प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
ऋग्वेदांतर्गत उल्लेख:- ऋग्वेदामध्यें लिख् धातूचा उपयोग आढळत नाही; पण अक्षर शब्द अनेक ठिकाणीं उपयोगांत आणलेला आढळतो. त्यापैकीं कांही ठिकाणीं तो क्षयरहित अशा विशेषणार्थी उपयोजिलेला दिसतो व कांही ठिकाणीं स्पष्टपणें वर्ण या अर्थी नामवाचक उपयोगांत आणिलेला दिसतो. उदाहरणार्थ:-
उप त्वा सातये नरो विप्रासो यन्ति धीतिभि: | उपाक्षरा सहस्त्रिणीं (७.१५,९).
यावरील भाष्य:- हे अग्ने त्वां नरो नेतारो यजमाना: विप्रासो विप्रा मेधाविन: धीतिभि: कर्मभि: सातये धनाय कामानां लाभाय वा उपयन्ति उपयन्ति उपगच्छन्ति | सहस्त्रिणी सहस्त्रसंख्याका अक्षरा क्षयरहिता स्तुतिरूपा अरमदीया वाकत्वामुपयाति च ||
याचा अर्थ:- हे अग्ने तुला श्रेष्ठ व बुद्धिमान् लोक धनाकरितां स्तवितात. व आमची सहस्रसंख्याक अक्षरवाणी तुला स्तविते. सहस्त्र अक्षरांनी युक्त वाणी तुला स्तविते.
‘ सहस्रपाथा अक्षरा समवेति’ (७.१.१४)- येथेंहि अग्नीची स्तुति आहे. येथें आमची वाणी अक्षर अशी सहस्त्र मार्गांनी तुजकडे येते असा अर्थ आहे. सायणांनी ‘अक्षरेण स्तोत्रेण’ असा ‘अक्षर याचा अर्थ केला आहे. येथें’ सहस्रपाथा म्हणजे निरनिराळ्या प्रकारच्या हजारों वृत्तांतं अथवा छंदांत अक्षरयुक्त वाणी म्हणजे आमची स्तुति तुजकडे येते असें म्हटलें असावें. एका ठिकाणीं तर अक्षर याचा वर्ण असा अर्थ स्पष्टच आहे.
ऋचो अक्षरे परमे व्योमन् यस्मिन् देवा अधि विश्वे निषेदु: | यस्तत्रवेद किमृचा करिष्यति य इत्तद्विदुस्त इमे समासते || (१.१६४,३९).
वेदांचे अक्षर म्हणजे जेथें सकळ देव वास करतात असा अत्यंत उंच स्वर्ग होय. तर तें ज्यानें जाणलें नाहीं तो वेद घेऊन काय करील ? ज्यांनी तें जाणलें तेच सुखी होऊन भेटतात.
वर जें सहस्राक्षरा असें वाचेला विशेषण लावलें आहे तेंच आणखी एका ठिकाणीहि आढळतें; व येथें सहस्र अक्षर म्हणजे वर्णयुक्त असाच त्याचा अर्थ होतो. कारण त्या ऋचेंत छंदाच्या पदांचा उल्लेख आहे.
गौरीर्मिमाय सालिलानि तक्षत्येकपदी द्विपदी सा चतुष्पदी अष्टापदी नवपदी बभूवुषी सहस्त्राक्षरा परमे व्यामेन् (१.१६४,४१).
उदकें निर्माण करणारी गाय हंबरडा फोडिते. ती एक चरणाची, दोन चरणांची आणि चार चरणांची होय. आठ चरणांची, नऊ चरणांची आणि हजार अक्षरांची होणारी ती गाय अत्यंत उंच स्वर्गी हंबरडा फोडते.
येथें एक पादाच्या, दोन पादांच्या वगैरे ऋचा असतात व हजार अक्षरांची स्तोत्रें असतात असें म्हटलें आहे.
एका ठिकाणीं अक्षर हें मापनसाधन म्हणून उल्लेखिलें आहे.
पत्र्चपदानि रुपो अन्वरोहत्र्चतुष्पदीमन्वेमिव्रतेन | अक्षरेण प्रतिमिम एतामृतस्य नाभावधि संपुनामि || (१०.१३,३,).
येथें अक्षरेण प्रतिमिम म्हणजे अक्षरानें मोज असें म्हटलें आहे.
अक्षर हें वाणीचें मापममान आहे हें स्पष्टपणें पुढील ऋचेंत दिसतें.
गायत्रेण प्रतिमिमीते अर्कमर्केण साम त्रैष्टुभेन वाकम् | वाकेन वाकं द्विपदा चतुष्पदाक्षरेण मिमते सप्तवाणी: || (१.१६४,२४).
गायत्र वृत्ताच्या योगाने अर्क रचतात, अर्काच्या योगानें साम (रचतात), त्रिष्टुभ् वृत्ताच्या योगानें वाक् (रचतात), द्विपाद अथवा चतुष्पाद वाकाच्या योगानें (अनु) वाक् (रचतात). अक्षरांच्या योगानें सप्तवृत्तें निर्माण करतात
या मंत्रात स्पष्ट म्हटलें आहे कीं, गायत्री त्रिष्टुभ, जगती, अनुष्टुभू, पंक्ति, बृहती, उष्णिह् हीं मूळ सात वृत्ते अक्षरांच्या योगानें मोजतात. गायत्र्यादिकांच्या पादांत अक्षरें घालून किंवा कमी अधिक पाद घेऊन (उदाहरणार्थ, चार गायत्रपाद घेतले म्हणजे अनुष्टुभ् वृत्त होतें) इतर वृत्तें,सामें, अनुवाक् इत्यादिकांची रचना करतात असेंहि यांत स्पष्ट सांगितलें आहे.
अश्वमेधप्रकरणांत जी अश्र्वाच्या अंगावर रेखा काढण्याची कृति आपणांस यजुर्वेदांत दिसते तिचा उल्लेख ऋग्वेदांतहि त्याच कर्मांत आहे. ‘अङ्का: सूना: परिभूषन्त्यश्वम् | (१.१६२,१३) असा एका ऋचेचा शेवटचा पाद आहे. या सुक्तांत अश्वाचें विशसन, पचन इत्यादि क्रियांचे वर्णन आहे त्यातं अङ्का: याचा अर्थ सायणांनी ह्दयाद्यवयवांकनसाधना: बेतसशाखा: असा केला आहे.
एका ठिकाणी ‘ उत त्व: पश्यत्र ददर्श वाचं | उत त्व: श्रृण्वत्र श्रृणोत्येनाम् |’ (१०.७१,४) असें म्हटले आहे. या ठिकाणी ‘अनेन अर्धेन अविद्वान अभिहित;’ असे सायणाचार्य म्हणतात. जो वाणीला पहात असूनहि पहात नाहीं, व ऐकत असूनहि ऐकत नाहीं, म्हणजे निरक्षर माणसाला लिहलेला लेख दिसत असूनहि उपयोग नाहीं असा याचा मथितार्थ आहे. येथें वाचं पश्यन् हे शब्द अर्थातच लिहिलेल्या अक्षरांनाच उद्देशून म्हटले असले पाहिजेत.