प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.          

क्षत्रपांचे लेख:- शक राजांनी आपल्या मुलुखांतील निरनिराळ्या भागांचा कारभार पाहण्याकरितां नेमलेल्या अधिकार्‍यांस क्षत्रप म्हणत असत. क्षत्रप शब्द जरी संस्कृतासारखा दिसतो तरी तो प्राचीन इराणी भाषेंतील क्षत्र ह्मणजे जिल्हा या शब्दापासून सिद्ध झाला आहे. आणि क्षत्रप शब्दाचा अर्थ जिल्ह्याचा अधिकारी असा होतो असें बर्‍याच लोकांचे मत आहे. त्यास रा. वि का. राजवाडे आक्षेप घेतात. त्यांच्या मतें ज्या कालांत सत्रप शब्द इराणी भाषेंत सांपडावयास पाहिजे त्या काळांत सांपडत नाही, व यावरून तें असें अनुमान काढतात कीं, क्षत्रप हा शब्द भारतीय असून सत्रप हा शब्द क्षत्रप याचाच अपभ्रंश असावा. हे क्षत्रपहि बहुधा शकच असावे. पण त्यांनी पुढें आपल्या राजाची सत्ता झुगारून देऊन ते स्वतंत्र झाले. देशभेदानुसार या क्षत्रपांचे उत्तर क्षत्रप व पश्चिम क्षत्रप असे दोन भाग करितात. तक्षशिला, मथुरा इत्यादि उत्तरेकडील प्रांतांच्या क्षत्रपांस उत्तरक्षत्रप असें म्हणतात. पश्चिम क्षत्रपांत माळवा, राजपुताना, गुतराथ, काठेवाड, कच्छ व दक्षिणेकडील प्रांतांच्या क्षत्रपांचा समावेश होतो. उत्तरक्षत्रपांपैकीं (मनिगुलचा पुत्र) जिहोनिस, (आर्तसचा पुत्र) खरपोस्त, रंजुवुल (राजुल) इत्यादिकांची नाणी सांपडली आहेत. त्या सर्वांवर व पश्चिम क्षत्रपांपैकी फक्त भूमक, नहपान व चष्टन यांच्या नाण्यांवर खरोष्टी लेख मिळतात. पश्चिम क्षत्रपांतील राहिलेल्या सर्वांच्या नाण्यांवर ब्राह्मी लिपीतीलच लेख आढळतात. मथुरेचा महाक्षत्रप राजुल याच्या कारकीर्दीतील त्याच्या पट्टराणीचा, मुलाचा व आणखी कित्येक कमी दर्जाच्या माणसांचे लेख मथुरेस सांपडले आहेत. त्यांची व क्षत्रप गणकपवकचा मुलगा कविशिअ क्षत्रप याच्या रावळपिंडीच्या २० मैल अग्नेयीस माणिकिआल येथील स्तूपांत मिळालेल्या पितळेच्या डब्याच्या झांकणावरील लेखाची लिपि खरोष्टीच आहे [ ए. इ.; पुस्तक ९, पानें १४१-४७; व पुस्तक १२, पान २९९ ].