प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
लेखनसाहित्य आणि लिपिस्वरूप यांचा संबंध:- लेखनकलेच्या पूर्वीपासूनचा इतिहास लक्षांत घेतां असें दिसतें कीं, भिन्नभिन्न प्रकारच्या लेखनसाहित्याचा प्राचीन लिपीवर एकंदरीत बराच परिणाम झाला असावा. बाबिलोन व मिसर देंशातील लोक प्रथमत: लेखनाकरितां मातीच्या विटांचा उपयोग करीत असत. त्याचा परिणाम असा झाला कीं, विटांसारख्या कणखर पदार्थांवर कोणत्या तरी बारीक अणकुचीदार हत्यारानें टोंचून लिहिण्याची पद्धति अमलांत येऊन कीलाकृति अक्षरें असलेली (क्युनिर्फॉर्म) लिपि तयार झाली.
त्याचप्रमाणें ग्रीक व रोमन लोकांनी उपयोगांत आणलेल्या लेखनपटांचा पृष्ठभाग चिकट मेणाचा असल्यामुळें ह्या लोकांमध्यें तुटक व असंयुक्त अशी लेखनशैली उत्पन्न झाली. याच्या मानांने थोड्या खरबरीत असलेल्या पापायरस नांवाच्या लेखनपटाच्या पृष्ठभागावर लिहिली जात असलेली लिपि किंचित् अधिक जोर देऊन लिहावी लागल्यामुळें तिची अक्षरें अतिशय किरटी बनलीं.