प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
अर्वाचीन लिपि.
सिरिलिक:- ही लिपि इसवी सनाच्या नवव्या शतकांत होऊन गेलेल्या सिरिल नामक कॉन्सटंटाइन पंडितानें पश्चिम ग्रीकपासून तयार केली असें म्हणतात. तिच्यापासून निघालेल्या लिपी सर्व्हिया, रशिया वगैरे स्लाव्ह देशांच्या कांही भागांत प्रचलित आहेत.
मराठी व नागरी:- नागरीचा प्रचार उत्तर हिंदुस्थानांत ९ व्या शतकापासून असल्याचा पुरावा मिळतो; पण दक्षिण हिंदुस्थानांत राष्ट्रकूट (राठोड) वंशांतील दंतिदुर्ग राजानें दिलेल्या शके ६७५ तील एका दानपत्राची लिपि नागरी आहे. दक्षिणेंत हिला ‘नंदिनागरी’ म्हणतात. अ, छ, व, ण यांसारखीं कांही हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीं अक्षरें खेरीज करून उत्तरेकडील नागरी व महाराष्ट्रांतील मराठी या लिपींत मुळींच फरक नाहीं. प्राचीन नागरीच्या पूर्व शाखेपासून बंगाली लिपि निघाली. शिवाय नागरीपासून कैथी, महाजनी, राजस्थानी व गुजराथी या लिपी निघाल्या.
मोडी:- तिलोनमधून आणून हेमाडपंत उर्फ हेमाद्रि पंडित नामक कोणीं ब्राह्मणानें ही लिपि महाराष्ट्रांत सुरू केली असें कोणी म्हणतात. शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांनीं ही लिपि बनविली व पुढें पेशवाईमध्यें कोणी बिवलकर आडनांवाच्या गृहस्थानें तिच्यांत सुधारणा बेली, असें पंडित ओझा म्हणतात. तिसरें मत असें आहे कीं, ही लिपि फार जुनी असून मौर्य म्हणजे अशोककालीन बाह्मी लिपीपासून हिची उत्पत्ति झालेली आहे.
गुजराथी:- नागरी लिपीचें किंचित् विकृत स्वरूप होऊन ही लिपि बनली आहे. जलद लिहितां लिहितां मूळ नागरी अ, इ, ख, च, ज, झ, फ आणि ब आठ वर्णांत बदल होऊन हल्लींचे गुजराथी वर्ण बनले आहेत. इतर वर्ण सारखेच आहेत.
बंगाली:- ही लिपि नागरीपासून १० व्या शतकाच्या सुमारास निघाली. बदाल येथील एका स्तंभावर खोदलेल्या नारायणपालच्या कारकीर्दीतील १० व्या शतकांतल्या लेखांत हिचें मूळ स्वरूप पहावयास मिळतें. हिच्यापासून चालू बंगाली, मैथिल व उडिया या लिपी निघाल्या.
कैथी:- ही लिपि म्हणजे नागरीचेंच किंचित् विकृत रूप आहे, ही कायस्थ (कायथ) म्हणजे कारकून लोकांची त्वरेनें लिहण्याची लिपि असल्यामुळें तिला कैथी (कायथी) असें नांव पडलें. बहार प्रांतांतील प्राथमिक शाळांत ह्या लिपींत छापलेलीं क्रमिक पुस्तकें असतात. मिथिल, मगध व भोजपुरी असे हिचे तीन प्रकार आहेत.
मैथिल:- मिथिला म्हणजे तिरहूत देशांतील ब्राह्मण लोक या लिपीचा संस्कृत ग्रंथ लिहिण्याच्या कामी उपयोग करतात. ही लिपि बंगालीचें परिवर्तन पावलेंलें स्वरूप आहे. या प्रांतांतील इतर लोक नागरी किंवा कैथी लिपि वापरतात.
उडिया:- ही लिपि ओरिसा प्रांतात प्रचलित आहे. ही पुरातन बंगाली लिपीतून निघाली असें दिसतें, हिची बहुतेक अक्षरें इ. स. च्या १२ व्या शतकांतील सहस्राकोलच्या बंगाली लेखातील अक्षरांशीं जुळतात.
