प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.  
 
वर्णमालेची निष्पत्ति:- हेनी स्मिथ विल्यम्स यांच्या मतें चित्रलेखन व ध्वनिचिन्हलेखन या दोन अवस्थांतून गेल्याशिवाय वर्णमालायुक्त कोणतीच लिपि तयार होणें शक्य नाहीं. अर्थात्, एखादें राष्ट्र दुसर्‍या राष्ट्राच्या अनुभवाचा फायदा घेऊन एखाद्या शास्त्रांत झपाट्यानें मधल्या पायर्‍या गाळून प्रगति करूं शकतें. स्वत: लेखनकलेचा विकासहि अशाच रीतीनें झालेला दिसतो. कारण बाबिलोनी व असुर लोक आपल्या ध्वनिचिन्हयुक्त लिपिचेंच कौतुक करीत बसले असतांना त्यांच्या पूर्व व पश्चिम दिशेला असलेल्या राष्ट्रांनीं इकडे त्यांच्या शब्दावयवांचें पृथक्करण करूऩ त्यापासून स्वर आणि व्यंजनें निर्माण केलीं. पारसिक व फिनीशियाचे लोक हीं ती दोन राष्ट्रें होत. तथापि पाश्चात्त्य पंडित ह्या दोन्हीहि राष्ट्रांनां वर्णमालेच्या शोधाचें सारखेंच श्रेय देत नाहीतं. पारसिक लोकांनी बहुधा मोठ्या कुरूसच्या वेळी बाबिलोनी लिपीची कांही अक्षरें घेऊन त्यांचा आपली वर्णमाला तयार करण्याच्या कामी उपयोग केला;  तथापि ह्या वेळीं फिनीशियाची वर्णमाला तयार होऊन कित्येक शतकें लोटली असल्यामुळें पारसिकांनां वर्णमालेची कल्पना फिनीशियाच्या लिपीपासूनच सुचली असली पाहिजे असें यूरोपीय पंडितांनां वाटतें. या दोन राष्ट्रांच्या कल्पकतेमध्यें जो कांही फरक समजला जातो तो हाच. कारण एकदां वर्णमालेची कल्पना सुचल्यावर प्रत्येक वर्णाकरितां निरनिराळें चिन्ह ठरविण्यास विशेष कल्पकता लागत नाहीं. तथापि याहि बाबतींत वर्णमालेच्या विकसनाचा अभ्यास केला असतां असें आढळून येतें कीं मनुष्याच्या मनाचा कल नेहमी नवीन कांही शोधून काढण्यापेक्षां जुन्याची नक्कल करण्याकडेच अधिक असतो.