं. म्यु. पुस्तक १,प्लेट १०-१४; व स्मि. कॅ. कॉ. इं. म्यु. प्लेट ८-९ ]. शकवंशी मोग (मोअ) राजाच्या कारकीर्दीतील त्याच्या पतिक नामक क्षत्रपाचा तक्षशिला येथें एक ( सं. ७८ चा ) ताम्रपटलेख [ ए. इं. (एपिग्राफिआ इंडिका); पुस्तक ४, पान ५५-५६] मिळाला आहे त्याची लिपीहि खरोष्ठीच आहे.