प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.     
 
गद्यग्रंथ:- निरक्षर समाजांत पद्यात्मक वाङ्मयाची वाढ ही कांही असंभवनीय गोष्ट नाहीं. परंतु गद्यात्मक ग्रंथ तयार करणें व ते शतकेंचीं शतकें कांहीहि फेरबदल न होऊं देतां जसेचे तसेच अक्षरश: कायम ठेवणें, हें कार्य मात्र निरक्षर समाजाच्या आवांक्याच्या बाहेरचें आहे. वेदसंहितांतील कांहीं भाग व ब्राह्मणांतील बराच मोठा भाग गद्यात्मक असून तीं ब्राह्मणें हे वेदावरील टीकात्मक ग्रंथ आहेत. लेखनकलेचें ज्ञान नसतांना कोणताहि गद्यात्मक ग्रंथ तयार होणेंच प्रथम असंभवनीय वाटतें, मग ब्राह्मणांसारख्या टीकात्मक ग्रंथाची गोष्ट तर बोलावयालाच नको. असा एखादा ग्रंथ कांही अकल्पित रीतीने तयार झाला तरी तो पिढ्यानुपिढ्या कांहिहि फेरबदल न होऊं देतां कायम कसा ठेवावयाचा ही पुन्हां दुसरी अडचण आहे.