अहोमी:- ही लिपि आसाममध्यें प्रचलित आहे. हिचे पेगू उर्फ मोन लिपीशीं बरेंच साम्य आहे.
ब्रह्मी:- ही लिपि पालीपासून तयार झाली. इ. स. च्या ४ थ्या शतकाच्या अखेरीस बौद्ध लोक सिलोनमधून आराकानमध्यें आले तेव्हां त्यांनी पाली लिपि ब्रह्मदेशांत आणली. ब्रह्मी लिपीचे तीन भेद आहेत. एक किऔक्त्स (शिलालिपि), दुसरी चौकोनी पाली (बौद्धधर्मग्रंथलिपि) व तिसरी त्सलोंह (वाटोळी लिपि). या पोटलिपी तयार होण्याचें कारण वापरण्यांत येणारें निरनिराळें लेखनसाहित्य होय.
काश्मिरी (शारदा):- या लिपीचा प्रचार हिंदुस्थानच्या वायव्येकडील म्हणजे पंजाब व काश्मीर या प्रांतांत आहे. ८व्या शतकांतील मेरूवर्मा राजाच्या लेखावरून पाहतां त्या वेळी पंजाबांत कुटिल लिपि प्रचारांत होती. नंतर तिच्यापासून शारदा लिपि तयार झाली. या लिपीपासून हल्लींची कश्मिरी व टाकरी लिपि निघाली असून गुरूमुखी लिपीतलीं वरींचशीं अक्षरें या लिपींतून घेतलेलीं आहेत.
गुरुमुखी:- पंजाबच्या सामान्य व सुशिक्षित लोकांमध्ये पूर्वी ‘लंडा’ नांवाची एक माहाजनी लिपि प्रचलित होती. या लिपींत स्वरचिन्हं नव्हतीं. अघापहि कोठें कोठें तीं वापरीत नाहींत. असें म्हणतात कीं, शीख लोकांचे धर्मग्रंथ प्रथम याच लिपीत लिहिले जात असत व म्हणून ते शुद्ध रीतीनें वाचतां येत नसत. ही अडचण दूर करण्याकरतां गुरू अंगद (१५३८-५२) यानें आपले धर्मग्रंथ शुद्ध लिहिले जावे म्हणून नागरीप्रमाणें एक स्वरचिन्हयुक्त लिपि तयार केली ही लिपी गुरूच्या मुखांतून निघाली म्हणून हिला गुरूमुखी असें नांव पडलें. हिची बहुतेक अक्षरें तत्कालीन शारदा लिपींतून घेतलीं होतीं.
टाकरी:- ही लिपि म्हणजे शारदा लिपीचें मोडी स्वरूप होय. जम्मूमध्यें व पंजाबच्या उत्तरेकडील सर्व डोंगरी मुलखांत (बहुधा सिमला जिल्हा सोडून) हिचा प्रचार असून ती निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळ्या स्वरूपांत प्रचलित आहे. रजपूतांपैकीं ठाकुर लोकांची ही लिपि असल्यामुळें तिला ठाकरी, टाकरी असें नांव पडलें असावें. हिच्यांत स्वरचिन्हें मुळींच लिहीत नाहींत, किंवा व्यंजनांच्या पुढें स्वर स्वतंत्रपणेंच लिहतात.
ग्रंथ:- ही लिपि मद्रासच्या उत्तरेस, व दक्षिणेस अर्काट, सालेम, त्रिचनापल्ली, मदुरा, तिनवेल्ली या जिल्ह्यांत चालू आहे. ७ व्या शतकापासून १२ व्या शतकापर्यंत फेरफार होत होत ही लिपि बनलीं असून तिच्यापासून पुढें मलयाळं आणि तुळु या लिपी बनल्या. मद्रासेकडील तामिळ लिपींत वर्णसंख्या अपुरी असल्यामुळें संस्कृत ग्रंथ लिहिण्याकरितां ही लिपि योजितात, व म्हणून हिला ग्रंथलिपि हें नांव पडलें असावें असें अनुमान आहे.
