प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.
खरोष्ठी लिपीचें सामान्य निरीक्षण:- आतांपर्यत खरोष्ठी लिपींतील जे लेख उपलब्ध झाले आहेत त्यांवरून असें दिसून येतें कीं, त्या लिपींत स्वरांमध्ये र्हस्व व दीर्घ असा भेद बिलकुल नव्हता. ती ज्या लिपीपासून निघाली तिच्यांतील स्वरांचें दारिद्य्र पाहिलें असतां खरोष्ठीत हा भेद नसल्याबद्दल कोणासहि आश्चर्य वाटणार नाहीं. खरोष्ठी लिपींतील सर्व स्वर ब्राह्मींतील किंवा प्रस्तुतच्या नागरींतील स्वरयुक्त व्यंजनाप्रमाणें अ ह्या स्वरासच निरनिराळी चिन्हें जोडून तयार केले होते. र्हस्वदीर्घाचा भेद नसल्यामुळें अ,इ,उ,ए,व व ओ एवढेच फक्त स्वर त्या लिपींत आढळून येतात. तींत अनुस्वाराचें चिन्ह आहे, पण विसर्गाकरितां मात्र कोणत्याहि चिन्हाची योजना केलेली दिसून येत नाहीं. न आणि ण या व्यंजनांच्या रुपांत विशेष भेद आढळून येत नाहीं. व त, न आणि र या अक्षरांचे एकमेकांशी बरेंच सादृश्य असल्या कारणानें साधारण माणसास तीं अक्षरे सहसा ओळखतां येत नाहीतं. ह्या लिपींत जोडाक्षरें फारशी आढळून येत नाहीत; व जी आहेत त्यांतहि अशीं कित्येक आहेत कीं, तीं अवयवभूत व्यंजनें एकमेकांस जोडून सिद्ध न करतां त्यांच्याकरितां कांही तरी मन: पूत रूपें योजिल्यामुळें त्यांनां ओळखणें फारच कठिण जातें (उदाहरणार्थ, या लिपींतील स्त्र. त्व, स्व. त्व इत्यादि जोडाक्षरें पहा). या लिपीत आणखी एक दोष दिसून येतो. आजपर्यंत सांपडलेल्या कोणत्याही खरोष्ठी लेखावरून तीत हलन्त व्यंजन लिहिण्याची कांही सोय असल्याचे दिसून येत नसल्यानें, त्या लिपींत व्यंजनान्त शब्द शुद्ध रीतीनें लिहितां येत नव्हते असें दिसून येतें.