प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
लेखणी, परकार, रेखापाटी व कांबी:- शाई व ताडपत्र, भूर्जपत्र वगैरे कागदाच्या कोंटीतील वस्तू यांच्या शिवाय लेखणी, परकार, रेखापाटी व कांबी ह्या आणखी चार साधनांचा हिंदुस्थांनातील प्राचीन काळच्या ग्रंथलेखनामध्यें उपयोग होत असे. यापैकी लेखणी ही तर लेखनसामुग्रीतील एक अवश्य वस्तूच आहे. धूळपाटीवर लिहिण्याकरितां लांकडाची लेखणी वापरीत असत: कागदावर किंवा पटावर शाईनें लिहिण्यासाठी बोरूची किंवा वांसाची लेखणी करीत; व ताडपत्रावरील लेख लिहिण्यास एक प्रकारच्या लोखंडाच्या लेखणीचा ( म्हणजे शलाकेंचा ) उपयोग करीत. कमल, कुंडली इत्यादि आकृती काढण्यासाठीं जे निरनिराळ्या प्रकारचे लोखंडाचें सांचे वापरीत असत त्यांस परकार असें नांव होतें. रेखापाटी ही एक लांकडाची पातळ पाटी असून तिजवर सारख्या अंतरावर दोरे आवळलेले असत. ज्या कागदावर कांही लिहावयाचें असे तो ह्या पाटीवर ठेवून चांगला दाबला म्हणजे त्यावर समांतर रेषांच्या खुणा पडत. याच रीतीनें दोन ओळीच्या मध्यें आणखी खुणा पाडून प्रत्येक मोठ्या घराची दोन पोटघरें करण्यांत येत होतीं. यांपैकी वरील पोटघराच्या दोन ओळीत गेलें म्हणजे ओळी सरळ व समांतर येत व अक्षरें लहानमोठीं निघत नसत. कांबी ही एक लांकडाची पातळ पट्टी असून तिचा उपयोग रेघाटण्याच्या कामीं रूळाप्रमाणे करण्यांत येई.
लेखनपद्धतीच्या इतिहासांत पुढें दिलेल्या विकासावस्था दृष्टीस पडतात.
(१) चित्र, स्मारकचिन्हें इत्यादि, (विचारलेखन).
(२) चित्रोत्पन्न लिपि, चित्रस्वरूपी, (उच्चारलेखन).
(३) चित्रोत्पन्न मातृकालिपि ( उच्चारपृथक्करण आणि उच्चारलेखन).
(४) निरनिराळ्या भाषांस विशिष्ट लिपिपद्धतीची योजना व त्यायोगें विशिष्ट लिपीचे झालेले उपभेद.
लिपि भाषेस दृष्टिगोचर करिते, श्रुतिगोचर करीत नाहीं. श्रुतिगोचर करण्याची क्रिया “ नादलेखका”चें विवेचन करतांना दिली आहे. याशिवाय लिपींच्या इतिहासामध्यें लघुलेखन, मुद्गण इत्यादि प्रयोजनांमुळें अनेक निरनिराळे प्रकार उत्पन्न होतात ( लघुलेखन व मुद्रण पहा ). लघुलेखनाच्या प्रयोजनामुळें आणि छापण्याच्या हेतूमुळें इंग्रजीत लिहिण्याची लिपि आणि छापण्याची लिपि असें द्वैत झालें. मराठीत कांही अंशी तेंच द्वैत मोडी व बाळबोध यांमध्यें आहे. बाळबोधीचें स्वरूप मुद्रणाच्या सोईसाठीं बदलण्याची खटपट पुष्कळ चालू आहे. या खटपटींत भाऊशास्त्री लेले, बाळ गंगाधर टिळक, वैद्यबंधू मुंबई इत्यादि मंडळीनीं थोडाबहुत भाग घेतला आहे. बोलण्यामुळें हवेंत उत्पन्न होणार्या लहरीचे लेख घेण्याची जी कृति निघाली आहे तिजवरून जगांतील अस्तित्वांत असलेल्या सर्व लिपींस दूर टाकून स्वाभाविक सर्वजनमान्य लिपि उत्पन्न करावी अशीहि खटपट चालू आहे. एतद्विषयक काम जगदीशचंद्र बोस यांनीहि थोडेंसें केलें आहे.