तेलगू-कानडी:- ही लिपि मुंबई इलाख्यांतील सोलापूर विजापूर, बेळगांव, धारवाड व कारवार या जिल्ह्यांत, हैद्राबाद संस्थानच्या दक्षिण भागांत, व मद्रासइलाख्यांतील विजगापट्टण, गोदावरी, कृष्णा, कर्नूल, बल्लारी, अनंतपूर, कुडुप्पा, व नेलोर या जिल्ह्यांत प्रचलित आहे. ५ व्या शतकापासून १३ व्या शतकापर्यंत फरक होतां होतां हिच्यापासून हल्लींच्या तेलगू व कानडी या लिपी झाल्या आहेत.
कानडी:- ‘तेलगू-कानडी ’ पहा.
तामिळ:- मद्रास इलाख्यांतील ज्या भागांत ग्रंथलिपि आहे त्याच भागांत तमिळ लिपि प्रचलित आहे. या लिपींतील बरीच अक्षरें ग्रंथलिपींतील असून ‘क’ ‘र’ वगैरे कांही अक्षरें ब्राह्मी लिपींतून घेतलेलीं आहेत.
मल्याळम्:- मलयाळं किंवा केरळ देशाची ही लिपि असल्यामुळें तिला सदरहू नांव आहे. हिची अक्षरें ग्रंथ लिपीशी सदृश असून ती त्या लिपीचेंच मोडी स्वरूप आहे. ही, दक्षिण कानडा प्रदेशाचा दक्षिण भाग, सर्व मलबार, कोचीन व त्रावणकोरचा बराचसा (त्रिवेद्रमच्या उत्तरेकडील) भाग एवढ्या ठिकाणी प्रचलित आहे. तामिळ भाषा बोलणारे लोक संस्कृत पुस्तकें लिहिण्याकरितां हिचा उपयोग करतात.
तुळु:- ग्रंथलिपीपासून निघालेल्या मल्याळं लिपीचेंच एक परिवर्तन पावलेलें स्वरूप. दक्षिण कानड्यांतील तुळु भाषा बोलणारे लोक संस्कृत ग्रंथ लिहिण्याकरितां हिचा उपयोग करतात.
कारशुनी:- इ. स. ९ व्या शतकांच्या सुमारास नेस्टोरियन मिशनरी हिंदुस्थानांत आले त्या वेळीं त्यांच्या नेस्टोरियन लिपीपासून हिचा उद्भव झाला. नेस्टोरियन लिपींतील मूळ बावीस वर्णांत मलयाळं लिपींतील नऊ वर्णांची आणखी भर घालून ही लिपि तयार केलेली आहे. ही लिपि मलबारांतील नेस्टोरियन ख्रिस्ती लोक अद्याप वापरतात.
सिंहली:- दक्षिण सिंहलद्वीपांतील लिपि. ही दूरच्या प्रदेशांत गेलेली एक पाली वर्गांतील लिपि असून तिजवर प्राचीन ग्रंथ लिपीचा संस्कार झाला आहे.
यवद्वीपी:- ही लिपि जावांत प्राचीन काळीं प्रचलित असलेल्या कवि लिपींत आसामांतील शिलालेखांतल्या लिपीशीं सदृश असणार्या देश्य लिपींतील कांही अक्षरांची भर पडून बनली आहे. इ. स. च्या ९ व्या, १० व्या शतकांतील जे कवि लिपीचे ताम्रलेख उपलब्ध आहेत, त्यांची लिपि ब्रह्मदेशांतील किऔक्सूस लिपीशीं सदृश आहे, कवि लिपि जावा बेटांत बौद्ध धर्मप्रसारकांनी नेली.
सयामी:- सयामी लोक धर्मग्रंथ लिहिण्याच्या कामी चौकोनी पालीचा उपयोग करतात. परंतु तें लिहिण्याकरितां जी मोडी लिपि वापरतात ती आसामांतील शिलालेखांत पूर्वहिंदुस्थानांतील लिपीचें जें स्वरूप दृष्टीस पडतें त्यापासून निघालेली आहे.
कोरियन:- ही लिपि कोणी जपानी काताकाना लिपीपासून निघाली असें म्हणतात. ही वर्णमालायुक्त आहे. टेलर हा तिच्या अक्षरांच्या रूपावरून व वर्णांच्या अनुक्रमावरून तिची उत्पत्ति पालीपासून ठरवितो.
चिनी:- या लिपीसंबंधी माहिती प्राचीन लिपींखाली आलीच आहे.
