प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
खरोष्टी लिपि:- हिंदुस्थानांतील दुसरी प्राचीन लिपि जी खरोष्टी तिला निरनिराळ्या पाश्चात्त्य पंडितांनी ‘बॅक्ट्रियन पाली, ’ ‘ आरियनो पाली,’ ‘ नॉर्थ अशोक, ’ ‘ काबुलियन’ व ‘ गांधार ’ अशी निरनिराळीं नावें आपआपल्या इच्छेनुरूप दिलेली आढळतात. त्या लिपींत लिहिलेला अशोकाच्या पूर्वीचा एकहि शिलालेख अजूनपर्यंत सापडलेला नाहीं. तथापि पंजाबांत चालत असलेलीं इराणी लोकांची जी कांहीं प्राचीन नाणीं उपलब्ध झालीं आहेत त्यांवर मात्र ब्राह्मी किंवा खरोष्टी लिपींतील एक एक अक्षराचा ठसा पहावयास मिळतो.