प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
यूरोप, पश्चिम आशिया व आफ्रिका देशांतील लिपींच्या उत्पत्तीविषयी पाश्चात्त्यांचे सिद्धांत:-‘ फिनीशियन’ लोकांची फिनीशियन लिपि हिअरेटिक उर्फ पुरोहिती लिपीपासून निघाली असा तज्ज्ञांचा समज आहे. फिनीशियन लिपीपासून पुढें ग्रीक, रोमन व सेमेटिक या निरनिराळ्या लिपी निघाल्या. फिनीशियन लिपि ख्रिस्तपूर्व दहाव्या शतकाच्या सुमारास निघाली असावी व तिच्यापासून पुढें सुमारें तीन शतकांनी ग्रीक लिपीची उत्पत्ति झाली असावी, असा तज्ज्ञ मंडळींचा अभिप्राय आहे. सेमेटिक लिपींचे पुन्हां दक्षिण सेमेटिक व उत्तर सेमेटिक असे स्थानपरत्वें दोन भाग होतात. दक्षिण भागांत राहणार्या लोकांच्या म्हणजें दक्षिण सेमटिक लिपींत ‘ हिमिअरिटिक ’, इथिओपिक ’ ‘ कूफी ’ व अरबी ह्या लिपी मोडतात; व उत्तर भागांतील म्हणजे उत्तर सेमेटिक लिपींत ‘ अरमइक ’, ‘ सिरिअक ’ व ‘ खाल्डियन ’ या लिपींचा समावेश होतो. ‘हिमिअरिटिक’ ही दक्षिण अरब लोकांची लिपि असून ती मुसुलमानी धर्माच्या फार पूर्वीची आहे. या लिपीचें बरेचसे लेख ‘सेबा’ नांवाच्या राज्यांत सांपडतात म्हणून हिला ‘सेबियन’ असेंहि म्हणतात. ‘ अरमइक ’ ही सिरियांतील मेसापोटेमिया व पॅलेस्टाइन या भागांची भाषा; सिरिया देशास पूर्वी ‘अरम्’ असेंहि म्हणत असत, म्हणत, म्हणून या भाषेला ‘ अरमइक ’ हें नांव पडलें. या सर्व लिपीचा परस्पर संबंध पुढें एके ठिकाणीं दिलेल्या वंशावळीवरुन ध्यानांत येईल.
वर ज्या लिपीचा उल्लेख आला आहे त्यांशिवाय ‘क्युनिफॉर्म’ अथवा कीलाकृति नांवाची आणखी एक लिपि होती. ही आरंभी चित्रात्मक होती. परंतु मागून इराणी लोकांनीं हिला वर्णात्मक केलें. आशियांतील तुर्कस्थानांत युफ्रेटिस नदीच्या आसमंत भागीं पूर्वी असुरिया नांवाचें एक बलाढ्य राज्य होतें. तेथें या लिपीची उत्पत्ति झाली. असुरिया व बाबिलोन हीं दोन प्रतिस्पर्धी राष्ट्रें होती; व असुरियाचें राष्ट्र बाबिलोनमधून निघून पुन्हां त्यांतच अंतर्भूत झालें असें म्हणतात. एके काळीं मिडिया, इराण, आर्मीनिया व सरिया हे सर्व देश असुरियाच्या राज्यांतच मोडत होते. क्युनिफॉर्म लिपींतील लेख यांतील बहुतेक सर्व देशांत सांपडले आहेत. या लिपींतील अक्षरें बाणाच्या पात्याच्या कित्येक आकृती एकत्र करून झाल्यासारखी दिसतात म्हणून तीस ‘ कीलीकृति ’ असें म्हणतात. इराणचा प्रख्यात बादशहा दरायस किंवा दर्यूस यांने आपला वृत्तान्त याच विचित्र लिपींत ‘ बेहिस्तान ’ येथें खोदून ठेविला होता. हल्लीच्या पर्शियन लिपीची उत्पत्ति याच लिपीपासून झाली आहे.
भरतखंडातील प्राचीन लिपीविषयी पाश्चात्त्य पंडितांनीं जे आपले विचार प्रगट केले आहेत, ते नीट समजण्याकरतां यूरोप, पश्चिम आशिया व अफ्रिका या देशांतील निरनिराळ्या लिपींच्या उत्पत्तीसंबंधी जे सिद्धांत प्रचलित आहेत त्यांबद्दल कांही माहिती दिली आहे, प्राचीन इजिप्त अथवा मिसर या देशांतील पुरातन वस्तूंचे जे अवशेष उपलब्ध झाले आहेत, त्यांवरून तेथें एक चित्रलिपि प्रचलित होती. तिजविषयी माहिती मागें दिलीच आहे. या लिपीपासून पुढें जी एक वर्णात्मक लिपि निघाली तिला ‘ हिअरेटिक ’ असें नांव दिलें आहे, हिअरेटिकपासून फिनीशियन निघाली आणि त्या फिनीशियनपासून हिंदुस्थानांतील लिपी उत्पन्न झाल्या असा त्यांचा समज आहे, या समजाविषयीं विवेचन पुढें यईलच,
भारतीय लिपीचें मातृत्व फिनीशियन लिपीस देण्याचें एक मुख्य कारण असें की, भारतीयांस अत्यंत प्राचीन काळीं लिपिज्ञान नव्हतें हा समज होय.
फिनीशियन आणि भारतीय लिपी यांचा संबंध शोधण्यापूर्वी पाश्चात्त्य पंडितांनी गृहीत धरलेल्या वरील विचारांचे प्रथम परीक्षण करू.