काताकाना:- इ. स. च्या तिसर्या शतकांत जपानी लोकांस चीनपासून लिपिज्ञान झालें, त्यांनी चिनी लोकांच्या असंख्य अक्षरांतून आपल्या भाषेंतील प्रत्येक स्वतंत्र ध्वनीसाठीं एक एक चिन्ह घेऊन आपली लिपि बनविली. जपानी भाषेंत र, फ, व, प, न, त, द, त्स, ब, क, ग, य, स, झ आणि म असे पंधरा व्यंजनोच्चार व पाचंच स्वरोच्चार असल्यामुळें व त्यांच्या ७५ संयोगांपैकीं कांही त्या भाषेंत होतच नसल्यामुळें, ५० हूनहि कांही कमीच ध्वनिचिन्हांत त्यांचे सर्व काम होतें. या लिपीस काताकाना लिपि असें नांव असून तिच्या अक्षरांत चिनी अक्षराची एकच बाजू (काट) घेतली असल्यामुळें ती फार सोपी झाली आहे. ही इसवी सनाच्या नवव्या शतकापूर्वी केव्हां तरी निघाली.
हिरागाना:- हिची उत्पत्ति चिनी लिपीच्या (गवती अक्षरें) त्सौनामक मोडी स्वरूपापासून झाली. या ध्वन्यक्षर लिपींत ३०० चिन्हें आहेत.
अनामी:- ध्वन्यक्षरलिपि. ही चिनीपासून निघाली.
मांगोलियन:- ही लिपि नेस्टोरियन मिशनर्यांच्या एस्ट्रांघेला लिपीपासून निघालेल्या उइगर लोकांच्या वर्णमालेंत तिबेटी वर्णमालेंतील पांच वर्णांची भर घालून तयार केलेली आहे. काश्गर हें या मिशनर्यांचें धर्मप्रसाराच्या कामाचें केंद्रस्थान असून तेथें ते ७ व्या शतकांतच गेलेले होते. १२ व्या व १३ व्या शतकांत उइगर लिपीचा सर्व मांगोलियन साम्राज्यांत प्रसार झाला. १३ व्या शतकाच्या पूर्वार्धानंतर उइगरपासून मांगोलियन लिपि बनली तिच्यापासून पुढें कालमुक व मांचू या असंस्कृत लोकजातींच्या लिपींचा उद्भव झाला. मांगोलियन व तत्संभव सर्व लिपी वरून खाली डावीकडून उजवीकडे लिहितात. हल्ली ही लिपि गोवीमैदानाच्या उत्तरेकडील मांगोलियन बौद्ध व खाल्फा लोक वापरतात.
कालमुक:- मांगोलियन लिपि पहा. १७ व्या शतकाच्या आरंभास मांगोलियन लोकांची कालमुक नांवाची शाखा मांगोल-गालिक वर्णमाला घेऊन व्होल्गा नदीच्या मुखाजवळ रहावयास गेली, तेथें ही लिपि तयार झाली. तेथील बौद्ध वाङ्मय या लिपींत लिहून ठेवलेलें आहे.
मांचू:- ‘मागोलियन लिपि’ पहा. ही लिपि मांचुरिया व बैकल सरोवराच्या उत्तरेस वसाहत करून राहिलेल्या मांगोल लोकांत प्रचलित आहे.
सिरो-खाल्डी:- पर्शियामधील ख्रिस्ती लोकांना नेस्टोरियन असें म्हणतात. हे नेस्टोरियन लोक ससेनियन राजांच्या कारकीर्दीत जी लिपि वापरीत असत तिलाच नेस्टोरियन किंवा सिरो-खाल्डी असें नांव आहे. इ. स. ६०० मधील नेस्टोरियन लोकांचा लेख उपलब्ध आहे. परंतु त्याची लिपि एस्ट्रांघेलो लिपीहून विशेष भिन्न नाहीं. पण इ. स. ८९९ तल्या हारान येथील लेखांत मात्र नेस्टोरियन लिपीचें वैशिष्टय प्रथम दिसून येतें. अझेर बिझान या पार्शियन प्रांतांतील सिरो-खाल्डिक चर्चचे लोक अद्यापि ही लिपि वापरतात. मलबारांतील कार्शुनी लिपीचा उद्भव हिच्यापासूनच झाला आहे.
