प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
भरतखंडातील दोन प्राचीन लिपी: ब्राह्मी व खरोष्ठी:- मोर्यवंशी अशोक राजाच्या शिलालेखावरून व ख्रिस्तपूर्व चवथ्या शतकापासून पुढील सहा सात शतकांतील जीं प्राचीन नाणी सांपडली आहेत त्यांवरून असें दिसून येंतें की प्राचीन काळी आपल्या भरतखंडात दोन निरनिराळ्या लिपी प्रचलित होत्या. त्यांपैकी एका लिपीचा प्रचार सार्वत्रिक असून तिचीं अक्षरें प्रस्तुत नागरी लिपीप्रमाणें डावीकडून उजवीकडे लिहीत जाण्याचा परिपाठ होता, व दुसरी लिपि भरतखंडाच्या कांही विशिष्ट भागांतच उपयोगांत असून ती हल्लींच्या फारशी लिपीप्रमाणें उजवीकडून डावीकडे लिहण्यांत येत होती. ब्राह्मणांनी रचलेल्या ग्रंथांवरून या लिपींनां प्राचीन काळीं काय नांवे होतीं याचा बोध होत नाहीं. परंतु जैनांच्या ‘पत्रवणा’ सूत्रांत व ‘ रामवायांग ‘ सूत्रांत ज्या १८ लिपींची नावें दिली आहेत त्यांत मात्र ‘बंभी’ म्हणजे ब्राह्मी लिपीस अग्रस्थान दिलें असून ‘ भगवती ‘ सूत्राचा आरंभ तर ‘ नमो बंभीए लिविए ’ म्हणजे ब्राह्मी लिपीस नमस्कार असो असें म्हणूनच केला आहे. बौद्धांचें ‘ललित विस्तर’ नामक एक संस्कृत पुस्तक आहे त्याच्या दहाव्या अध्यायांत एकंदर ६४ लिपींचा उल्लेख आला असून त्यांतील पहिल्या दोन लिपींची नांवे ब्राह्मी व खरोष्टी अशीं आहेत.
इसवी सनाच्या पहिल्या आठ शतकांत कित्येक बौद्ध श्रमण आपल्या मताचा प्रसार करण्याकरितां भरतखंडातून चीन देशांत गेले व तेथें त्यांच्या मदतीनें संस्कृत व पाकृत पुस्तकांचीं चिनी भाषेंत भाषांतरे झालीं (पहा.विभाग १ ला पृष्ठें १३३-३५). खास चीन देशांतहि बुच्या तत्त्वांचें ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिंता संस्कृत व प्राकृत भाषांचे अध्ययन व अध्यापन होऊं लागलें व त्यामुळें विद्वानांनीं आपल्या भाषेंत बौद्ध धर्मासंबंधी जे अनेक ग्रंथ रचले त्यामध्यें भरतखंडांतील कित्येक प्राचीन गोष्टीविषयी माहिती आली आहे. इ. स. ६६८ साली ‘ फा युअन् चुलिन् ’ नावांचा जो बौद्ध ज्ञानकोश तयार ज्ञाला त्यांत ‘ललितविस्तरा’ प्रमाणेंच निरनिराळ्या ६४ लिपींची नांवे दिली असून तत्संबंधीं दिलेल्या वर्णनांत म्हटलें आहे की, “ देवी शक्ति अंगी असलेल्या ज्या तीन आचार्यांनी लेखनकलेचा शोध लावला त्या सर्वांत ब्रह्मा हा प्रसिद्ध असून त्यानें काढलेल्या अक्षरें डावीकडून उजवीकडे लिहिण्यांत येतात. किअलु-लु-से-टो या शब्दांचें संक्षिप्त रूप: किल-लु-से-टो = क-लु-से-टो= ख-रो-स-ट= खरोष्ठ] याचा दर्जा ब्रम्ह्याच्या खालोखाल आहे व त्याची [खरोष्टी] लिपि उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. सर्वांत कमी महत्त्वाचा आचार्य जो ‘त्संकी’ त्याच्या [चिनी] लिपींतील अक्षरें वरुन खालीं लिहीत जातात. पहिले दोन आचार्य भरतखंडांत शेवटचा चीनमध्यें होऊन गेला. पहिल्या दोन आचार्यांच्या लिपी त्यांनां देवलोकापासून प्राप्त झाल्या व तिसर्यानें आपली लिपि पक्ष्यादिकांच्या पदचिन्हांवरून तयार केली “ [इं. अं. पुस्तक ३४ पान २१].
उपर्युक्त चिनी ग्रंथावरून ही गोष्ट स्पष्ट होते की, भरतखंडांतील डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाणार्या लिपीस ब्राह्मी व उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाणार्या लिपीस खरोष्टी अशी प्राचीन काळीं नांवें होतीं. ब्राह्मी ही भरतखंडांतील स्वतंत्र लिपि होती व तिचा प्रचार सार्वत्रिक होता. म्हणूनच बौद्ध व जैन ग्रंथ त्या लिपींत लिहिले गेले. या ब्राह्मी लिपीलाच पाश्चात्त्य पंडितांनीं ‘ पाली ‘, ‘ इंडियन पाली ‘ ‘ साउथ अशोक ‘ अथवा ‘लाट’ अशीं पृथक् पृथक् नांवें दिली आहेत.