अरबी:- ही लिपि अरमइकपासून निघालेल्या नेस्खी लिपीपासून विकास पावली. हींत र्हस्व स्वर नाहींत. स्वरभेद दाखविण्यासाठी टिंबें वापरतात, पण तीहि इ. स. च्या ४ थ्या शतकापूर्वी नव्हतीं. हींत अक्षरें २२च आहेत, पण २९ व्यंजनोच्चार व्यक्त करून दाखवितां येतात. अक्षरांची रूपें सारखी होत चालल्यामुळें त्यांच्यामधील भेद टिंबांसारख्या कृत्रिम उपायांनी दर्शवावा लागतो. दोन अक्षरांपेक्षां एकाच अक्षराच्या दोन रूपांत अधिक फरक दिसतो. अरबी वाचणारास अक्षरापेक्षां शब्दाची ओळख लवकर पटते.
टर्किश (तुर्की):- ही लिपि अरमाइकपासून निघालेल्या नेस्खीचेंच एक विकास पावलेलें स्वरूप आहे. तींत व हिंदुस्थानींत किंवा पर्शियनमध्यें मुख्यत: अक्षरांच्या संख्येंतच फरक दिसून येतो. टर्किशमध्यें वर्णसंख्या बत्तीस व पर्शियनमध्यें तीस आहे.
पर्शियन:- पर्शियन लिपि हें नांव मुख्यत: इराण मधील अर्वाचीन पर्शियन भाषेचे उच्चार व्यक्त करण्याकरितां फेरफार करून घेतलेल्या नेस्खी अरबी लिपीच्या स्वरूपास देतात. इराणमध्यें पूर्वी क्युनिफार्म म्हणजे कीलाकृति लिपि होतीं. पर्शियन लिपीची वर्णसंख्या बत्तीस आहे.
हिंदुस्थानी [उर्दु]:- ही लिपि अरमइक लिपीपासून निघालेल्या नेस्खी लिपीचेंच एक विकास पावलेलें स्वरूप आहे. हिंदुस्थानांतील देश्य वर्णमालेच्या अक्षरांच्या अनुक्रमाशीं जुळवून घेण्याकरितां नेस्खीच्या मूळ वर्णानुक्रमांत फेरफार करून व स्थानिक उच्चार व्यक्त करण्याकरितां मूळ वर्णांत कांही नवीन अक्षरांची भर घालून हिंदुस्थानांत वापरण्यांत येणारी ही लिपि बनली आहे.
अर्वाचीन सामारिटन:- हिची उत्पत्ति प्राचीन हिब्रूलिपीपासून झाली. ती हल्ली नेब्लस येथें असलेल्या सामारिटिन लोकांच्या लहानशा समाजांत धर्मग्रंथांकरितां वापरण्यांत येते. व्यवहारामध्यें मात्र हे लोक अरबी लिपीच वापरतात. आपल्या आद्य जननीशीं जास्तीत जास्त साम्य ठेवणारी रोमन कॅपिटल लिपीशिवाय ही एकटीच लिपि आहे. हिच्या वर्णमालेंतहि २२ अक्षरेंच आहेत.
रॅबिनिक:- हा एक हिब्रू लिपीचाच प्रकार आहे. हिच्यांत दोन पोटभेद आहेत. उत्तर रॅबिनिक जर्मनी व पोलंडकडील ज्यू लोकांत प्रचारांत असून दक्षिण रॅबिनिक इटाली व स्पेनकडील ज्यू लोक वापरतात.
अर्मिनियन:- ही लिपि बरीच अर्वाचीन आहे. ती मेस्त्रॉब नामक एका बिशपानें इसवी सनाच्या ४ थ्या शतकानंतर काढलेली दिसते. टेलर हा तिचा संबंध इराणी लिपीशी जोडतो, परंतु ब्रिटानिकाकारास ती ग्रीकसंभव आहे हेंच मत सयुक्तिक दिसतें.
जॉर्जियन:- या लिपीसंबंधानें अशी दंतकथा आहे कीं, बिशप मेस्त्रॉब यानें ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याकरितां आर्मीनियन लिपि बनविल्यावर इ.स. ४१० मध्यें त्यानें आयबेरियन म्हणजे जॉर्जियन लोकांत जाऊन त्या लोकांनां अठ्ठावीस अक्षरांची लिपि दिली, तिलाच जॉर्जियन लिपि म्हणतात.
ग्रीकमायन्यूस्कयूल:- फिनीशियन लिपि खि. पू. नवव्याआठव्या शतकाच्या सुमारास (कोणाच्या मतें त्याच्याहि अगोदर) इजियनमार्गे ग्रीसमध्यें येऊन प्राचीन ग्रीक लिपि तयार झाली. ती उजवीकडून डावीकडे लिहिली जात असे. पुढे तिची लेखनशैली बदलली व आयोनियांत प्रचलित असलेल्या लिपीपासून इ.स. च्या चवथ्या शतकांत अर्वाचीन ग्रीक लिपि तयार झाली.
रोमन:- प्राचीन लिपींपैकी ‘ रोमन ’ लपीची माहिती पहा. जेव्हां छापण्याची कला जर्मन भिक्षूंनीं आल्पसपर्वताच्या दक्षिणेस नेली तेव्हां तेथें ते प्रथम कृष्णाक्षरी ठशांचा (जर्मन ब्लॅकलेटर टाईपचा) उपयोग करीत असत. परंतु हीं अक्षरें चांगली दिसत नसल्यामुळें त्यांच्या पुस्तकांचा. बाजारांत खप होईना. म्हणून इटालियन कारकून जी बारीक सुंदर अक्षरें वापरीत असत त्यांच्या धर्तीवर त्यांनीं आपले नवे ठसे पाडले. १४६५ पासून या ठशांत सुधारणा होत होत हल्लीची छापण्याची रोमन लिपि तयार झालेली आहे. इंग्रजी पुस्तकांतून आपण हल्ली जी लिपि पाहतो ती हीच होय.
इटालिक:- इटालिक म्हणजे तिरपी छापलेली रोमन अक्षरें. ह्या इटालिक अक्षरांचा मूळ उगम इ०स ० १५०१ मध्यें जें व्हर्जिलचें काव्य छापण्यांत आलें त्यांत जीं अर्धमोडी रोमन अक्षरें वापरली होती त्यांपासून झाला आहे. इटालियन लिपि म्हणून जिला म्हणतात तीत व इंग्लिश लिपींत अक्षरांच्या संख्येशिवाय दुसरा विशेष फरक नाही. इटालियन लिपींत बावीस अक्षरें व इंग्लिशमध्यें सव्वीस आहेत.
इंग्लिश:- हिची लिहिण्याची मोडी अक्षरें अपकृष्ट कॅरोलाइन मायन्थुस्क्यूलपासून निघालेल्या दरबारी लिपीपासून तयार झालीं. तथापि इलिंझाबेथच्या काळीत प्रचलित असलेल्या इटालियन तर्हेचा तिजवर बराच परिणाम झाला आहे. ही लिपि मूळ अक्षरांच्या फांट्यांत मुरडींची वाढ होऊन बनलेली उघड उघड दिसते. कॅरोलाइन लिपि ही प्राचीन रोमन लिपीपासून निघाली होती. आरंभीची इंग्रजी पुस्तकें कॅक्सटननें आणलेल्या (१४७१-७७) (जर्मन) कृष्णाक्षरी ठशांत छापली गेलीं. पुढें अर्धशतकानें पॅरिसहून रोमन अक्षराचें ठसे इंग्लंडमध्यें आले.
जर्मन:- हिची लिहण्याची मोडी अक्षरें मेरोव्हिंजियन मोडी लिपीपासून बनलेल्या बादशाही दफ्तरांतील लिपीपासून तयार झालीं. जर्मन पुस्तकांत कृष्णाक्षरी ठशांचा उपयोग करण्यांत येत असून छापण्याच्या कामीं त्यांचाच उपयोग प्रथम करण्यांत आला होता. हे कृष्णाक्षरी ठसे म्हणजे मध्ययुगीन हस्तलिखितांतील अक्षरांची नक्कल होय.
सर्व्हियन:- हिची उत्त्पत्ति ९ व्या शतकांतील ग्रीक अन्शल्सपासून निघालेल्या सिरिलिक लिपीपासून झालेली दिसते. ही सिरिल नामक पंडितानें इ. स. ८५५-८६३ या सुमारास बनविली अशी हिच्याविषयी एक दंतकथा आहे. हिने लवकरच ग्लॅगोलिटिक लिपीची जागा घेऊन तिला नामशेष करून टाकलें. तिच्यापासून पुढें जी सर्व्हियन लिपि निघाली तींत फक्त ४ च अक्षरें जास्त आहेत.
वालाशियन:- ही लिपि वालशियन लोकांनी आपल्या प्रांतांत प्रचारांत असलेल्या सिरिलिक वर्णमालेचे कांही निरर्थक स्वर व इतर अक्षरें गाळून आणि तींत स्वत: जरूर असलेल्या दोन नवीन अक्षरांची भर घालून तयार केली. हीत एकंदर २७ अक्षरें आहेत. परंतु वालाशियन लोकांच्या लॅटिन भाषेस स्लाव्ह लिपि जुळेशी नसल्यामुळें तिची जागा आतां बहुतेक रोमन लिपीनें घेतलेली आहे.
ग्लॅगोलिटिक:- ही ल्लव्ह लोकांची लिपि असून तिचा जन्म इतर बहुतेक यूरोपीय लिपींप्रमाणें पश्चिम ग्रीकपासूनच झाला होता. हिची जागा अंशत: हिच्याहून सर्व प्रकारें श्रेष्ठ असलेल्या सिरिलिक लिपीनें घेतली आहे. ग्लॅगोलिटक हें नांव ‘ शब्द ’ या अर्थाच्या एका बल्गेरियन शब्दापासून पडलें आहे, म्हणजे या लिपीचें नांव बल्गेरियन आहे. स्लाव्ह दंतकथेप्रमाणें हिची उत्पत्ति इ. स. च्या ४ थ्या शतकाइतकी जुनी आहे. ही लिपि स्लोव्हेनियन, इलीरियन (अल्बेनियाच्या उत्तरभागाचें पुरातन नांव), क्रोऐशियन व दुसरे पश्चिम स्लाव्ह लोक यांच्यामध्यें प्रार्थना लिहिण्याकरितां आरंभी प्रचलित होती. हिचीं अक्षरें पुढे सिरिलिक लिपीमध्यें अंतर्भूत करून घेण्यांत आलीं. इतकेच नव्हे, तर अक्षरांची नांवे सु दोन्ही लिपींत एकच आहेत. ग्लॅगोलिटिक लिपीची जागा आतां बहुतेक रोमन लिपीनें घेतली आहे. ही क्रोआशिया व क्कर्नेरो बेटांत १७ व्या शतकापर्य़ंत प्रचलित होती. हिची उत्पत्ति प्राचीन मोडी ग्रीक लिपीपासून झालेली दिसते तथापि याबद्दल विद्वानांत अद्यापि बराच मतभेद आहे. कांही रशियन अक्षरांची उत्पत्तीहि या लिपीतील अक्षरांपासून दाखवितां येते.
रशियन:- ही लिपि थोडक्याच वर्षांपूर्वी एका मोठ्या साम्राज्याची सरकारी कामकाजाच्या कागदोपत्रीं वापरण्याची लिपि असल्यामुळें भौगोलिक विस्तारांत तिचा लॅटिन व असबी लिपीच्या जोडीचा दर्जा आहे. या लिपीच्या इ. स. ९९६ मधील शिलालेखांतील अक्षरांचे स्लाव्ह पुरोहितांच्या सिरिलिंक अक्षराशी बरेंच साम्य दिसतें. पिटर दि ग्रेटच्या कारकीर्दीत जुन्या रशियन वर्णमालेतील ४८ वर्णांपैकी १४ वर्ण अनवश्यक म्हणून गाळण्यांत आले. कित्येक अक्षरांची रूपें बदललीं व एक अक्षर नवीन बनविण्यांत आलें.
अल्बेनियन:- उत्तर अल्बेनियांतले लोक लॅटिन वर्णमाला वापरतात. परंतु दक्षिण अल्बेनियामध्यें मात्र ग्रीक मायन्युरक्यूलपासून अल्बेनियन भाषेच्या सोईसाठी टिंबांच्या साहाय्यानें कांहीं नवीन अक्षरें बनविलेली व दोन तीन रोमन अक्षरें असलेली एक निराळी लिपि वापरतात. हिलाच अल्बेनियन असें म्हणतात.
रोमइक:- रोमइक अथवा नूतन हेलेनिक लिपि. या लिपींतील अक्षरांचे पश्चिम यूरोपांतील लिपींच्या अक्षरांशी बरेच सादृश्य आहे.
मघरेबी:- ही लिपि मोरोक्को व अल्जियर्समध्यें प्रचलित असून तिची उत्पत्ति प्राचीन अरबी लिपीपासून झाली आहे. ती अरबीसंभव कूफी लिपीहून कमी रेखीव आहे. तिच्यांत अरबीच्या नेस्खी शाखेपेक्षां लपेटी कमी असल्यामुळें ती वाचावयास सोपी जाते.
प्युनिकउर्फकार्थजियन:- या लिपीची उत्पत्ति फिनीशियन लिपीच्या सिडोनी शाखेपासून झाली. या लिपीचें सर्वांत जुने लेख ख्रि. पू. ३र्या शतकांतील असून ते कार्थेज व मार्सेल्स येथें सांपडले आहेत नाणीं मात्र ख्रि. पू. ५ व्या शतकापासून १ ल्या शतकापंर्यतची मिळतात. यानंतर या लिपीस जें बरेंचसें मोडी व अपकृष्ट स्वरूप आलें तें उत्तर आफ्रिका व स्पेन येथे सांपडलेल्या नाण्यांवर दिसून येतें. सहारामधील भटकणार्या रानटी लोकांची हल्लीची लिपि प्युनिक लिपीच्या न्युमेडियन शाखेपासून निघाली असावी असा अंदाज आहे.
अम्हरिक:- अबीसीनियांतील लिपि. इ. स. १३०० तं अम्हर प्रातांतील घराणें सिंहासनारूढ झालें त्यावरून हिचें नांव पडलें. दक्षिण अरबस्थानांतून घीझ लोक अबीसीनियांत आले त्यांनी आपल्या बरोबर आणलेल्या हिमिअरिटिक लिपीपासून इ. स. ५०० च्या सुमारास इथिओपिक लिपि तयार झाली. ही ध्वन्यक्षरलिपि होती. तीत आणखी कांही अक्षरांची भर पडून अम्हरिक लिपि बनली, हींत ३३ व्यंजनोच्चार व ७ स्वरोच्चार यांच्या संयोगानें होणार्या निरनिराळ्या ध्वनींसाठी २३१ स्वतंत्र अक्षरें आहेत.
अझटेक:- मेक्सिकोंतील प्राचीन चित्रलिपि. स्पॅनिश लोक जेव्हां मेक्झिकोमध्यें आले तेव्हा या लिपींत नुकतींच कोठें ध्वनिचिन्हें तयार होण्यास सुरूवात झाली होती (मेक्सिकन लिपि पहा).
मेक्सिकन:- स्पॅनिश लोकांनी अमेरिकेंत पाय ठेवला तेव्हां मेक्सिकन अझटेक लिपि नुकतीच कोठें चित्रावस्थेंतून ध्वन्यक्षरावस्थेंत शिरत होती. स्पॅनिश लोक अमेरिकेंत आल्यावर त्यांच्या धर्मप्रसारकांनी देश्य लोकांची कल्पनाचिन्हें विकासवून त्यांपासून आपल्या भाषेंतील कल्पना व्यक्त करण्यासारखी एक लिपि बनविली.
मय:- युकाटनची लिपि. ही अझटेक चित्रलिपीपासून बनली असून तिनें चित्रलिपीच्या पुढची जी ध्वन्यक्षरलिपीची पायरी ती गांठली होती. हीत कल्पनाचिन्हांच्या व ध्वनिचिन्हांच्या जोडीला ज्यांना वर्णे हें नांव देंता येईल अशी आणखी २७ अक्षरेंहि होतीं असें मयांच्या संस्कृतीचें जे अवशेष सांपडले आहेत त्यांवरून दिसतें. मध्यअमेरिकेच्या देश्य लोकांनी ज्या निरनिराळ्या चित्रलिपी काढून विकासविल्या त्यांबद्दल अद्याप आपणांस जवळ जवळ कांहीच ज्ञान नाही.